Friday, February 9, 2024

विशेष लेख

विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व

श्री.गिरीश महाजन,मंत्री, ग्रामविकास आणि पंचायतराज व पर्यटन

राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले, जनतेला आपलेसे वाटणारे आणि धडाडीचे निर्णय घेणारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राला बहुआयामी नेतृत्व लाभले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मला शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे.

कोणतेही काम पार पाडण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज असते.असे नेतृत्व सर्वांना बरोबर घेवून जाणारे सर्वांना आपलेसे वाटणारे नेतृत्व असले की ते जनमानसात लोकप्रिय होते.असे नेतृत्व आणि कर्तृत्वाचा उत्तम संगम असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक गोष्टी शिकण्यास मिळत आहेत.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि  धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारावर  मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी नेहमीच मार्गक्रमण केले.पदापेक्षा तळागाळातील जनतेसाठी काम करताना त्यांनी नेहमी संवेदनशीलता जपली आहे.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येऊन एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत गेला आहे आणि त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची आपल्या मतदारसंघात असलेली मजबूत पकड  त्यांच्या लोकप्रियतेची पोचपावती आहे. ठाणे  महापालिकेत नगरसेवक ते विधानसभेचे सदस्य या राजकीय कारकीर्दीत त्यांनी मतदारसंघात  तसेच राज्यभरात अनेक जनहिताची कामे केली.  कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघातून 2004 मध्ये विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. जनतेने सातत्याने दाखवलेल्या विश्वासानंतर आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आजपर्यंत त्यानी मागे वळून पाहिले नाही.

पक्षीय राजकारणापेक्षा वैयक्तिक मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम महाराष्ट्राची जनता कधीच विसरू शकत नाही.२०१९ मध्ये कोल्हापूर,सातारा आणि सांगली महापुरामध्ये अस्मानी संकट आले असताना. त्या कालावधीत आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम सर्वांच्या लक्षात राहील, असे आहे. महापुराच्या कालावधीत आरोग्य यंत्रणे सोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सर्व काम स्वतः पाहिले. 

नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी देखील केली आहे. राज्याचा विकास व्हायचा असेल तर सर्वांना परवडणारी दळणवळण व्यवस्था, दर्जेदार सुविधा देखील असाव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी  महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले.नागपूर ते शिर्डी (कोकेमठाण) या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे पूर्वी हे अंतर पार करण्यासाठी तेरा तास लागत होते आता पाच तासात हे अंतर पार करणे शक्य होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कमी कालावधीत केलेले भूसंपादन, शेतकऱ्यांना त्वरित दिले ला भूसंपादनाचा मोबदला, सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन या रस्त्याचे विक्रमी वेळेत पूर्ण केलेले काम या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेले आहे. एकूणच या कामामुळे प्रकल्पाची  घोषणा करून  त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यावर भर देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यशैली  आहे.

रायगड जिल्ह्यातील  ईरशाळवाडी येथे १९ जुलै २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास भूस्खलन होवून दरड कोसळली होती.  या दुर्घटनेत ८४ व्यक्ती बेपत्ता होत्या.या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जाऊन या घटनेवर ती पूर्णपणे सनियंत्रण करून मदत व बचाव कार्यात केलेले काम हे वाखनण्याजोगे होते.

बदलापूर आणि वांगणीदरम्यान अडकून पडलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या सगळ्या 1050 प्रवाशांची केलेली सुखरूप सुटका,राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून प्रवाशांच्या सुखरूप सुटकेसाठी त्यांनी केलेले काम मी स्वतः पहिले असून  या सर्व घटनांचा मी साक्षीदार आहे.

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी पदभार घेतल्यापासून राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना एक अत्यंत चांगला अनुभव मिळत आहे. कोरोना सारखे संकट, महापूर, अतिवृष्टी या कालावधीत जनतेला दिलासा देणारे निर्णय, परवडणाऱ्या घरांना चालना, लोकाभिमुख प्रशासन, पायाभूत प्रकल्पांना वेग, दुर्बल घटकांना दिलासा,शासन आपल्या दारी उपक्रम असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शिक्षण,आरोग्य,शेती-सिंचन, परिवहन,माहिती तंत्रज्ञान,ऊर्जा,पर्यटन या सर्व क्षेत्रात यापुढेही अनेक नवीन योजना राबवण्याचा मानस आहे.राज्याची शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्यासाठी, प्रगती कडे नेण्यासाठी अनेक विकास आराखडे त्याचे नियोजन केले जात आहे.

महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण करत असलेल्या सर्व प्रयत्नांना यश मिळो,आपली सर्व स्वप्ने साकार होवो, तुम्हाला वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो ...

