Saturday, March 18, 2023

वृत्त क्रमांक 129

स्वयंरोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध

युवकांनो आपल्या कौशल्यांचा विकास करा

- आमदार भीमराव केराम

▪️किनवट येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 18 :- आम्ही ज्या काळात शिकलो त्या काळात आजच्यापेक्षा अधिक आव्हाने होती. आश्रम शाळेतून शिक्षण घेत नोकरीचे आमचेही स्वप्न होते. जिद्द, चिकाटी, मेहनत हे जर सोबतीला असतील तर वाटेल त्या आव्हानावर मात करण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, आदिवासी विभाग कटिबद्ध असून आत्मविश्वासाने कौशल्य शिक्षणाकडे वळा, असे आवाहन आमदार भीमराव केराम  यांनी केले.

कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्यावतीने किनवट येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरात पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते. तेलंगणाच्या काठावर असलेल्या किनवट तालुक्यातील आदिवासी, बहुजन समाजातील युवकांना विविध अशासकीय आस्थापनांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी हा महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास तहसीलदार डॉ. मुणाल जाधव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुभाष परघणे, दिपक बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्यास एकुण 19 खाजगी आस्थापनांनी सहभाग घेऊन विविध पदांसाठी सुमारे 1 हजार युवक-युवतींच्या मुलाखती घेतल्या. 2 हजार रिक्त पदांची याठिकाणी नोंदणी करण्यात आली होती. अनेक युवकांनी आपल्या  यशस्वी मुलाखती दिल्या व यश संपादन केले. नौकरीसमवेत स्वयंरोजगाराच्या दृष्टीने अनेक संधी आज गावोगावी उपलब्ध आहेत. यासाठी कौशल्य शिक्षणाची अत्यावश्यकता आहे. शासन यादृष्टिने प्रयत्न करीत असून ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांपासून ते युवकांच्या मनात उद्योगाच्या जर संकल्पना असतील तर त्या साकार करण्यासाठी जिल्हा प्रशासन व कौशल्य विभाग तत्पर आहे. विद्यापीठ पातळीवर यादृष्टिने चालना देण्यासाठी इनक्युबेशन सेंटर कार्यान्वित आहे. महिला, युवक-युवतींनी आत्मविश्वासाने पुढे येऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले.

आज झालेल्या या महामेळाव्यात 591 उपस्थितांनी प्रत्यक्ष नोंदणी केली तर 458 जणांनी ऑनलाईन नोंदणी केली.
00000








No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...