Wednesday, February 12, 2025
वृत्त क्रमांक 172
नगरपरिषदांच्या अग्निशमन यंत्रणेसाठी
ट्रीपल लेअरचे फायर प्रॉक्झिमिटी सूटचे वाटप
नांदेड दि. 12 फेब्रुवारी :- महसूल व वन विभाग (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन), महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या 72 फायर प्रॉक्झिमिटी सूटचे वाटप आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यामार्फत करण्यात आले.
जिल्ह्यातील देगलूर, उमरी, धर्माबाद, हदगाव, मुदखेड, कुंडलवाडी, बिलोली, कंधार, मुखेड, भोकर, लोहा, किनवट या 12 नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात फायर प्रॉक्झिमिटी सूटचा वापर कसा करायचा याबाबत तज्ञ प्रशिक्षकामार्फत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अग्निशमन विभागातील कर्मचारी यांच्या अडचणी जाणून घेतल्या व या सूट सोबतच त्यांना आगीमध्ये बचाव कार्य करताना श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून भविष्यात त्यांना ब्रीदिंग अपरेटस सेट घेऊन देण्यासंबंधीचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास दिले. तसेच “आगीस प्रतिबंध हेच उत्तम संरक्षण” असल्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांनी याप्रसंगी सांगितले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका प्रशासन गंगाधर इरलोड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटील, तहसिलदार (महसूल) विपिन पाटील, तहसिलदार (सर्वसाधारण) शंकर लाड, नगरपालिका प्रशासन विभागाचे अधीक्षक सीताराम गायकवाड पाटील यांच्यासह १२ नगरपरिषदांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000
वृत्त क्रमांक 171
नांदेडला 21 ते 23 फेब्रुवारीला राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा
राज्यातील अडीच हजार महसूल विभागातील खेळाडू, अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन
जिल्हाधिकाऱ्यांचा जिल्हयातील माध्यम प्रतिनिधींशी संवाद
नांदेड दि. 12 फेब्रुवारी :- नांदेड येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्यावतीने राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टेडियम येथे करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचे उदघाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्य हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज येथे दिली.
या स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, प्रमुख अतिथी राज्यमंत्री योगेश कदम यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक खासदार व आमदार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, सर्व विभागीय आयुक्त, नोंदणी मुद्रांक महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त पुणे, सर्व अपर आायुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.
या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर, कोकण, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक या महसूल विभागातील तसेच नोंदणी व मुद्रांक विभाग आणि जमाबंदी आयुक्त, पुणे अशा 7 विभागातील जवळपास दोन ते अडीच हजार पुरुष व महिला खेळाडू उपस्थित राहणार आहेत. यामध्ये संचलन, क्रिकेट, कबड्डी, व्हॉ लीबाल, फुटबॉल, खो-खो, रिले, महिला थ्रो-बॉल आणि जलतरण या सांघिक खेळ प्रकाराचा समावेश आहे. तसेच बुद्धीबळ, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस, 100,200,400 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा, भाला, थाळी फेक, रिंग टेनिस आणि 45 वर्षावरील 3 कि.मी.चालणे इत्यादी वैयक्तिक 82 प्रकारच्या खेळातील मैदानी सामने श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम, इंदिरा गांधी मैदान, पिपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज या मैदानावर तर जिल्हा क्रीडा संकुल आणि महानगरपालिकेच्या इनडोअर हॉल मध्ये इनडोअर प्रकारचे तसेच कै.शांताराम सगणे या जलतरणिकेमध्ये सर्व जलतरणाचे सामने होणार आहेत.
मैदानी खेळाव्यतिरिक्त सर्व 7 विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यशवंत कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी 6 ते 10 वा.दरम्यान करण्यात आले आहे. उत्कृष्ट गायन, अभिनय, वैयक्तिक नृत्य, वेशभूषा, नक्कल, वादक, निर्मिती, दिग्दर्शक, कलाप्रकार, निवेदक, नाटीका इत्यादी कलाप्रकारचा समावेश आहे.
राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने जिल्हयात विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळांचे स्पोर्टस हब तयार होण्यास चालना मिळणार आहे. त्याअनुषंगाने विविध खेळांच्या मैदानाचा विकास व इतर सोयीसुविधा उपलब्ध होतील. त्याचा ग्रामीण भागातील खेळाडूंना लाभ होईल. स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातून अधिकारी व कर्मचारी खेळाडू जिल्हयात येणार आहेत. यामुळे जिल्हयात पर्यटन वाढीस संधी मिळेल.
या स्पर्धा तत्कालिन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून, नूतन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या मार्गदशानाखाली, अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर यांचे सनियंत्रणात आणि निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी घेतलेल्या अहोरात्र परिश्रमामुळे पार पडत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधीशी साधला संवाद
जिल्ह्याच्या विकासावर भर देण्यासाठी सर्वाचे सहकार्य आवश्यक- जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सर्व माध्यमाच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना त्यांनी नांदेड शहर व जिल्ह्यातील विविध विषयावरील समस्या व अडचणी जाणून घेतल्या. त्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करु असे आश्वस्त केले. यात प्रामुख्याने नांदेड शहरातील रस्ते आणि धुळीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. नांदेड जिल्हा हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असून इथे कृषी विषयक तसेच आरोग्य, शिक्षण, सिंचन या विषयावर प्राधान्याने काम करण्यात येईल असेही सांगितले. जिल्ह्यात कापूस, सोयाबिन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच कंधार, लोहा, किनवट येथील प्रलंबित कामे पूर्ण करणे, नांदेड जिल्हा हरित करण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देण्यात येईल याबाबतही त्यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्याच्या विकासात सर्वाचा सहभाग आवश्यक असून यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
000000
Tuesday, February 11, 2025
वृत्त क्रमांक 170
जिल्हाधिकाऱ्यांचा पहिल्याच भेटीत गैरव्यवस्थेवर प्रहार
बारावीच्या परिक्षा केंद्राची घेतली झाडाझडती
तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
तीन केंद्र प्रमुख व ८ पर्यवेक्षकांना कारणे दाखवा नोटीस
कॉपी पुरवणाऱ्या आठ जणांवर पोलीस कारवाई
नांदेड दि. 11 फेब्रुवारी :- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रुजू झाल्यानंतर पहिली कारवाई बारावीच्या परिक्षेदरम्यान हलगर्जीपणा दाखविणाऱ्या केंद्र प्रमुखावर,पर्यवेक्षकावर केली आहे. सोबतच परिक्षा केंद्रात अनधिकृतपणे उपस्थित असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तर कॉपी पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे.
नांदेड जिल्ह्यात कोणत्याही केंद्रावर, कुठेही कॉपी करणाऱ्यांची हयगय करू नये, पोलिसांनी सक्त कारवाई करावी. शिक्षण विभागाने आवश्यक सुविधा पूर्ण कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज कंधार तालुक्यातील विविध परिक्षा केंद्राना भेटी दिल्या. यादरम्यान, परिक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा त्यांना आढळून आल्या नाहीत. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर उपस्थित होते. त्यांनी याबद्दल गंभीर आक्षेप घेतले असून शिक्षणाधिकाऱ्यांना भेटी दरम्यान तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. नोटीस बजावलेल्या केंद्र संचालकामध्ये भीमशंकर उच्च माध्यमिक विद्यालय, शिराढोण, ता. कंधार, श्री. गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, चिखली ता. कंधार, नेताजी सुभाषचंद्र उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी ता. कंधार यांचा समावेश आहे.
याशिवाय परिक्षा केंद्रामध्ये कोणतीही जबाबदारी सोपवली नसताना उपस्थित असणाऱ्या तीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्युनियर कॉलेज पानभोसी येथील सहशिक्षक श्रीमती दहीहंडे गवळी, श्रीमती एम.ए. खान, लिपिक ए.यु.शेख यांचा समावेश आहे.
