Saturday, August 21, 2021

 जिल्ह्यातील 97 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 97 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. रविवार 22 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 14 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, स्त्री रुग्णालय, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 14 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, मुखेड, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 13 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय कंधार येथे 50 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 20 ऑगस्ट 2021 पर्यंत एकुण 9 लाख 35 हजार 498 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 21 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 7 लाख 50 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 44 हजार डोस याप्रमाणे एकुण 9 लाख 94 हजार 30 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 492 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 717 एवढी झाली असून यातील 88 हजार 13 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 43 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 661 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे देगलूर तालुक्यांतर्गत 1, किनवट 1, अर्धापूर 1 असे एकुण 3 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 5 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 43 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 26, नांदेड जिल्ह्यातील तालुके अंतर्गत गृह विलगीकरण 6 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 124, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 96 हजार 858

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 93 हजार 950

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 717

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 13

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 661

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.1 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-7

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-1

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-43

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

विशेष लेख

समृद्ध भारतासाठी कटिबद्ध होण्याचा अमृत महोत्सव 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी राष्ट्रध्वज वंदनास साक्षिदार होण्याचा आनंद आणि याचे आत्मिक समाधान शब्दात न सांगण्यासारखे आहे. प्रत्येकाच्या अंगावर देश भक्तीचे रोमांच आणि प्रेरणा देणाऱ्या अमृत महोत्सवी पर्वात आपण जात आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीयांना काय-काय सहन करावे लागले याची साक्ष देणारे मोजकेच ज्येष्ठ नागरिक आज हयात आहेत. ब्रिटिशांच्या बंदुकांचा प्रतिकार आपली निधडी छाती घेऊन आनंदाने गोळ्या झेललेल्या पूर्वजाचे आपण वारस आहोत. हा अमृत महोत्सव साजरा करताना स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले, त्याग केला, शांततेच्या मार्गाने आंदोलने केली, त्यांची किती उदाहरणे आपणापुढे ठेवू हा मला प्रश्न पडला आहे. 

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आपल्या पूर्वजांनी जपलेले अहिंसेचे, विवेकाचे, धर्मनिरपेक्षतेचे, असहकार चळवळीचे, स्वदेशी बाण्याचे, समतेचे, बंधुत्वाचे मूल्य किती लाख मोलाचे होते याची प्रचिती संपूर्ण जगाने घेतली. स्वदेशी बाण्यासाठी, स्वातंत्र्यासाठी विदेशी कपड्यांच्या होळीचे आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, असहकार चळवळ, अहमदाबाद आंदोलन, चंपारण सत्याग्रह, चले जाओ आंदोलन, हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे टप्पे आहेत. यात प्रत्येक आंदोलनाने भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याबद्दल स्फुलिंग चेतविले. बैसाखी सणासाठी जालीयनवाला बागेत जमलेल्या लहान लेकराबाळांसह, माय-माऊलीसह लहान-मोठ्या लोकांना बेसावध असताना ब्रिटिशांनी गोळ्या झाडल्या. आपल्या काखेत लहान बाळांना घेऊन विहिरीत उड्या घेणाऱ्या मातांचे हुंकार आजही तिथे भेट दिल्यावर आपल्याला ऐकायला येतील. आपल्या महाराष्ट्रातील नंदुरबार येथील स्वातंत्र्यासाठी तिरंगा फडकवणाऱ्या छोट्या शिरीशकुमार या बालकावर गोळ्यांच्या तीन फेरी झाडून ब्रिटिशांनी केलेली हत्या, असे किती विरांच्या बलिदानाचे स्मरण करावे ? 

ज्या कायद्याच्या धाकाने ब्रिटिशांने भारताच्या स्वातंत्र्यावर बंदुकी रोखल्या त्याचा तेवढ्याच संयमाने, धिरानेअहिंसेच्या मार्गातून संपूर्ण भारताला जागे करणाऱ्या महात्मा गांधीची किती सारी उपोषणे, आंदोलन डोळ्यापुढे ठेवावीत ! पंडीत जवाहरलाल नेहरु पासून सरदार वल्लभभाई पटेल, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, भगिनी निवेदिता, लाला लजपतराय, सय्यद अहमद खान, बंकीमचंद्र चटर्जी, दादाभाई नौरोजी, विनोबा भावे, जमनालाल बजाज, बिरला यांच्यासारख्या असंख्य व्यक्तींनी दिलेल्या योगदानाचे मोल करता येणार नाही. एकसंघ भारतासाठी, जात-पात, धर्माच्यापलीकडे मानवतेची मूल्य जोपासून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या, मरण यातना सोसणाऱ्या पूर्वजांनी स्वातंत्र्याच्या मूल्याचा समृद्ध वारसा आपल्या हाती दिला आहे, हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.    

