Saturday, June 4, 2022

 6 जून रोजी नांदेड जिल्ह्यात "शिवस्वराज्य दिन" होणार साजरा

 

पालकमंत्री अशोक चव्हाण साधणार दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर झाला होता. या महापुरुषांनी महाराष्ट्राला लोककल्याणकारी राज्याचा समृद्ध वारसा दिला. स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन म्हणून 6 जून हा दिवस कायम स्मरणात रहावा व या दिवसापासून प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रेरणा घेता यावी या उद्देशाने 6 जून हा शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला आहे. या निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" येत्या सोमवारी साजरा केला जाणार आहे. यादृष्टिने नांदेड जिल्हा परिषदेतर्फे जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून पालकमंत्री अशोक चव्हाण यानिमित्ताने दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्वांशी संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली.

 

सोमवार 6 जून रोजी जिल्हा परिषदेतर्फे शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन केले जाईल. यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Friday, June 3, 2022

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष लेख

संकल्प करू या पर्यावरण रक्षणाचा !

संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे 1972 साली पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानुसार 1973 मध्ये 5 जून रोजी पहिल्यांदा पर्यावरण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जागतिक तापमान वाढीची समस्या लक्षात घेत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरु आहेत. पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणामुळे मानवी जीवन अस्तित्वात आहे. वातावरण आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. निर्सग आपल्याला श्वासोच्छवासासाठी हवेपासून खाण्या-पिण्यापर्यंत सर्व काही पुरवते आणि पृथ्वीवर राहण्यासाठी अनुकूल वातावरण देते. ही सर्व निसर्गाची देणगी आहे. निसर्ग आणि पर्यावरणामुळेच हे जग सुरळीतपणे सुरू आहे. निसर्ग आपल्याला जगण्यासाठी खूप काही देतो पण त्या बदल्यात मानवाने फक्त निसर्गाचे शोषण केले मानवाच्या या कृत्यामुळे निसर्गाची हानी होत असूनजीवसृष्टीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.

 

अशा परिस्थितीत पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. ग्लोबल वार्मिंगसागरी प्रदूषण आणि वाढती लोकसंख्या यांचा वाढता धोका नियंत्रित करणे हे एक आव्हान आहे. जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण करता येईल. यासाठी दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.या निमित्ताने आपण सर्व जण पर्यावरण संवर्धनासाठी पुढील संकल्प करू शकतो.


पर्यावरण दिनाचा पहिला संकल्प

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घरातून निर्माण होणारा कचरा योग्य ठिकाणी पोहचवण्याचा पहिला संकल्प घ्या. आपल्या घरातून दररोज खूप कचरा बाहेर पडतो.काही लोक कचरा इकडे तिकडे फेकतात. तो फेकलेला कचरा एकतर जनावरांच्या पोटात जातो किंवा नद्यांमध्ये वाहून जातो. त्यामुळे आपल्या नद्याही प्रदुषित झाल्या आहेत. कचरा इकडे-तिकडे न टाकता तो डस्टबीनमध्ये टाकावा. सुका व ओला कचरा वेगळा करून फेकून द्या जेणेकरून त्याचा योग्य वापर करता येईल.


पर्यावरण दिनाचा दुसरा संकल्प

माणसाचे जीवन श्वासोच्छवासाने चालते आणि श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा लागते.त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनी श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्नकरूत्यासाठी पेट्रोल-डिझेलऐवजी ई-वाहन वापरू. अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.


पर्यावरण दिनाचा तिसरा संकल्प

निसर्ग हा झाडे आणि वनस्पतींवर अवलंबून आहे. मात्र आजकाल कोणीही कधीही झाडे तोडत आहे. झाडे तोडल्याने ऑक्सिजनच्या कमतरता बरोबर हवामानाचे चक्रही बिघडत आहे. त्यामुळे अनेकदा भीषण नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत वृक्षतोड थांबवून आपण अधिकाधिक रोपे लावूजेणेकरून निसर्गाची आतापर्यंत झालेली हानी भरून काढता येईलअशी प्रतिज्ञा घ्या.

 
पर्यावरण संरक्षणाचा चौथा संकल्प

झाडेरोपेमाती, , प्राणीपाणी इत्यादींचा पर्यावरण स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरणाचा समतोल सदैव राखला जावाअशी प्रार्थना करा आणि पर्यावरणाचा समतोल व सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल. ते सर्व काही आम्ही करू अशी शपथ घ्या.


