Wednesday, April 3, 2024

  वृत्त क्र. 305 

पोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर. नांदेडमध्ये दाखल

नांदेड दि. 3 एप्रिल : 16-नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या पोलीस निवडणूक निरीक्षक श्रीमती जयंती आर. यांचे आज नांदेड येथे आगमन झाले. 

पोलीस निवडणूक निरीक्षक (पोलीस ऑब्झर्वर) श्रीमती जयंती आर. (भा.पो.से.) पोलीस विभागाकडून आलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्या तामीळनाडू कॅडरच्या २०१० च्या आयपीएस अधिकारी आहेत. तामीळनाडू येथे त्या पोलीस उप- महानिरिक्षक आहेत. शासकीय विश्रामगृहावर निवडणूक काळामध्ये त्या थांबणार आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक ९४९८११११५५ असून नागरिकांना लोकसभा निवडणुकी संदर्भात असणाऱ्या समस्यांबाबत त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो.

00000

 वृत्त क्र. 304 

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र दाखल

नांदेड दि. 3 एप्रिल :- 16- नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक  (जनरल )शशांक मिश्र ( भा.प्र.से ) यांचे आज नांदेड येथे आगमन झाले. भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त वरिष्ठ सनदी अधिकारी शशांक मिश्र हे केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयात सहसचिव आहेत. नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात ते थांबणार आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक ९२०९१६३०२९ आहे. नागरिकांना काही तक्रारी असल्यास ते लोकसभा निवडणुकी संदर्भातील तक्रारी निवडणुकीसाठी आलेल्या सर्वसाधारण निवडणूक निरीक्षकांच्या लक्षात आणून देऊ शकतात.नागरिकांना भेटण्यासाठी त्यांनी सकाळी नऊ ते दहा ही वेळ ठेवली आहे.

0000

 वृत्त क्र. 303

बुधवारी 9 अर्ज ; आतापर्यंत 20 अर्ज दाखल

145 अर्जाची उचल ;आज शेवटची तारीख 

नांदेड दि. 3 एप्रिल :- लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या गुरुवार चार एप्रिल शेवटचा दिवस आहे. आज बुधवारी एकूण 9 अर्ज दाखल झाले. 19 उमेदवारांचे 20 अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. 

बुधवारी 16 नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत. एका उमेदवाराने आतापर्यंत दोन अर्ज दाखल केल्यामुळे 19 उमेदवारांचे 20 अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी एकोणवीस अर्जाची उचल करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 145 अर्ज उचलण्यात आले आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आज दाखल झालेले अर्ज लक्ष्मण नागोराव पाटील (अपक्ष), तुकाराम गणपत बिराजदार (अपक्ष ), वसंतराव बळवंतराव चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी ), शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलिस ए इन्कलाब ए मिल्लत,), मोहम्मद वसीम (अपक्ष ), मोहम्मद सिद्दीकी शेख संदलजी (अपक्ष), भास्कर चंपतराव डोईफोडे (अपक्ष ), असलम इब्राहिम शेख (अपक्ष ) 

आतापर्यंत दाखल झालेले अर्ज चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भारतीय जनता पार्टी), विष्णू मारुती जाधव (राष्ट्रीय किसान पार्टी), जगदीश लक्ष्मण पोतरे (अपक्ष ), कदम सुरज देवेंद्र (अपक्ष) ,नागोराव दिगंबर वाघमारे (अपक्ष ), नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसेन (अपक्ष), वसंतराव बळवंतराव चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), महारुद्र केशव पोपळाईतकर (अपक्ष),अकबर अख्तर खॉन (अपक्ष),साहेबराव भिवा गजभारे (अपक्ष), जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केला आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा निवडणूक होत आहे. 28 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. उद्याचा एक दिवस अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जाची छाननी 5 एप्रिलला होईल. अर्ज 8 एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. 8 तारखेला अंतिम उमेदवार निश्चित होईल.

0000











 

 वृत्त क्र. 302 

सीईओ मिनल करनवाल यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

नांदेड दि. 3 एप्रिल :- नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदान जनजागृती नोडल अधिकारी मिनल करनवाल यांची जनसंपर्क अधिकारी  मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत आज गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचे महत्त्व,  जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येणारी तयारी, जनजागृती उपक्रम आदी विषयी त्यांनी या मुलाखतीतून माहिती दिली आहे.

0000

Tuesday, April 2, 2024

 वृत्त क्र. 301 

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत

एमपीडीए अंतर्गत धाडसी कारवाई

 

नांदेड दि. 2 :- वारंवार शिक्षा होऊनही सुधारणा न होऊ शकलेल्या एका गुन्हेगारावर महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी (एमपीडीए) कायद्याअंतर्गत नांदेडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. एक वर्षासाठी गुन्हेगाराची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

 

नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कुणाल बाबुलाल जयस्वाल या गुन्हेगारावर महाराष्ट्र दारूबंदी गुन्ह्याच्या कलम 93 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारची शिक्षा अथवा दंडाची भीती नसणाऱ्याअवैध मद्य व्यवहारातील आरोपींनी वारंवार गुन्हा केल्यास महाराष्ट्र दारूबंदी गुन्ह्याच्या कलम 93 अंतर्गत घेण्यात आलेल्या बंद पत्राचे उल्लंघन केल्यास किंवा कुठल्याही प्रकारच्या अवैध मद्य विक्री केल्यास  एमपीडीए प्रस्ताव दाखल करून गुन्हेगाराची रवानगी थेट कारागृहात करण्यात येते याची नोंद घ्यावीअसेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

अवैध मध्ये निर्मिती विक्री वाहतूक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १८००२३३९९९९ व व्हॉटस अॅप ८४२२००११३३ तसेच दूरध्वनी क्र. ०२४६२-२८७६१६ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्र. 300 

एमसीएमसी समितीची बैठक 

नांदेड दि. 2 – जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांच्‍या अध्‍यक्षतेखाली काम करणा-या माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण (एमसीएमसी ) समितीची बैठक सोमवारी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथील माध्‍यम कक्षात पार पडली. उमेदवारी  निश्चित झाल्‍यानंतर प्रमाणिकरण व संनियंत्रण कार्यामध्‍ये गती देण्‍यात यावी, असे निर्देश यावेळी जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी दिले. 

यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे माधव जायभाये, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विश्‍वास वाघमारे, वरिष्‍ठ पत्रकार राजेश निस्‍ताने, जनसंपर्क अधिकारी मिलींद व्‍यवहारे, सायबर सेलचे प्रतिनिधी  तसेच मिडीया कक्षाच्‍या सर्व सदस्‍यांची उपस्थिती यावेळी होती. 

सारखा मजकूर, एकाच सभेचे सारखे वृत्‍तांकन, उमेदवारांच्‍या विजयी निश्चितीचे दावे, जनतेचे पाठबळ मिळत असल्‍याचे दावे तशा पध्‍दतीचे वाक्‍य वापरुन पेरण्‍यात येणा-या वृत्‍तांची दखल घेण्‍यात यावी. तसेच जाहिरातीच्‍या दरानुसार उमेदवारांच्‍या खर्चामध्‍ये त्‍यांची नोंद करण्‍यात यावी तशी माहिती खर्च विभागाला देण्‍यात यावी. तसेच रेडीओवर येणा-या जाहिरातीचीही नोंद घेण्‍याचे यावेळी समितीने निश्चित केले. माध्‍यमांना तसेच राजकीय पक्षांना याबाबतची माहिती देण्‍यात आली आहे. तथापि, वारंवार याबाबत माध्‍यमांना अवगत करण्‍यात यावे, असेही यावेळी समिती सदस्‍यांनी स्‍पष्‍ट केले. सोशल माध्‍यमांच्‍या रोजच्‍या शंभरावर खात्‍याची तपासणी होत असल्‍याची माहिती यावेळी सायबर सेलमार्फत देण्‍यात आली.

00000











 वृत्त क्र. 299 

निवडणुकीच्‍या काळातील वृत्‍तांकनाची पत्रकारितेच्‍या विद्यार्थ्‍यांनी जाणून घेतली माहिती 

नांदेड दि. 2 – एमजीएम महाविद्यालयाच्‍या एमजे एमएस अभ्‍यासक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यानी निवडणूक काळामध्‍ये निवडणूक  आयोग तसेच प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाला अपेक्षित असणारे वृत्‍तांकन व  माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमार्फत या काळात होणारी देखरेख यासंदर्भातील माहिती माध्‍यम कक्षाला भेट देवून जाणून घेतली. 

जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात माध्‍यम कक्ष स्‍थापन करण्‍यात आला आहे. याठिकाणी प्रिंट, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, ऑडीयो व सोशल मिडीयाचे संनियंत्रण केले जात आहे.  माध्‍यम कक्ष आणि निवडणुकीचे कव्‍हरेज हे पत्रकारांसाठी अत्‍यंत महत्‍वाचे कार्य आहे. सध्‍या लोकसभेची आदर्श आचारसंहिता सुरु असून  निवडणूक प्रक्रियेबाबतची अचूकता राहावी व प्रशासनामार्फत द्यावयाची सर्व माहिती माध्‍यमांना वेळेत देण्‍यासाठी माध्‍यम प्रमाणिकरण व संनियत्रण समितीची स्‍थापना करण्‍यात आली आहे.  या समितीच्‍या माध्‍यमातून जाहिरातीच्‍या मजकुराला प्रमाणित करणे,  प्रिंट माध्‍यमात येणा-या जाहिराती व मजकूर पेडन्‍युज तर नाही यावर देखरेख, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व सोशल मिडीयावर येणा-या आक्षेपार्ह वृत्‍तांकडे लक्ष ठेवणे ही कामे माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमार्फत केले जातात. पत्रकारितेची पदवी घेणा-या विद्यार्थ्‍यांनी या बाबीची प्रक्रीया व माहिती जाणून घेतली. 

काल माध्‍यम कक्षाची माहिती घेण्‍यासाठी एमजीएम महाविद्यालयाचे एमजे एमएस या पदवीस शिक्षण घेणारे विद्यार्थी  -विद्यार्थी यांनी भेट देवून माहिती घेतली. यावेळी माध्‍यम कक्षाचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजूषा कापसे, क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे अधिकारी माधव जायभाये, जनसंपर्क अधिकारी मिलींद व्‍यवहारे तसेच मिडीया कक्षाच्‍या सर्व सदस्‍यांची उपस्थिती यावेळी होती. 

यावेळी सर्व पत्रकारितेच्‍या विद्यार्थ्‍यांना माध्‍यम कक्षाबाबत चालणा-या कार्याची माहिती जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी दिली. सोशल मिडीयावरील संनियंत्रण, फेकन्‍युज, वृत्‍तपत्राच्‍या जाहिरातीना  परवानगी याबाबत सविस्‍तर माहिती यावेळी देण्‍यात आली.

0000









  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...