Thursday, June 21, 2018


आंतरराष्ट्रीय योग दिनास खेळाडुंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड दि. 21 :- संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून घोषीत केला आहे. पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. म्हणून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन व आंतरराष्ट्रीय योग दिन समिती नांदेड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नेहरु युवा केंद्र, जिल्हा स्काऊट गाईड व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन श्री गुरुग्रंथ साहिब भवन, गुरुद्वारा परीसर नांदेड येथे करण्यात आले.
या कार्यक्रमास शहरातील अंदाजे पाचशे खेळाडू मुले-मुली, जेष्ठ नागरीक, महिला, विविध संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पतंजलीचे योग प्रशिक्षक पुज्य स्वामी आनंददेवजी महाराज, हरिद्वार मुळ प्रयाग अलाहाबाद यांचे स्वागत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  यावेळी व्यासपिठावर अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, अशोक देवकरे, नांदेड गुरुद्वारा बोर्डाचे डी. पी. सिंघ, गुरुविंदरसिंघ वाधवा, शिवाजी शिंदे, पतंजली योग समितीचे श्री साजणे, पी. डी. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.  
तसेच क्रीडा अधिकारी सय्यद साजीद, मारोती सोनकांबळे, प्रवीण कोंडेकर, क्रीडा मार्गदर्शक अनिल बंदेल, शिवकांता देशमुख, आनंद गायकवाड, आनंद सुरेकर, नेहरु युवा केंद्राचे कुलदीपसिंघ शाहू, स्काउट गाईडचे संघटक दिगंबर करंडे, दिपाली मुधोळकर, जि. प. अधीक्षक श्री येदपूलवार, जेष्ठ क्रीडा शिक्षक आर. जी. जाधव, कराटे असोसिएशनचे सचिव गजानन फुलारी, तायक्वॉदो असोसिएशन सचिव बालाजी जोगदंड, आर्चरी असोसिएशन सचिव श्रीमती वृषाली पाटील जोगदंड, वंदना खोकले, जयदिप कहाळेकर, के. यु. वानखेडे, सर्व सभासद, टेबलटेनिसचे सर्व खेळाडू यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पतंजलीचे योग प्रशिक्षक पुज्य स्वामी आनंददेवजी महाराज, हिरद्वार मुळ प्रयाग अलाहाबाद व त्यांचे सहकारी यांनी उपस्थितांना योगासन, प्राणायाम, ध्यानचे प्रात्यक्षिक करुन दाखविले व उपस्थितांकडून करुन घेतले. त्याचबरोबर योगाचे महत्व उपस्थितांना पटवून दिले. अतिशय उत्स्फुर्त आणि उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले तर आभार दिगंबर करंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी संजय चव्हाण, आनंद जोंधळे, मोहन पवार, धम्मानंद काबळे, विद्यानंद भालेराव, सोनबा ओव्हाळ आदींनी परिश्रम घेतले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी कळविले आहे.
0000000


















मधमाशा पालन उद्योग वाढीसाठी प्रशिक्षण
नांदेड दि. 21 :- जिल्ह्यात मधमाशा पालन उद्योगात वाढ होऊन शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योगाचे महत्व अवगत व्हावे परागभवनासाठी जिल्हा कृषी कार्यालयामार्फत आत्मा योजनेअंतर्गत मधमाशा पालन उद्योगाकरीता प्रात्यक्षिकासाठी निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांना सातेरी / मेलीफेरा मधमाशाची प्रात्यक्षिकासाठी मधपेटी उपलब्ध करुन मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेणेसाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ  उद्योग भवन तळ मजला कार्यालय नांदेड येथे  संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.                                                 
00000


