Monday, December 24, 2018


निवडणूक विषयक पहिले प्रशिक्षण संपन्न

नांदेड, दि. 24 :- जिल्हाधिकारी नांदेड यांची अधिसूचना दि. 26 नोव्हेंबर 2018 अन्वये नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री. हुजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्य निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. सदरील निवडणूकीसाठी दि. 14 डिसेंबर 2018 रोजी श्री. गुरु ग्रंथ साहिब भवन, नांदेड येथे , सर्व अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण संपन्न झाले . सदरील प्रशिक्षणामध्ये नांदेड, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर , उस्मानाबाद , परभणी , हिंगोली व चंद्रपुर जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक , संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी हे उपस्थित होते. निवडणूक प्रक्रीयेबाबतचे सविस्तर प्रास्ताविक श्री. अरुण डोंगरे , जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले . तसेच निवडणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याबाबतचे मार्गदर्शन श्री. संजय जाधव, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी उपस्थितांना केले. मतदान प्रक्रीयेबाबत आणि मतमोजणी करण्याबाबतचे प्रशिक्षण श्रीमती अनुराधा ढालकरी , उपजिल्हाधिकारी यांनी दिले.
सदरील निवडणूकीचे दुसरे प्रशिक्षण व निवडणूक साहित्य वाटप दि. 25 डिसेंबर 2018 रोजी श्री. गुरु ग्रंथ साहिब भवन, नांदेड येथे होणार असल्याबाबत सर्व संबंधितानी नोंद घ्यावी, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या वतीने कळविले आहे.
000000

Saturday, December 22, 2018


24 डिसेंबर 2018 रोजी राष्‍ट्रीय ग्राहक दिन
              नांदेड, दि. 22:- ग्राहकांच्‍या हक्‍कांची व ग्राहक संरक्षण कायदा याची जनतेत जागृती होण्‍याच्‍या उद्देशाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सोमवारी दिनांक 24 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता राष्‍ट्रीय ग्राहक दिन तहसिल कार्यालय, नांदेड येथे साजरा करण्‍यात येत आहे.
              या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे  राहतील व कार्यक्रमाचे अध्‍यक्ष, जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्‍यक्ष किशोरकुमार रं. देवसरकर राहतील. तसेच प्रमुख वक्‍ते नांदेड जि.ग्र..नि.मंच सदस्‍य रविंद्र बिलोलीकर, सदस्‍य श्रीमती कविता कौ. देशमुख,  अशासकीय सदस्‍य जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषदेचे डॉ. श्री.बा.दा. जोशी, जिल्‍हाध्‍यक्ष,.भा. ग्राहक पंचायत विभाग तथा सदस्‍य पुरुषोत्‍तम अमिलकंठवार, अन्‍न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण निधी व्‍यवस्‍थापन समिती, महाराष्‍ट्र हे  राहतील.
     सर्व जनता व ग्राहकांनी 24 डिसेंबर 2018 रोजी साजरा होणाऱ्या राष्‍ट्रीय ग्राहक दिनाच्‍या कार्यक्रमास तहसिल कार्यालय, नांदेड येथील सभागृह येथे सकाळी 11.00 वाजता उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जिल्‍हा पुरवठा अधिकारी, नांदेड यांनी केले आहे. 
****
 
 

Friday, December 21, 2018


आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची

माहिती सादर करण्याचे आवाहन

            नांदेड, दि. 21:- माहे  डिसेंबर-2018 या महिन्याचे वेतन देयक दाखल करतांना सर्व शासकिय, निमशासकिय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनाना सुचित करण्यांत येते की, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नांदेड यांचेकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती बाबतचे माहे-डिसेंबर-2018 अखेरचे ई. आर-1 त्रैमासिक विवरणपत्र माहे-31 जानेवारी-2019 पर्यंत भरावयाची मुदत असून या कार्यालयाचे संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in  वरुन ऑनलाईन ई-आर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडल्याशिवाय मासिक वेतन देयके इतर कोणतेही देयके कोषागारात  स्विकारले जाणार नाहीत, याची संबंधीतानी नोंद घ्यावी.  

