Friday, May 17, 2024

वृत्त क्र. 430

 सारथी प्रणाली 18 मेपर्यंत बंद

नांदेड दि. 17 :- अनुज्ञप्ती (लायसन्स) व अनुज्ञप्ती विषयक सर्व कामकाजासाठी परिवहन विभागाच्या सारथी 4. 0 या प्रणालीद्वारे केले जाते. या प्रणालीवर अर्ज व शासकीय शुल्क भरण्याची कार्यवाही केली जाते. 

परंतु सद्या सारथी प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या सर्व्हरच्या देखभाल/दुरुस्तीचे काम राष्ट्रीय सूचना केंद्राद्वारे सुरु आहे. सदर दुरुस्तीचे कामकाज सुरु असल्यामुळे 18 मे 2024 च्या सकाळी 10 वाजेपर्यत सारथी प्रणाली बंद राहील, यांची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

0000 

वृत्त क्र. 429

शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा उत्कृष्ट व रास्त भावात

मिळण्यासाठी जिल्ह्यात 17 भरारी पथकांची नियुक्ती

नांदेड दि. 17 :- खरीप हंगाम लवकरच सुरु होत असुन, शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, खते व किटकनाशके मिळण्याकरीता विक्रेते व उत्पादक यांच्या नियमित तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हयात जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुकास्तरावर एक असे एकुण 17 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही निविष्ठा विक्रेत्यांनी गैरव्यवहार, साठेबाजी, ज्यादा दराने विक्री, बोगस खते बियाणे विक्री करु नये, असे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एस. बऱ्हाटे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करताना काही अडचणी येत असतील किंवा विक्रेत्यांकडुन अडवणुक होत असेल तर तात्काळ संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

खरीप हंगामामध्ये कृषिसेवा केंद्र चालक किंवा खाजगी एजंन्ट मार्फत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे खते / बियाणे व किटकनाशके विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी कृषि विभागाकडुन कृषि सेवा केंद्राची नियमित तपासणी करण्यात येते. सर्व निविष्ठांचे व्यवस्थीत वाटप व चांगल्या प्रतीच्या निविष्ठा शेतकऱ्यांना मिळतील, त्यांची निविष्ठासाठी अडवणुक होणार नाही यासाठी भरारी पथक काम करणार आहे.

त्याचबरोबर कृषि निविष्ठा विक्रीमध्ये गैरव्यवहार, साठेबाजी, ज्यादा दराने विक्री, असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास उत्पादक, विक्रेत्यांचे परवाने निलंबित किंवा रद्य करण्यात येतील. गैरव्यवहाराचे स्वरुप गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा बोगस बियाणे, खते व किटकनाशकांची विक्री केल्यास संबंधिताविरुध्द भरारी पथकामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर भरारी पथकामध्ये तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती, निरीक्षक वजन व मापे व मंडळ कृषि अधिकारी यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकात कृषि विकास अधिकारी, मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, वजन मापे निरीक्षक यांचा समावेश आहे.

मागील वर्षात कृषि विभागामार्फत नांदेड जिल्हयात बोगस खते विक्री केल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बियाण्यांची अनधिकृत विक्री केल्यामुळे एका बियाणे उत्पादकावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच अप्रमाणीत बियाण्यांची विक्री केल्यामुळे उत्पादक व कृषि सेवा केंद्र चालक यांच्या विरुध्द 68 न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. येणाऱ्या खरीप हंगामामध्ये मोहिम राबवुन कृषि निविष्ठा विक्रेते व उत्पादकांच्या तपासण्या करण्यात येणार असुन त्यामध्ये अनियमितता आढळुन आल्यास संबंधितांचा परवाना निलंबित अथवा रद्य करण्यात येईल असेही कृषि विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वृत्त क्र. 428

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या  पात्र परिसरात कलम 144  

नांदेड दि. 17 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 मे 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जून 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 मे 2024  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जून 2024 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

Thursday, May 16, 2024

वृत्त क्र. 427

मान्‍सुन पूर्व कालावधीत दुर्घटना टाळण्यासाठी

जाहिरात फलकाची तपासणी करण्याचे आदेश

नांदेड दि. 17 :- घाटकोपर, मुंबई येथे 13 मे रोजी जाहिरात फलक कोसळल्‍याची दुर्घटना घडलेली आहे. यात जीवीत व वित्तहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जाहिरात फलकामुळे अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शहरी व ग्रामीण भागातील यंत्रणाना दिले आहेत.

