Thursday, March 30, 2017

परीक्षेत यशप्राप्तीसाठी सराव महत्वाचा - हतनुरे
नांदेड दि. 30 :- स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यासासोबत परीक्षेच्या अनुषंगाने सराव परीक्षा देणे महत्वाचे असून यामाध्यमातून यश मिळण्याचा आत्मविश्वास वाढीस लागतो, असे प्रतिपादन पुणे येथील प्रा. हणमंत हतनुरे यांनी केले. "उज्ज्वल नांदेड" या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर मनपा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने राज्य सेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सराव परीक्षेचे त्तरासह  विश्लेषण करताना ते बोलत होते.
डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह सेतू समिती अभ्यासिका याठिकाणी सामान्य ज्ञान सीसॅट या विषयावर सराव परीक्षा घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, ग्रंथपाल आरती कोकुलवार बाळू पावडे उपस्थित होते.
या दोन्ही विषयाची सराव परीक्षा झाल्यानंतर प्रा. हतनूरे यांनी पाच तास सामान्य ज्ञान या विषयावरील प्रश्नपत्रिकेचे उत्तरासहितविश्लेषण विद्यार्थ्यांसमोर सादर केले. सोबतच प्रश्नपत्रिका सोडविताना आवश्यक त्या भागावर लक्ष केन्द्रीत करणे, अचूकता वेळेचे व्यवस्थापन या महत्वाच्या बाबी कशा आत्मसात करायच्या याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने महत्वाच्या अशा सराव परीक्षेचे नि:शुल्क आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
परीक्षा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोंडीबा गाडेवाड, रघुवीर श्रीरामवार, मधुकर, सोपान यनगुलवाड आदीने सहकार्य केले.

000000
उष्माघातापासून बचावासाठी
काळजी घ्या - आरोग्य विभाग
नांदेड दि. 30 - देशात उष्णतेची लाट आलेली आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. अशा वेळी नागरिकांनी विशेषत: जेष्ठ व्यक्ती, लहान बालके, गरोदर माता व उन्हात काम करणाऱ्या व्यक्तीनी स्वत:ची काळजी घ्यावी. उष्माघात पासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजना कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभाग नांदेड यांचेकडून करण्यात आले आहे.
उष्माघातपासून बचावासाठीच्या उपाय योजना पुढील प्रमाणे -  
उष्णतेमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी असे करा. 
·         भरपूर पाणी पिणे.
·         भरपूर थंड पेय पिणे. उदा. ताक, आंब्याचे पन्हे, नारळ पाणी.
·         आवश्यक असल्याशिवाय उन्हात जाण्याचे टाळा.
·         फिकट रंगाचे कपडे घालणे.
·         थंड जागेत / वातावरणात राहणे.
·         भर उन्हात म्हणजे साधारणता: दुपारी १२ ते संध्याकाळी ५ पर्यंत काम करायचे टाळणे.
उष्माघाताची लक्षणे –
§  अस्वस्थपणा
§  थकवा
§  शरीर तापणे
§  अशक्तपणा
§  अंगदुखी, डोकेदुखी
§  मळमळ

उष्माघाताची लक्षणे आढळल्यास असे करा :
§  थंडगार पाण्याने आंघोळ करणे
§  ( डोक्यावरून गार पाण्याने आंघोळ करून, तापलेले शरीर थंड होण्यास मदत होईल )
§  थंड जागेत / वातावरणात आराम करणे
§  परिश्रमाचे काम न करणे
§  भरपूर थंड पाणी  / पेय पिणे
§  मनपा आरोग्य केंद्रात किवा जिल्हा रुग्णालयास त्वरित ओषधपचार करवून घेणे.
§  108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधवा.
हे करू नका
·         दुपारी 12 ते 3 उन्हात फिरु नका.
·         मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटयुक्त सॅाफ्ट ड्रिंक्स घेऊ नका. त्यामुळे डीहाइडेट् होते.
·         उच्च प्रथीनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.

