Tuesday, July 21, 2026

वृत्त क्रमांक 

इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२६-२७ साठी नोंदणी सुरू; पात्र युवक-युवतींनी सहभागी व्हावे

नांदेड, दि. २१ जुलै :- महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांच्या निर्देशानुसार इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 या देशातील प्रतिष्ठित राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) यांच्या माध्यमातून दर दोन वर्षांनी आयोजित होणारी ही स्पर्धा व्यावसायिक शिक्षण व कौशल्य क्षेत्रातील गुणवंत युवक-युवतींना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून देते. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांची निवड राज्यस्तर आणि राष्ट्रीय फेऱ्यांसाठी केली जाते. राष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना भारताचे प्रतिनिधित्व करत WorldSkills Competition मध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.

स्पर्धा विविध कौशल्य क्षेत्रांमध्ये वैयक्तिक (Individual) तसेच सांघिक (Team) स्वरूपात होणार आहे. बहुतांश कौशल्यांसाठी उमेदवारांचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तर सायबर सुरक्षा, उद्योग 4.0, मेकॅट्रॉनिक्स, रोबोट प्रणाली एकत्रीकरण, स्वायत्त मोबाइल रोबोटिक्स, काँक्रीटचे बांधकाम कार्य आणि Landscape Gardening या Team Skills साठी उमेदवारांचा जन्म १ जानेवारी २००४ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.

स्पर्धेसाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असून विविध उद्योग, क्षेत्रीय कौशल्य परिषदा तसेच व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पॉलिटेक्निक महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, विद्यापीठे, शाळा, प्रशिक्षण संस्था, उद्योग तसेच कौशल्य विकासाशी संबंधित संस्थांनी पात्र उमेदवारांमध्ये या स्पर्धेबाबत जनजागृती करून त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी Skill India Digital (SIDH) पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी. नोंदणी संकेतस्थळ : https://www.skillindiadigital.gov.in अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड येथे संपर्क साधावा. 

00000

वृत्त क्रमांक 

जिल्ह्यात 22 ते 31 जुलै दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

नागरिकांनी महाराजस्व समाधान शिबिरांचा लाभ घ्यावा; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. 21 जुलै : मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या औचित्याने राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात 22 ते 31 जुलै 2026 या कालावधीत विधानसभा मतदारसंघनिहाय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक मतदारसंघासाठी कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने या समाधान शिबिरांमध्ये महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, विविध दाखल्यांचे वितरण तसेच इतर शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती, अर्ज स्वीकारणे तसेच नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील संबंधित समाधान शिबिरास आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच प्रलंबित प्रकरणे व तक्रारींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :

83-किनवट : 22 जुलै 2026, सकाळी 10 वा., एन.के. गार्डन, किनवट.

84-हदगाव : 27 जुलै 2026, सकाळी 10 वा., सुमन लॉन्स अँड गार्डन, हदगाव.

85-भोकर : 22 जुलै 2026, सकाळी 9.30 वा., गणराज मंगल कार्यालय, भोकर.

 86-नांदेड उत्तर : 26 जुलै 2026, सकाळी 10 वा., ए.के. संभाजी मंगल कार्यालय, वाडी (बु.), नांदेड.

87-नांदेड दक्षिण : 22 जुलै 2026, सकाळी 10 वा., ओम गार्डन, नवीन कौठा, नांदेड.

88-लोहा : 31 जुलै 2026, सकाळी 10 वा., के.के. मंगल कार्यालय, लोहा.

89-नायगाव : 22 जुलै 2026, सकाळी 10 वा., कुसुम मंगल कार्यालय, नायगाव.

90-देगलूर : 22 जुलै 2026, सकाळी 10 वा., शिवम मंगल कार्यालय, कुंडलवाडी, ता. बिलोली.

91-मुखेड : 22 जुलै 2026, सकाळी 10 वा., कै. मा. आमदार गोविंदराव राठोड सांस्कृतिक सभागृह, नगर परिषद, 

मुखेड.

00000

Monday, July 20, 2026

 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सुधारित निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ. पात्रता, कालावधी व अटी जाणून घ्या.
🌾 कर्जमुक्तीकडे आणखी एक भक्कम पाऊल!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ अंतर्गत सुधारित निकष, ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी आणि पात्र शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ लाभ प्रक्रिया.

 शेतकरी हिताचा ऐतिहासिक निर्णय !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत नव्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ.

