Monday, August 18, 2025

 






दि.१७ ऑगस्ट 2025

वृत्त क्रमांक 873 

पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे दिले निर्देश

नांदेड, दि. 18 ऑगस्ट:-जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. मुखेड तालुक्यात लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रामध्ये आणि लातूरच्या उदगीर तालुक्यात आणि कर्नाटकच्या बिदर तालुक्यात काल अतिवृष्टी झाली. यामुळे चार गावे जलमय झाली आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद मंडळात २०० मी.मी पावसाची नोंद झाली. यामुळे लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रातील रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी घुसले. महसूल व एसडीआरएफच्या टीमचे सकाळपासून शोध व बचाव कार्य सुरु आहे.

तसेच नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्पातून १ लाख २५ हजार क्यूसेस विसर्ग सोडण्यात येत असल्यामुळे  शहरात व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे सतत जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून सर्व परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. तसेच सर्व परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.

०००००

  वृत्त क्रमांक 872

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

* नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करु नये

* प्रशासनाच्यावतीने शोध व बचाव कार्य सुरु

* नदी नाल्यावर सेल्फी घेण्यासाठी जीव धोक्यात घालू नये 

नांदेड दि. 18 ऑगस्ट :- जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून सतत पाऊस सुरु आहे. अनेक तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त पाऊस झाला आहे. यामुळे विष्णुपूरी प्रकल्प क्षेत्रात पाऊस आणि विसर्ग दोन्हीही वाढले आहेत. विष्णुपूरी प्रकल्पाच्यावरच्या भागातील सिध्देश्वर व येलदरी धरण भरले आहेत. त्यांचा विसर्गही वाढलेला आहे. त्यामुळे विष्णुपूरी धरणाचे 8 गेट उघडले असून 94 हजार क्युसेस वेगाने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. हा विसर्ग आता वाढविण्यात येणार असून 1 लाख 25 हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नांदेड शहर व नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे. नागरिकांनी अत्यंत महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये आणि लातूरच्या उदगीर तालुक्यात आणि कर्नाटकच्या बिदर तालुक्यात काल अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद मंडळात 206 मी.मी पावसाची नोंद झाली. यामुळे लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रातील रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी घुसले. रावणगावमध्ये 225 नागरिक अडकले होते. हसनाळमध्ये 8 नागरिकांनी बुरुजावर आश्रय घेतला, तर रावणगावमध्ये मशिदीवर 4 तर झाडांवर 8 नागरिक अडकले होते. भिंगोलीत साधारण: 40 नागरिक अडकले होते. यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली होती. सकाळपासून महसूल व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम कार्यरत आहे. यासोबतच पोलीसांची एक टीम कार्यरत असून आर्मीची एक टीम या गावामध्ये पोहोचली आहे. सकाळपासून सुरु झालेल्या एसडीआरएफ टिमने शोध व बचाव कार्य केले आहे. अजूनही रावणगावमध्ये 80 ते 100 लोक पुराच्या पाण्याने वेढलेले असून दोन तासात या नागरिकांची सोडवणूक करण्यात येणार आहे. आतापर्यत 5 नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. जनावरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. 

पैनगंगा प्रकल्पांची परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. नागरिकांना सतर्क राहण्याचे  आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. विष्णुपूरी प्रकल्पातून विसर्ग वाढल्यानंतर काही समस्या उदभवू नये यासाठी तेलंगनातील पाटबंधारे विभागाच्या सचिवाशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासन बिदर व लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. 

अतिवृष्टी व सतत तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी,नाल्यांना पूर आला आहे. नागरिकांनी पूराचे पाणी आलेल्या ठिकाणावरुन वाहने चालवू नये. तसेच पूर पाहण्यासाठी किंवा धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी अतिउत्साहात पाण्यात जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 871

एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी 31 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

प्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन

नांदेड दि. 18 ऑगस्ट :- ज्या वाहनांची 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही. अशा वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन 31 नोव्हेंबर 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे यांनी केले आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम,1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या G.S.R. 1162 (E) 04 डिसेंबर 2018 व S.O. 6052(E) दि.06.12.2018 नुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट विहित वेळेत न बसविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार परिवहन विभागातर्फे दंड आकारणी करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी दंड टाळण्यासाठी 31 नोव्हेंबर 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 01.04.2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरिता मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची/उत्पादकाची निवड करण्यात आली आहे. वाहनधाकारंनी वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. या व्यतिरीक्त कुठल्याही इतर संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे. मोटार सायकल व ट्रॅक्टरसाठी दर 450 रुपये तीन चाकी वाहनांसाठी 500 रुपये व सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांसाठी 745रुपये इतका दर आकारला जाणार आहे. या व्यतिरीक्त जीएसटीचा दर भरावा लागणार आहे व हे शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे.

