Friday, January 30, 2026

 वृत्त क्र. 152

शासकीय तंत्रनिकेतन येथे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त परिसंवाद संपन्न

नांदेड, दि. ३० जानेवारी :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतन येथे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त परिसंवाद कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनुश्री केंद्रे, मोटार वाहन निरीक्षक हेमंत साळुंखे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रेणुका राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व, प्रशासकीय जबाबदाऱ्या तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक कौशल्यांबाबत सखोल माहिती देण्यात आली. रस्ता सुरक्षा, नागरिकांशी संवाद, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रामाणिक प्रशासन यांचे महत्त्व अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले.

तसेच स्पर्धा परीक्षा, प्रत्यक्ष कामातील अनुभव आणि भविष्यातील करिअर संधी यावरही विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी समाधानकारक उत्तरे दिली.

या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एल. कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. बैठक व्यवस्था प्रा. एस. जी. अन्नमवाड यांनी केली, तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. बी. बी. कपूर यांनी केले.

कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या क्विझ स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना आरटीओ कार्यालयाकडून मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या वतीने मार्गदर्शक अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

00000

Thursday, January 29, 2026

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंत्यदर्शन थेट प्रक्षेपण (Live)

लिंक | क्लिक👉 https://www.youtube.com/live/dy5Td1fzJ-w

वृत्त क्र. 150

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड दि. 29 जानेवारी :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 2 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

या दिवशी महसूल,  गृह,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,  पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.

00000

Wednesday, January 28, 2026

 वृत्त क्र. 151

भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेत

 इच्छुक शेतमालकांनी शेत विक्रीसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 29 जानेवारी :- जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर जिरायती (कोरडवाहु) किंवा २ एकर बागायती (ओलीताखालील) जमिन उपलब्ध करुन देणे ही योजना राबवायची आहे. 

तेव्हा नांदेड जिल्ह्यातील (प्राधान्याने किनवट व माहूर तालुका) येथील इच्छूक शेतमालकांनी आपला  शेत विक्रीसाठी आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र. भुवायो-2018/प्र.क्र.127/का-14 दि. 28 जुलै 2021 मधील परिच्छेद क्र. 02 व परिशिष्ठ-ब नुसार शेती विकणेसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जि. नांदेड येथे माहिती सुविधा केंद्रामध्ये परिपूर्ण अर्ज, आवेदन पत्र भरणा करावे तसेच आपले अर्ज, आवेदन सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावेत असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनितचंद्रा दोन्तुला यांनी केले आहे. 

इच्छूक शेत मालकांना शेत विक्रीसाठी अर्ज, आवेदन करण्यासाठी असून, या योजनेअंतर्गत शेत मिळविण्यासाठी लाभार्थ्यांसाठी अर्ज, आवेदन नाही याची नोंद घ्यावी असेही प्रसिध्दीप्रत्रकात कळविले आहे. 

00000

 राज्याचे 'खंबीर नेतृत्व', मराठवाड्याचा 'आधारवड' कोसळला!

प्रशासनावरील ज्यांची ‘वचक’, कामाचा ‘उरक’ पाहून अधिकारीही थक्क व्हायचे, असे संपूर्ण राज्याचे खंबीर नेतृत्व आज हरपले. अजित (दादा) पवार केवळ एका जिल्ह्याचे मर्यादित नेतृत्व नव्हते, तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून राज्याचा गाडा समर्थपणे हाकत. ते राज्याचे नेते होतेच, पण त्याही पलीकडे जाऊन मराठवाडा विभागावर त्यांचा विशेष लोभ होता. दादा मूळचे पश्चिम महाराष्ट्राचे, पण धाराशिव त्यांचे सासर. त्यामुळे मराठवाड्याचे 'जावई' म्हणून त्यांचा या भागावर जीव होताच, पण बीड जिल्ह्याचे 'पालकमंत्री' म्हणून त्यांनी जिल्ह्याला पितृवत प्रेम दिले.

तखत श्री हजूर अबचलनगर साहिब जी गुरुद्वारातील ती 'अखेरची' भेट 

अवघ्या दोन दिवसांपूर्वी, २५ जानेवारीला दादा मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर, नांदेडच्या पवित्र भूमीत होते. नांदेड येथील 'तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब'  गुरुद्वारात ते नतमस्तक झाले.  सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पवित्र गुरुद्वारात अत्यंत भक्तीभावाने दर्शन घेतले. 'कडा प्रसाद' ग्रहण केला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. दर्शन झाल्यानंतर ते गुरुद्वारा परिसरात थांबले.  'तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब'जीं चे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेऊन, बाहेर येईपर्यंत दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाट पाहत होते. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर सर्व मंत्री महोदय यांनी पवित्र गुरुद्वारातून एकत्रितपणे ऐतिहासिक 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शताब्दी समागम कार्यक्रमासाठी मोदी मैदानाकडे प्रस्थान केले. राज्याचे नेतृत्व म्हणून ज्येष्ठता आणि पदाचा मान राखण्याची त्यांची ही कृती सर्वांनाच भावली. गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा यावेळी सन्मान केला.

पालकमंत्र्यांचा 'धडाका' आणि 'विश्वविक्रम' 

एकीकडे नांदेडमध्ये ते अध्यात्मात रमले होते, तर दुसरीकडे बीडमध्ये त्यांनी विकासाचा विक्रम रचला होता. १ जानेवारी २०२६ ला वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी बीडमध्ये एकाच वेळी १३६३ विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करून प्रशासनालाही अवाक केले होते.

केवळ इमारती नाहीत, तर निसर्गाशी नाते जोडत त्यांच्याच उपस्थितीत बीडमध्ये एकाच दिवशी ३० लाखांहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. याची नोंद 'वर्ल्ड रेकॉर्ड' (India Book of Records) मध्ये झाली. तरुणांवर त्यांचे विशेष प्रेम होते, म्हणूनच खेळाडूंसाठी क्रीडा विभागाचा २५ कोटींचा निधी मंजूर करून त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'टर्फ ग्राउंड' बीडकरांना दिले.

सहकार आणि अर्थाची जोड 

प्रशासकीय शिस्तीचे भोक्ते असलेल्या दादांनी बीडमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विभागाच्या भव्य 'सहकार संकुला'चे भूमिपूजन केले. सर्व सहकारी कार्यालये एकाच छताखाली असावीत, हा त्यांचा आग्रह होता. राज्याचे वित्त व नियोजन मंत्री या नात्याने त्यांनी बीडच्या विकासाला कधीच निधी कमी पडू दिला नाही. १७ सप्टेंबर २०२५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अहिल्यानगर-बीड’ रेल्वेचे उद्घाटन झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २ हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणि ऐनवेळी दिलेले १५० कोटी रुपये, ही अर्थमंत्री म्हणून दादांनीच मंजूर केले होते.

 हृदयाची काळजी घेणारे 'दादा' 

बीड जिल्हा रुग्णालयात 'कार्डियाक कॅथलॅब' देऊन त्यांनी गोरगरिबांच्या हृदयाची सोय केली. दुर्दैवाने, बीडकरांच्या हृदयाची काळजी घेणाऱ्या पालकमंत्र्यांचे हृदय मात्र आज थांबले.

एकीकडे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे सुकाणू समर्थपणे सांभाळणारे 'वित्त व नियोजन मंत्री' आणि दुसरीकडे बीडच्या प्रत्येक प्रश्नावर बारकाईने लक्ष घालणारे 'पालकमंत्री'... अशी दुहेरी भूमिका त्यांनी समर्थपणे पेलली. धाराशिवचे जावई आणि बीडचे पालक असलेल्या या विकासपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली!

- डॉ. श्याम टरके

सहायक संचालक (माहिती),

विभागीय माहिती कार्यालय, लातूर.








