Monday, September 16, 2024

वृत्त क्र. 841


पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नांदेड दौरा

 

नांदेड दि. 16 सप्टेंबर :- राज्याचे ग्रामविकास व पंचायतराजपर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथून विमानाने रात्री 10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. रात्री 10.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.

 

मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून शासकीय वाहनाने माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेडकडे प्रयाण. सकाळी 8.25 वा. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे आगमन. सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण. सकाळी 9 वा. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा 76 वा वर्धापन दिन समारंभास उपस्थिती. सकाळी 10.40 वा. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथून शासकीय वाहनाने विमानतळ नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10.55 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व सकाळी 11 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने जळगावकडे प्रयाण करतील.

0000

सुधारित वृत्त क्र. 840

 

वात्सल्ययोजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात

नांदेड जिल्ह्याचा सहभाग राहणार

 

·         18 सप्टेंबरला नांदेडची मुले अर्थमंत्र्यांना थेट ऐकणार

 

नांदेड दि. 16 सप्टेंबर :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या वात्सल्य नावाच्या नव्या पेन्शन योजनेची सुरूवात 18 सप्टेंबर रोजी होत आहे. नवी दिल्ली येथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग आहे. देशातील मोजक्या जिल्ह्यामध्ये नांदेडचा सहभाग निश्चित झाला असून हा कार्यक्रम नांदेड येथील केंद्रीय विद्यालयात होणार आहे.

 

नांदेड जिल्ह्याच्या अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय विद्यालय विमानतळ रोड नांदेड येथे 50 विद्यार्थी व 50 पालकांच्या सहभागात जिल्हा या राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमात सहभागी होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन व अन्य मान्यवर या कार्यक्रमाला दिल्ली येथून संबोधित करणार आहेत.18 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 4.30 या काळामध्ये हा कार्यक्रम होणार असून नांदेड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शिखर बँकेमार्फत हे आयोजन करण्यात आले आहे.

 

काय आहे वात्सल्य योजना

वात्सल्य ही शून्य ते 18 वयोगटातील बालकांसाठी नवीन पेन्शन योजना आहे. पालक आपल्या मुलांच्या नावे या पेन्शन योजनेत महिन्याला किमान 1 हजार तर वर्षभरात कमाल अमर्यादीत रुपये जमा करू शकतो. मुलाच्या 18 वर्षापर्यंत हे खाते पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खाते होणार आहे. मुलगा 18 वर्षाचा झाला की, हे खाते अखंडपणे नियमित एनपीएस खात्यात किंवा एनपीएस नसलेल्या योजनेत रुपांतरीत केले जाऊ शकते. थोडक्यात बालकाच्या भविष्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचे खाते शून्य ते 18 या वयोगटात उघडण्याची ही योजना आहे. मुलांसाठी दीर्घकालनी बचत आणि आर्थिक नियोजनाला यामुळे हातभार लागणार आहे. भारतीय नागरीक असणे ही या योजनेची प्राथमिक अट असून नागरिकांच्या सेवानिवृत्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यातून आर्थिक सुरक्षा निर्माण केली जाते.     

0000

 वृत्त क्र. 839 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

नांदेड, दि. 16 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण केले जाईल. यानंतर  सकाळी  9 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होईल. या समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.  

 

समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये.  या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालये, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना व आदेश दिले आहेत.

 

उद्या सकाळी 8.30 वा. पालकमंत्री गिरीश महाजन यांचे विसावा उद्यान येथे आगमन होणार आहे. त्यानंतर 8.40 वा. त्यांच्या हस्ते स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल. अन्य मान्यवर देखील पुष्पचक्र अर्पण करतील. 8.48 वा. सशस्त्र सलामी दिली जाणार आहे. त्यानंतर 9 वा. राष्ट्रध्वजारोहण होईल. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री जिल्ह्याला संबोधित करणार आहेत. याशिवाय क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांच्या स्वातंत्र सैनिक परिवाराशी हितगुज झाल्यानंतर सकाळी 9.30 सुमारास सभास्थळावरील मुख्य कार्यक्रमाचा समरोपह होणार आहे.

00000 









Sunday, September 15, 2024

 वृत्त

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची संघर्षागाथा १६ सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर  

 महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती

मुंबई दि. १५ :  भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं तरी मराठवाडा निजामाच्या विळख्यातून मुक्त झाला नव्हता. मराठवाड्यातील जनतेने त्यासाठी उभारलेल्या अभूतपूर्व लढ्याला अखेर यश येऊन १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. या घटनेला १७ सप्टेंबरला ७६ वर्षं पूर्ण होत आहेत. या खास दिनाचे औचित्य साधत 'मुक्तीसंग्राम- कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' हा ७५ मिनिटांचा नाट्य माहितीपट येत्या १६ सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर दु.२ वाजता आपल्या भेटीला येणार आहे. जास्तीजास्त प्रेक्षकांनी हा नाट्य माहितीपट पाहावा असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

महामंडळाची निर्मिती असलेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. या माहितीपटात अजय पुरकर, समीर विद्वान्स, समीर धर्माधिकारी, सचिन देशपांडे, श्रीकांत भिडे, अभिजीत श्वेतचंद्र, अक्षय वाघमारे, पूजा पुरंदरे, विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, ऋतुजा बागवे, दिप्ती धोत्रे, विराजस कुलकर्णी, आस्ताद काळे, आदिनाथ कोठारे, आशुतोष वाडेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
00000

वृत्त क्र. 838

ईद-ए-मिलाद सणानिमित्त 16 सप्टेंबरची सुटी कायम   

नांदेड दि. 15 सप्टेंबर :- मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यासाठी सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजीची सार्वजनिक सुटी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी कायम ठेवली आहे. 

यासंदर्भात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी अधिसूचना जारी केली असून सोमवार 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद या सणाची सुटी असेल असे सर्वांना सूचित केले आहे.

000  

 वृत्त क्र. 1626

 

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास १७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

 

         मुंबई, दि. १४  : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावाअसे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख ६६ हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावाउमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहेउमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्जआधार कार्डपदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ.अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला)उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावापासपोर्ट आकाराचा फोटोहमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. दि. १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

Friday, September 13, 2024

वृत्त क्र. 837

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या 

लाभार्थ्यांची निवड 19 सप्टेंबर रोजी लॉटरी पद्धतीने होणार 

नांदेड दि. 13 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय नांदेड मार्फत सुविधा कर्ज योजना (एनएसएफडीसी) 5 लाख व महिला समृध्दी (एमएसवाय) 1.40 लाख या योजनेचे कर्ज मागणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यात आले आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड गुरूवार 19 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वा. ग्यानमाता शाळेसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चिट्ठीद्वारे (लॉटरी पद्धतीने) होणार आहे.  

या कर्ज प्रकरणांची ईश्वरी चिट्ठी (लॉटरी) द्वारे निवड करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड तथा ईश्वर चिट्ठी समितीचे अध्यक्ष यांनी दिलेल्या मान्यतेनुसार चिट्ठीव्दारे (लॉटरी पद्धतीने) ही निवड करण्यात येणार आहे. या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील अर्जदारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे. पात्र अर्जदारांची यादी या महामंडळ कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. याची संबधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) नांदेड यांनी केले आहे. 

0000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...