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यामध्ये 18 ऑगस्ट 2025 रोजीपर्यत 1 लाख 961 वाहनांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी करण्यात आली असून 46 हजार 469 इतक्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आली आहे.  एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून वाहनांना एचएसआरपी बसविण्याची अंतिम 31 नोव्हेंबर 2025 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.

01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे एचएसआरपी बसविण्याकरिता ॲपाईटमेंट घेण्याची कार्यपध्दती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 870

शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा 

नांदेड दि. 18 ऑगस्ट :- कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून नांदेड जिल्हयातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळणार आहे. राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण या योजनेतून "प्रथम अर्ज, प्रथम लाभ (FCFS) या तत्वानुसार लाभार्थ्यांची ट्रॅक्टर खरेदीसाठी एकूण 1 हजार 352 शेतकऱ्यांची निवड झालेली असून याकरिता 16 कोटी 52 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान वाटप होणार आहे. तसेच कृषी अवजार बँक स्थापन करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील 144 शेतकऱ्यांची निवड झालेली असून या घटकाखाली 10 कोटी 25 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान वाटप होणार आहे. 

कृषि यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेमधुन कृषि अवजार बँकेसाठी 101 शेतकऱ्याची निवड झालेली असुन या करीता 6 कोटी 7 लाख 80 हजार रुपयाचे अनुदान वाटप होणार आहे. जर निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी व कृषी अवजार बँकेचा लाभ घेतला, तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. 

योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी तात्काळ महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करून शासनाकडून मिळणाऱ्या या अनुदानाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड जिल्हयाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केली आहे.

00000

वृत्त क्रमांक 869

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या

विविध कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 18 ऑगस्ट :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योनजेअंतर्गत कर्ज प्रकरणाचे सन 2025-26 या आर्थिक वर्षातील उद्दीष्ट मुख्यालयाकडून प्राप्त झाले आहे. अनुसूचित जातीतील गरजू अर्जदारांकडून कर्जाचे ऑनलाईन अर्ज विविध व्यवसायासाठी मागविण्यात आली आहेत. महामंडळाच्या नियमानुसार अटी व शर्तीच्या अधिन राहून ऑनलाईन अर्ज भरुन हार्डकॉपी जिल्हा कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापक डी. एस. गायकवाड यांनी केले आहे. 

सन 2025-26 या आर्थिक वर्षातील विविध योजनेअंतर्गत अनुदान योजनेअंतर्गत 50 हजार रुपयापर्यंत कर्ज अर्ज करता येते. यामध्ये 25 हजार रुपये हे महामंडळाचा अनुदान व 25 हजार रुपये बँकेचे कर्ज दिले जाते. बीजभांडवल योजनेत 5 लाख रुपयापर्यंत कर्जासाठी अर्ज करता येते. यामध्ये महामंडळाचे अनुदानासह 20 टक्के कर्ज, बँकेचा सहभाग 75 टक्के कर्ज व अर्जदाराचा सहभाग 5 टक्के असे एकुण 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. थेट कर्ज योजना रुपये 1 लाखपर्यंत महामंडळाकडुन 50 हजार रुपये अनुदान, 45 हजार रुपये कर्ज व्याजदर द.स. 4 टक्के व अर्जदाराचा सहभाग 5 हजार रुपये असे एकुण 1 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. अशा विविध योजना महामंडळाकडून राबविण्यात येते. या योजनेचे उदिष्ट मुख्यालय मुंबई यांच्याकडून प्राप्त झाले आहे. 

या योजनेअंतर्गत लाभार्थी हा अनुसूचीत जातीचा असणे आवश्यक आहे. जसे बौध्द, महार, बुरुड व हिंदु खाटीक या समाजातील गरजु व्यक्तींना स्वत:चा उदरनिर्वाह व स्वयंरोजगार मिळविण्यासाठी छोटे-मोठे लघु उद्योग जसे किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, ब्युटी पार्लर, शेळीपालन, डेअरी व्यवसाय, रेडीमेड गारमेंट इ. व्यवसायासाठी महामंडळामार्फत कर्ज व अनुदान दिले जाते. 