स्वातंत्र्यानंतरची ही 73 / 74 वर्ष आपण खूप काही शिकण्यात वेचली. स्वत:चा गाडा स्वत: उभा करण्याचे आव्हान आपण पेलले. ही मुहूर्तमेढ स्वतंत्र अर्थकारणाची, औद्योगिकीरणाची, रोजगार निर्मितीची, अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेची होती. याचबरोबर सार्वजनिक आरोग्याच्या हमीची, वाडी-वस्त्यातील, डोंगर-दऱ्यातील शिक्षणातील वंचित असलेल्या प्रत्येक घटकाला शिक्षणाचा प्रवाहात आणण्याची ही मुहूर्तमेढ होती. एका बाजुला आर्थिक व सामाजिक विकास तर दुसऱ्या बाजुला लोकशाही मूल्यांना प्राधान्य ! जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून जो लौकिक आपण प्राप्त केला त्याचा पाया भारतातल्या स्वातंत्र्य चळवळीत आहे हे विसरुन चालणार नाही. 

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी स्वयंपूर्ण भारतासाठी जी दूरदृष्टी त्यांनी त्यावेळेस दिली त्या दूरदृष्टीमुळे आपण स्वातंत्र्याच्या अवघ्या 74 वर्षात गरिबी निर्मुलनापासून, अन्न सुरक्षिततेच्या संवैधानिक अधिकारापर्यंत, औद्योगिक विकासापासून आंतराळाच्या प्रगतीपर्यंत, अणुऊर्जेच्या स्वयंसिद्धतेपर्यंत, वैज्ञानिक संशोधनात आघाडीपर्यंत, दूरसंचार क्षेत्रापासून आजच्या 5 जी (फाइव्ह जी) पर्यंतच्या युगाचा पाया हा पंडित जवाहरलाल नेहरु, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिलेल्या दूरदृष्टीत होता, हे विसरुन चालणार नाही.   

या 74 वर्षात भारताने अनेक आव्हानांचा सामना केला. मोठमोठे दुष्काळ पचवले. निसर्गाच्या लहरीपणामुळे पाण्याचे आव्हान पचविले. अन्न-धान्याच्या बाबतीत स्वंयपूर्णता सिद्ध करुन कृषिक्रांतीची बीजे रोवली. मानवी आरोग्यावर अपरीचित असलेल्या विविध आजाराबाबत संशोधन करुन औषधोपचाराच्या निर्मितीपर्यंतचा आपला प्रवास थक्क करणारा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची जी लोकसंख्या होती त्याच्या तिप्पटीने भर पडून आज ज्या काही सोई-सुविधा मुलभूत प्रमाणात आवश्यक आहेत त्या उभे करण्यात एवढा काळ लागणे यात गैर नाही. स्वत:ची अर्थव्यवस्था निर्माण करणे, औद्योगिकरणाला चालना देणे, हे सारे पंचवार्षिकचे टप्पे निश्चित करत अन्न-धान्यापासून शिक्षणापर्यंत, आरोग्यापासून तंत्रज्ञानापर्यंत भारताला स्वयंपूर्ण होता आले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात प्रवेश करताना आजवरच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासमवेत 2019 नंतरचा कोविड-19 चा काळ मात्र आपल्याला वेगळा काढून तपासून बघावा लागेल. मागच्या दीड वर्षात कोरोनामुळे जागतिक महासत्ता असणारे देश लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी प्रयत्नांची शर्थ करतांना दिसले. त्या तुलनेत भारतासारख्या विविध नटलेल्या देशात या दीड वर्षाच्या आव्हानाच्या काळात जी एकसंघता दाखविली तो खरा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा गौरव म्हणून आपल्याला पहावे लागेल. या दीड वर्षात लोककल्याणकारी राज्याची संकल्पना, प्रत्येकाच्या आरोग्याची हमी घेण्यासह निर्बंध घालुनही जनजीवन सुरळीत ठेवण्यामध्ये शासन म्हणून जे यशस्वी नियोजन करता आले त्याकडे पाहिल्यावर आता स्वताचा स्वत:ला विश्वास बसत नाही. 

गतवर्षी मेच्या अखेरीस मलाही कोरोनाच्या दिव्यातून जावे लागले. संपूर्ण जगभर ही लाट वाढली. नांदेडची मर्यादीत खाटांची क्षमता असलेल्या आरोग्य सुविधेवर  90 हजार लोकांपर्यंत उपचार व विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी पडली. पालकमंत्री म्हणून प्रशासनाच्या पाठीमागे भक्कम उभे राहणे, दुसऱ्या बाजुला ज्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत त्यासाठी नवीन यंत्रणा तात्काळ उभी करणे, दीडशे खाटावरुन जिल्ह्यातील मंगल कार्यालय असोत, सभागृह असोत जिथे जागा मिळेल तिथे लोकांना आरोग्याच्या सुविधा कमी कालावधीत आपण उभ्या करु शकलो. 

कोविडच्या व्यवस्थापनासाठी गतवर्षात आर्थिक आव्हाने असतांनाही आपणजिल्ह्यात सुमारे 52 कोटी रुपयांचा निधी केवळ आरोग्य विभागासाठी उपलब्ध करुन दिला. यातून सर्व व्यवस्था आपल्याला करता आली. तर यावर्षी आजवर सुमारे 6 कोटी 21 लाख रुपयापर्यंतचा निधी आपण आरोग्यासाठी उपयोगात आणला. यानिधीतून जिल्हा रुग्णालयात अतिरीक्त दोनशे खाटांचा बाह्य रुग्ण विभाग आपण सुरु केला. नव्याने उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात कोरोनावर उपचाराची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध केली. जिल्हा रुग्णालयातील शंभर खाटाच्या डीसीएचसी स्तराचे कोविड-19 हॉस्पिटलमध्ये रुपांतर करुन त्याठिकाणी केंद्रीत ऑक्सिजन प्रणाली निर्माण केली. 

देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनासाठी स्वतंत्र कक्ष उभारुन त्याठिकाणी विद्युत व इतर अत्यावश्यक कामे पूर्ण केली. हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातही स्वतंत्र कोविड वार्डची निर्मिती, मालेगाव येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये कोविडचा कक्ष व त्याठिकाणी अत्यावश्यक असलेली विद्युतीकरणाची कामे, देगलूर येथील ट्रामा केअर इमारतीत कोरोना उपचाराचा कक्ष, उपजिल्हा रुग्णालय हदगाव, लोहा, मुखेड, किनवट व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी कोरोनावर उपचार करण्यासाठी आपण स्वतंत्र वार्ड निर्माण करुन आरोग्य सुविधा भक्कम केल्यात. अनेक ठिकाणी जुन्या इमारती असल्यामुळे वेळेच्या आतात्याठिकाणी विद्युतीकरणापासून ते नळ जोडणीपर्यंतची सर्व कामे पूर्ण करावी लागली. 

कोरोनावर उपचारासाठी अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर या सुविधा उपलब्ध करणे ही तारेवरची कसरत होती. या यंत्र सामुग्रीसाठी जागोजागी विद्युतीकरणाची सुविधा आवश्यक होती. प्रत्येक तालुकापातळीवर, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ग्रामीण आरोग्य केंद्र व उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत आणि आपल्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयापर्यंतच्या सर्व सोई-सुविधांचा एकत्रित आढावा घेऊन त्याचे यशस्वी नियोजन करुन आपण आरोग्य सेवेच्या व्यवस्थापनात एक अनुकरणीय मापदंड निर्माण केला. 

जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या लक्षात घेता 100 खाटांच्या स्वतंत्र वार्डाची आपण निर्मिती केली. एकीकडे कोरोना बाधितांवर उपचाराची सुविधा तर दुसऱ्या बाजुला जिल्ह्यातील नागरिकांच्या कोविड चाचणीसाठी भक्कम यंत्रणा उभी करणे मुळीच सोपे काम नव्हते. आजही हे काम अव्याहतपणे सुरू आहे. सुरुवातीच्या काळात साऱ्याच गोष्टी अनभिज्ञ होत्या. जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक संस्थांची मतमतांतरे लक्षात घेऊन नांदेड सारख्या ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची सुविधा उपलब्ध करतांना प्रशासनाने कोणतीही कसर सोडली नाही. 

एका बाजुला कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविणे, दुसऱ्या बाजुला बाधितांवर उपचार करणे तर तिसऱ्या बाजुला जे अतिगंभीर आहेत त्यांच्यासाठी व्हेंटिलेटरच्या सुविधा उपलब्ध करणे, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांशी समन्वय साधून अतिरिक्त उपचार सुविधेची व्यवस्था करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. 

याच्या जोडिला जिल्ह्यातील किनवट सारख्या आदिवासी बहुल भागापासून थेट मुखेड, देगलूर, लोहा, कंधारपर्यंत लसीकरणाच्या मोहिमेत जनतेचा भक्कम सहभाग घेत त्याचे नियोजन करणे आपल्याला आवश्यक होते. आपण सुरुवातीला प्राधान्याने वयस्कर लोकांच्या लसीकरणावर भर दिला. त्यानंतर वयोमानाप्रमाणे व कोऑरबीट नागरिकांच्या लसीकरणावर आपण भर दिला. त्या खालोखाल आता युवकांच्या लसीकरणावर आपण भर देत असून लवकरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या महालसीकरण मोहिमेचा आपण शुभारंभ करत आहोत. जिल्ह्याला ज्या प्रमाणात लस प्राप्त होत आहे त्यातील 30 टक्के लसीचा साठा महाविद्यालयीन युवकांसाठी प्राधान्याने आपण वापरणार आहोत. 

जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागावा यासाठी आपण उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटेकोर वापरासह प्रलंबित प्रकल्प मार्गी लागण्यासाठी नियोजन केले आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहेच मागील महिन्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण नांदेड जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पाचा आढावा घेऊन त्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. लेंडी प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या हरितक्रांतीचे स्वप्न आपण लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहोत. केवळ नांदेड जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण मराठवाड्याच्या कृषि क्षेत्रासाठी जायकवाडी, अप्पर पेनगंगा आणि इतर धरणे खूप महत्वाची आहेत. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा येवा कमी झाल्याचे चित्र काळजी करायला लावणारे आहे. यातूनही मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. राज्याच्या कृषि विभागातर्फे "विकेल ते पिकेल" या संकल्पनेपासून ते बीज अर्थात बियाणांचा स्वावलंबनापर्यंतचा जो प्रयास सुरु आहे तो कौतुकास्पद आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि इतर पिकांचे चांगले बियाणे जपून ठेवत मोठ्या प्रमाणात एक दुसऱ्यांची मदत करुन त्यात स्वयंपूर्णता आणली याचे मला विशेष कौतूक आहे. कृषिक्षेत्राचे तंत्रज्ञ दिवसेंदिवस बदलत आहे. 

निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी ई-पिक पाहणी सारखा महत्वपूर्ण प्रकल्प आपण राज्यात सुरु केला आहे. यात पिक पेरणीची माहिती, प्रत्येक गावनिहाय, सात-बारा निहाय आपल्याला आता सहज एकत्रीत स्वरुपात उपलब्ध होईल. यामुळे कृषि क्षेत्राचे पेरणीनुसार त्याचे व्यापक नियोजन करता येईल. शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण असून पेरणीनुसार येणारे उत्पादन व या उत्पादनासाठी योग्य भाव मिळेल याचे नियोजन करता येणे शक्य होईल. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न कसे होऊ शकेल याची काळजी आपण घेत आहोत. 

शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनेत काही अडचणी असल्याचे आमच्या निदर्शनास आले. पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांची होणारी दिशाभूल आणि लूट थांबविण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. ही योजना केंद्र सरकारची योजना आहे. राज्य सरकारकडे केवळ अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली कंपन्यांचे हित जर साधले जात असेल तर पिक विमा योजनेत बदल करण्याची राज्य सरकारची मागणी आहे. संपूर्ण राज्यात बीड जिल्हा पॅटर्न लागू करण्यात यावा अशी अधिकृत मागणी पंतप्रधानांकडे आपण केली आहे. कर्जमुक्ती योजना असेल, कापसाची खरेदी असेल, यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र शोध मोहिम घेऊन शेतकऱ्यांच्या सात-बारा निहाय, कापसाची उचल आपण करुन घेतली आहे. शेतकऱ्यांचे दु:, अडचणी दूर व्हाव्यात हा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. 

शेतीला पूरक उद्योग म्हणून पशूधनाकडे आपण पाहतो. इतर जिल्ह्याच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यात उपलब्ध असलेले पाण्याचे प्रमाण व हिरवा चारा लक्षात घेता पशुपालन व्यवसायाची संधी आपल्या येथे मोठी आहे. प्रत्येक गावातील पशूधनाला आरोग्याच्या सुविधेसाठी आवश्यक असलेले खोडे असंख्य गावात खराब झाले होते. काही गावे / खेडे यांना खोड्यांची उपलब्धता नव्हती. मानव विकास कार्यक्रमांतर्गत आपण 9 तालुक्यातील 546 गावांमध्ये "गाव तेथे खोडा" योजनेंतर्गत खोडा उपलब्ध करुन दिला आहे. आपल्या जिल्हा परिषदेचा हा अभिनव उपक्रम असून याचा शुभारंभ आपण केला आहे. याचबरोबर ज्या-ज्या गावांमध्ये मोडकळीस आलेले पशु दवाखाने आहेत त्याच्या इमारतीची पाहणी केली जात आहे. जनावरांच्या लसीकरणासाठी अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅबला आपण मंजुरी दिली आहे. जिल्ह्यासाठी तीन फिरत्या पशुवैद्यकिय रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या आहेत. 

ग्रामविकासाच्या वाटचालीत असलेली अनेक आव्हाने याची मला कल्पना आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, त्यांचे सदस्य, सरपंच हे आहे त्या उपलब्ध स्थितीत त्यांच्यापरीने चांगले काम करीत आहेत. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक गावांचे गणित आणि विकासाचे नियोजन हे काळजीचे झाले आहे. या नियोजनातील विविध प्रश्नांपैकी अत्यंत अशा भावनिक प्रश्न म्हणजे स्मशानभूमी / दफनभूमी. या जिल्ह्यात असंख्य गावांना स्वत:ची दफनभूमी / स्मशानभूमी नसल्याने मोठा भावनिक प्रश्न निर्माण झाला होता. यातील अडचण लक्षात घेऊन "गाव तेथे स्मशानभूमी" हा अभिनव उपक्रम आपण सुरु केला असून आजच्या घडीला जवळपास 105 गावांना आपण गायरान जमीन स्मशानभूमीसाठी उपलब्ध करुन दिली आहे. इतर ज्या गावात गायरान जमीन नाही त्या गावासाठी लोकांना अपील करुन कोणी जर जमीन देत असेल तर ती जमीन शासकीय दराने विकत घेण्याची तयारी आपण दर्शविली आहे. 

ग्रामीण भागासह मागील काही वर्षात मराठवाड्यातील रस्ते विकास योजनांचा अनुशेष मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हा अनुशेष अल्पकालावधीत भरुन निघेल असे शक्य नाही. परंतू जे अत्यावश्यक रस्ते विकासाची कामे आहेत ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी सुरु केला आहे. नांदेड जिल्ह्यातील विविध पायाभूत व इतर विकास कामांसाठी सुमारे 4 हजार कोटींच्या कामांना आपण मंजुरी दिली आहे. नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जे महत्वाचे वास्तुस्थापत्य, विद्युत व इतर कार्यालय आवश्यक होती त्याची उपलब्धता आपण केली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर पूर्ण वळण रस्ता मार्गावरील आसना नदीच्या जोडीला आणखी नवा पुल, आपण युद्धपातळीवर काम करुन पुर्ण करीत आलो आहोत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला नांदेड जिल्ह्यातील जनतेला जोडण्यासाठी आपण नांदेड-जालना हा जोड दृतगतीमार्ग प्रस्तावित केला असून हा मार्ग आपण लवकरात लवकर पूर्ण करू. याचा लाभ इथल्या उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे. 

नांदेड शहराच्या सांस्कृतिक वैभवासाठी "उर्दू घर" आपण जनसेवेसाठी खुले केले आहे. मानवी संवेदनेचा एक मोठा कप्पा उर्दू भाषेत, उर्दू साहित्यात दडलेला आहे. उर्दू भाषेचा परिचय बहुभाषिकांना व्हावा, उर्दू भाषेचे संवर्धन व्हावे, उर्दू शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या भाषेचे परिपूर्ण ज्ञान मिळावे आणि महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्व भाषेतील साहित्यिक कवी यांना एका व्यासपिठावर एकत्र येता यावे. यादृष्टिने राज्यातले पहिले "उर्दू घर" आपण नुकतेच जनतेसाठी खुले केले आहे. 

मानवी समाजाच्या विकासासाठी, जडण-घडणीसाठी केवळ भौतिक सुविधा देऊन चालणार नाही तर भौतिक सुविधेच्या आकाराबरोबर विवेकाचे भान आणि मानवतेच्या विचारांचा जागरही आवश्यक असतो. नांदेड हे विचाराच्या जागरासाठी ओळखले जाते. इथल्या नागरिकांना विवेकाच्या जागराच्यादृष्टिने स्वस्थ बसता यावे, चिंतन करता यावे असेही पार्क आपण विकसित केले आहे. यात गोदावरीच्या काठावर घाटांची निर्मिती असेल किंवा राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक असेल अथवा अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी यांची नांदेड शहरातविकसित केलेले स्मारके विचारांची केंद्र झालेली आहेत. आपल्या विसावा उद्यानात मानवतेच्या संदेशासाठी भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार पद्मश्री आर. के. लक्ष्मण यांच्या नजरेतून साकारलेल्या कॉमनमॅनचा पुतळा हा आपण नांदेडकर जनतेला अर्पण केला आहे. लोकशाहीच्या विकासासाठी जनतेच्या विवेकाला भान देण्याचे कामही शासनाचे आहे. सजग आणि विवेकाचे भान असलेल्या लोकसहभागातून उद्याचा भारत समृद्ध होणार आहे. या समृद्ध भारतासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊ !

 

-         अशोक चव्हाण, पालकमंत्री नांदेड जिल्हा

 

शब्दांकन- विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

 

Friday, August 20, 2021

जिल्ह्यात चार जणांची कोरोनावर मात, तिघे कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 86 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 714 एवढी झाली असून यातील 88 हजार 7 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 46 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

गुरुवार 19 ऑगस्ट 2021 रोजी कंधार तालुक्यातील दिग्रस येथील 76 वर्षाच्या महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 661 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नायगाव तालुक्यात अंतर्गत 1, देगलूर तालुक्यातर्गत 1 असे एकूण 3 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 46 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 29, नांदेड जिल्ह्यातील तालुके अंतर्गत गृह विलगीकरण 6 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 124, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 95 हजार 366

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 92 हजार 468

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 714

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 7

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 661

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.1 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-8

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-2

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-46

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 जिल्ह्यातील 68 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 68 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शनिवार 21 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, स्त्री रुग्णालय, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 17 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर स्त्री रुग्णालय येथे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, कंधार, धर्माबाद, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 19 ऑगस्ट 2021 पर्यंत एकुण 9 लाख 27 हजार 486 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 20 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 7 लाख 50 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 44 हजार डोस याप्रमाणे एकुण 9 लाख 94 हजार 30 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त राहण्यासाठी शासनाचे आदेश

प्रवेशद्वाराजवळ तंबाखू त्याग पेटीबाबत मार्गदर्शक सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तंबाखुमुक्त राहण्यासाठी शासनाने स्वतंत्र निर्णय काढून काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. यात प्रामुख्याने प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तंबाखु त्याग पेटी, जमा तंबाखू व तंबाखू पदार्थाची विल्हेवाट, दंडात्मक कारवाई याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 116 मधील तरतुदीनुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व थुंकण्यावर प्रतिबंध आहेत. याचबरोबर साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीच्या अधिन राहून राज्यात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास, थुंकण्यास व धुम्रपानास (ई-सिगारेटसह) प्रतिबंध करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत करुन जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय परिसरात धुम्रपान करतांना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

हे आदेश शासकीय, निमशासकीय, खाजगी, विविध मंडळे, परिमंडळे, महामंडळे, औद्योगिक, व्यावसायिक, वाणिज्य, शैक्षणिक, वैद्यकीय, रहिवासी, क्षेत्र व संकुले, रेल्वे स्थानके, बस स्थानके, जल वाहतूक स्थानके, बंदरे क्षेत्र, न्यायालयीन संस्था, देवस्थान, बगीचे, पर्यटन स्थळे, शॉपिग मॉल, तरण तलाव, सिनेमागृहे, व्यायाम शाळा, रस्ते, बाजार पेठा, हॉटेल्स इ. संस्था, आस्थापना व सार्वजनिक क्षेत्रांच्या ठिकाणी व आवारातही लागू करण्यात आले आहेत. 

साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायदानुसार सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांने त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश, दंड व दंडनीय कारवाईबाबत तसेच सार्वजनिक ठिकाणी दर्शनी भागात जनजागृतीचे फलके प्रसिद्ध करावीत. या अधिनियम व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिक्षा व दंड आकारण्यात येईल. या दंडाची रक्कम शासनास भरण्याची तरतूद करण्यात आली आहे, याची सर्व कार्यालय प्रमुखांनी नोंद घ्यावी असेही शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.

0000

 अन्न धान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी - डॉ विश्वजीत कदम 

 ·         तिन महिन्यात शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश 

·         गैर व्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश

मुंबई दि. 18 :- अन्न धान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी असे निर्देश आज मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी दिले. 

जळगाव तसेच नांदेड जिल्ह्यातील 2018 मध्ये उघडकीस आलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याच्या धर्तीवर वाहतूक ठेकेदार यांच्याशी संगनमत करून धान्यांचा काळाबाजार चालू असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी गंभीर दखल घेऊन मंत्रालयातील दालनात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन याबतीत गांभिर्याने दखल घेऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. 

जळगाव जिल्ह्यातील वाहतूकदार यांनी गोदामांमध्ये पोहोच मालाच्या ई-1 रजिस्टर मधील अभिलेख तसेच या अभिलेखाचा विविध टोल नाक्यावरील असलेल्या नोंदी तसेच (जि पि एस ) यंत्राचा वापर वाहतूकदार नियमाप्रमाणे करत आहेत का, तसेच ठेकेदार यांची वाहने शासनाच्या निकषांची पुर्तता करतात आहेत का याबाबत संबंधित(RTO) यांचा अहवाल प्राप्त आहेत का, याचबरोर अन्न धान्य वितरण करण्यात येणाऱ्या वाहनांना नियमाप्रमाणे हिरवा रंग तसेच PDS चे फलक लावण्यात आले आहेत का, जळगाव जिल्ह्यातील धान्यांचे पुर्ण इ-पास मशिनद्वारे झाले आहेत का, आदी बाबी डॉ. कदम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जळगाव जिल्ह्यातील वरील सविस्तर बाबतीत अहवाल शासनाला तिन महिन्यात सादर करण्याचे निर्देश डॉ कदम यांनी दिले. 

डॉ. कदम यांनी जिल्हयामधील अन्नधान्य वाहतुकीच्या वाहनांवर शासनाच्या निर्देशाप्रमाणे जी.पी.एस. यंत्रणा बसविलेल्या नसल्याने तिव्र नाराजी व्यक्त केली. तसेच माल व्यपगत करण्याची प्रकरणे तसेच इतर बाबींवर बोट ठेवले. राज्यमंत्री यांनी पुढील 3 महिने सर्व वाहतुक व्यवस्थेवर जी.पी.एस. यंत्रणा क्षेत्राची नावे तसेच इतर सर्व माध्यमातून गैरप्रकाराबाबत तपासणी करुन शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.  

यावेळी या बैठकीला श्री. अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव,  सह सचिव,सुधिर तुंगार, सुनील सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी, श्री,प्रशांत कुलकर्णी, सहायक पुरवठा अधिकारी, आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

00000




 

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...