Friday, February 22, 2019

 मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या राज्यभरात विशेष मोहीम
नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना विशेष संधी

नांदेडदि. 22: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी उद्या दिनांक 23 व रविवार दि. 24 फेब्रुवारी 2019 रोजी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहेअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 
 दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापियामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने ही दोन दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. बीएलओंकडे नमुना क्र. 678 व 8अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरीकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल.
सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असून गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचनही करण्यात येणार आहे. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील नागरी कल्याण संघटना (रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन- आरडब्ल्यूए) आणि सर्व ग्रामसभांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना देण्याबाबत कळविले आहे.
या कार्यक्रमाची माहिती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय सहायकाची (बीएलए) नेमणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे अशी विनंतीदेखील राजकीय पक्षांना करण्यात आली आहे.
मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in  या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावीअसे आवाहनही मुख्य निवडणूक‍ कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
0000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
नांदेड विमानतळावर स्वागत 

नांदेड, दि. 22 :-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड, लातूर, बीड या जिल्हा दौऱ्यासाठी नांदेड गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आज सकाळी आगमन झाले. यावेळी नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  याचवेळी दुसऱ्या विमानाने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचेही आगमन झाले.  
आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, माजी राज्यमंत्री डी. बी. पाटील, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या श्रीमती गुरुप्रित कौर सोडी, राजेश पवार, संतूक हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, भगवानराव पाटील आलेगावकर, संजय कोडगे आदिंनीही यावेळी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांचे स्वागत केले. 
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग, जहाजबांधणी आणि जलसंधान, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी यांचेसोबत हेलिकॉप्टरने अहमदपूर जि. लातूरकडे प्रयाण झाले.
000000

Thursday, February 21, 2019


रा. प. महामंडळात
चालक तथा वाहक पदाची रविवारी परीक्षा
अफवांवर विश्वासू ठेवू नका
           नांदेड, दि. 22 :- रा. . महामंडळाचालक तथा वाहक पदाची ऑफलाईन परिक्षा रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात येणार आहे. या भरतीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर  विश्वास ठेवू नका अशा प्रवृत्तीच्या लोकांकडुन उमेदवारांशी संपर्क आल्यास त्याबाबत त्वरीत रा. . महामंडळाच्या संबंधीत विभाग नियंत्रक यांचेशी संपर्क साधावा.
        उमेदवारांना या भरती प्रक्रियेबद्दल ऑफलाईन परीक्षेसंदर्भात अफवा पसरवून निवड करुन देण्याचे प्रलोभन दाखवून संभ्रम निर्माण करुन देण्याचा प्रयत्न होत असल्यास अशा अफवा   प्रलोभनास उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी बळी पडु नये. तसेच स्थानिक पोलीस स्टेशन लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यास राप महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन राप महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
------



शनिवार, रविवारी
विशेष मतदार नोंदणी मोहिम
           नांदेड, दि. 21 :- आगामी लोकसभा निवडणूक 2019 विचारात घेऊन ज्‍यांनी मतदार म्‍हणून अद्याप नाव नोंदणी केली नाही अशा वंचित मतदार होण्यास पात्र व्‍यक्‍तींना नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी म्‍हणून नांदेड जिल्‍हयाच्‍या सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर शनिवार 23 व रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्‍यात येणार आहे.
           या विशेष मोहिमेच्‍या दिवशी मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहून नागरीकांचे नाव नोंदणीबाबत अर्ज स्विकारणार आहेत. मतदार म्‍हणून नाव नोंदविणे अथवा वगळणी करणेबाबत https://www.nvsp.in/ या ऑनलाईन पोर्टलद्वारे देखील अर्ज भरता येते.
           भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार 31 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्‍यात आली आहे.      सर्व मतदारांनी या अंतिम मतदार यादीत आपले नाव असल्‍याची खातरजमा https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर भेट देऊन अथवा जिल्‍हास्‍तरावर स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या मतदार मदत केंद्राचा टोल फ्री क्रमांक 1950 यावर संपर्क साधून करता येईल. तसेच यासाठी संबंधीत तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्‍हा निवडणूक अधिकारी कार्यालयास भेट देऊनही करता येईल.
               आगामी लोकसभा निवडणूकीच्‍या अनुषंगाने जिल्‍हयातील सर्व मतदारांनी अंतिम मतदार यादीत आपले नाव असल्‍याची खात्री करुन नाव नसल्‍यास नागरीकांनी शनिवार 23 व रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी आपल्‍या भागातील मतदान केंद्रावर जाऊन संबंधीत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेकडे आपला नाव नोंदणी अर्ज भरून द्यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण  डोंगरे  यांनी केले आहे.
000000