सर्व कार्यालयांना या कार्यालया मार्फत युजर आय.डी. पासवर्ड यापुर्वीच कळविण्यांत आलेले आहेत. तसेच सर्व कार्यालयानी आपले ई-मेल आय.डी. फोन नंबर, पत्ता, टॅन नंबर,पॅन नंबर टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी, असे आवाहन नांदेड कौशल्य विकास,रोजगार उद्योजकता सहायक संचालक उल्हास सकवान यांनी केले आहे.

0000

रास्तभाव धान्य दुकानात

तीन महिन्याची साखर उपलब्ध

 

नांदेड, दि. 21:-   सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकासाठी शासनाने डिसेंबर, 2018 , जानेवारी व फेब्रुवारी, 2019 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. या महिन्यात जिल्ह्यासाठी 598 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे.

तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. नांदेड 24.41 , हदगांव -45.94, किनवट -151.94, भोकर-26.93 , बिलोली -43.95 , देगलूर-17.25, कंधार-25.53, लोहा-41.5 , हिमायतनगर -28.29, माहूर-67.26, धर्माबाद-25, नायगाव-36.51, मुदखेड-7.21 याची सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

 

00000

अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यावर

फौजदारी तथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार    

 

नांदेड, दि. 21:-  उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या (इसापूर धरण) उजव्या व डाव्या कालव्यावर व त्यावरील शाखा कालवे, वितरीका, उपवितरीकांवर अनधिकृतपणे विनापरवानगी पंपाद्वारे उपसा करणाऱ्या तसेच कालव्यावरील बांधकामांना क्षती पोहचवून नदी, नाल्याद्वारे पाणी घेवून अथवा कालवा भरावास क्षती पोहचवून कालवा भरावून विहीरी , शेततळे अनधिकृतपणे , विनापरवानगी भरुन घेण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. अशा सर्व उपसा करणाऱ्या व्यक्ती, संस्था, शेतकरी यांना कळविण्यात येते की, सदरील कृती ही महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 नुसार बेकायदेशीर असून अशा सर्व घटना या फौजदारी प्रक्रियेस पात्र आहेत. वरील अनधिकृत पाणी उपस्यामुळे शेवटच्या भागातील लाभधारक सिंचनाच्या लाभापासून वंचित राहत आहेत.

त्यामुळे अशा सर्व अनधिकृत उपसा करणाऱ्या / अथवा पाणी घेणाऱ्या व्यक्ती , संस्था, शेतकरी यांना कळविण्यात येते की, अशी बेकायदेशीर कृती केल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्ती, संस्था, शेतकरी, यांच्या विरोधात महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 अन्वये फौजदारी तथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे नांदेड उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता वि. कि. कुरुंदकर यांनी कळविले आहे.

0000

Wednesday, December 19, 2018


एनसीव्हीटी, सीओई अंतिम प्रमाणपत्र वाटप सप्ताहाचे आयोजन  

 

नांदेड, दि. 18:- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथून फेब्रुवारी, 2009 ते ऑगस्ट, 2017 या कालावधीदरम्यान सेंटर ऑफ एक्सलंस योजनेतंर्गत अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे अंतिम प्रमाणपत्र संस्थेमध्ये प्राप्त झाले आहेत. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथून सन 1980 ते 2015 या कालावधीदरम्यान आय.टी. आय पूर्ण केलेल्या ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रमाणपत्र अंतिम देखील संस्थेस प्राप्त झाले आहेत. दिनांक 24 डिसेंबर, 2018 ते दि. 1 जानेवारी, 2019 या कालावधीदरम्यान संस्थेमध्ये सदर अंतिम प्रमाणपत्र वाटप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे अंतिम प्रमाणपत्र अद्यापपर्यंत प्राप्त झाले नाहीत, किंवा ज्यांच्या अंतिम प्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती कारावयाची आहे, अशा प्रशिक्षणार्थ्यांनी दिनांक 1 जानेवारी, 2019 पर्यंत खालील नमूद पुराव्यांसह संस्थेत समक्ष येवून अर्ज सादर करावीत.

तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही, अशा उमेदवारांनी एनसीव्हीटी-ट्रेड, सीओई-बी.बी.बी.टी, सीओई-ए.टी.एम उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावा व ओळखपत्र / आधार कार्ड झेरॉक्स , अंतिम प्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करावयाची आहे, अशा उमेदवरांनी ज्या बाबींमध्ये दुरुस्ती करावयाची आहे . (उदा स्वत:चे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, प्रशिक्षण कालावधी आणि उत्तीर्ण महिना व वर्ष) त्या बाबींच्या अनुषंगिक योग्य कागदपत्रे पुराव्यासाठी जोडण्यात यावीत. (उदा: शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.) असे नांदेड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.

