Wednesday, December 19, 2018


गोवर-रुबेला लसीकरणाबाबत   

शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुढाकार घ्यावा

--- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेतंर्गत जिल्ह्यात 5 लाख 17 हजार 258 बालकांचे लसीकरण

 




नांदेड, दि. 18:-  गोवर-रुबेला लसीकरण मोहीम -2018 या मोहिमेत शाळेच्या मुख्याध्यापक आणि  शिक्षकांनी शाळेतील मुलांना लसीकरण देण्याबाबत पुढाकार घ्यावा तसेच या मोहिमेस सहकार्य न केल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.   

गोवर-रुबेला जिल्हा टास्क फोर्स बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निजी कक्षात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, वैद्यकीय महाविद्यालयाचे पीएसम विभागाचे प्रमुख डॉ. गट्टानी, वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सल्लीम तांबे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी                          डॉ. विद्या झिने , मनपा आरोग्य अधिकारी सुरेशसिंह बिसेन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बाल कल्याणचे श्री. शिंगणे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (मा.) श्री. कुंडगीर, केंद्रीय जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डॉ. लोकेश अल्लाहाणी, डब्ल्युएचओ प्रतिनिधी डॉ. मंहम्मद घोडके आदिंची यावेळी उपस्थिती होती.  

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले की, ज्या शाळा गोवर - रुबेला या लसीकरण मोहिमेत सहभाग घेणार नाहीत, अशा शाळांच्या मान्यता रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल. तसेच शाळेतील शिक्षक तसेच मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. गोवर - रुबेला लसीकरण मोहीमेबाबत पालकांनी गैरसमज करु नये.  

ग्रामीण आरोग्य विभाग , महानगरपालिका विभाग, शहरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आतापर्यंत                      5 लाख 17 हजार 258 बालकांना गोवर-रुबेला लसीकरणाची लस देण्यात आलेली आहे. कांही शाळांमध्ये 97 टक्के प्रतिसाद मिळाला, तर कांही शाळांमधील प्रतिसाद निराशाजनक आढळून आला आहे.

जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, सर्व जनतेने सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी की, महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या आरोग्य खात्याची मोहिम नसून जागतिक आरोग्य संघटनेची मोहिम जे आज आपण करत आहोत ते अमेरिका व युरोपने 60 च्या दशकात करुन टाकले आहे.

या मोहिमेविषयी अनेक शिक्षित व उच्च आर्थिक स्तरातील पालकांना असे वाटते की, ही मोहिम गोरगरिबांसाठी आहे . व आमच्या मुलांना या लसीकरण मोहिमेचा धोका नाही. तसेच ज्यांना हा आजार होवू शकतो अशानांच ती घ्यावी . सरसकट सर्वांना लस कशासाठी कांहीना वाटते. अशा सर्वांनी निट समजून घ्यावे, की यात तुमचे-आमचे हा प्रश्न नसून गोवर-रुबेला हे दोन व्हायरस देशातील पूर्ण हद्दपार करावयाचे असतील तर देशातील 95 टक्के बालकांना एका विशिष्ट कमी कालावधीत ही लस मिळणे आवश्यक आहे.

या लसीच्या दुष्पपरिणाविषयी अनेक पालकांच्या मनात शंका आहेत. ताप, लसीची दिलेली जागा दुखणे, थोडीफार पुरळ येणे असे तुरळक लक्षणे दिसल्यास त्याचा फार ताण घेवू नये. त्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रावर किंवा बालरोग तज्ज्ञाकडे बाळाची तब्येत दाखवून घ्यावी. उपचारासाठी कुठलेही रिॲक्शन आल्यास उपचार करण्यासाठी टीम सज्ज आहेत.

ही मोहिम देशातून नव्हे ,तर जगातून व्हायरस हद्दपार करण्यासाठी असल्याने त्यात प्रत्येकाने सामील होणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. नांदेड जिल्ह्यात या मोहिमेच्या अनुषंगाने  जिल्हा प्रशासनासोबत खाजगी डॉक्टर, नांदेड इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा, बालरोगतज्ज्ञ संघटना या संघटना जिल्हा प्रशासनासोबत हातात - हात घेवून काम करतांना दिसत आहेत.   

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...