Thursday, November 30, 2023

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून

परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

नांदेड, (जिमाका) दि. 30 :-  महाराष्ट्र   लोकसेवा आयोगाकडून 2024 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in  https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे  आयोगाचे उपसचिव दे. वि. तावडे यांनी कळविले आहे.

शासन सेवेतील विविध पदांवरील भरती करिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोगविविध विद्यापीठेपरीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. तरी सर्व संबंधित संस्थांनी  परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीतयाची दक्षता घेण्याची विनंती  संस्थांना आयोगाने केली आहे.

इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच आयोगाकडून वेळोवेळी जाहिर करण्यात येणाऱ्या सुचनांसाठी आयोगाच्या वरील संकेतस्थळास उमेदवारांनी वेळोवेळी भेट द्यावीअसे आवाहन आयोगाद्वारे करण्यात आले आहे.

00000

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. सदर लोकशाही दिन सोमवार 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

 

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 


लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी कळविले आहे.

0000

 वृत्त


डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालयातील

स्वच्छता व सुरक्षिततेबाबत तडजोड नाही

-          जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 ·   कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित कामे मार्च पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश 

 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाने आजवर अलीकडच्या काही घटना वगळून आरोग्याच्या क्षेत्रात एक मोठी मजल गाठलेली आहे. दररोज हजारो रुग्णांवर उपचार करून देणारी व्यवस्था अचानक कोलमडून पडणार नाही. गत महिन्यात ज्या काही घटना घडल्या त्या नजरेआड करता येणाऱ्या नाहीत. शासकीय आरोग्य यंत्रणा ही सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याला बळ देणारी असते, हे लक्षात घेऊन शासनातील सर्व संबंधित विभागांनी आपल्या संदर्भात जी काही प्रलंबित कामे असतील ती कोणत्याही परिस्थितीत येत्या मार्च पर्यंत पुर्ण करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.  

 

विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुरक्षा, स्वच्छता आणि प्रलंबित कामे या विषयांची आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले, मनपा उपायुक्त कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, जिल्हा कारागृह अधिक्षक सोनावणे, ग्रामीण पाणी पुरवठा, महावितरण व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

महाविद्यालय परिसरातील मुख्य प्रशासकीय इमारतीचे फर्निचर, सुरक्षा भिंत, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, पथदिवे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी आदी विविध कामे शासनाने यापूर्वीच विचारात घेऊन त्याबाबत वेळोवेळी आदेशही दिलेले आहेत. कित्येक कामांचे निविदा होऊन ते काम संबंधित यंत्रणांना बहालही केलेले आहेत. त्यांना दिलेली कालमर्यादा कोणत्याही परिस्थितीत काटेकोरपणे पाळलीच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विभाग प्रमुखांना दिले. याचबरोबर जी कामे दिलेली आहेत त्या कामांच्या गुणवत्ता व दर्जेबाबत अधिक दक्षता घेण्याचेही त्यांनी सांगितले.

 

सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या काळजी समवेत शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयावर अनेक बाबी या कायद्यानेही बंधनकारक केलेल्या आहेत. न्यायालयाने जे वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी जर आवश्यक ती यंत्रणा उभारावी लागत असेल अथवा नव्याने करावी लागत असेल तर त्यात विलंब होता कामा नये. नांदेड जिल्ह्यातील कारागृहात असलेल्या कैद्यांच्या आरोग्याच्यादृष्टिने शासकीय रुग्णालयात सुरक्षीत वार्डाची नितांत आवश्यकता आहे. सदर वार्ड तात्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांना दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयातील सुरू असलेल्या विविध बांधकामांची माहिती दिली.

00000



Wednesday, November 29, 2023

 वृत्त

 वृत्त 

नागपूर येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय

नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 29 :- राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जमनालाल बजाज भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे दिनांक 9 व 10 डिसेंबर 2023 रोजी राज्यस्तरीय पंडित दिनदयाळ उपाध्याय नमो महारोजगार मेळावा संपन्न होईल. या मेळाव्यासाठी उद्योजकांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नामांकित उद्योजक / इंडस्ट्रीज यांना निमंत्रीत केले आहे.

 

या महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार प्राप्त व्हावा हा प्रमुख उद्देश आहे. जिल्हयातील खाजगी आस्थापना, उद्योग, व्यवसाय, कंपनी, फायनान्स, पतसंस्था, खाजगी बँक व उद्योजकांनी आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त होण्यासाठी आपल्या आस्थापनांवरील रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचीत करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 

दहावी/बारावी/आयटीआय/डिप्लोमा/पदवी/पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचीत केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करुन स्वत: मूळ कागदपत्रासह जमनालाल बजाज भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे 9 व 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण असल्यास दूरध्वनी क्रमांक 02462-251674 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

00000

 सुधारित वृत्त 

पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा पूर्व परीक्षा

2 डिसेंबर ऐवजी 10 डिसेंबरला होणार

 

नांदेड, (जिमाका) दि. 29 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ही शनिवार 2 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. उपसचिवमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे शुध्दीपत्रक क्रमांक एलटीडी-3417/सीआर-14/2017/जाहिरात दिनांक 29 नोव्हेंबर 2023 नुसार ही नियोजीत परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. सदर पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ही रविवार 10 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000   

Tuesday, November 28, 2023

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून

परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

     लातूर, दि. 28 (विमाका):-  महाराष्ट्र   लोकसेवा आयोगाकडून 2024 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in  https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे  आयोगाचे उपसचिव दे. वि. तावडे यांनी कळविले आहे.

        शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. तरी सर्व संबंधित संस्थांनी  परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याची विनंती  संस्थांना आयोगाने केल्याचेही त्यांनी कळविले आहे.

इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच आयोगाकडून वेळोवेळी जाहिर करण्यात येणाऱ्या सुचनांसाठी आयोगाच्या वरील संकेतस्थळास उमेदवारांनी वेळोवेळी भेट द्यावी, असे आवाहनही आयोगाव्दारे करण्यात आले आहे.

***

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी