Sunday, January 23, 2022

 भोकरसह इतर पाणी टंचाई असलेल्या

गावासाठी मंजूर कामे त्वरीत करा

-          पालकमंत्री अशोक चव्हाण   

नांदेड (जिमाका) दि. 23 :- संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता नागरिकांचे अधिक हाल होवू नयेत, गरजेच्या वेळी नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे यादृष्टीने भोकरसह इतर टंचाईग्रस्त गावातील कामांना मंजुरी दिली आहे. मंजूर असलेल्या पाणीटंचाई निवारणाची कामे त्वरीत पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित विभागाना दिले. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आज संपन्न झालेल्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीत ते बोलत होते. 

या बैठकीस आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी एन. कार्तीकेयन, उपविभागीय अधिकारी राजेंद्र ख्रंदारे, भोकर पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, तहसिलदार श्री. लांडगे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

नागरिकांना जेंव्हा पाण्याची टंचाई भासते तेव्हा त्यांना पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने संबंधित यंत्रणानी पाणी पुरवठ्याची कामे वेळेत पुर्ण करावीत. भोकर तालुक्यातील सुधा प्रकल्पाची उंची वाढविण्यात येणार असून त्यासाठी 10 गावातील जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रीया सुरू झाली आहे. या कामात सर्व यंत्रणानी वेळेत समन्वयाने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. पाणी टंचाईची कामे करतांना यंत्रणानी झालेल्या कामांचा प्रगती अहवाल शासनास सादर करावा. कामे कागदावर न दाखवता प्रत्यक्ष होणे महत्चाचे आहे अशा सूचनाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. जिल्ह्यातील टंचाई निवारण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुन पाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी भोकर, अर्धापूर परिसरात असलेल्या तळयातील गाळ काढून नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होईल व शहराच्या सुंदरतेत भर पडेल, असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी अर्धापूर, भोकर व मुदखेड तालुक्या अंतर्गत जल जीवन मिशन सद्यस्थिती, भोकर येथे सुरु  असलेल्या विविध शासकीय इमारत बांधकामाचाही आढावा, विंधन विहीर उपाययोजना, विहीर बोर अधिग्रहण मंजूर प्रकरणाची माहिती, ग्रामपंचायत निहाय उपलब्ध पाणी पुरवठा व उपाय योजना, पाणी टंचाई कृती आराखडा आदी बाबींचा आढावा यावेळी घेतला.

0000



No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...