Wednesday, February 20, 2019


बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांनी
घ्यावयाची दक्षता
नांदेड, दि. 21 :-   फेब्रुवारी / मार्च 2019 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेत विद्यार्थ्यांनी काय करावे व काय करु नये याबाबत घ्यावयाची दक्षता संदर्भात विभागीय सचिव लातूर विभगीय मंडळ लातूर यांनी माहिती दिली आहे.
परीक्षेत विद्यार्थ्यांने घ्यावयाची दक्षता पुढील प्रमाणे आहे. परीक्षा दालनात प्रत्येक पेपर सुरु होण्यापुर्वी 30 मिनिटे अगोदर उपस्थित रहावे. स्वत:च्या बैठक क्रमांकावरच बसावे. उत्तरपत्रिकेवरील पृष्ठ क्र. 2 वरील सर्व सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर विहित केलेल्या जागेत बैठक क्रमांक, (अंक व अक्षरी) केंद्र क्रमांक, दिनांक, विषय, माध्यम लिहून स्वाक्षरी करावी. बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर तो तपासून बैठक क्रमांक स्वत:चाच आहे याची खात्री करावी. स्वत:च्या हातानेच उत्तरपत्रिकेवर दिलेल्या विहित जागेतच बारकोड स्टिकर चिकटवावा. फॉर्म क्रमांक 1 वर स्वत:च्या बैठक क्रमांकासमोरच स्वाक्षरी करावी. उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे देण्यापुर्वी विद्यार्थ्यांनी स्वत: मुख्य उत्तरपत्रिकेवर तसेच घेतलेल्या सर्व पुरवण्यांवर होलोक्राफ्ट स्टिकर चिकटविणे आवश्यक आहे.  
दुसऱ्याच्या बैठक क्रमांकावर बसू नये. दुसऱ्याचा बारकोड स्वत:च्या उत्तरपत्रिकेवर चिकटवू नये. असे केल्यास विद्यार्थी पूर्णत: जबाबदार राहील. बारकोड स्टिकर कोणत्याही प्रकारे खराब करु नये. केल्यास हा गैरप्रकार समजण्यात येईल. उत्तरपत्रिकेत उत्तराशिवाय कुठलाही अनावश्यक मजकूर, स्वत:चे नाव, पत्ता, बैठक क्रमांक, देवदेतांची नावे, पास करण्याची धमकी / विनंती तसेच चिन्हांकित खुणा करुन कोणत्याही प्रकारे ओळख दर्शविण्याचा प्रयत्न करु नये. केल्यास हा गैरप्रकार समजण्यात येऊन नियमानुसार संपूर्ण परीक्षेची संपादणूक रद्द ठरविण्यात येईल. विद्यार्थ्यांनी पुरवणी स्टेपल करु नये. केल्यास गैरमार्ग समजण्यात येईल. पुरवणी बांधण्यासाठी पांढऱ्या दोऱ्या व्यतिरिक्त अन्य रंगाचे दौरे वापरु नयेत. वापरल्यास गैरमार्ग समजण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
00000


दहावी परीक्षेसाठी
विद्यार्थ्यांच्या कलचाचणीस मुदतवाढ
नांदेड, दि. 21 :-  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2019 च्या परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यासाठी 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत मुदतवाढ दिलेली असून ज्या नियमित व खाजगी विद्यार्थ्यांची अद्याप कलचाचणी घेतलेली नाही, अशा सर्व संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी कलचाचणी पुर्ण करुन घ्यावी व कोणताही विद्यार्थी कलचाचणी व अभिक्षमता चाचणी पासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.
00000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 21 :- जिल्ह्यात 7 मार्च 2019 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 21 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...