पर्यावरण संरक्षणाचा पाचवा संकल्प

पर्यावरण दिनीपाचवा आणि शेवटचा संकल्प घ्या की आम्ही पॉलिथिन किंवा प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न करू. पॉलिथिन आणि प्लास्टिक हे निसर्गाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः त्यांचा वापर करणार नाहीत्याचप्रमाणे तुम्ही इतर कोणी पॉलिथिन किंवा प्लास्टिक वापरताना दिसले तर त्यांनाही पर्यावरणाबाबत जागरूक करेल अशी प्रतिज्ञा घ्या. कारण पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

 

-         श्वेता पोटुडे

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

0000

2.6.2022

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- नांदेड जिल्ह्यात शुक्रवार 3 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवार 17 जून 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 


जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शुक्रवार 3 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवार 17 जून 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.


अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 महात्मा फुले लिखीत तृतीय रत्नचा

कुसूम सभागृहात 4 जून रोजी प्रयोग


·  सर्वांसाठी नि:शुल्क प्रवेश

·  महाज्योती तर्फे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- नांदेड येथील कुसुम नाट्यगृहात शनिवार 4 जून 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता महात्मा जोतिबा फुले लिखीत ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावात्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवारसंचालक डॉ. बबनराव तायवाडेप्रा. दिवाकर गमेलक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्यावतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या प्रयोग करण्याचे योजिले आहे.

 

अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून क्रीएटीव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत. एकुण 30 कलाकार व सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग असणार आहे. या आधी विविध जिल्ह्यात 26 प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उस्फुर्त असा प्रबोधनात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सदर नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदिपकुमार डांगे यांनी केले आहे.

00000




 उद्योजकता विकास अंतर्गत

महिलांसाठी मोफत टेलरिंग प्रशिक्षण


 · आरसेडी व उमेदचा उपक्रम

 

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी महिला टेलरिंग प्रशिक्षणाचे आयोजन ते 30 जुन 2022 पर्यंत आरसेडी नांदेड येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा प्रशिक्षक गजानन पातेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उमेद अभियानाचे राम भलावीअतिष गायकवाडकौशल्य समन्वयक प्रियंका चव्हाणबालाजी गिरीआशिष राऊतविश्वास हटृटेकर यांची उपस्थिती होती.

 

या प्रशिक्षणात नांदेड जिल्ह्यातील 18 ते 40 वयोगटातील महिला सहभागी होऊ शकतात. आतापर्यत 35 महिलांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेतला आहे. प्रशिक्षणात उद्योजकता विकासकौशल्य विकास अंतर्गत उद्योजकता सक्षमता कार्य दृष्टिकोनसंभाषनकौशल्यवेळेचे नियोजनबँकिंगप्रकल्प अहवालमार्केटिंग सर्व्हेआर्थिक साक्षरताइंग्रजी ज्ञानबेसिक संगणक ज्ञानशासकीय योजनासामाजिक सुरक्षा योजनातसेच शिवणकला अंतर्गत विविध विषयांचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षक ज्योती वांगजे या महिलांना मोफत प्रशिक्षण देवून त्यांना कार्यकुशल करण्याचे काम करीत आहेत. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थ्यांची निवासी आणि जेवणाची मोफत सोय करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रूनिता अर्ध्यापुरकरअभिजित पाथरीकरमारोती कांबळे यांनी परीश्रम घेतले.

00000

Thursday, June 2, 2022

 शेतकऱ्यांनी बियाणेखते व किटकनाशकांची

खरेदी करतांना काळजी घ्यावी

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे

 

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- शेतकऱ्यांची खरीप हंगाम पेरणीचे कामे चालू असून खते बियाणे खरेदीची प्रक्रिया सुरु आहे. शेतकऱ्यांनी बियाणेखते व किटकनाशके खरेदी करतांना योग्य ती काळजी घेवून अधिकृत कृषि केंद्र परवाना धारकांकडुनच खरेदी करावीत. कृषि सेवा केंद्र धारकाकडुन बॅगवर नमुद केलेल्या एमआरपी किंमतीपेक्षा ज्यादा दराने विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित तालुका कृषि अधिकारीकृषि अधिकारी पंचायत समिती किंवा जिल्हा तक्रार निवारण कक्ष संपर्क क्रमांक 9673033085, 8856957686, 02462-284252 या क्रमांकावर संपर्क करावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