एकात्मीक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत
शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी 30 जूनची मुदतवाढ
नांदेड दि. 21 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत समाविष्ट प्रकल्प आधारित विनाप्रकल्प आधारित या दोन्ही घटकासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्जाची www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्यास शनिवार 30 जुन 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी सन 2017-18 मध्ये काही बाबीसाठी अर्ज केले आहेत, तथापि त्यांना पूर्व संमती मिळाली नाही तसेच 1 जुन 2018 पुर्वी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत, अशा शेतकऱ्यांनी सन 2018-19 मध्ये पुन:श्च अर्ज करणे आवश्यक आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत समाविष्ट घटकांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज स्विकारण्याकरिता राज्यासन 2017 पासून हॉर्टनेट ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित आहे. सन 2018-19 या आर्थिक वर्षाएकात्मीक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत एकात्मीक पॅक हाऊस, शितखोली, पुर्वशीतकरणगृह, शीतगृह, एकात्मीक शीतसाखळी, रेफर व्हॅन, रायपनिंग चेंबर, एकात्मिक पुर्व शितकरणगृह शितखोली (सोलार पॉवरसह), प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदाचाळ उभारणी, मधुमक्षिक पालन-बी-ब्रिडरकडुन मधुमक्षिका वसाहतीचे उत्पादन करणे, मधुमक्षिका वसाहत संचवाटप या प्रकल्प आधारित फुलपिके, मसालापिके-हळद (रोपवाटीका), आळींबी उत्पादन प्रकल्प, सामुहीक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती-हरीतगृह, शेडनेट हाऊस, हरीतगृहातील उच्च प्रतीची भाजीपाला लागवड, हरीतगृहातील उच्च प्रतीची फुल पिके लागवड प्लास्टीक मल्चींग, ट्रॅक्टर 20 अश्वशक्तीपर्यंत, पीक संरक्षण उपकरणे मॅन्युअल स्प्रेअर- ) नॅपसॅक / फुट स्प्रेअर ) पॉवर नॅपसॅक स्प्रेअर / पॉवर ऑपरेटेड तैवान स्प्रेअर (क्षमता 8-12 लिटर) या विनाप्रकल्प आधारित घटकांचा समावेश आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी Hortnet प्रणाली नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच एक शेतकरी एक किंवा अधिक घटकांची निवड करु शकतो.
लाभार्थ्यांने अभियानांतर्गत घटकांसाठी नोंदणी करत असताना पासपोर्ट साईज फोटो, सात/बारा उतारा, आठ- उतारा, बँक पासबुकाची प्रथम पृष्ठाची छायांकित प्रत, आधार कार्ड, अनुसुचीत जाती / जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे संवर्ग प्रमाणपत्राचे छायांकित प्रत हमीपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. घटकनिहाय अर्जाचा हमीपत्राचा नमूना संकेतस्थळावर Application form & Hamipatra या सदराखाली हॉर्टनेटच्या महाराष्ट्र राज्याच्या होमपेजवर उपलब्ध आहे. योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
000000

Wednesday, June 20, 2018


शासकीय वसतीगृहातील प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 20 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील वसतिगृहातील 575 रिक्त जागांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर प्रथम वर्ष व व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम वर्षातील शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑफलाईन अर्ज संबधीत शासकीय वसतिगृहातील गृहपाल यांचेकडे सादर करावीत. अधिक माहितीसाठी संबंधीत वसतिगृहातील गुहपाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी 15 जून ते 4 जुलै 2018 पर्यंत, इयत्ता 11 वी व दहावीनंतरच्या अभ्यासक्रमात (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 20 ऑगस्ट पर्यंत, बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या पदविका/पदवी आणि एम.ए., एम.कॉम, एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी 24 ऑगस्ट पर्यंत व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी 15 जुलै ते 28 ऑगस्ट पर्यंत संबंधीत शासकीय वसतिगृहातील गृहपालांकडे अर्ज सादर करावेत.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्ह्यात मुलांसाठी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नांदेड, गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह नांदेड, अर्धापूर, हदगाव, भोकर, उमरी, नायगाव, बिलोली व धर्माबाद तसेच मुलींसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह विद्युतनगर व गांधीनगर नांदेड, हदगाव, भोकर, उमरी, देगलुर व मुखेड असे 16 वसतिगृह कार्यरत आहेत.
प्रवेश हे गुणवत्ता व आरक्षणावर आधारित असून पहिल्या व दुसऱ्या निवड यादी नंतर वसतिगृहात रिक्त जागा राहत असतील तर दुसऱ्या निवड यादीतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देवुन झाल्यानंतर प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्याने त्याच दिवशी वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल. रिक्त जागेची वसतिगृह व प्रवर्गनिहाय माहिती संबधीत वसतिगृहात तसेच समाज कल्याण कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात येईल. वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास व भोजन तसेच शैक्षणिक साहित्य, बेडींग साहित्य, निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा मोफत पुरविण्यात येतात, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


