Saturday, September 16, 2017

कृषि कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची 22 सप्टेंबर मुदत
आधार कार्ड नसले तरी नोंदणी करता येणार
नांदेड, दि. 16 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्‍मान योजना 2017 या योजनेअंतर्गत  शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी  ऑनलाईज अर्ज  भरण्‍याची मुदत शुक्रवार 22 सप्‍टेबर 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतीच्‍या आत शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. आधार कार्ड नसले तरी नोंदणी करता येणार आहे. नोंदणी झाल्यावर आधार कार्ड काढून आधार नंबर देण्याची सुविधा शासनाने दिलेली आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी कळविले आहे.
आजपर्यंत जिल्‍ह्यात एकुण 2 लाख 59 हजार 259 शेतकरी कुटूंबाचे ऑनलाईन अर्ज प्राप्‍त झाले आहेत.  या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका, विभाग, जिल्‍हा पातळीवर समीत्या गठीत केलेल्‍या आहेत. ज्‍या शेतक-यांना ऑनलाईन अर्ज भरण्‍यासाठी अडचणी येत असल्‍यास त्‍यांनी तहसिलदार व सहाय्यक निबंधक सहकारी संस्‍था यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. शासनाने आपले सरकार पोर्टलवर अर्ज भरणा केलेल्‍या  शेतक-यांची गावनिहाय याद्या उपलब्‍ध करुन दिलेल्‍या आहेत. कर्जमाफीमध्‍ये आपले नाव ऑनलाईन यादीत आहे की नाही हे पाहण्‍यासाठी लिंक http://csmssy.in या संकेतस्‍थळावर जावून खात्री करावी. आधारकार्ड नसले तरी नोंदणी करता येणार असून नोंदणी झाल्यावर आधारकार्ड काढून आधार नंबर देण्याची सुविधा शासनाने दिलेली आहे. बोटाचे ठसे जुळत नसल्यास त्यांचे मोबाईल नंबर आधारकार्डला जोडल्यास OTP  प्राप्त होईल नाव नोंदणी करता येईल. यातही अडचण आल्यास डोळयाचे बुबुळ रेटिना जुळवता येईल किंवा शेवटचा पर्याय म्हणून आधारकार्ड नसल्याचे नोंदवून लॉगईन करावे, मतदान ओळखपत्र, वयाचा दाखला, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडून नाव नोंदणी करु शकतात  असेही जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी कळविले आहे.

00000
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त
आज पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंद
नांदेड, दि. 16 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त रविवार 17 सप्टेंबर 2017 रोजी माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 9 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री र्जून खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. तत्पुर्वी सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पणाचा कार्यक्रम होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.   
या समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टिने बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

0000000
वृत्त क्र. 864        
सेंटरल सेक्टर शिष्यवृत्तीसाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 16 :- केंद्र शासन पुरस्कृत सेंटरल सेक्टर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज मंजुरीसाठी सोमवार 30 ऑक्टोंबर 2017 व नुतनीकरणासाठी ऑनलाईन पद्धतीने शनिवार 30 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन नांदेड विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक यांनी केले आहे.  
 तसेच नुतनीकरण अर्ज ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यात सीडीसह हार्डकॉपी सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड कार्यालयास सादर करावी. ऑफलाईन शिष्यवृत्तीचे अर्ज www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे ऑनलाईन अर्ज सोमवार 30 ऑक्टोंबर 2017 पर्यंत तर नुतनीकरणाचे अर्ज शनिवार 30 सप्टेंबर 2017 पर्यंत संबंधीत विद्यार्थ्यांनी भरावीत.
नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय वरिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान अनुदानीत, विना अनुदानीत, कायम विनाअनुदानीत, महाविद्यालय तसेच व्यवसायिक महाविद्यालयात सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी / मार्च 2017 मध्ये घेतलेल्या इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षेत गुणवत्ता यादीत टॉपच्या 20 विद्यार्थ्यांना तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी भारत सरकारची सेंटरल सेक्टर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने नवीन मंजुरी व नुतनीकरणासाठी नुतनीकरण-1 व नुतनीकरण-2  या पद्धतीने सादर करावीत. तसेच नुतनीकरण-3 व नुतनीकरण-4 अर्ज ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यात सीडीसह हार्ड कॉपी सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड कार्यालयास सादर करावीत.
00000


गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपीविरुद्ध
एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची जिल्ह्यात पहिली कारवाई
शासनाकडून जिल्हादंडाधिकारी नांदेड यांचे आदेश कायम
नांदेड, दि. 16 :-नांदेड शहरातील विक्रम उर्फ जुगनु बालाजी ठाकुर याने त्याच्या साथीदारांसह स्वत:जवळ जीवघेणी हत्यारे बाळगुन गंभीर गुन्हे करुन हैदोस घातला होता. तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. एमपीडीए अंतर्गत जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी विक्रम उर्फ जुगनु यास स्थानबद्ध करुन तुरुंगात टाकले आहे. या प्रकरणात शासनाकडून चौकशीअंती जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश कायम केले आहेत. नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच ही कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिनियम 1981 (सुधारणा 1996, 2009 आणि 2015 ) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
नांदेड शहरातील इतवारा भागातील चिराग गल्लीत राहणारा विक्रम उर्फ जुगनु बालाजी ठाकुर वय 28 वर्ष याने त्याच्या साथीदारांसह स्वत:जवळ तलवार, चाकु, खंजर व दगड यासारखी जीवघेणी हत्यारे बाळगुन घातक शस्त्रानिशी हल्ला करणे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, दगडफेक, बेकायदा गर्दी करणे आणि घातक शस्त्राने दुखापत, गंभीर दुखापत यासारखे गंभीर गुन्हे करुन हैदोस घातला होता. तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणण्याचा बऱ्याचवेळा प्रयत्न केला आहे. त्याच्या विरोधात तक्रार देण्यास कुणीही समोर येत नसल्याने परिणामी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. तसेच परिसरातील नागरिकांच्या जीवीतास, मालमत्तेस देखीली शाश्वत धोका बनला होता. त्यामुळे त्याला वेळीच आवर घालणे आवश्यक असल्याने आरोपीच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस विभागाकडून मागवून घेण्यात आला होता. त्यानंतर जिल्हादंडाधिकारी यांनी विक्रम उर्फ जुगनु या आरोपीला स्थानबद्ध करुन तुरुंगात टाकले. या प्रकरणात शासनाने संपुर्ण चौकशी करुन जिल्हादंडाधिकारी नांदेड यांचे आदेश कायम केले आहेत.  

000000

Friday, September 15, 2017

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त रविवारी
विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ
नांदेड, दि. 15 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त रविवार 17 सप्टेंबर 2017 रोजी माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 9 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. तसेच सकाळी 8.30 वाजता हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानंवदना व पुष्पचक्र अर्पणाचा कार्यक्रम होणार आहे.  या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. 
या समारंभासाठी निमंत्रीतांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्या पुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टिने बॅग सोबत आणू नये. या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30  पुर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या  परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

0000000
निवडणूक आचारसंहितेमुळे
महिला लोकशाही दिन होणार नाही
नांदेड, दि. 15 :- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सोमवार 18 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिनाचे आयोजन होणार नसल्याबाबत महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी जाहीर केले आहे. अशी माहिती सदस्य सचिव तथा जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.

00000
फुटबॉल खेळामुळे सर्व क्षमता विकसीत होतात
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 15 :- "महाराष्ट्र मिशन 1-मिलीयन" या फुटबॉल खेळ महोत्सवाएकाच दिवशी विविध शाळेत फुटबॉल खेळण्याचा आनंद विद्यार्थी घेत आहेत. फुटबॉल खेळामुळे सर्व क्षमता विकसीत होत असतात. राज्यभर होत असलेला हा फुटबॉल महोत्सव सर्वात मोठी क्रीडामोहीम ठरत असून संपुर्ण नांदेड जिल्हा फुटबॉलमय होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) वर्ल्ड कप स्पर्धा 6 ते 24 ऑक्टोबर 2017 या कालावधीत भारतात होत आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडा संस्कृती रुजविण्याचा ड्रिम प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन 1 मिलियन हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने जिल्ह्यात फुटबॉलमय वातावरण निर्माण व्हावे यासाठी आयोजित फुटबॉल मिशन भव्य रॅलीस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. यावेळी फुटबॉल खेळाची विविध कौशल्य, प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी करुन दाखविली. याप्रसंगी स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, शिक्षण अधिकारी सौ. जयश्री गोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, भारत स्काऊटस् आणि गाईडसचे जिल्हा संघटक दिगांबर करंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फुटबॉल फेस्टीवल रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथुन शिवाजी पुतळा, कलामंदीर, शिवाजीनगर, महात्मा फुले पुतळा, महानगरपालिका जलतरणिका ते इंदिरा गांधी मैदान गोकुळनगर येथे समारोप करण्यात आला. या रॅलीत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी, भारत स्काऊट गाईडसचे विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, इंडियन फोर्स ॲकडमी, नांदेड जिल्हा फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी यांचा सहभाग होता.
रॅली समारोपानंतर इंदिरा गांधी मैदान येथे फुटबॉल खेळाची प्रात्यक्षिके, प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन नांदेड जिल्हा फुटबॉल संघटनेमार्फत करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र खेळाडू विरुद्ध विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्यात प्रदर्शनीय फुटबॉल सामना  खेळण्यात आला. त्याचबरोबर किडस किंगडस्‍ पब्लिक स्कुल नांदेड येथे 17 वर्षाच्या आतील मुलांचे गुडलक फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यात विविध शाळेत जवळपास 30 हजार खेळाडुंनी फुटबॉल खेळात सहभाग घेणार असल्याची, माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. यादव यांनी यावेळी दिली.  

000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...