 

शब्दांकन : संध्या गरवारे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

विशेष लेख

 मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख

सर्व सामान्यांच्या उत्कर्षाचा ध्यास घेतलेले नेतृत्व

- रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे 

            राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या समृद्धीचा ध्यास घेऊन दिवसातील 16 - 16 तास मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे काम करत आहेत. राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देता यावा यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन त्यांच्या अंमलबजावणीसाठी स्वतः मुख्यमंत्री आग्रही असल्याचे दिसते. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांना सक्षम बनवून त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी झटणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

            गेल्या दीड वर्षापासून राज्याला एक सक्षम नेतृत्व मिळाले आहे. या सक्षम नेतृत्वामुळे राज्यात विकास कामांचा धडाका सुरू आहे. विकासकामांसोबत सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात समृद्धी अणणारे अनेक महत्वाचे निर्णय शासनस्तरावर घेण्यात येत आहेत. जनतेशी बांधिलकी असलेले मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्या या धडाक्यामुळेच जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या दूरदृष्टी आणि कल्पक बुद्धिमतेमुळे रोजगार हमीच्या क्षेत्रात अनेक कल्याणकारी निर्णय घेतले गेले आहेत.

            राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत विकासाचे दालन खुले व्हावे, त्यांचे जीवनमान उंचवावे आणि हे करत असतानाच पर्यावरणाचेही संरक्षण व्हावे अशा तिहेरी उद्देशाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात मिशन बांबू लागवड राबवण्यात येत आहे. या मिशनमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून प्रती हेक्टरी सुमारे 7 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. बांबू ही भविष्याची गरज असल्याचे ओळखून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हे मिशन सुरू केले आहे. बांबूच्या माध्ममातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता तर मिळणार आहेच. त्याशिवाय देशाची आर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाचे संरक्षण हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. पर्यावरण रक्षणामध्ये बांबू लागवडीला अनन्यसाधारण महत्व आहे. बांबू लागवडीमुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करणे आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. शेतकऱ्यांना पडिक जमिनीवर, शेताच्या बांधावरही बांबू लावगड करता येणार आहे आणि त्यासाठी मनरेगा अंतर्गत अनुदान देण्यात येणार आहे. असा क्रांतिकारी निर्णय घेऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचे उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे.

            यासोबतच ग्रामीण भागाच्या विकासासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा पुरेपूर वापर करण्याचे अनेक महत्वाचे आणि लाभदायी निर्णय मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या पाठिंब्याने रोजगार हमी आणि फलोत्पादन विभागाने घेतले आहेत. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राम रोजगार सेवकांना कामासोबतच चांगल्या मानधनाची हमी मिळाली आहे. ग्राम रोजगार सेवक जितके जास्त काम करतील तितके जास्त मानधन त्यांना मिळेल अशी व्यवस्था या सुधारणा दरांमध्ये करण्यात आली आहे. पूर्वी 750 मनुष्य दिवस निर्मिती  करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा किमान 2 हजार रुपये म्हणजेच वार्षिक 24 हजार रुपये मानधन मिळत होते. त्यामध्ये सुधारणा करून हे मानधन किमान 2 हजार 500 म्हणजेच वार्षिक 30 हजार रुपये करण्यात आले. तसेच 10 हजार मनुष्य दिवसांपर्यंत काम करून त्यांना किमान 84 हजार व कमाल 1 लाख रुपयांपेक्षाही जास्त वार्षिक उत्पन्नाची हमी देण्याची व्यवस्था या सुधारणांमध्ये करण्यात आली आहे.

            राज्यातील प्रत्येक कुटुंब सुविधा संपन्न बनवण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबवण्यात येत आहे. या मिशनमध्ये पाच वर्षांसाठी 10 लक्ष सिंचन विहिरी, 7 लक्ष शेततळे तयार करणे आणि 10 लक्ष हेक्टर क्षेत्रात फळबाग, बांधावर वृक्ष लागवड, रेशीम उद्योग उभारणी व बांबू लागवड करणे असे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या माध्यमातून शेतीसाठी शाश्वत सिंचनाची सोय निर्माण करणे आणि मजुरांच्या हाताला काम देणे असे दुहेरी उद्दीष्ट साध्य होत आहे. तसेच यामध्ये गोठे, शेळीपालन, कुक्कुटपालन शेड, पाणंद रस्ते, शाळांना संरक्षण भिंत बांधणे, गोडाऊन बांधकाम, नाला खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरण, तलावातील गाळ काढणे अशी ग्रामीण विकासाची कामे हाती घेण्यात येत आहेत.

            प्रत्येक कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान कालावधीसाठी रोजगार हमी म्हणून मागणीनुसार ग्रामीण भागातील अकुशल हाताला काम देणे. गुणवत्तापूर्ण टिकाऊ उत्पादक मालमत्ता तयार करणे, गरिबांच्या उपजीविकेच्या साधनांचा आधार मजबूत करणे, समाजिक समावेश निश्चित करणे आणि पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करणे या उद्देशाने सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबवण्यात येत आहे.

            तसेच ग्रामपंचायत क्षमता बांधणी, कामांमधील व मानधन वितरणातील विलंब टाळणे, कामे लवकर प्राप्त करून घेणे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ई-मस्टर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात रेशीम उद्योग विकास योजना मनरेगा अंतर्गत राबवण्यात येत आहे. सिंचन सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने व प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने सिंचन विहरींच्या कामांना गती देण्यात आली आहे.

            आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण भागाचा कायपालट होत असून शेतकरी व ग्राम रोजगार सेवकांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जनतेच्या हितासाठी राबणारे असे हे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांना त्यांच्या वाढ दिवसानिमित्त पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा...!

                                                                                      

शब्दांकन:

हेमंतकुमार चव्हाण,

विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व त्यांना संपर्क

विशेष लेख

 ‘.. संवेदनशील, अथक कार्यशैली हीच प्रेरणा’ – विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.

ुख्यमंत्री महोदयांच्या कामाचा वेग कित्येकदा अचंबित करण्यासारखा असतो. अहोरात्र ते कामात असतात. इथं अहोरात्र म्हणजे अहोरात्र असंच असतं. निर्णय घ्यायचा आहे, तर त्यामध्ये वेळ दवडणं त्यांना आवडत नाही. ते त्यांना अपेक्षितही नसतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यातील त्यांच्या वेगवेगळ्या विभागांच्या कामांवर नजर टाकली तर, त्यांचा झपाटा लक्षात येतो. इथं उल्लेखित कामे, प्रकल्प, उपक्रम, ही वाणगीदाखल आहेत. त्यांची यादी मोठी होऊ शकते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासाठी रुग्णसेवा ही सर्वोच्च आहे. त्यामुळे आपण अलिकडच्या काळात पाहिलं असेल, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम देखील मुख्यमंत्री महोदयांप्रमाणेच अहोरात्र सुरु असते. या कक्षाद्वारे महाराष्ट्रातल्या काना-कोपऱ्यातल्या गरजू रुग्णांपर्यंत वैद्यकीय उपचारांसाठी मदत पोहचवली जाते. ही मदत आर्थिक असतेच. पण त्याशिवाय दररोज कित्येकांचे वेगवेगळ्या कारणांसाठी मदतीसाठी विनंती, विचारणा सुरु असते. वेगवेगळ्या प्रकारची मदत मागितली जाते. मुख्यमंत्री महोदयांप्रमाणेच तत्पर आणि वेळेत मदत पोहचवणारा कक्ष अशी ओळख तयार झाली आहे. या वैद्यकीय कक्षाच्या व्यतिरिक्तही मुख्यमंत्री महोदय विशेष बाब म्हणूनही सातत्याने मदत करण्यात पुढे असतात. अशी मदत करताना त्यांच्यापुढे वेळ-काळाचं बंधन नसतं. समोरचा मदत मागतो आहे. तो गरजू आहे, याची खात्री झाली की तिथल्या तिथे मदत करतात. रात्री-अपरात्री पर्यंत वैद्यकीय सहायता कक्ष आणि संबंधितांपर्यंत मदत पोहचवण्याचे संदेश जातात. एकदा एका अपघातात दोन्ही हात गमावलेला आणि पायांनीही अधू झालेला तरूण मुलाला घेऊन त्याचे वडील आले होते. त्यांनी आपली करून कहाणी ऐकवणे सुरु असतानाच, त्यांना मदत पोहचवण्याची प्रक्रीया सुरु झाली होती. सगळी मदत केली जाईल, कुटुंबाला हातभार लावला जाईल, असा धीर-दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी त्या तरुणाच्या खांद्यावर हात ठेवला. याच दरम्यान सगळी चक्रे फिरली होती, आणि मदतीचा धनादेशही संबंधित बाप-लेकांच्या हातात सुपूर्द केला गेला होता.

मदतीची अपेक्षा बाळगून येणाऱ्यांचे प्रत्येकाचे समाधान करण्यात ते यशस्वी होतात. प्रत्येकाचे समाधान व्हावे यासाठी तिथल्या तिथे निर्णय घेण्याची. संबंधिताना तडक दूरध्वनी करून, जागेवरच सूचना देण्याची त्यांची पद्धत असते. यामुळे त्यांच्या भेटीची अपेक्षा बाळगून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. ते त्यांना जाणीवपूर्वक वेळही देतात. अभ्यागतांची गर्दी हा त्यांच्यासाठी दैनंदिनीचा भाग असतो. त्यामुळेच उशिरा रात्रीपर्यंत त्यांच्याकडे भेटीसाठी गर्दी आणि रांगच असते.

आपत्तीच्या काळातही मुख्यमंत्र्यांची स्वतःहून जाणून घेऊन पुढे राहण्याची आणि प्रत्यक्ष फिल्डवर उतरून नेतृत्व करण्याची भूमिका असते. त्यामुळेच नैसर्गिक किंवा अन्य कुठल्याही आपत्तीत ते आर्थिक सहाय्य आणि मदत-बचावासाठी ते सदैव सतर्क आणि त्याबाबतच्या माहितीने अद्ययावत असतात. अशा वेळी या गोष्टीं ते दुसऱ्यांवर सोपवून बाजूला राहू शकतात. पण तसे होत नाही. ईर्शाळवाडी सारखी दरड कोसळण्याची दुर्घटना असो किंवा अन्य कुठला अपघात, पूर अशा आपत्तीतही ते मदत पुरवण्यापासून त्यातील आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनाच्याबाबतीत आग्रही असतात. या सर्व गोष्टींचा सातत्याने आढावा आणि वेळच्या वेळी या गोष्टी पार पडताहेत की नाही याचा पाठपुरावा करण्यावरही त्यांचा भर असतो.