याशिवाय परीक्षेदरम्यान नकला करण्यास मदत करणाऱ्या बाहेरील व्यक्ती श्रीनिवास अर्जून भुसेवाड, प्रणव अनिल टोम्पे, गणपत जळबा गायकवाड, दस्तगीर खमरोद्दीन, शिवाजी नारायण कदम रा. चिखली यांच्यावर भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 126 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. उस्मान नगर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर यांनी यासंदर्भात गुन्हे नोंदविले आहेत.
याशिवाय डी.जी.खरात, एस.एस. नरंगले, सी.डी.सोनटक्के, एस.जी.पाटील, ए.एस. जोगदंड, एम.जी.कांबळे, एस.एम. केंद्रे, एस.बी.गायकवाड या आठ पर्यवेक्षकांनी वर्गामध्ये स्वतः आय कार्ड न वापरणे, बैठक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे, त्यांची आवश्यक तपासणी न करणे, याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
जिल्ह्यामध्ये बारावीच्या परिक्षा सुरु होताना कोणती काळजी घ्यावी याबाबत स्पष्ट दिशा निर्देश असतात. केंद्र प्रमुखांनी विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध कराव्यात याबाबतही स्पष्ट सूचना दिल्या असतात. यामध्ये बैठक व्यवस्था उत्तम ठेवावी. संरक्षण भिंत नसलेल्या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवावी. बाहेरील व्यक्ती आत येणार नाही याची काळजी घ्यावी. परिक्षा केंद्राच्या परिसरात अनधिकृत व्यक्तीची उपस्थिती राहू नये. कॉपी पुरविणाऱ्यांवर सक्त कारवाई करावी. परिक्षा केंद्राच्या ठिकाणचे सीसीटीव्ही सुरु ठेवावे. भरारी पथक व बैठे पथक अधिक सक्रीय असावेत, अशा सूचना दिल्या जातात. मात्र अनेक ठिकाणी गैरव्यवस्था आढळून आली. त्यामुळे तातडीने आजच्या आज सर्व संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे.
पुढील पेपरच्या आत व्यवस्था करा
विद्यार्थ्यांनी पेपर देताना त्यांना कोणत्या सुविधा असाव्यात, त्यांच्यासाठी आवश्यक बैठक व्यवस्था, डेस्क बेंचची उपलब्धता, पाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था, अनावश्यक पक्षांना बंद ठेवण्याची दक्षता, परीक्षा केंद्र बाहेर जमाव राहणार नाही याची काळजी घेणे याबाबत कुठेही दुरावस्था दिसू नये अशी सक्त ताकीद दिली आहे. पुढच्या पेपरच्या वेळी पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी फेरी मारणार असून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.
भरारी पथकांवरच कारवाई करणार
जिल्ह्यामध्ये भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या पथकांची सक्रियता दर्शनी दिसायला हवी केवळ नियुक्तीसाठी ही पथके नसून केलेल्या कारवाईचे तातडीने रिपोर्टिंग झाले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अन्यथा पुढच्या पेपरच्या वेळी ज्या भागात अशी गैरव्यवस्था असेल ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे जमाव दिसतील त्या ठिकाणी केंद्रप्रमुख, भरारी पथक, पोलीस, महसूल व तालुक्यातील संबंधित सर्वांवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच पुढच्या पेपर पुर्वी सर्व व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात आजपासून 107 परीक्षा केंद्रावर बारावीची परिक्षा सुरु झाली आहे. आज इंग्रजीच्या पेपरला ४१ हजार८९८ पैकी ४० हजार ९५o विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली. ९७.५२ टक्के उपस्थिती होती. या पार्श्वभूमीवर जिल्याह्त परीक्षा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.
00000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...








.jpeg)


.jpeg)
.jpeg)




.jpeg)

.jpeg)



