Tuesday, February 19, 2019


विधानपरिषद विरोधी पक्षनेता
धनंजय मुंडे यांचा दौरा
नांदेड दि. 19 :-  महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
बुधवार 20 फेब्रुवारी 2019 रोजी परळी जि. बीड येथून सकाळी 10 वा. नांदेड येथे आगमन व सहकार महर्षी पद्मश्री कै. शामरावजी कदम यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- दि. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड. त्यानंतर शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. सायं. 5 वा. सभेस उपस्थिती स्थळ- स्टेडीयम मैदान नांदेड. सोईनुसार परळी वै. जि. बीडकडे प्रयाण करतील.
0000000

Monday, February 18, 2019


अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची आढावा बैठक
तरुणांना स्वयंरोजगार उभारणीसाठी
बँकांनी कर्ज प्रकरणात पुढाकार घ्यावा
-         अध्यक्ष नरेंद्र पाटील
नांदेड दि. 18 :- आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील तरुणांना स्वयंरोजगार उभारणीसाठी बँकांनी पुढाकार घेऊन महामंडळाकडील कर्ज प्रकरणे त्वरीत मंजूर करावीत, असे निर्देश अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक महामंडळाचे अध्यक्ष श्री पाटील यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे कक्षात आज घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, भाजपचे राजेश पवार, मराठा महासंघाचे आनंद अडकिणे, विविध बँकचे व्यवस्थापक, मंडळाचे जिल्हा समन्वयक शुभम शेवनकर, मराठी क्रांतीचे युवक व महिला, मराठा समाजातील पदाधिकारी, तरुण उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, शेतकरी व तरुणांचे जीवनमान उंचावण्यासाठी महामंडामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना सुरु केल्या आहेत. मराठा समाजाच्या आर्थिक विकासासाठी महामंडळ महत्वाचे काम करत असून तरुणांनी जास्तीतजास्त एकत्र येऊन व्यवसायासाठी बँकेला लागणारी कागदपत्रे जमा करुन कर्जाचा लाभ घ्यावा. प्रांत अधिकाऱ्यांनी  प्राप्त प्रस्तावाबाबत दरमहा तालुकास्तरावर बँक व अर्जदारांच्या उपस्थितीत आढावा घेऊन मंडळाची योजना सक्षम करावी. जिल्ह्यात उद्योजक तयार होतील यासाठी बँकेचे प्रयत्न महत्वाचे आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना उद्योगासाठी आहेत. उद्योग उभारणीसाठी तरुणांना लागणारे प्रशिक्षण देऊन  बँकांनी मंडळाच्या योजनेची माहिती मराठी भाषेत दिल्यास ही योजना शेवटपर्यंत पोहचेल असेही त्यांनी सांगितले.     
जिल्ह्यात महामंडळाकडे 374 ऑनलाईन प्रस्ताव प्राप्त झाली असून त्यापैकी 9 प्रस्ताव मंजूर झालीत तर 49 प्रस्ताव बँकेत प्रलंबित आहेत. मंडळाकडून 5 लाभार्थ्यांना व्याज परतावाचा लाभ दिला जात असून 4 प्रकरणे कागदपत्रांच्या त्रुटीमुळे प्रलंबित आहेत. आर्थिक दृष्टया मागास घटकांना बँकेमार्फत स्वयंरोजगार उभारणीसाठी कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, सेवा क्षेत्रातील प्रकल्पासाठी दिलेल्या कर्जावरील व्याज परतावा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून दिला जातो. या योजनेत बँकेच्या 10 लाखापर्यंतच्या कर्ज मंजूर प्रकरणात वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास त्यातील व्याजाची रक्कम 12 टक्के प्रमाणे आधार लिंक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात  येते. गट कर्ज व्याज परतावा योजनेत वार्षिक उत्पन्न मर्यादेत असलेल्या उमेदवारांना गटासंदर्भात बँक कर्ज मर्यादा प्रती गटास कमीतकमी 10 लाख ते जास्तीतजास्त 50 लाखापर्यंत देण्यात आलेल्या उद्योग उभारणी कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास जास्तीत जास्त 12 टक्के व्याज दराच्या आणि 15 लाखाच्या मर्यादेत त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा केली जाते. ही योजना संपूर्ण संगणीकृत प्रणालीद्वारे राबविण्यात येते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीत पदाधिकारी व तरुणांनी योजनेच्या प्रस्तावाबाबत चर्चेत सहभाग घेऊन येणाऱ्या  अडचणीबाबत समाधान करुन घेतले. 
00000