शहरी भागातील व महामार्गावरील लावण्‍यात आलेल्‍या जाहिरात फलकांचे (होर्डींग) रचनात्‍मक (स्ट्रक्चरल ऑडीट) तपासणी करावेत. तपासणीअंती आढळून आलेले अवैध जाहिरात फलक निष्कासनाची कार्यवाही तात्काळ करुन संबंधीतावर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्‍यासाठी व दक्षतेची बाब म्‍हणून नैसर्गिक आपत्‍ती समयी जाहि‍रात फलकाच्‍या आजू-बाजूला न थांबण्‍याबाबत सुचनाही नागरीकांना दिल्या आहेत. घाटकोपर, मुंबई येथे मोठी दुर्घटना घडल्‍यामुळे जीवीत व वित्तहानी झाली असून या अगोदरही पुणे शहरामध्‍ये 6 ऑक्टोबर 2018 रोजी अशीच दुर्घटना घडलेली होती. त्‍यामध्‍येही जीवीत व वित्तहानी झालेली होती. अशा स्‍वरुपाची घटना मान्‍सून काळात वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसामुळे होऊ शकतात. अशा दुर्घटना घडू नये यासाठी शासनाच्‍या सुचनेनुसार शहरी भागातील व महामार्गावरील लावण्‍यात आलेल्‍या जाहिरात फलकांचे  रचनात्‍मक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 0000

वृत्त क्र. 426

 आपत्ती व्यवस्थापनाच्या योग्य अंमलबजावणीसाठी प्रभावी संपर्क व समन्वयावर भर द्या

– जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

·         जिल्ह्यात आपत्ती निर्माण होणार नाही यांची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी

·         मागील वर्षी आपत्ती निर्माण झाली त्याठिकाणावरचे प्रश्न तात्काळ सोडवा

·         जिल्ह्यातील धोकादायक होर्डीगमुळे आपत्ती निर्माण होणार नाही यांची काळजी घ्या

नांदेड दि. 16 :- दरवर्षीच्या मान्सून पेक्षा यावर्षीचा मान्सून जास्त प्रमाणात दर्शविला असला तरी जिल्ह्यात संभाव्य काळात आपत्ती निर्माण होणार नाही यांची खबरदारी यंत्रणानी घ्यावी. त्यासाठी सर्व आपत्ती व्यवस्थापनासंबंधीची कामे 31 मे 2024 पूर्वी करण्यावर भर द्यावा. प्रभावी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागानी प्रभावी संपर्क व योग्य समन्वय ठेवून कामे पूर्ण करण्यावर भर द्यावाअसे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटेमनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडेनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरउपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसेजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटेआपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटीलजिल्ह्यातील सर्व तहसिलदारगटविकास अधिकारी यांच्यासह विद्युतअग्निशमनजलसंपदाआदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यात मागच्या वर्षी ज्या भागात आपत्ती निर्माण झाली होती त्याठिकाणचे प्रश्न यंत्रणानी सर्वेक्षण करुन प्राधान्याने सोडविण्यावर भर द्यावा. तसेच आरोग्य विभागाने पावसाळयात अचानक उदभवणाऱ्या रोगराई व संसर्गजन्य आजार याबाबत दक्ष राहून औषधी साठा व पुरेशा प्रमाणात ब्लिंचीग पावडर उपलब्ध करुन ठेवावे. नांदेड शहरातील नालेसफाईगटार दुरुस्तीनाल्यातील गाळ काढण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्ह्यात गोदावरीपैनगंगामांजराआसनालेंडीकयाधूमन्याड या नद्या व या नद्याच्या उपनद्या यांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील पूरप्रवण गावाची संख्याही मोठया प्रमाणात आहे. जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये 337 गावे ही पूरप्रवण क्षेत्रात मोडतात. या गावातील शासकीय यंत्रणानी विशेषत: गाव पातळीवरील ग्रामसेवकतलाठीपोलीस पाटीलतहसिलदारगटविकास अधिकारी यांना परस्परात समन्वय ठेवून कोणत्याही परिस्थितीत आपत्ती निवारणासाठी अडचण निर्माण होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील लहान-लहान नालेतलावकॅनाल यामध्ये गाळकचराझाडेझुडपे वाढल्यामुळे पूरपरिस्थती निर्माण होवून आपत्तीची परिस्थिती निर्माण होवू शकते त्यामुळे पावसाळयापूर्वी हे कामे पूर्ण करण्यावर भर द्यावाअसे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.



 जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील धोकादायक व बेकायदेशिर होर्डींग काढण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना त्यांनी मनपानगरपरिषदनगरपालिका यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पावसाळयात होर्डीगमुळे कोणतीही आपत्ती ओढवणार नाही किंवा हानी होणार नाही यांची काळजी संबंधित यंत्रणेनी घ्यावीअसे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

 गोदावरी नदीवर पूर नियंत्रणासाठी असलेली महत्वाची ठिकाणे व त्या-त्या ठिकाणावरुन अतिवृष्टी झाल्यास पूर वहणाचा कालावधी  हा संबधीत अधिकाऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर नियत्रंण कक्ष कार्यान्वित करुन त्यावर जबाबदार अधिकारीकर्मचारी यांची नेमणूक करावी असे त्यांनी स्पष्ट केले. गावपातळीवर ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करुन या समित्यामार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे अद्ययावत आराखडे तयार करुन आपत्ती निवारणाबाबत नियोजन करावेअसे निर्देश त्यांनी दिले. आरोग्य व्यवस्थेसाठी लागणारी औषधे,  पाण्यातून होणारे आजार लक्षात घेता पुरेशा प्रमाणात ब्लिंचीग पावडरस्वच्छतेच्यादृष्टीने नगर/महानगर पालिका क्षेत्रातील नाले सफाईवीज वितरणात अडथळा होणार नाही यादृष्टीने आपतकालिन व्यवस्थापन या बाबीवर त्यांनी भर देवून सर्व यंत्रणेला दक्षतेच्या सूचना दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रारंभी आपत्ती व्यवस्थापन बाबत सविस्तर सादरीकरण केले.



0000


Wednesday, May 15, 2024

 वृत्त क्र. 425 

टंचाई निवारणाची कामे लोकसहभागातून हाती घ्यावीत

-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

•  आंदेगाव येथील नाला खोलीकरणाच्या कामास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ

 

नांदेड दि. 15 :- नांदेड जिल्ह्यात टंचाई निवारण व मान्सून पूर्व कामे प्राधान्याने सुरु आहेत. टंचाई निवारणासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अनेक तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेवून उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणाना देत आहेत. पिण्यासाठी व पिकांना मुबलक पाणी मिळावे यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात जलसंधारणाची व तलावनाल्यातील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत. काढलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकून यातून शेतजमीन सुपीक होण्यास मदत होईल. यासाठी नागरिकांनी लोकसभागातून अशी कामे मोठया प्रमाणात हाती घ्यावीत. अशा कामांना शासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्थामार्फत सहकार्य करण्यात येईलअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.

 

हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथे लोकसहभागातून आज नाला खोलीकरणाच्या कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी  उपविभागीय अधिकारी विनोद गड्डमवारकिनवटचे उपविभागीय कृषि अधिकारी आर.डी. रणवीरहिमायतनगरच्या तहसिलदार पल्लवी टेमकरतालुका कृषि अधिकारी दिलीप जाधवकृषि अधिकारी निलेश वानखेडेकृषि पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक व गावातील संरपंच कांताबाई विठ्ठल वाढवेपोलीस पाटील मारोती निळकंठे तसेच सेवा मंडळाचे पदाधिकारी व समस्त गावकरी आदींची उपस्थिती होती.

 

आंदेगाव या गावाचे भौगोलिक क्षेत्र 973.35 हेक्टर असून पेरणी लायक क्षेत्र 937.4 हेक्टर आहे. या गावशिवारात ज्वारीतूरमुगउडीदसोयाबिनकापूसहळदऊसगहूहरभरामकाकेळी व तीळभुईमूग इत्यादी पिकांची लागवड होते. लघुपाटबंधारे विभागाने आंदेगाव व दरेसरसम या गावाच्या सीमेवर दरेसरसम पाझर तलावाचा सांडवा आंदेगाव शिवारातील नाल्यामध्ये सोडला आहे. या नाल्यात पाणी सोडल्यामुळे गाळ साचून नाला उथळ झाला आहे.  नाल्यातील पाणी उपजावू व पिकावू जमीनीवर वाहते व पिकाचे दरवर्षी खरिपात नुकसान होत होते. त्यावर लोकसहभागातून गावकरीशेतकरीकृषि विभाग यांच्या समन्वयातून गुरुदेव सेवा मंडळ यांच्या सहकार्यातून गाळ काढण्याचा नियोजन करण्यात येवून या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच या कामाला सर्व शासकीय यंत्रणेचे व एनजीओचे सहकार्य राहीलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000