हे करा
  • तहान नसल्यास हि पुरेसे पाणी प्या.
  • बाहेर जाताना गॅागल, छत्री, टोपी, बूट किवा चप्पल वापरा.
  • प्रवास करताना सोबत पाणी घ्या.
  • आपले घर थंड ठेवा, पडदे सनशेड बसावा.
  • रात्री खिडक्या उघडया ठेवा.
  • अशक्त, कमजोरी असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उष्माघाताच्या उपचारासाठी गुरुगोबिंदसिंघजी स्मारक शासकय जिल्हा रुग्णालय नांदेड , डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , महापालिकेची रुग्णालये या ठिकाणी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000
जागतिक ग्राहक दिनाचे आज आयोजन
            नांदेड दि. 30 -  ग्राहकांच्या हक्कांची व ग्राहक संरक्षण कायदाची जनतेत जनजागृती होण्याच्या उद्देशाने शुक्रवार 31 मार्च 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सकाळी 10 वा. जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते होणार आहे.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा सौ. स्मिता कुलकर्णी राहतील. तसेच प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य डॉ. बा. दा. जोशी राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून जि. ग्रा. सं. प. सदस्य आर. एस. कमटलवार हे राहतील.
            नागरिक व ग्राहकांनी शुक्रवार 31 मार्च 2017 रोजी जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सकाळी 10 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

Wednesday, March 29, 2017

भारतीय स्टेट बँक मोठी, मजबूत,
गुणवत्तापूर्ण संस्था - दिपंकर बोस
क्षेत्रिय कार्यालयाच्यावतीने ग्राहक मेळावा संपन्न
नांदेड दि. 29 - सहयोगी बँकांच्या विलनीकरणामुळे भारतीय स्टेट बँक ही सर्वात मोठी, मजबूत आणि गुणवत्तापूर्ण अशी एक संस्था होईल, अशा विश्वास भारतीय स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक दिपंकर बोस यांनी येथे व्यक्त केले.
भारतीय स्टेट बँक क्षेत्रिय व्यवसाय कार्यालय नांदेड यांच्यावतीने सोमवारी 27 मार्च रोजी ग्राहक मेळावा (टाऊन हॉल मिटींग) चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री. बोस ग्राहकांशी संवाद साधतांना बोलत होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील ग्राहकांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या व त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. याप्रसंगी  भारतीय स्टेट बँकेचे महाप्रबंधक वी. रामलिंग, उपमहाप्रबंधक नवलकिशोर मिश्रा, क्षेत्रीय प्रबंधक अक्षयकुमार तिवारी, भारतीय स्टेट बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक रंजन बोस, क्षेत्रीय प्रबंधक सर्वोत्तम कुलकर्णी, सहाय्यक महाप्रबंधक के. राजशेखर, स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे सहायक महाप्रबंधक संजय कुमार आदींची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. बोस म्हणाले की, सहयोगी बॅंकेच्या विलनीकरणाच्या संदर्भात बरेच गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात आहेत. यासंदर्भात मुख्य महाव्यवस्थापक यांनी आस्वस्थपणे सांगितले की कोणतेही मोठे बदल व्यवहारात होणार नाहीत. असलेल्या ग्राहकांना (दोन्ही बँकेच्या ) कोणताही भार सहन करावा लागणार नाही. या विलनीकरणामुळे भारतीय स्टेट बँक ही सर्वात मोठी, मजबूत आणि गुणवत्तापूर्ण अशी एक संस्था होईल.
ग्राहक मेळाव्यात ग्राहकांनी केलेल्या सूचना पैकी काही स्विकारण्यात आल्या. त्यापैकी काही विषयांवर चर्चा झाली. तसेच त्वरीत कार्यवाही करण्याची खात्रीही देण्यात आली. याअनुषंगाने कॅशलेस बँकीग आणि डिजीटायलेजशनचे महत्व समजावून सांगण्यात आले. भारतीय स्टेट बँकेची यासंदर्भात चालू असलेल्या वाटचालीबाबत तपशीलवार माहिती देण्यात आली. कॅशलेस बॅकींग व डिजीटायझेशनच्या परिवर्तनशील युगात ग्राहकांनी कशाप्रकारे काळजी घ्यावी या संदर्भातही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संयोजन मुख्य प्रबंधक जे. एस. कांबळे, धिरेंद्र बारोट, मधुसूदन, सुरेश देशपांडे, बाबाराव पवार, राजेश कंधारकर, परमेश्वर नवघरे, माधव चुकेवाड, प्रविण सोनवणे, अमोल, प्रफूल, सुमित, संदीप, मुरली, रेश्मी, शलाखा, छाया आदींने केले. 
आदित्य शेणगावकर यांनी सुत्रसंचलन केले. स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे उपमहाप्रबंधक सी. एस. जांगीड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नांदेड व परिसरातील विविध शाखांचे ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते.

