वृत्त क्रमांक 172
नगरपरिषदांच्या अग्निशमन यंत्रणेसाठी
ट्रीपल लेअरचे फायर प्रॉक्झिमिटी सूटचे वाटप
नांदेड दि. 12 फेब्रुवारी :- महसूल व वन विभाग (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन), महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या 72 फायर प्रॉक्झिमिटी सूटचे वाटप आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यामार्फत करण्यात आले.
जिल्ह्यातील देगलूर, उमरी, धर्माबाद, हदगाव, मुदखेड, कुंडलवाडी, बिलोली, कंधार, मुखेड, भोकर, लोहा, किनवट या 12 नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात फायर प्रॉक्झिमिटी सूटचा वापर कसा करायचा याबाबत तज्ञ प्रशिक्षकामार्फत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अग्निशमन विभागातील कर्मचारी यांच्या अडचणी जाणून घेतल्या व या सूट सोबतच त्यांना आगीमध्ये बचाव कार्य करताना श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून भविष्यात त्यांना ब्रीदिंग अपरेटस सेट घेऊन देण्यासंबंधीचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास दिले. तसेच “आगीस प्रतिबंध हेच उत्तम संरक्षण” असल्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांनी याप्रसंगी सांगितले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका प्रशासन गंगाधर इरलोड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटील, तहसिलदार (महसूल) विपिन पाटील, तहसिलदार (सर्वसाधारण) शंकर लाड, नगरपालिका प्रशासन विभागाचे अधीक्षक सीताराम गायकवाड पाटील यांच्यासह १२ नगरपरिषदांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment