Sunday, March 19, 2023

वृत्त क्रमांक 131

शेतकऱ्यांना शासन काहीही कमी पडू देणार नाही   -  पालकमंत्री गिरीश महाजन

· शेताच्या बांधा-बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री महाजन यांनी दिला शेतकऱ्यांना धीर

·  बारड, नागेली, पांढरवाडी, पाटनूर येथे केळी, खरबुज, टोमॅटो आदी पिकांचे नुकसान पाहून सारेच झाले हवालदिल         

नांदेड (जिमाका) दि. 19 :- गेल्या तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील बारड, नागेली, पाटनूर व इतर भागात अति गारपिटीमुळे शेतकऱ्यांना हवालदिल व्हावे लागले. राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील या नुकसानीबाबत मंत्रालय पातळीवरून जिल्हा प्रशासनाला तात्काळ निर्देश दिले होते. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे सुरू करून अधिकाधिक न्याय शेतकऱ्यांना कसा देता येईल हे पहावे, असे स्पष्ट केले. आज त्यांनी प्रत्यक्ष बारड, नागेली, पांढरवाडी, पाटनूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर दिला. 

जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाच्या या दौऱ्यात त्यांच्या समवेत आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, डॉ. अजित गोपछडे, प्रवीण साले, संबंधीत विभागाचे प्रमुख उपस्थित होते. 

झालेल्या नुकसानीची एक भुमिपूत्र म्हणून मला जाणीव आहे. मी सुद्धा केळी उत्पादक शेतकरी आहे. हाताशी आलेली केळी निसर्गाच्या अशा अवकृपेने निघून जाते तेंव्हा शेतकऱ्यांना होणारे दु:ख व सोसावे लागणारे आर्थिक नुकसान याची कल्पना करवत नाही. शेतकऱ्यांसाठी शासन अधिक सकारात्मक आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्याबाबत त्यांनी सभागृहालाही वस्तुस्थिती अवगत करून हे सरकार शेतकऱ्यांना काही कमी पडू देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या नुकसानीबद्दल आम्ही अधिक सजग असून जिल्हा प्रशासनातर्फे तात्काळ पंचनामे पूर्ण करून त्यांना मदतीबाबत तात्काळ कार्यवाही करू अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. 

पाटनूर येथे परिसरातील सर्व शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. निसर्गाचा लहरीपणा हा अलिकडच्या काळात वाढत चालला आहे. यात विशेषत: मार्च, एप्रिल, मे मध्ये गारपीटमुळे होणारे नुकसान आव्हानात्मक झाले आहे. वादळ, वारे, अतिवृष्टीसह विमामध्ये गारपिटीचाही समावेश करणे आवश्यक आहे. याचबरोबर शेतकऱ्यांनीही आता विमाबाबत अधिक काळजी घेऊन गारपिटीचाही अंर्तभाव कसा होऊ शकेल याची काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. अनेक शेतकऱ्यांच्या केळी पिकाची संपूर्ण पाने फाटून गेली आहेत. अशा स्थितीत केळीची फळधारणा ही अशक्य आहे. एकदा केळीची पाने फाटली एकप्रकारे हे संपूर्ण पिक हातातून गेल्यासारखे आहे. ज्याठिकाणी गारपिटीमुळे असे नुकसान झाले आहे त्यांना वास्तविक प्रत्येक झाड काढणेही आता खर्चिक आहे. या नुकसानीचा सर्व अंदाज शासनाने लक्षात घेतला असून अधिकाअधिक मदतीची भुमिका आमच्या शासनाची आहे, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. 

पांढरवाडी शिवार येथे गोविंद चित्तलवाड यांच्या केळीचे झालेले नुकसान, कापावार शेंबोलीकर यांच्या टोमॅटोचे झालेले नुकसान तर पाटनूर शिवारातील जगदीश उपाध्याय, गोविंदराव देशमुख यांच्या शेतातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली. प्रारंभी शासकीय विश्रामगृह येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत कशी करता येईल ती करण्याचा आग्रह धरला. 