शासकिय तंत्र प्रशाला केंद्रात प्रवेश सुरु
नांदेड दि. 20 :- शासकीय तंत्र प्रशाला केंद्र देगलूर या संस्थेत शैक्षणिक सत्र 2018-19 साठी एचएससी व्होकेशनल इयत्ता 11 वीसाठी आयटीआय समकक्ष व्यवसाय अभ्यासक्रमांना प्रवेश देणे चालू आहेत. ॲटोमोबाईल, इलेक्ट्रीकल व कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश क्षमता प्रत्येकी 30 असून कालावधी दोन वर्षांचा आहे. दहावी व पुरवणी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय केंद्र, रामपूर रोड देगलूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी केले आहे.
000000


उद्योगाची आधार नोंदणी करण्याचे
 जिल्हा उद्योग केंद्राचे आवाहन
नांदेड दि. 20 :- जिल्ह्यातील उद्योजकांचे उद्योग सुरु आहेत अशा सेवा व उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांनी www.udyogaadhar.gov.in या संकेतस्थळावर उद्योग आधार नोंदणी करुन एमएसएसई डेटा बँकची नोंदणी ऑनलाईन करावी. शासनाकडे उद्योगाची नोंद होऊन उद्योग क्षेत्रातील सवलती व योजनांचा लाभ घेण्यास उद्योग पात्र राहतील. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, शिवाजीनगर नांदेड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधून मोफत नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड यांनी केले आहे.
पुढील उद्योग घटकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. सेवा उद्योगात ब्युटी पार्लर, गॅरेज, केश कर्तनालय, नेट कॅफे, प्रशिक्षण संस्था, पिठाची गिरणी, लाँड्री, रिपेअरींग सेंट सर्व प्रकारचे, मोबाईल दुरुस्ती, कॉम्प्युटर जॉबवर्क, वर्कशॉप, झेरॉक्स सेंटर आदी. उत्पादक व्यवसाय क्षेत्रात अन्य प्रक्रिया उद्योग, दालमिल, राईसमिल, मसाला उद्योग, चर्मोद्योग, रेडीमेड गारमेंटस, फॅब्रीकेशन वर्क्स, लोणचे पापड, द्रोण पत्रावळी, डेअरी प्रॉडक्टस, मिठाई तयार करणे, ऑईल मिल, कुक्कुट खाद्य, मका प्रक्रिया आदी व्यवसाय क्षेत्रातील घटकांनी नोंदणी करावी, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000


बारावी परीक्षेचे अर्ज
करण्यास मुदतवाढ      
नांदेड दि. 20 :- इयत्ता बारावी परीक्षेचे अर्ज नियमित शुल्क व विलंब शुल्कासह भरण्याच्या तारखा 4 ते 18 जून या कालावधीत निश्चित केल्या होत्या. मंडळाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊ अर्ज विलंब शुल्काने भरण्याची मुदत सोमवार 25 जून 2018 पर्यंत वाढविली आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षचे ऑनलाईन अर्ज   www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन घेण्यात येत आहेत. यासंदर्भात अडचणी असल्यास संबंधीत विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्यमंडळ पुणे यांनी केले आहे.
शिक्षण मंडळामार्फत नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची बारावी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये आयोजित केली आहे. दिनांक 14 ते 25 जून या कालावधीत भरलेली अर्ज विलंब शुल्कानुसार जमा करावीत. मात्र त्यानंतर अर्ज विलंब शुल्काने भरण्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...