Friday, September 15, 2017

फुटबॉल खेळामुळे सर्व क्षमता विकसीत होतात
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 15 :- "महाराष्ट्र मिशन 1-मिलीयन" या फुटबॉल खेळ महोत्सवाएकाच दिवशी विविध शाळेत फुटबॉल खेळण्याचा आनंद विद्यार्थी घेत आहेत. फुटबॉल खेळामुळे सर्व क्षमता विकसीत होत असतात. राज्यभर होत असलेला हा फुटबॉल महोत्सव सर्वात मोठी क्रीडामोहीम ठरत असून संपुर्ण नांदेड जिल्हा फुटबॉलमय होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) वर्ल्ड कप स्पर्धा 6 ते 24 ऑक्टोबर 2017 या कालावधीत भारतात होत आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडा संस्कृती रुजविण्याचा ड्रिम प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन 1 मिलियन हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने जिल्ह्यात फुटबॉलमय वातावरण निर्माण व्हावे यासाठी आयोजित फुटबॉल मिशन भव्य रॅलीस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. यावेळी फुटबॉल खेळाची विविध कौशल्य, प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी करुन दाखविली. याप्रसंगी स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, शिक्षण अधिकारी सौ. जयश्री गोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, भारत स्काऊटस् आणि गाईडसचे जिल्हा संघटक दिगांबर करंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फुटबॉल फेस्टीवल रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथुन शिवाजी पुतळा, कलामंदीर, शिवाजीनगर, महात्मा फुले पुतळा, महानगरपालिका जलतरणिका ते इंदिरा गांधी मैदान गोकुळनगर येथे समारोप करण्यात आला. या रॅलीत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी, भारत स्काऊट गाईडसचे विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, इंडियन फोर्स ॲकडमी, नांदेड जिल्हा फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी यांचा सहभाग होता.
रॅली समारोपानंतर इंदिरा गांधी मैदान येथे फुटबॉल खेळाची प्रात्यक्षिके, प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन नांदेड जिल्हा फुटबॉल संघटनेमार्फत करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र खेळाडू विरुद्ध विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्यात प्रदर्शनीय फुटबॉल सामना  खेळण्यात आला. त्याचबरोबर किडस किंगडस्‍ पब्लिक स्कुल नांदेड येथे 17 वर्षाच्या आतील मुलांचे गुडलक फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यात विविध शाळेत जवळपास 30 हजार खेळाडुंनी फुटबॉल खेळात सहभाग घेणार असल्याची, माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. यादव यांनी यावेळी दिली.  

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...