वृत्त क्र. 424

शेतकऱ्यांनी अनधिकृत एचटीबीटी

कापुस बियाण्यांची खरेदी करु नये

-         जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस.बऱ्हाटे

नांदेड दि. 15 :- अनधिकृत एच.टी.बी.टी कापुस बियाणे खरेदी व लागवड करु नये असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी व बियाणे विक्री परवानाधारकांकडुनच कापुस बी.टी.बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस.बऱ्हाटे यांनी केले आहे.

फसवणुक व बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडुन बियाणे पावतीसह खरेदी करावे. अनधिकृत बी.टी बियाणे खरेदीसाठी बनावट कंपन्या खाजगी एजंट आमिष अथवा प्रलोभन देत असतील तर शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी तालुका कृषि अधिकारी कार्यालयजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय व कृषि विभागजिल्हा परिषद यांच्याकडे कराव्यात असेही कळविले आहे.

बाजारात बोगस कंपन्याखाजगी व्यक्तिमार्फत परवाना नसलेली अनधिकृत एच.टी.बी.टी  कापुस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अनधिकृत एच.टी.बी.टी  बियाणांना काही व्यक्ती तणनाशक बीटी ) ( आरआरबीटी व बीटी-बीजी-3 या नावाने संबोधतात. तणनाशक बीटी ) ( आरआरबीटी व बीटी-बीजी-3 या अवैध बियाण्यांना शासनाची मान्यता नाही. अशा प्रकारचे बि-बियाणे विक्री करणेबाळगणेसाठा करणे गुन्हा आहे. या प्रकारचे अनधिकृत कापुस बियाणे लागवड केलेल्या कापुस पिकाचे पानांचे नमुने व उत्पादीत कापसाचे नमुने घेऊन त्यांची एच.टी.बी.टी जनुके तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. त्याचे नमुने तपासणीअंती एच.टी.बी.टी जनुके आढळल्यास संबंधितावर अनुषंगीक कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. अनधिकृत एच.टी.बी.टी बियाणे आढळल्यास त्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येइल. कृषि व पोलीस विभाग सतर्क असुन एच.टी.बी.टी बियाणे विक्री करण्याऱ्यांवर बारीक लक्ष ठेवुन असल्यामुळे कोणीही हे बियाणे विक्रीचा प्रयत्न करुन नये, असेही कृषि विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

शासनाची मान्यता नसलेल्या एच.टी.बी.टी बियाणे लागवडी नंतर ग्लायफोसेट हे तणनाशक फवारण्याची बनावट कंपनी व विक्रेते शिफारस करतील. दरम्यान ग्लायफोसेट हे तणनाशक कार्सिनोजनीक गुणधर्माचे असुन त्याच्या वापरामुळे मानवी आरोग्यास कँन्सरसारखे रोग उदभवण्याची शक्यता आहे. त्याच्या अतिवापरामुळे जमीनीची सुपिकता नष्ट होऊन भविष्यात त्या जमीनीत कोणतेही पिक लागवड करता येणार नाही व जमीन नापीक होईल. सर्व शेतकरीशेतमजुर यांचे आरोग्य धोक्यात होईल. ग्लायफोसेट या तणनाशकाचा केवळ पिके नसलेल्या जमीनीवर व चहा मळयासाठील वापर करण्याची शिफारस केंद्र शासनाने केली आहे.

या व्यतिरिक्त ग्लायफोसेट हे तणनाशक इतर पिकांवर वापरता येणार नाही. मान्यता नसलेल्या एच.टी.बी.टी कापसाची लागवड रोखण्यासाठी व कार्सिजोनिक गुणधर्म असलेल्या ग्लायफोसेटच्या वापरामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी व परवानाधारक विक्रेत्याकडूनच कापूस बियाणे खरेदी करावे असेही कृषि विभागाने कळविले आहे.

0000 

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...