दिव्यांग आणि दिव्यांगांच्या मदतीसाठी ते दक्ष असतात. स्वतंत्र दिव्यांग विभाग व्हावा यासाठी त्यांची तळमळ होती. दिव्यांगाविषयी आस्थेचे आणि त्यांच्या हितांचे रक्षण व्हावे असे निर्णयही त्यांनी तडकपणे घेतले आहेत.

गरजूंना मदत यासोबतच राष्ट्रभक्तीचे आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे उपक्रम अशा सर्वच बाबतीत मुख्यमंत्री महोदय संवेदनशील असतात. त्यांचे या सगळ्या गोष्टींवर बारकाईनं लक्ष असतं. या उपक्रमांच्या नियोजन-आयोजनात कुठलीही त्रुटी राहू नये यासाठी ते आग्रही असतात. स्वतः लक्ष घालून अनेक गोष्टींना ते आकार देतात. यातही त्यांची दूरदृष्टी आणि नावीन्याचा ध्यास दिसून येतो. सहभागी कलाकार, ज्येष्ठांचा-तज्ञांच्या मतांचा आदर, त्यांना काय हवं- काय नको हे पाहण्यातही ते मागे राहत नाही. उत्तम, उत्कृष्ट आणि भव्य-दिव्य यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असतात. यातूनच महाराष्ट्रात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सर्व उपक्रमात मग तो हर घर तिरंगा असो किंवा पुढे दीर्घकाळ चाललेला मेरी माटी-मेरा देश हा उपक्रम. या सगळ्याच्या आयोजनात महाराष्ट्र अव्वल राहीला आहे. यातील काही उपक्रमांत तर विक्रमच रचला गेला आहे. या अमृत कलश उपक्रमाच्या आयोजनात तेही आवर्जून सहभागी झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध उपक्रम आयोजित केले गेले. किल्ले रायगडवर विशेष कार्यक्रम केला गेला. त्यामध्येही हिरीरीने सहभागी झाले. यातील सर्व उपक्रमांत त्यांनी स्वारस्य दाखवून अनेक सूचना केल्या होत्या. त्यामुळेच आपण वर्षभर हा या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करू शकलो. यातून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाणता राजा या महानाट्याचे प्रयोगांचे आयोजन करण्यात आले. आता आगामी काळात शिवजयंतीच्या निमित्यानेही प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजिक करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या ठिकाणी स्वच्छता, रंगरंगोटी, सुशोभिकरण करण्यात यावे असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

स्वच्छता हा देखील मुख्यमंत्र्यांच्या आवडीचा आणि आस्थेचा विषय आहे. ते स्वच्छतेचे भोक्ते आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्वच्छतेचा विषय प्राधान्यक्रमावर आला आहे. विशेषतः शहरी भागातील स्वच्छतेसाठी त्यांनी डिप क्लिनिंग या संकल्पनेवर भर दिला आहे. सध्या महानगरापर्यंत असलेली ही मोहिम पुढे राज्यभरातील सर्वच शहरात राबवली जाणार आहे. अलिकडेच केंद्र सरकारने महाराष्ट्राचा या नागरी स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राला प्रथम क्रमांचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यातच या मोहिमेचे यश सिद्ध होते. यापुढे या मोहिमेचा, या संकल्पनेचाही विस्तार केला जाणार आहे. याशिवाय सौंदर्यीकरण, सुशोभिकरण याबाबतही त्यांचा कटाक्ष असतो. शहरात वृक्षराजी आणि ऑक्सिजन पार्क निर्माण व्हावेत. प्रदूषण आणि अस्वच्छता दूर व्हावी यासाठी त्यांचा आग्रह असतो. त्यासाठी ते वारंवार यंत्रणांना सूचना देत असतात. प्रचंड व्यस्तात आणि अनेक कार्यक्रम असतानाही ते प्रसंगी भल्या सकाळी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून स्वच्छता मोहिमेला प्रोत्साहित करण्यासाठी दौरे करतात हे आपण पाहतोच आहोत.

शेती विषयक आणि अनुषांगिक अनेक गोष्टींबाबत त्यांच्याकडे अद्ययावत माहिती असते. त्यामुळेच त्यांनी अलिकडेच बांबू लागवडीसारख्या अभिनव गोष्टींवर भर दिला आहे. बांबुची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. बांबू लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला स्त्रोत निर्माण होणार आहे. यासाठी अलिकडच्या मंत्रिमडळ बैठकीतही ऊती संवर्धित बांबूची लागवड तसेच त्याच्या देखभालीसाठी अनुदानाची तरतूद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

दहिहंडी हा पारंपरिक उत्सव आता एक महत्वाचा क्रीडा प्रकार आहे. यातील गोपाळांविषयी मुख्यमंत्र्यांना मनापासून आत्मियता आहे. या गोपाळांना दुखापत झाल्यास त्यांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी विमा संरक्षण आणि मंडळांनाही प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. या दहिहंडीला युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा प्रकारात (इनटॅन्जिंबल कल्चरल हेरिटेज) स्थान मिळावे यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्याही मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. त्यादृष्टीनेही प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडून अशा या विविध विषयांचा सातत्याने आढावा सुरु असतो. यातून सकारात्मक आणि चांगले काही घडून यावे अशी त्यांची भूमिका असते. त्यासाठी ते मार्गदर्शन करतात, सातत्याने पाठबळ देत असतात. त्यांचा काम करण्याचा उत्साह आणि झपाटा यामुळे अशा उपक्रमांच्या नियोजन, आयोजनात सहभागी विविध यंत्रणांना, अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन मिळत असते. त्यांच्याकडून प्रेरणा मिळत असते. त्यांची प्रेरणा आणि प्रतिसाद हाच आणखी चांगले काम करण्यासाठी ऊर्जा देत राहतो. हेच त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे.

-         विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.

 

विशेष लेख

 माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पर लेख

       :श्री. मंगलप्रभात लोढा,

मंत्री,कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग तथा पालकमंत्री मुंबई उपनगर

 

       सर्वसमावेशक नेतृत्व

 

शांत, संयमी, दृढ निश्चयी स्वभाव आणि तळागाळातील जनतेविषयी मनात असलेली संवेदनशीलता जपून, सर्वसमावेशक नेतृत्व असलेले  माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मला शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे.

 नेतृत्व आणि कर्तुत्व कोणाकडून उसने मिळत नाही तर ते स्वतःच निर्माण करावे लागते. नेतृत्व आणि कर्तृत्वाचा उत्तम संगम असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक गोष्टी शिकण्यास मिळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीच्या नव्या उंची गाठत आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर श्री. एकनाथ शिंदे यांनी नेहमीच मार्गक्रमणा  केली आणि पुढेही सुरू ठेवतील. धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजोपयोगी कामे केली. पदापेक्षा तळागाळातील जनतेसाठी काम करताना त्यांनी नेहमी संवेदनशील जपली आहे.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येऊन एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत गेला आहे आणि त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी खरोखर प्रेरणादायी आहे.

श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची आपल्या मतदारसंघात असलेली मजबूत पकड  त्यांच्या लोकप्रियतेची पोचपावती आहे. अगदी अलीकडेच प्रसारित झालेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातून त्यांच्या कारकिर्दीची आपल्याला नव्याने ओळख होते.अगदी चित्रपटाला साजेशी अशी त्यांची संपूर्ण कारकीर्द आहे.

ठाणे  महापालिकेत नगरसेवक ते विधानसभेचे सदस्य या राजकीय कारकीर्दीत त्यांनी मतदारसंघात  तसेच राज्यभरात अनेक जनहिताची कामे केली.  कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघातून 2004 मध्ये विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. जनतेने सातत्याने दाखवलेल्या विश्वासानंतर आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आजपर्यंत त्यानी मागे वळून पाहिले नाही.

कोणत्याही पक्षीय राजकारणापेक्षा वैयक्तिक मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम महाराष्ट्राची जनता कधीच विसरू शकत नाही. २०१९ मध्ये कोल्हापूर,सातारा आणि सांगली महापुरामध्ये अस्मानी संकट आले असताना. त्या कालावधीत आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम सर्वांच्या लक्षात राहील, असे आहे. महापुराच्या कालावधीत आरोग्य यंत्रणे सोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सर्व काम स्वतः पाहिले.  

नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी देखील केली आहे. राज्याचा विकास व्हायचा असेल तर सर्वांना परवडणारी दळणवळण व्यवस्था, दर्जेदार सुविधा देखील असाव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी  महामार्गाचे नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.नागपूर ते शिर्डी (कोकेमठाण) या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे पूर्वी हे अंतर पार करण्यासाठी तेरा तास लागत होते आता पाच तासात हे अंतर पार करणे शक्य होणार आहे.

 

सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कमी कालावधीत केलेले भूसंपादन, शेतकऱ्यांना त्वरित दिलेल्या भूसंपादनाचा मोबदला, सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन या रस्त्याचे विक्रमी वेळेत पूर्ण केलेले काम या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेले आहे. कोणत्याही प्रकल्पाची फक्त घोषणा करून उपयोग नसते तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊन जनतेला त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग होणं गरजेचे असतं आणि हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शांत संयमी मनाने आणि दृढ निश्चय असलेल्या स्वभावाने करून दाखवले आहे.

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी पदभार घेतल्यापासून राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना एक अत्यंत चांगला अनुभव मिळत आहे. कोरोना सारखे संकट, महापूर, अतिवृष्टी या कालावधीत जनतेला दिलासा देणारे निर्णय, परवडणाऱ्या घरांना चालना, लोकाभिमुख प्रशासन, पायाभूत प्रकल्पांना वेग, दुर्बल घटकांना दिलासा,शासन आपल्या दारी उपक्रम  असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यापुढेही अनेक नवीन योजना राबवण्याचा मानस आहे. राज्याला प्रगती कडे नेण्यासाठी अनेक विकास आराखडे त्याचे नियोजन केले जात आहे.