 

बाजारपेठेत डी.ए.पी खत मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेले आहे. सदयस्थितीत शेतकऱ्यांकडून एकाच कंपनीच्या किंवा ब्रँडच्या डी.ए.पी खताची मागणी वाढलेली आहे. परंतु बाजारात उपलब्ध होणाऱ्या सर्व कंपन्यांच्या डी.ए.पी खतामध्ये नत्र व स्फुरदचे प्रमाण सारख्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचा डी.ए.पी खताची खरेदी करावी. एकाच कंपनीच्या डी.ए.पी खताचा आग्रह धरु नये. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी करताना युरीया व सिंगल सुपर फॉस्पेट किंवा एनपीके 20:20:0:13 या खताचा वापर करावा. या खतामधुन सोयाबीन पिकासाठी गंधक युक्त खते मिळतात जे की सोयाबीन पिकांसाठी आवश्यक आहेत. तसेच बियाणेखते व किटकनाशके खरेदी करताना अधिकृत कृषि केंद्र परवाना धारकांकडुनच खरेदी करावी. खरेदीचे पक्के बिल पावती घ्यावी. पावतीवर खरेदी केलेल्या निविष्ठांचा संपुर्ण तपशिल असल्याची खात्री करावी. अनुदानीत रासायनिक खताची खरेदी करताना विक्रेत्यांकडुन इ-पॉस मशीनवरील बिल घ्यावे. खरेदी केल्यानंतर बॅगवर नमुद असलेली किंमत व विक्रेत्याने दिलेले बिल तपासुन घ्यावे. तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे टॅग वेस्टनपिशवी व त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करुन ठेवावे. बियाण्याची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी. शेतकऱ्यानी घरचे तसेच बाजारातील खरेदी केलेले बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी . पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करुनच बियाण्याची पेरणी करावी. सलग तीन दिवस 100 मि.मि. पाऊस पडल्यावर व जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा असल्यावरच सोयाबीन बियाण्याची पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे
0000

 बेरोजगारांना उद्योजकाचे स्वप्न साकारण्यासाठी

उद्यमिता यात्रा व प्रशिक्षणातून दिशा 

-   महापौर जयश्री पावडे

 

·       उद्यमिता यात्रेचे नांदेड मध्ये आगमन

·       सामाजिक न्याय भवन येथे प्रशिक्षण

·       गरजू व होतकरू लाभार्थ्यांनी घ्यावा लाभ

 

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात अनेकांना रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले. अनेकांचे रोजगार बुडाले. त्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी व नवा आत्मविश्वास देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची ही उद्यमिता यात्रा महत्वाची असून या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रशिक्षणातून शहरी बेरोजगारांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास नांदेडच्या महापौर जयश्रीताई पावडे यांनी व्यक्त केला.

 

स्वयंरोजगार निर्मिती व उद्यमिता नवीन युवा-युवतींमध्ये रुजावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभाग, जिल्हा प्रशासन आणि युथएड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या उद्यमिता यात्रेचे आज नांदेड येथे आगमन झाले. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सविता बिरगे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांची उपस्थिती होती.

 

राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये ही उद्यमिता यात्रा जात असून 40 दिवसात 40 प्रशिक्षकांमार्फत 4 हजार  युवक-युवतींपर्यंत पोहोचून त्यांच्या व्यवसायाला आकार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नांदेड येथे या यात्रेतील प्रशिक्षकांमार्फत 4 जुन 2022 पर्यंत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. इच्छुकांनी वेळेच्या आधी या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 

उद्यमिता यात्रेच्या निमित्ताने आयोजित प्रशिक्षण शिबिरात व्यवसायाचे नियोजन, योजनांची माहिती, राज्य शासनाची ओळख, योजनांसाठी असलेल्या अटी, व्यवसायाचे पर्याय, डिजिटल साक्षरता, उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या संधी, बीजभांडवल योजना, आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाईल.

 

इच्छुकांनी यात सहभाग घेण्यासाठी जिल्हा समन्वयक इरफान खान, शुभम शेवनकर, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कैलासनगर नांदेड येथे दूरध्वनी क्रमांक 02462-251674 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

000000 






  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...