000000
  जिल्हा रुग्णालयातील क्ष-किरण विभागाचे
जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते उद्घाटन
            नांदेड दि. 29 - श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात आज जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचया हस्ते क्ष-किरण विभागाचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज जिल्हा रुग्णालयास भेट दिली. याभेटी दरम्यान त्यांच्या हस्ते रुग्णालयातील क्ष-किरण विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध विभागाची पाहणी केली व विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना  महत्वपूर्ण निर्देश दिले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी रुग्णालयातील पोलीस चौकी कार्यान्वीत करण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी पोलीस चौकी तत्काळ चालू करण्यासाठी संबंधितांना सूचित करण्याचे निर्देश दिले. त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. या भेटी दरम्यान वैद्यकीय  अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

000000
शासकीय व्यवहारांसाठी स्टेट बँक शाखा
31 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार  
            नांदेड दि. 29 - जिल्‍ह्यातील स्‍टेट बँक ऑफ  हैद्राबाद आणि स्‍टेट बँक ऑफ इंडिया यांची शाखा कार्यालये शुक्रवार 31 मार्च 2017 रोजी शासकीय व्‍यवहारासाठी रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आदेशीत केले आहे.
            महाराष्‍ट्र राज्‍य कोषागार अधिनियम 1968 अन्‍वये जिल्‍हाधिकारी यांनी निर्गमीत केलेल्या आदेशात म्हटले आहे की, स्‍टेट बँक ऑफ हैद्राबादच्‍या औद्योगिक वसाहतीतील शाखेसह नांदेड आणि जिल्‍ह्यातील तालुका मुख्‍यालयातील सर्व शाखा कार्यालय तसेच स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्‍या लोहा, माहूर, उमरी, अर्धापूर, हिमायतनगर आणि मुदखेड येथील शाखा कार्यालये शुक्रवार 31 मार्च 2017 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत शासकीय व्‍यवहारांसाठी सुरु राहतील.

000000

Monday, March 27, 2017

कापूस बोंडअळी नियंत्रण जनजागृती वाहनाचा
जि. प. अध्यक्षा पवार यांच्या हस्ते शुभारंभ  
नांदेड दि. 27 :- कापसावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती, प्रात्यक्षिके करणाऱ्या फिरत्या वाहनास आज जिल्हा परिषेदेचे अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणातून हा रथ मार्गस्थ झाला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि विकास अधिकारी पंडीतराव मोरे, सीड्स फोर्टचे अध्यक्ष मधुकर मामडे आदी उपस्थित होते.  
जिल्ह्यात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून आला आहे. त्यावर प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी जिल्हा परिषदेचा कृषि विभाग व रासी सीडस् यांच्या संयुक्त विद्यमाने या फिरत्या वाहनाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर कापसाचे नुकसान होत असते. या बोंडअळीचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. म्हणून गुलाबी बोंडअळी प्रतिबंध करण्यासाठीचे प्रात्यक्षिके व माहिती या फिरत्या वाहनांद्वारे गावोगावी शेतकऱ्यांपर्यंत पोहचली जाणार आहे. हे वाहन 25 दिवस जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फिरणार आहे.   
यावेळी मोहिम अधिकारी ए. जी. हाडे, जिल्हा कृषि अधिकारी एस. एल. शिरफुले, व्ही. जी. अघापुरे, व्ही. आर. सरदेशपांडे, एस. एन. कऱ्हाळे, पी. एम. जाधव, सीडस् कंपनीचे व्यवस्थापक अनिल जावळे, उल्हास पाटील, वसुंधरा फर्टिलायजर, बालाजी कृषि सेवा केंद्र, नवीन ॲग्रो एजन्सी, मुद्रा ट्रेडर, श्रीनिवास कृषि सेवा केंद्र, गजानन ॲग्रो एजन्सीचे संचालक, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...