Monday, February 18, 2019


अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची आढावा बैठक
तरुणांना स्वयंरोजगार उभारणीसाठी
बँकांनी कर्ज प्रकरणात पुढाकार घ्यावा
-         अध्यक्ष नरेंद्र पाटील
नांदेड दि. 18 :- आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील तरुणांना स्वयंरोजगार उभारणीसाठी बँकांनी पुढाकार घेऊन महामंडळाकडील कर्ज प्रकरणे त्वरीत मंजूर करावीत, असे निर्देश अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक महामंडळाचे अध्यक्ष श्री पाटील यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे कक्षात आज घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, भाजपचे राजेश पवार, मराठा महासंघाचे आनंद अडकिणे, विविध बँकचे व्यवस्थापक, मंडळाचे जिल्हा समन्वयक शुभम शेवनकर, मराठी क्रांतीचे युवक व महिला, मराठा समाजातील पदाधिकारी, तरुण उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, शेतकरी व तरुणांचे जीवनमान उंचावण्यासाठी महामंडामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना सुरु केल्या आहेत. मराठा समाजाच्या आर्थिक विकासासाठी महामंडळ महत्वाचे काम करत असून तरुणांनी जास्तीतजास्त एकत्र येऊन व्यवसायासाठी बँकेला लागणारी कागदपत्रे जमा करुन कर्जाचा लाभ घ्यावा. प्रांत अधिकाऱ्यांनी  प्राप्त प्रस्तावाबाबत दरमहा तालुकास्तरावर बँक व अर्जदारांच्या उपस्थितीत आढावा घेऊन मंडळाची योजना सक्षम करावी. जिल्ह्यात उद्योजक तयार होतील यासाठी बँकेचे प्रयत्न महत्वाचे आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना उद्योगासाठी आहेत. उद्योग उभारणीसाठी तरुणांना लागणारे प्रशिक्षण देऊन  बँकांनी मंडळाच्या योजनेची माहिती मराठी भाषेत दिल्यास ही योजना शेवटपर्यंत पोहचेल असेही त्यांनी सांगितले.     
जिल्ह्यात महामंडळाकडे 374 ऑनलाईन प्रस्ताव प्राप्त झाली असून त्यापैकी 9 प्रस्ताव मंजूर झालीत तर 49 प्रस्ताव बँकेत प्रलंबित आहेत. मंडळाकडून 5 लाभार्थ्यांना व्याज परतावाचा लाभ दिला जात असून 4 प्रकरणे कागदपत्रांच्या त्रुटीमुळे प्रलंबित आहेत. आर्थिक दृष्टया मागास घटकांना बँकेमार्फत स्वयंरोजगार उभारणीसाठी कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, सेवा क्षेत्रातील प्रकल्पासाठी दिलेल्या कर्जावरील व्याज परतावा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून दिला जातो. या योजनेत बँकेच्या 10 लाखापर्यंतच्या कर्ज मंजूर प्रकरणात वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास त्यातील व्याजाची रक्कम 12 टक्के प्रमाणे आधार लिंक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात  येते. गट कर्ज व्याज परतावा योजनेत वार्षिक उत्पन्न मर्यादेत असलेल्या उमेदवारांना गटासंदर्भात बँक कर्ज मर्यादा प्रती गटास कमीतकमी 10 लाख ते जास्तीतजास्त 50 लाखापर्यंत देण्यात आलेल्या उद्योग उभारणी कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास जास्तीत जास्त 12 टक्के व्याज दराच्या आणि 15 लाखाच्या मर्यादेत त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा केली जाते. ही योजना संपूर्ण संगणीकृत प्रणालीद्वारे राबविण्यात येते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीत पदाधिकारी व तरुणांनी योजनेच्या प्रस्तावाबाबत चर्चेत सहभाग घेऊन येणाऱ्या  अडचणीबाबत समाधान करुन घेतले. 
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...