Sunday, January 23, 2022

 नांदेड जिल्ह्यात 786 व्यक्ती कोरोना बाधित

तर 507 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 12 अहवालापैकी 786 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 648 तर अँटिजेन तपासणीद्वारे 138 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 98 हजार 495 एवढी झाली असून यातील 91 हजार 508 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 329 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 658 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 392, नांदेड ग्रामीण 49, भोकर 7, देगलूर 2, धर्माबाद 2, कंधार 5, हदगाव 10, किनवट 36, लोहा 3, मुदखेड 20, मुखेड 13, उमरी 16, माहूर 35, परभणी 26, हिंगोली 8, लातूर 1, अकोला 1, नागपूर 2, हैद्राबाद 4, तेलंगणा 1, पुणे 1, वाशीम 1, राजस्थान 2, बुलढाणा 3, यवतमाळ 2, उमरखेड 1, औरंगाबाद 3, निजामाबाद 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 20, बिलोली 19, किनवट 2, मुखेड 21, नांदेड ग्रामीण 5, देगलूर 20, लोहा 3, नायगाव 6, अर्धापूर 8, धर्माबाद 17, माहूर 2, उमरी 5, भोकर 2, हदगाव 5, मुदखेड 3 असे एकुण 786 कोरोना बाधित आढळले आहे.

 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 432, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 67, खाजगी रुग्णालय 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2 असे एकुण 507 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 921, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 3 हजार 338, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 33, बिलोली कोविड रुग्णालय 2 असे एकुण 4 हजार 329  व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 32 हजार 58

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 18 हजार 655

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 98 हजार 495

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 91 हजार 508

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 658

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.90 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-18

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-89

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4 हजार 329

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 भोकरसह इतर पाणी टंचाई असलेल्या

गावासाठी मंजूर कामे त्वरीत करा

-          पालकमंत्री अशोक चव्हाण   

नांदेड (जिमाका) दि. 23 :- संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता नागरिकांचे अधिक हाल होवू नयेत, गरजेच्या वेळी नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे यादृष्टीने भोकरसह इतर टंचाईग्रस्त गावातील कामांना मंजुरी दिली आहे. मंजूर असलेल्या पाणीटंचाई निवारणाची कामे त्वरीत पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित विभागाना दिले. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आज संपन्न झालेल्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीत ते बोलत होते. 

या बैठकीस आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी एन. कार्तीकेयन, उपविभागीय अधिकारी राजेंद्र ख्रंदारे, भोकर पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, तहसिलदार श्री. लांडगे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

नागरिकांना जेंव्हा पाण्याची टंचाई भासते तेव्हा त्यांना पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने संबंधित यंत्रणानी पाणी पुरवठ्याची कामे वेळेत पुर्ण करावीत. भोकर तालुक्यातील सुधा प्रकल्पाची उंची वाढविण्यात येणार असून त्यासाठी 10 गावातील जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रीया सुरू झाली आहे. या कामात सर्व यंत्रणानी वेळेत समन्वयाने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. पाणी टंचाईची कामे करतांना यंत्रणानी झालेल्या कामांचा प्रगती अहवाल शासनास सादर करावा. कामे कागदावर न दाखवता प्रत्यक्ष होणे महत्चाचे आहे अशा सूचनाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. जिल्ह्यातील टंचाई निवारण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुन पाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी भोकर, अर्धापूर परिसरात असलेल्या तळयातील गाळ काढून नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होईल व शहराच्या सुंदरतेत भर पडेल, असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी अर्धापूर, भोकर व मुदखेड तालुक्या अंतर्गत जल जीवन मिशन सद्यस्थिती, भोकर येथे सुरु  असलेल्या विविध शासकीय इमारत बांधकामाचाही आढावा, विंधन विहीर उपाययोजना, विहीर बोर अधिग्रहण मंजूर प्रकरणाची माहिती, ग्रामपंचायत निहाय उपलब्ध पाणी पुरवठा व उपाय योजना, पाणी टंचाई कृती आराखडा आदी बाबींचा आढावा यावेळी घेतला.

0000



 अवैधरित्या मद्य साठवणूक विरोधातील धडक कारवाईत

20.50 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त 

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  राज्य उत्पादक शुल्क देगलूर विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे दारूबंदी गुन्ह्याखाली मुखेड तालुक्यातील एकलारा व देगलूर तालुक्यातील तमलूर येथे छापा मारून 20.50 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कातिलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास 1800833333 व व्हॉटसॲप क्र. 8422001133 तसेच दुरध्वनी क्रमांक 02462-287616 वर संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. 

धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे उत्पादन शुल्क भरलेले 1 हजार 100 बॉक्स घेऊन निघालेल्या वाहनातील मद्यसाठा अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने इतरत्र साठवून नंतर त्या वाहनाची तुळजापूर येथे अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला होता. यातील 415 बॉक्स तुळजापूर पोलीसांनी तर 30 बॉक्स हट्टा पोलीसांनी जप्त केले आहेत. उर्वरीत 262 बॉक्स मद्यसाठा निरीक्षक देगलूर यांनी मुखेड व देगलूर तालुक्यात 2 ठिकाणी जप्त केला आहे. या गुन्ह्यात 3 आरोपीला ताब्यात घेतले असून त्यांना तीन दिवसाची कोठडी मिळाली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक ए. एम. पठाण हे करीत आहेत. 

ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क देगलूर विभागाच्या पथकाने निरीक्षक ए. एम. पठाण, दुय्यम निरीक्षक रामलिंग सुर्यवंशी, स. दु. नि. शिवाजी कोरनुळे, जवान उज्जल सदावर्ते, जवान नि वाहन चालक फाजिल खतिब यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. ही कारवाई दुय्यम निरीक्षक राजकिरण सोनवणे, हरि पाकलवाड, ए. जी. शिंदे, मो. रफी, बालाजी पवार, विकास नामवाड, परमेश्वर नांदुसेकर, आर. बी. फाळके, शिवदास नंदगावे, दिलीप जाधव यांनी मदत केली.

000000

 घोडज येथील कामेश्वर या बालकाशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संवाद 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2021 साठी नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील घोडज येथील कामेश्वर जगन्नाथ वाघमारे यांची निवड झालेली आहे. भारतातील निवड झालेल्या राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांची आभासी पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधणार आहेत. कामेश्वरच्या माध्यमातून जिल्ह्यातील बालकांचा एक प्रकारे गौरव झाला असून याबद्दल कामेश्वरचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

000000



सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, दंत चिकित्सा महाविद्यालयाची उपलब्धता करून देऊ
- पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 23 :- नांदेड जिल्ह्याचा विस्तार इतर जिल्ह्याच्या तुलनेत मोठा आहे. येथील प्रत्येक तालुक्याच्या नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सेवा-सुविधा नांदेड येथील आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उपलब्ध करुन देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांना काही गंभीर आजार झाले तर त्यांना त्यावर उपचार घेणेही परवडत नाही, हे लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा-सुविधा अधिक भक्कम करू, असे नि:संदिग्ध प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 200 विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृहाचे भूमीपूजन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार मोहनअण्णा हंबर्डे, सदस्य आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. जयश्री पावडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धवराव भोसले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, अभ्यागत मंडळाचे सदस्य संतोष पांडागळे, डॉ. करुणा जमदाडे, डॉ. दि. बा. जोशी, आशाताई शिंदे आदींची उपस्थिती होती.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण असले पाहिजे. याचबरोबर इतरांच्या आरोग्याची काळजी घेतांना त्यांचेही आरोग्य सदृढ राहिले पाहिजे, हे लक्षात घेऊन शेजारीच असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालयाच्या मध्यभागी क्रीडा संकुल विकसीत करता येईल का याबाबत आम्ही प्रयत्न करू. आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्या प्रामुख्याने कोविड-19 साठी आपण नव्यानेच उभारल्या. यात कोविड वार्ड, लहान मुलांचा वार्ड, दवाखाण्यातील वापरलेले पाण्यावर प्रक्रिया करुन त्याला निसर्गपूरक करण्यासाठी उभारण्यात आलेला मलनिस्सारण प्रकल्प, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर या सुविधांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. जे करू ते चांगलेच करू, यात तडजोड नाही असे स्पष्ट करून या सुविधा पुरेशा नाहीत याची आम्हाला कल्पना आहे. येत्या काही दिवसात याठिकाणी चागल्या दर्जाचे कॅन्सर उपचार केंद्र व्हावे, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे, दंतचिकित्सा महाविद्यालयाच्या इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन स्तरावर योग्य ती पावले उचलू असे सूचक विधानही त्यांनी केले.

याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या वसतीगृहाला भरघोस 19 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. येथील नवीन प्रशासकीय इमारतीला चांगल्या सुविधाजनक कार्यपद्धती डोळ्यापुढे ठेवून फर्नीचरही देण्यात आले आहे. आपल्या नांदेड येथे साकारलेले वैद्यकीय हब लक्षात घेता चांगल्या नर्स ही उपलब्ध व्हाव्यात यासाठी नर्सींग कॉलेजही आपण येत्या शैक्षणीक वर्षापासून सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित आमदारांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकुंद कुलकर्णी यांनी केले तर आभार बोडके यांनी मानले.

00000




  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...