0000

 

गोवर-रुबेला लसीकरणाबाबत   

शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुढाकार घ्यावा

--- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेतंर्गत जिल्ह्यात 5 लाख 17 हजार 258 बालकांचे लसीकरण

 




नांदेड, दि. 18:-  गोवर-रुबेला लसीकरण मोहीम -2018 या मोहिमेत शाळेच्या मुख्याध्यापक आणि  शिक्षकांनी शाळेतील मुलांना लसीकरण देण्याबाबत पुढाकार घ्यावा तसेच या मोहिमेस सहकार्य न केल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.   

गोवर-रुबेला जिल्हा टास्क फोर्स बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निजी कक्षात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, वैद्यकीय महाविद्यालयाचे पीएसम विभागाचे प्रमुख डॉ. गट्टानी, वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सल्लीम तांबे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी                          डॉ. विद्या झिने , मनपा आरोग्य अधिकारी सुरेशसिंह बिसेन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बाल कल्याणचे श्री. शिंगणे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (मा.) श्री. कुंडगीर, केंद्रीय जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डॉ. लोकेश अल्लाहाणी, डब्ल्युएचओ प्रतिनिधी डॉ. मंहम्मद घोडके आदिंची यावेळी उपस्थिती होती.  

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले की, ज्या शाळा गोवर - रुबेला या लसीकरण मोहिमेत सहभाग घेणार नाहीत, अशा शाळांच्या मान्यता रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल. तसेच शाळेतील शिक्षक तसेच मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. गोवर - रुबेला लसीकरण मोहीमेबाबत पालकांनी गैरसमज करु नये.  

ग्रामीण आरोग्य विभाग , महानगरपालिका विभाग, शहरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आतापर्यंत                      5 लाख 17 हजार 258 बालकांना गोवर-रुबेला लसीकरणाची लस देण्यात आलेली आहे. कांही शाळांमध्ये 97 टक्के प्रतिसाद मिळाला, तर कांही शाळांमधील प्रतिसाद निराशाजनक आढळून आला आहे.

जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, सर्व जनतेने सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी की, महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या आरोग्य खात्याची मोहिम नसून जागतिक आरोग्य संघटनेची मोहिम जे आज आपण करत आहोत ते अमेरिका व युरोपने 60 च्या दशकात करुन टाकले आहे.

या मोहिमेविषयी अनेक शिक्षित व उच्च आर्थिक स्तरातील पालकांना असे वाटते की, ही मोहिम गोरगरिबांसाठी आहे . व आमच्या मुलांना या लसीकरण मोहिमेचा धोका नाही. तसेच ज्यांना हा आजार होवू शकतो अशानांच ती घ्यावी . सरसकट सर्वांना लस कशासाठी कांहीना वाटते. अशा सर्वांनी निट समजून घ्यावे, की यात तुमचे-आमचे हा प्रश्न नसून गोवर-रुबेला हे दोन व्हायरस देशातील पूर्ण हद्दपार करावयाचे असतील तर देशातील 95 टक्के बालकांना एका विशिष्ट कमी कालावधीत ही लस मिळणे आवश्यक आहे.

या लसीच्या दुष्पपरिणाविषयी अनेक पालकांच्या मनात शंका आहेत. ताप, लसीची दिलेली जागा दुखणे, थोडीफार पुरळ येणे असे तुरळक लक्षणे दिसल्यास त्याचा फार ताण घेवू नये. त्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रावर किंवा बालरोग तज्ज्ञाकडे बाळाची तब्येत दाखवून घ्यावी. उपचारासाठी कुठलेही रिॲक्शन आल्यास उपचार करण्यासाठी टीम सज्ज आहेत.

ही मोहिम देशातून नव्हे ,तर जगातून व्हायरस हद्दपार करण्यासाठी असल्याने त्यात प्रत्येकाने सामील होणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. नांदेड जिल्ह्यात या मोहिमेच्या अनुषंगाने  जिल्हा प्रशासनासोबत खाजगी डॉक्टर, नांदेड इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा, बालरोगतज्ज्ञ संघटना या संघटना जिल्हा प्रशासनासोबत हातात - हात घेवून काम करतांना दिसत आहेत.   

0000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...