Saturday, February 16, 2019


जप्त केलेला गहू, तांदळाचा बुधवारी लिलाव
नांदेड, दि. 16 :- जप्त केलेला गहू व तांदळाचा पशु खाद्यासाठी जाहिर लिलाव बुधवार 20 फेब्रुवारी 2019 रोजी शासकीय धान्य गोदाम खुपसरवाडी ता. जि. नांदेड येथे सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी नांदेड यांचे निर्देशानुसार जप्त केलेला गहू- 516 क्विंटल 29 किलो 280 ग्रॅम व तांदूळ- 167 क्विंटल 9 किलो 260 ग्राम तांदळाचा पशु खाद्यासाठी हा जाहिर लिलाव होणार आहे. ज्यांना बोली बोलावयाची आहे त्यांनी या लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.
लिलावातील अटी व शर्ती पुढीलप्रमाणे राहतील. लिलावाची बोली स्विकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्व अधिकार तहसिलदार नांदेड यांनी राखुन ठेवले आहेत. लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीना बाजारी किंमतीच्या 25 टक्के इतकी अनामत रक्कम भरुन हरासमध्ये भाग घेता येईल. ज्या बोलीदाराची बोली जास्त असेत ती स्विकारण्यात येईल व लिलावाची रक्कम तात्काळ भरावी लागेल. ज्या बोलीदाराची बोली स्विकारण्यात येणार नाही त्यांची अनामत रक्कम लिलाव संपल्यानंतर लिलावाच्या ठिकाणीच त्यांना परत करण्यात येईल. लिलावातील धान्याची प्रत व सद्यस्थितीची खात्र करुन घेण्याची जबाबदारी संबंधीत लिलाव धारकाची आहे. हे धान्य कार्यालयीन वेळेत शासकीय धान्य गोदाम येथे पाहता येईल, असेही तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन
नांदेड, दि. 16 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382- 251633 व इयत्ता 12 वीसाठी 02382- 251733 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनी क्रमांकावर किंवा समुपदेशकाचे नाव बी. एम. कच्छवे 9371261500 व बी. एम. कारखेडे 9860212898 या क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय सचिव यांनी केले आहे.
00000


सैन्यदलात अधिकारी पदाच्या भरतीसाठी मोफत पूर्व प्रशिक्षण
नांदेड, दि. 16 :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी 21 फेब्रुवारी ते 2 मार्च 2019 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 48 चे आयोजन करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे सोमवार 18 फेब्रुवारी 2019 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google Plus पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या संकेतस्थळावर www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध Cheek List आणि महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊनलोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन आणावेत.
केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे. कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसई-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सी प्रमाणपत्र किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा दूरध्वनी नंबर 0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
0000000


अभ्यासक्रमासाठी लागणारी
प्रमाणपत्रे प्राप्त करुन घ्यावीत
-         तहसिलदार किरण अंबेकर
नांदेड दि. 16 :- विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी उत्‍पन्‍न, वय व अधिवास, वय व राष्‍ट्रीयत्‍व, जातीचे, नॉनक्रिमीलेअर आदी प्रमाणपत्रांसाठी नजीकच्‍या महा ई-सेवा केंद्रावर जाऊन परीपूर्ण अर्ज करुन ऑनलाईन  प्रमाणपत्रे विहीत मुदतीत प्राप्‍त करुन घ्‍यावेत, असे आवाहन नांदेडचे तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये प्रमाणपत्रासाठी ऐनवेळी गर्दी किंवा विद्यार्थ्‍यांचा प्रवेश प्रक्रियेत पालक, विद्यार्थ्‍यांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी नांदेड तालुक्यातील विद्यार्थी व पालकांनी आवश्यक लागणारी प्रमाणपत्रे वेळेत प्राप्त करुन घ्यावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
0000


अल्पसंख्याक आयोगाचे
उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचा दौरा
नांदेड दि. 16 :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ज. मो. अभ्यंकर हे मंगळवार 19 फेब्रुवारी 2019 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
मंगळवार 19 फेब्रुवारी 2019 रोजी मुंबई येथून नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5.10 वा. नांदेड येथे आगमन. त्यानंतर शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंत अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तींच्या भेटी. सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थाचालक यांचे सोबत बैठक. सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत निवासी उपजिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, निरंतर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांची आढावा बैठक. दुपारी 12.30 वा. नांदेड येथून हिंगोलीकडे प्रयाण करतील.
अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती, संघटनांच्या तक्रारीचे निराकरण
नांदेड जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील तक्रारग्रस्त व्यक्तींना भेटून त्यांच्या तक्रारी एकून घेणार आहेत. त्याशिवाय त्यांनी दिलेल्या निवेदनाबाबत व समक्ष दिलेल्या माहितीबाबत संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तक्रारदारांच्या समस्यांचे निराकरण कसे करता येईल याबाबतची त्यांची भुमिका समजून घेणार आहेत. संबंधीत अल्पसंख्याक व्यक्तीवर अन्याय होत असल्याचे दिसून आल्यास त्याबद्दलची नियमाधीन समयबद्ध कार्यवाही करण्यास संबंधीत अधिकाऱ्यास आदेशित करणार आहेत. तसेच अल्पसंख्याक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थाचालकांच्या समस्यांबाबतही सुनावणीची कार्यवाही केली जाणार आहे.
अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती व संघटनांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्यावतीने आयोजित केलेल्या या समस्या निराकरणाच्या उपक्रमाची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अवर सचिव यांनी केले आहे.
000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...