प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र गावागावात सुरू करणे,आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी तरूणांना उपलब्ध होण्यासाठी आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राची स्थापना,राज्यातील पारंपारिक कारागिरांना आणि हस्तकलाकारांना  आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देणारी पी.एम.विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणी, अकरा कलमी नमो उपक्रमातंर्गत नमो महारोजगार  मेळावे,रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करून रोजगार क्षम आणि कुशल महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक गोष्टी शिकावयास मिळत आहे.

महाराष्ट्राला सुखी, समृद्ध आणि संपन्न राज्य करण्यासाठी आपण करत असलेल्या सर्व प्रयत्नांना यश मिळो,आपली सर्व स्वप्ने साकार होवो, तुम्हाला वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो ...

 

शब्दांकन : संध्या गरवारे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

 विशेष लेख/दादाजी भुसे

 

एक संवेदनशील मनाचे आणि जनतेचं दुःख ते आपलं दु;ख या भावनेने काम करणारे मुख्यमंत्री राज्याला एकनाथ शिंदे यांच्या रुपाने लाभले आहेत. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांचा आज वाढदिवससर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना निरोगी, सुदृढ आरोग्य लाभो, ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो

महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा एकच ध्यास घेऊन केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे काम सुरु आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या ‘अमृत’काळ संकल्पनेवर आधारित आपल्या राज्याचा 2023-24 चा अर्थसंकल्पच हा पंचामृत या संकल्पनेवर मांडण्यात आला. या ‘पंचामृत अर्थसंकल्पा’मध्ये शेती, पायाभूत सुविधा, उद्योग यांच्याशी योजनांवर भर देण्यात आला. यात ‘शाश्वत शेती समृद्ध शेतकरी’, ‘महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा विकास’, ‘भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा’, ‘रोजगारनिर्मिती’, ‘पर्यावरणपूरक विकास’ या पाच प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. गेली वर्षभर या पंचामृत अर्थसंकल्पाला पुढे नेण्यासाठी काम सुरु आहे.

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठांसाठी मोफत महिलांनाही  निम्म्या तिकीट दराने एस.टी. बस प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. यामुळे आता आपल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि माता-भगिनींना राज्यभर फिरता येऊ लागले आहे. तीर्थाटनासह, प्रियजनांकडे, औषधोपचार आणि काही कारणांसाठी त्यांना आता तिकीट खर्चाची चिंता करावी लागत नाही. यामुळे आपल्या असंख्य भगिनींना शिक्षण-उच्च शिक्षणासाठी प्रवास करणे सोयीचे झाले आहे.

देवावर निस्सिम श्रद्धा असलेल्या आपल्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळा नेत्रदीपक पद्धतीने साजरा झाला. यानिमित्ताने राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांना स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी स्वतंत्र योजना त्यांनी सुरु केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपुरच्या पायी वारीत दिंड्यांद्वारे सहभागी होणाऱ्या आपल्या वारकरी बांधवांच्या सुरक्षेसाठी देखील विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना त्या –त्या काळात कार्यन्वित केली आहेत. पंढरपूरच्या विकासासाठी देखील प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.  यात विकास आराखडा तयार करून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न आहे. वारकऱ्यांसोबतच विठुभक्तांना या तीर्थस्थळी चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी त्यांची भूमिका आहे.

शेतकरी-बळीराजा आपला अन्नदाता. सदैव शेतकऱ्याच्या सोबत, त्याच्या सुख-दुःखात मुख्यमंत्री ठामपणे उभे राहिले आहेत. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती कोसळली तेव्हा मुख्यमंत्री त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहीले आहे. म्हणूनच आपण सततच्या पावसाचा निकष तयार करून, त्यालाही आपत्तीच्या व्याख्येत समाविष्ट केले आहे.  त्यामुळे या नुकसानी शेतकऱ्यांना मदत करणे शक्य झाले. एनडीआरएफच्या निकषाहूनही अधिकची मदत आपण शेतकरी आणि आपत्ती ग्रस्तांना त्यांनी केली आहे. पूर आणि आपत्तीच्या निवारणासाठी प्रत्येक विभागीय पातळीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दले नियुक्त करण्याचा महत्वाचा निर्णयही घेतला आहे.

शेती आणि सिंचन, कृषी-औद्योगीक क्षेत्रातही आमुलाग्र असे बदल व्हावेत असे निर्णय त्यांनी घेतले आहेत. सिंचनाचा अनुशेष भरून निघेल यावर भर दिला आहे. अगदी सुरवातीच्या टप्प्यातच रखडलेल्या 35 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे आठ लाख हेक्टरच्या क्षेत्राला सिंचनाला लाभ होणार आहे.  जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा आपण नव्या दमाने सुरु केला आहे. राज्यातील पाच हजार गावे जलसमृद्ध होणार आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील 6 प्रकल्प आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेतील 24 प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयांत पीकविमा उपलब्ध करून दिला आहे. २०० कोटी रुपयांच्या तरतुदीसह ‘महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान’ सुरू केले आहे. हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापण्यासाठी निधी दिला आहे.