कर्ज मागणी अर्ज करण्यासाठी अर्ज ऑनलाइन मागविण्यात आली आहेत. महामंडळाचे संकेतस्थळ http://mpbcdc.maharashtra.gov.in महा-दिशा पोर्टलवर लागणाऱ्या कागदपत्रासह अटी व शर्ती निहाय ऑनलाइन अर्ज करुन महामंडळाच्या योजनेचा गरजू लाभार्थ्यांनी कर्ज व अनुदानाचा  लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

योजनेच प्राप्त उद्दीष्ट

अनुदान योजना (50 हजार रुपयापर्यंत) यात 25 हजार रुपये बॅकेचे कर्ज व 25 हजार रुपये अनुदान राहील. भौतिक उद्दिष्ट 90 असून आर्थिक उद्दिष्ट रु. लाखात 45.00 तर बीजभांडवल कर्ज निरंक राहील. बीजभांडवल योजना (50001 ते 5 लाख पर्यंत) भौतिक उद्दिष्ट 90, आर्थिक उद्दिष्ट रु. लाखात 45.00 तर बीज भांडवल कर्ज रु. लाखात 180.00 आहे.  थेट कर्ज योजना (रु.1 लाख पर्यंत) भौतिक उद्दिष्ट 36 तर  आर्थिक उद्दिष्ट रु. लाखात 18.00, बीज भांडवल कर्ज रु. लाखात 16.20 याप्रमाणे आहे. 

महा-दिशा पोर्टलवर या योजनेची परिपुर्ण माहिती दिली आहे. ही माहिती पाहुनच ऑनलाइन अर्ज करावेत,  असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक डी. एस. गायकवाड यांनी केले आहे.

000000

 राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश 

नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती शोध-बचाव कार्याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

 

मुंबई / नांदेड दि. 18 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.

 

यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनमाहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलारमुख्य सचिव राजेशकुमारजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरआपत्ती व्यवस्थापन अपर मुख्य सचिव सोनिया सेठीकृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बृहन्मंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीसर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. तर नांदेड येथून जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हेसंबंधित विभागाचे अधिकारी आदीची प्रत्यक्षात उपस्थिती होती.

 

बैठकीत विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील पावसाबाबतची माहिती सादर केली. रत्नागिरीरायगड आणि हिंगोलीनांदेड जिल्ह्यात अधिक पाऊस झाला असूनहवामान खात्याने 17 ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

यावेळी नांदेड जिल्ह्यात काल लेंडी धरणाच्या प्रभाव क्षेत्रात 200 मी.मी. पाऊस झाल्यामुळे काही पुनर्वसित  गावामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होवून चार गावे जलमय झाली आहेत. या गावामध्ये पुरामुळे 5 नागरिक बेपत्ता असून अनेक जनावरांचे नुकसान झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असूनविष्णुपूरी प्रकल्पावर लक्ष ठेऊन असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

 

मागील दोन दिवसांत राज्यात विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. कोकणातील काही नद्यांनी धोकापातळी ओलांडली असून जळगावमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अलमट्टीबाबत कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्क ठेवला जात असूनसध्या धोका नसला तरी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले. मुखेडमधील परिस्थिती नियंत्रणात आली असूनविष्णुपुरीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

छत्रपती संभाजीनगर विभागातील 800 गावे बाधित झाली आहेत. दक्षिण गडचिरोलीत प्रशासन सतर्क आहे. अकोलाचांदूररेल्वेमेहकरवाशिम येथे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विदर्भात प्राथमिक अंदाजानुसार 2 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.

 

मुंबईत आज सकाळपासून अवघ्या आठ तासांत 170 मिमी पाऊस झाला आहे. शहरात पाणी तुंबल्यामुळे दोन ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली. रेल्वेमेट्रो व इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुढील 10 ते 12 तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे असूनप्रशासनाने काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उद्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन व महापालिकांना देण्यात आला आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या सूचनांमध्येएसएमएस ॲलर्ट पाठवताना वेळेचा अचूक उल्लेख करावायेणारे अलर्ट गांभीर्याने घ्यावेतस्वतःची काळजी घ्यावीअसे आवाहन करण्यात आले. तातडीच्या मदतीसाठी मंत्रालय गाठण्याची गरज नाहीस्थानिक पातळीवरच निधी व अधिकार देण्यात आले आहेतअसे त्यांनी स्पष्ट केले.

 

घरांच्या पडझडीसाठीची मदतपंचनामे योग्य पद्धतीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. धोक्याची पातळी वाढण्यापूर्वी अन्य राज्यांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. पर्यटकांच्या ठिकाणी पोलिसांनी सतर्क रहावेदरडी कोसळणाऱ्या भागात आधीच यंत्रणा कार्यरत करावीतसेच निवारा केंद्रात भोजनशुद्ध पाणी व पांघरूण यांची पुरेशी सोय करावीअसे आदेश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.

00000





  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...