वृत्त क्र. 836
Friday, September 13, 2024
वृत्त क्र. 835
सणवाराच्या काळात चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार
समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर सायबर सेलची नजर
नांदेड दि. 13 सप्टेंबर : सण उत्सवाच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत. जिल्ह्यात हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द व शांततेला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या काळात सर्व धर्मियांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे, वेगवेगळ्या प्रतिकृती, वेगवेगळ्या सणांच्या मिरवणूक नांदेड शहर व नांदेड ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या संदर्भातील प्रसिद्धी, बातम्या, लेख, अग्रलेख, फोटो, व्हिडिओ देताना अतिशय गांभीर्याने वृत्तांकन होईल, याबाबतची विनंती सर्व माध्यम प्रतिनिधींना करण्यात आली आहे.
तथापि, काही अनधिकृतरीत्या वेब पोर्टल चालविणारे, तसेच सोशल मीडियाचा गैरवापर करणारे असामाजिक तत्व वृत्त देताना,पोस्ट करताना, सामाजिक जाणीवांचे भान ठेवत नाही. अशांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
त्यामुळे समाज माध्यमांचा योग्य प्रकारे सर्वांनी वापर करावा. तसेच नागरिकांनी देखील समाज माध्यमांवर येणाऱ्या कोणत्याही पोस्ट बद्दल प्रतिक्रिया देताना व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वरील पोस्ट नेमक्या कुठल्या आहेत याची खातर जमा करावी. शांततेने प्रतिक्रिया व्यक्त करावी. पोलिसांची मदत घ्यावी.
काही समाजकंटक अशा वेळी जुन्या पोस्ट टाकून लोकांची दिशाभूल करतात. परस्परांच्या धर्माविरुद्ध, धार्मिक कार्यक्रमासंदर्भात अफवा पसरवितात, टीका टिपणी करतात, त्यामुळे जनतेने सावध असावे.
नांदेड शहराला सर्व धर्मियांच्या सामंजस्याचा चांगला इतिहास आहे .त्यामुळे कोणतीही चुकीची पोस्ट समाज माध्यमांवर आल्यावर त्याबाबत जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. नांदेडच्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, सोशल मीडिया, मेडिया इन्फ्लुअन्सर, शांतता समितीच्या सदस्यांनी अशा प्रकारे माध्यमांचा कोणी गैरवापर करत असेल तर याबाबत पोलीस विभागाला अवगत करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 834
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार शनिवारी धाराशिव जिल्हयात
परंडा येथे 14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम
नांदेड दि.13 सप्टेंबर : राज्य सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे.14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता परंडा शहरातील कोटला मैदान येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महिला सशक्तीकरण अभियानाचे उदघाटन करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री सतीश चव्हाण,विक्रम काळे, राणाजगजितसिंह पाटील,ज्ञानराज चौगुले व कैलास पाटील यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती राहणार आहेत.
या कार्यक्रमात जिल्हयातील 10 यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.विविध विभागाअंतर्गत 9 महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात विविध योजनांच्या लाभाचे वाटप, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत 5 महिलांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे वाटप,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत 15 महिलांना लाभाचे वाटप करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध विभागांचे योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारुन त्यामध्ये महिलांविषयक योजनांची माहिती देण्यात येणार आहे.आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिबीराचे आयोजन करुन महिलांची आरोग्य तपासणी व सकस आहार यासह स्वच्छताविषयक माहिती देण्यात येणार आहे.
कामगार विभागाच्या वतीने महिला कामगारांना भांडी वाटप करण्यात येणार आहेत.महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्याकडून महिला बचतगटांची नोंदणी करण्यात येवून स्टॉलच्या माध्यमातून महिलांना विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने महिलांना उद्योग उभारणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाला जिल्हयातील महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
***
Thursday, September 12, 2024
वृत्त क्र. 833
"एक पेड मां के नाम" अभियान अंतर्गत
17 सप्टेबर रोजी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम
नांदेड दि. 12 :- “एक पेड मां के नाम” वृक्ष लागवडीची मोहिम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या अभियान अंतर्गत मंगळवार 17 सप्टेंबर रोजी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाचे छायाचित्र मेरी लाईफ पोर्टलच्या https://merilife.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करावेत. तसेच गुगल शीटमध्ये वृक्ष लागवडीची परिपूर्ण माहिती भरावी, असे नागपूरचे रोजगार हमी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीणचे आयुक्त अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत भारतात पर्यावरण, वन व जलवायु परिवर्तनाशी सामना करण्यासाठी आवाहन केले आहे. या मोहीमेंतर्गत 80 कोटी झाडे सप्टेंबर 2024 पर्यंत व 140 कोटी झाडे मार्च 2025 पर्यंत लागवड करण्याची मोहीम राबविण्याबाबत केंद्र शासनाने सुचित केले आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याकरीता सप्टेंबर 2024 पर्यंत 2 कोटी 57 लाख उद्दीष्टे पुर्ण करण्यात येणार असून मार्च 2025 अखेर पर्यंत 4 कोटी 30 लक्षचे उद्दीष्टे पूर्ण करावयाचे आहे, असेही म्हटले आहे.
00000
वृत्त क्र. 832
संविधान महोत्सवाचे औचित्य साधून "संविधान मंदीर" उद्घाटन सोहळा
नांदेड दि. 12 :- संविधान महोत्सवाचे औचित्य साधून “संविधान मंदीर" उद्घाटन मा. उपराष्ट्रपती महोदय जगदीप धनखड यांच्या शुभहस्ते रविवार 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने करण्याचे विभागामार्फत सुनिश्चित केले आहे.
सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील 434 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे.
त्याअनुषंगाने प्रस्तुत संस्थेत संविधान महोत्सवाचे औचित्य साधून 12 ते 15 सप्टेंबर 2024 पर्यंत नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचे आयोजन शिल्प निदेशक तथा प्रशिक्षणार्थ्यांसाठी करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 15 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे सकाळी 11 वा. संविधान मंदिराचे उद्घाटन आभासी पद्धतीने करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, मा. मंत्री, मा. आमदार विधानसभा व विधानपरिषद, जिल्हयातील सर्व मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे नांदेड औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.
00000
वृत्त क्र. 831
नांदेड शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड दि. 12 :- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त, ईद-ए-मिलाद व गणपती विसर्जन सणानिमित्त भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी 12 ते 18 सप्टेंबर 2024 रोजीचे 24 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत. हा आदेश जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरील मुख्य रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा ते चिखलवाडी कॉर्नर, महाविर चौक पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर तसेच नांदेड शहरातील माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथील परिसरात उपोषणे, धरणे, मोर्चा, रॅली, रास्ता रोको, आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध केले आहे.
संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश 10 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमीत केले आहेत.
0000
विशेष वृत्
‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी
आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी
मुंबई दि. १२ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री
योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी
भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार
योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १०
हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत
नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक
उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार
कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक
आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि
आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण
असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा
दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला),
उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट
आकाराचा फोटो, हमीपत्र
(ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. उद्या
शुक्रवार दि.१३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या
संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली
आहे अशा उमेदवारांनी Apply
बटन दाबून अर्ज Submit
करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
00000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...