          मुख्यमंत्री पदाचा कुठलाही बडेजाव न बाळगता थेट जनतेत जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे, अडचणीत असलेल्याला मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळेच जेव्हा जनतेला थेट त्यांच्या दाराशी शासकीय योजना देणाऱ्या शासन आपल्या दारी सारख्या उपक्रम राबविण्यात आला तर त्यांनी त्यात वैयक्तिक लक्ष घातले. प्रत्येक जिल्ह्यात या उपक्रमाचे आयोजन करतांना जास्तीत जास्त नागरिकांना थेट लाभ मिळवून देण्याचा त्यांचा आग्रह असतो. यामुळेच आतापर्यंत शासन आपल्या दारी उपक्रमांतून करोडो नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहचले आहेत.

राज्याच्या प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत सामावून घेण्याचा ध्यास मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आहे. याच ध्यासातून मी देखील त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. एक खमकं, खंबीर आणि जनतेच्या भावनांचा आदर करणारं हे एक नेतृत्व आहे...

आपल्या सर्वांचे लाडके एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आणखी उजळून निघो, या सदिच्छांसह पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो!

-दादाजी भुसे

महाराष्ट्र राज्य

 

विशेष लेख

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवेदनशील व अभ्यासू नेतृत्व

मा.मंत्री अब्दुल सत्तार, अल्पसंख्याक विकास विभाग आणि पणन विभाग

शांत स्वभाव, अभ्यासू नेतृत्व, मितभाषी, संयमी पण कामांमध्ये आक्रमक अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. ते संवेदनशील लोकप्रतिनिधी आहेत. समाजाच्या उत्कर्षासाठी सतत कार्यरत सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाणे हा त्यांचा स्वभाव आहे.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त कर्तृत्व आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी राजकारणात स्वतःचे स्थान पक्के केले. ठाण्याच्या मातीत राजकीय कारकीर्दीची जडणघडण झाली. नगरसेवक ते मुख्यमंत्री असा थक्क करणारा प्रवास एकनाथ शिंदे यांचा आहे. हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.राज्यात दीड-दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. या संकटाच्या काळात शिंदे साहेब अनेकांच्या मदतीसाठी धावून गेले.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दीड वर्षांत सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,मा.उपमुख्यमंत्री अजित पवार

हे अत्यंत वेगाने निर्णय प्रक्रिया राबवण्याचे काम करीत आहेत. जी कामे वर्षानुवर्ष निर्णया अभावी रखडली होती. ती या सरकारने अत्यंत कमी वेळेत जलद गतीने पूर्ण केली आहेत. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली सर्वच मंत्री लोककल्याणकारी काम करीत आहेत.

 माझ्यावर अल्पसंख्याक विकास विभाग आणि पणन  विभागाची जबाबदारी दिली आहे.

मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागामार्फत राज्यस्तरीय मिलेट महोत्सव आयोजित करण्यात आला.आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत मिलेट महोत्सवानिमित्त मिलेट खरेदीदार, विक्रेता संमेलन व खरेदी करार आणि राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन केले.

            नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान वितरित करण्यात आले.तसेच राज्यातील ११६ बाजार समित्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे.

     अल्पसंख्याक समाजासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची शासन हमीची मर्यादा 8 वर्षांसाठी रुपये 30.00 कोटी वरुन 500.00 कोटी इतकी करण्यात आलेली आहे. अल्पसंख्याक समुदायातील मुलांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून शासनाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्ती या योजनेची पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमबजावणी करण्यात येत आहे.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 15 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक महिलांचे नवीन 2 हजार 800 बचतगट स्थापन करण्यात येणार आहे असे अनेक जनहिताचे निर्णय शिंदे साहेबांनी घेतले आहे.

               महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही आपले कार्य वाढते राहो याच सदिच्छा. आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच शुभकामना!

वाढदिवसाच्या मनःपूर्वक अनंत शुभेच्छा.

शब्दांकन: दत्तात्रय कोकरे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

विशेष लेख

 

विधायक कार्याचा कृतिशील आदर्श!

- शंभूराज शिवाजीराव देसाई,

राज्य उत्पादन शुल्क मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री- सातारा व ठाणे जिल्हा

महाराष्ट्राचे लोकप्रिय व लाडके मुख्यमंत्री, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, जनहितदक्ष नेतृत्व मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांचा आज वाढदिवस! त्यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो.

राजकीय-सामाजिक जीवनात वावरताना विचार, तत्त्व यांना कृतीची पूरक जोड देणारी जी काही मोजकी नेतेमंडळी आहेत, त्यात आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा अग्र क्रमांक लागतो. म्हणून अवघ्या दीड वर्षांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील तळागाळातील जनतेच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केले आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी, जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यकर्ता वृत्तीने दिवसाचे सतरा-अठरा तास झोकून देऊन काम करणारे नेतृत्व आज त्यांच्या रूपाने राज्याला लाभले आहे. कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता ते महाराष्ट्रासाठी ज्या तळमळीने, तडफेने कामे करतात त्यास तोड नाही. मंत्रिमंडळातील त्यांचा एक सहकारी म्हणून काम करताना त्यांच्या या काम कार्यशैलीतून आम्हास नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. 

आदरणीय शिंदेसाहेब आता जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असले तरी राज्याच्या विधिमंडळात सहकारी म्हणून २००४ पासून आम्ही एकत्र काम करीत आहोत. सन २००४ मध्ये एकाच वेळी आम्ही दोघेही विधानसभेवर निवडून आलो. सत्ता असो अथवा नसो, मैत्री कशी जपावी, सहकाऱ्यांशी कसा स्नेह ठेवावा, जनतेच्या हितासाठी कसे सक्रिय राहावे, याचा वस्तुपाठ मा. शिंदे साहेबांनी घालून दिला आहे. कोरोना काळात शिंदे साहेब रोज अडीच लाख अन्नाची पाकिटे वाटत होते. सांगली-कोल्हापूरला अतिवृष्टीने झोडपले, तेव्हा पूरग्रस्तांसाठी ७० हजार चादरी घेऊन ते धावले होते. महाडला दरडी कोसळल्या, तेव्हा मुसळधार पावसात, गुडघाभर चिखलात उभे राहून ते कार्यकर्त्यांसह अहोरात्र आपद्ग्रस्तांना मदत करीत होते. मुंब्रा-भिवंडीमध्ये इमारती कोसळल्या, तेव्हा बेघर झालेल्या लोकांची निवास व जेवणखाण्याची त्यांनी व्यवस्था करून दिली. त्यांच्या संवेदनशील कार्यपद्धतीत आता ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही खंड पडलेला नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यात रायगडमधील इर्शाळवाडी येथे डोंगर खचून दुर्घटना घडली, तेव्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब पहाटेच दुर्घटनास्थळी पोहोचले. दुर्घट असा डोंगर चढून घटनास्थळावरील ग्रामस्थांना दिलासा दिला. त्यांच्या या संवेदनशीलतेने मदतकार्य करणाऱ्या पथकांनाही ऊर्जा मिळाली. आपल्या कृतीतून आदर्श घालून देणारे असे नेतृत्व विरळाच! त्यामुळेच दीड वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असा उठाव झाला, तेव्हा अवघा शिवसैनिक त्यांच्या बाजूने एकवटल्याचे महाराष्ट्राने, देशाने आणि जगानेही पाहिले.

शिंदे साहेबांनी दूरदृष्टीने राज्याच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, नगरविकास अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी कार्यक्षमपणे सांभाळली. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे आकारास आला. हा महामार्ग आज महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेखा म्हणून ओळखला जातो आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेतील एकनाथजी शिंदे साहेब असे एकमेव मुख्यमंत्री आहेत, जे सुरक्षा आणि शिष्टाचार न बाळगता सर्वसामान्यांना भेटतात. त्यांच्याशी संवाद साधतात. आज राज्यातील प्रत्येकाला ते आपला मुख्यमंत्री वाटतात. आपण जनसामान्यांचे मुख्यमंत्री आहोत, ही भावना बाळगून ते सर्वांना भेटत असतात. वैद्यकीय साहाय्यासाठी त्यांच्याकडे दररोज अक्षरशः रीघ लागते. प्रत्येकाला आपापल्या परीने ते नेहमीच मदत करतात. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या आरोग्य चळवळीत उभ्या केलेल्या कामातून अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांना तळागाळातील परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे. कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर आर्थिक अनुदान देणे असो किंवा दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची भूमिका शिंदे साहेबांनी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची मदत राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची विक्रमी मदत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये ४४ लाख शेतकऱ्यांना १८ हजार ६७२ कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. कृषी विकास होऊन आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावे, यासाठी शिंदे साहेब नेहमीच प्रयत्नशील असतात. शेतीबरोबरच उद्योग क्षेत्राकडेही त्यांचे तितकेच लक्ष असते. अलीकडेच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान शिंदे साहेबांच्या उपस्थितीत राज्याने ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा शिंदे साहेबांचा दावोस दौरा महत्त्वाचा ठरला आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून २ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले शिंदे साहेब हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, याचा आम्हास अभिमान आहे. सातारा जिल्ह्यातील विकासकामांकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते. सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांचा विकास व्हावा, जिल्ह्यात पर्यटन वाढ व्हावी, यासाठी ते आग्रही असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळत असताना सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक प्रश्न तातडीने मार्गी लागतात, याचे समाधान आहे. सामान्यातल्या सामान्य लोकांना ओळखणारा, त्यांच्या कष्टाची, मनाची, चिंतांची जाण राखणारा मुख्यमंत्री त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभला आहे. छत्रपती शिवरायांचा आदर्श उराशी बाळगून वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने सामाजिक बांधिलकीने राजकारण-समाजकारण करणाऱ्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च मन:पूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो आणि राज्याची, येथील जनतेची सेवा त्यांच्या हातून अखंड घडत राहो, अशी सदिच्छा व्यक्त करतो.

0000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...