नियोजन भवन येथे पालकमंत्री यांनी

विभाग प्रमुखांकडून घेतला आढावा

नांदेड जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या सुमारे 19 हजार 899 एवढी असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यात जिरायत बाधित क्षेत्र 11 हजार 376 हेक्टर असून बागायत बाधीत क्षेत्र हे 10 हजार 636 असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे 1 हजार 542 हेक्टर क्षेत्रावरील फळपिकाचे बाधित क्षेत्र असल्याचा अंदाज आहे. अर्धापूर, भोकर, मुदखेड, नांदेड, लोहा, हदगाव, देगलूर, हिमायतनगर, कंधार, किनवट आदी तालुक्यांचा यात समावेश आहे. या गारपिटीमुळे 917 शेतकरी बाधित आहेत. सद्यस्थितीत एकुण 698 हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे झालेले आहेत. उरलेले पंचनामे येत्या 4 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय मिळावा यादृष्टीने शासनाने प्रयत्न करावेत. याचबरोबर विमाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा व्हावी यासाठी विमा कंपन्यांना निर्देश करण्याची मागणी करून लेखी निवेदन दिले. याचबरोबर आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार  राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार जितेश अंतापूरकर यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना नुकसानीबाबत माहिती देऊन तात्काळ पंचनामे पूर्ण होऊन मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

0000

छायाचित्र : सदा वडजे, नांदेड










वृत्त क्रमांक 130

 ज्येष्ठांना जे-जे देण्यासारखे आहे ते-ते देण्याचा प्रयत्न

-  पालकमंत्री गिरीश महाजन

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :-ज्येष्ठांना मान-सन्मानाची वागणूक देणे ही आपली संस्कृती असून ती आपण जोपासली पाहिजे. यासाठी शासन संवेदनशिल असून येत्या काळात शासनातर्फे महिला व जेष्ठांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येईल. शासनातर्फे जेष्ठांना जे-जे देण्यासारखे आहे ते-ते देण्याचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण,  क्रीडा व युवक कल्याण  मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

 

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कामच्या 5 व्या राज्यस्तरीय महिला अधिवेशन आणि मनोहारी मनोयुवा आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार तसेच महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कामचे अध्यक्ष अरुण रोडे, अशोक तेरकर, राज्यातील फेस्कामचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ महिला सदस्य आदींची उपस्थिती होती.

 

राज्यात अंदाजे 1 कोटी 36 लाख ज्येष्ठांची संख्या असून ज्येष्ठांना आवश्यक त्या मुलभूत गरजा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे. यात प्रामुख्याने प्रवास आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे. 75 वर्षावरील ज्येष्ठांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये मोफत प्रवासाची सोय असून,  महिलांनाही प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे. येत्या काळात महानगरपालिका क्षेत्रात विरंगुळा सेंटर उभारण्यात येणार आहेत. तसेच राज्यात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी 65 वर्षाच्यावरील नागरिकांना वेगळी ओपीडीची व्यवस्था करण्याचा विचार असून ज्येष्ठांना नियमित तपासण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाहीअसे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित ज्येष्ठांना सांगितले.

 

शासनाच्यावतीने सध्या ब्रेस्ट कॅन्सर तपासणी मोहिम सुरु आहे. या आजारात महिलांनी पुढाकार घेवून आपली तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन वेळीच निदान होवून उपचार मिळाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. यासाठी ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका यांच्यामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. महिलांनी या मोहिमेचा अवश्य लाभ घ्यावा, असेही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.  

 

फेस्कामच्यावतीने वैद्यकीय सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबाबत डॉ. मायाताई कुलकर्णी यांना फेस्काम महिला भूषण पुरस्कार व अण्णासाहेब टेकाळे यांना जीवन गौरव पुरस्कार पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. फेस्कामचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी ज्येष्ठांना शासनातर्फे दिलेल्या सुविधांबाबत आभार मानले. यावेळी फेस्कामच्या मनोहारी मनोयुवा पुस्तिकेचे प्रकाशन व यावल समाचार वृत्तपत्राचे प्रकाशन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

00000

छायाचित्र : सदा वडजे, नांदेड



Saturday, March 18, 2023

वृत्त क्रमांक 129

स्वयंरोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध

युवकांनो आपल्या कौशल्यांचा विकास करा

- आमदार भीमराव केराम

▪️किनवट येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 18 :- आम्ही ज्या काळात शिकलो त्या काळात आजच्यापेक्षा अधिक आव्हाने होती. आश्रम शाळेतून शिक्षण घेत नोकरीचे आमचेही स्वप्न होते. जिद्द, चिकाटी, मेहनत हे जर सोबतीला असतील तर वाटेल त्या आव्हानावर मात करण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, आदिवासी विभाग कटिबद्ध असून आत्मविश्वासाने कौशल्य शिक्षणाकडे वळा, असे आवाहन आमदार भीमराव केराम  यांनी केले.

कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्यावतीने किनवट येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरात पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते. तेलंगणाच्या काठावर असलेल्या किनवट तालुक्यातील आदिवासी, बहुजन समाजातील युवकांना विविध अशासकीय आस्थापनांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी हा महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास तहसीलदार डॉ. मुणाल जाधव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुभाष परघणे, दिपक बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्यास एकुण 19 खाजगी आस्थापनांनी सहभाग घेऊन विविध पदांसाठी सुमारे 1 हजार युवक-युवतींच्या मुलाखती घेतल्या. 2 हजार रिक्त पदांची याठिकाणी नोंदणी करण्यात आली होती. अनेक युवकांनी आपल्या  यशस्वी मुलाखती दिल्या व यश संपादन केले. नौकरीसमवेत स्वयंरोजगाराच्या दृष्टीने अनेक संधी आज गावोगावी उपलब्ध आहेत. यासाठी कौशल्य शिक्षणाची अत्यावश्यकता आहे. शासन यादृष्टिने प्रयत्न करीत असून ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांपासून ते युवकांच्या मनात उद्योगाच्या जर संकल्पना असतील तर त्या साकार करण्यासाठी जिल्हा प्रशासन व कौशल्य विभाग तत्पर आहे. विद्यापीठ पातळीवर यादृष्टिने चालना देण्यासाठी इनक्युबेशन सेंटर कार्यान्वित आहे. महिला, युवक-युवतींनी आत्मविश्वासाने पुढे येऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले.

आज झालेल्या या महामेळाव्यात 591 उपस्थितांनी प्रत्यक्ष नोंदणी केली तर 458 जणांनी ऑनलाईन नोंदणी केली.
00000








वृत्त क्रमांक 127

 पालकमंत्री गिरीश महाजन यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शनिवार 18 मार्च 2023 रोजी लातूर येथून मोटारीने रात्री 8.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. रविवार 19 मार्च रोजी जिल्ह्यातील गारपिटग्रस्त झालेल्या भागाला भेटी देऊन पाहणी करतील व आढावा बैठक घेतील.   

0000

वृत्त क्रमांक 128

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144    

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून सोमवार 20 मार्च 2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते बुधवार 19 एप्रिल 2023 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.   

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पुल, दक्षिणेस गोदावरी नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 मार्च 2023  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 एप्रिल 2023  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.   

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

Friday, March 17, 2023

वृत्त क्रमांक 126

 स्थूलपणा निदान व उपचार शिबिराचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 17  :- राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे विविध व्याधींचे प्रतिबंधात्मक उपाय व उपचार याबाबत जनजागृती व उपचार अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय नांदेड येथे कायचिकित्सा विभागाअंतर्गत स्थूलपणा निदान व उपचार शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी रुग्णालयाच्या निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. मंजुषा पाटील, डॉ. विश्वास गोगटे, अध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.   

 

या शिबिराद्वारे स्थूलता निदान व उपचारासाठी निश्चित मोठा लाभ होईल असा विश्वास अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील यांनी व्यक्त केला. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी देऊन स्थूलते बद्दल जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करावेत व विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करून स्थूलता निवारणा विषयी माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा. डॉ. पी. डी. डोंगरे यांनी केले.  

000000

वृत्त क्रमांक 125

 पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे किनवट येथे भव्य आयोजन 

 

·  विविध कंपन्यांचे प्रतिनिधी करणार युवकांची निवड

·  सुमारे 2 हजार युवक-युवतींना मिळणार रोजगार  

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शनिवार 18 मार्च 2023 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय आयटीआय किनवट येथे सकाळी 11 वा. करण्यात आले आहे. उपआयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता औरंगाबाद व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

 

नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी  मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवीआयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त अर्ज करावेत. याबाबत अडचण असल्यास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधवा.

 

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर  रोजगार इच्छूक उमेदवारांना नोकरी साधक (जॉब सिकर) म्हणून नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोकरी साधक (जॉब सिकर) या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित ऑनलाईन रोजगार मेळावा-5 दिसेल. त्यातील Action या पर्यायाखालील दोन बटणांपैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील.

 

दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. हा संदेश काळजीपूर्वक वाचून I Agree बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे (पदाचे नाव, शैक्षणिक अहर्ता, आवश्यक कौशल्य, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण) दिसेल. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्य यानुसार पदाची निवड करावी व अर्जाच्या Apply बटणावर क्लिक करावे. त्यानंतर एक संदेश दिसेल हा संदेश काळजी पूर्वक वाचून ओके बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यामध्ये आपला ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेल अशी माहिती रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी दिली.

00000

वृत्त क्रमांक   BH सिरीज वाहनधारकांनी थकीत कर तातडीने भरावा ;  अन्यथा विशेष तपासणी मोहिमेत कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन नांदेड,...