 वृत्त क्रमांक 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

'क्लिनिकल कॅनव्हास २०२६' पोस्टर स्पर्धेचे उत्साहात आयोजन 

नांदेड दि. 20 जुलै :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील औषधवैद्यकशास्त्र (मेडिसिन) विभागाच्यावतीने एम.बी.बी.एस. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 'क्लिनिकल कॅनव्हास २०२६' या पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. वैद्यकीय शिक्षणात कौशल्यकेंद्रीत विद्यार्थिकेंद्रित, अनुभवधारीत अध्यापनपद्धत रुजविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये मेडिसिन विषयाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, उपअधिष्ठाता व औषधवैद्यक शास्त्र विभागप्रमुख डॉ. शितल राठोड यांच्या LEARNING BY DOING च्या संकल्पना व पुढाकाराने ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त आणि तन्मयतेने सहभाग नोंदवून उत्तम प्रतिसाद दिला. 

या कार्यक्रमांतर्गत तृतीय वर्ष (एम.बी.बी.एस.) १५ गटातील १५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या टीम बनविण्यात आल्या होत्या व विद्यार्थ्यांनी आपल्या निवडीनुसार वेगवेगळ्या विषयांवर आपले सादरीकरण केले. हे सादरीकरण करण्याच्या आधी विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त करणे, आपल्या कल्पनांना कलेच्या माध्यमातून प्रकट करणे व सादरीकरण करणे अपेक्षित होते. याच्यातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळाली तसेच त्यांच्यातील विविध कलात्मक सुप्त गुणांचे प्रदर्शन झाले. 

या स्पर्धेसाठी डॉ. संजयकुमार मोरे, डॉ. वंदना दुधमल, डॉ. अनिल देगावकर, डॉ. अब्दुल समीर, डॉ. इस्माईल इनामदार, डॉ. वैष्णवी कुलकर्णी आणि डॉ. किशोर राठोड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यावेळी इतर विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक बहुसंख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कापसे आणि डॉ. हेमंत गोडबोले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

"पोस्टर प्रदर्शनाच्या या नवीन आणि नाविन्यपूर्ण माध्यमातून आमच्या वैद्यकीय ज्ञानामध्ये भर पडली, अभ्यासात रुची निर्माण झाली तसेच शिकण्याचे एक नवीन माध्यम उपलब्ध झाले" असे मनोगत यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. या उपक्रमाची संकल्पना औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख तथा उपअधिष्ठाता डॉ. शितल राठोड यांची होती. त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकांतून औषधवैद्यकशास्त्र विषय विद्यार्थ्यांसाठी अधिक सहजरित्या समजण्यासारखा करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी सहयोगी प्राध्यापक डॉ. कपिल मोरे, डॉ. उबैदुल्ला खान, डॉ. फारुकी अब्दुल राफे, डॉ. अंजली देशमुख तसेच सहाय्यक प्राध्यापक डॉ. गोविंद लोणे, डॉ. मोहन भंडारे, डॉ. देवीदास बंटेवाड, डॉ. संदीप उप्पोड व डॉ. भारती राठोड तसेच सर्व पदव्युत्तर विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेला.

00000





वृत्त क्रमांक 

अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार

प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन  

नांदेड दि. 20 जुलै :- सन 2025-26 या वर्षासाठी कल्याणकारी निधीतून विशेष गौरव पुरस्कार पुढे नमूद केलेल्या विविध क्षेत्रातील कामगिरी नुसार प्रदान केली जाणार आहेत. नमूद क्षेत्रात विशेष गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव, अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रे व शिफारशीसह सोमवार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे जमा करण्यात यावीत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार करता येणार नाही कारण विहित अर्ज ठराविक दिनांकापर्यंत संचालक सैनिक कल्याण विभाग पुणे यांना सादर करणे अनिवार्य आहेत.

इयत्ता १० वी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्के व १२ वी बोर्डाच्या परीक्षेत ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/राज्य स्तर पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू. साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इ. क्षेत्रातील राष्ट्रीय/राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्ती. नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्यांना केंद्र/राज्य शासन पुरस्कृत व्यक्ती. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी (विद्यापीठात प्रथम/IIT,IIM,AIIMS मध्ये प्रवेश प्राप्त). सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक राज्य स्तरावर पुरस्कार मिळविणारे व्यक्ती. अधिक माहितीसाठी कल्याण संघटक व लिपिक  (मोबाईल नंबर 8999638872/ 8707608283) यांच्याशी संपर्क करावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.  

000000

 कर्जमुक्ती योजनेचा पहिला टप्पा पूर्ण;  नांदेड जिल्ह्यातील 12 हजार 929 शेतकऱ्यांना 106.25 कोटींचा दिलासा नांदेड, दि. 7 ऑगस्ट : पुण्यश्लोक अह...