वृत्त क्र. 149

एमएच २६ - डीए नवीन मोटारसायकल नोंदणी मालिका लवकरच सुरू

पसंती क्रमांकासाठी 29 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार

नांदेड, दि. २८ जानेवारी:- परिवहनेतर संवर्गातील मोटारसायकल वाहनांसाठी MH26-DA ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेअंतर्गत पसंती क्रमांक घेण्यासाठी अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पसंती क्रमांकासाठी इच्छुक अर्जदारांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सदर अर्ज 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जासोबत संबंधित पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डी.डी.) सादर करणे बंधनकारक असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

विहित केलेल्या दिनांक व वेळेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच एखाद्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, संबंधित अर्जदारांना 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात येईल.

तरी पसंती क्रमांक घ्यावयाच्या इच्छुक वाहनधारकांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

०००००

वृत्त क्र. 148

हमीभावाने तूर खरेदीसाठी २० जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी

नांदेड जिल्ह्यात २३ खरेदी केंद्रे निश्चित - जिल्हा पणन अधिकारी

नांदेड, दि. 28 जानेवारी:- केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२६ साठी तूर पिकाची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची २० जानेवारी  ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात एकूण २३ खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तरी शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी आर. जी. गव्हाणे यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात खालील खरेदी केंद्रांवर मार्केटिंग फेडरेशनमार्फत तूर पिकासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

तालुका खरेदी-विक्री संघ मुखेड / हदगाव / बिलोली (कासराळी) / लोहा, कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कुंडलवाडी, नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी संस्था, अर्धापुर, पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सहकारी संस्था, देगलूर, बळीराम पाटील फळे व भाजीपाला सहकारी खरेदी-विक्री संस्था, बेरळी, मुखेड फळे व भाजीपाला सहकारी खरेदी-विक्री संस्था, उमरदरी, किनवट तालुका कृषीमाल प्रक्रिया सहकारी संस्था, गणेशपूर (ता. किनवट), जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी-विक्री सहकारी संस्था, कौठा, स्वामी विवेकानंद अभिनव सहकारी संस्था, शेळगाव थडी (ता. धर्माबाद), अष्टविनायक शेतीमाल खरेदी-विक्री सहकारी संस्था, मानवाडी फाटा (ता. हदगाव), महात्मा बसवेश्वर ग्रामीण विकास मंडळ, बापशेटवाडी (मुक्रामाबाद), शेतकरी उत्पादक कंपनी, रातोळी / बेटमोगरा, पांडुरंग फळे व भाजीपाला सहकारी संस्था, धामनगाव, बळीराजा पणन अभिनव सहकारी संस्था, कोठारी (ता. किनवट), श्रीराम जानकी अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ, सगरोळी (ता. बिलोली), चक्रधर फळे व भाजीपाला सहकारी संस्था, बिल्लाळी (ता. मुखेड), स्वामी विवेकानंद अभिनव नाविन्यपूर्ण सहकारी संस्था, देगलूर, स्व. प्रमोद महाजन अभिनव नाविन्यपूर्ण सहकारी संस्था, पाळा (ता. मुखेड), जगदंबा विद्याप्रसारक मंडळ, बाऱ्हाळी (ता. मुखेड)याप्रमाणे आहेत. 

तरी शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणीसाठी चालू हंगामातील तूर पिकाची ऑनलाईन नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक ही आवश्यक कागदपत्रे संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर सादर करावीत. नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने POS मशीनद्वारे करण्यात येणार असल्याने नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी आर. जी. गव्हाणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

०००००

 कर्जमुक्ती योजनेचा पहिला टप्पा पूर्ण;  नांदेड जिल्ह्यातील 12 हजार 929 शेतकऱ्यांना 106.25 कोटींचा दिलासा नांदेड, दि. 7 ऑगस्ट : पुण्यश्लोक अह...