Saturday, August 21, 2021

विशेष लेख

समृद्ध भारतासाठी कटिबद्ध होण्याचा अमृत महोत्सव 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी राष्ट्रध्वज वंदनास साक्षिदार होण्याचा आनंद आणि याचे आत्मिक समाधान शब्दात न सांगण्यासारखे आहे. प्रत्येकाच्या अंगावर देश भक्तीचे रोमांच आणि प्रेरणा देणाऱ्या अमृत महोत्सवी पर्वात आपण जात आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीयांना काय-काय सहन करावे लागले याची साक्ष देणारे मोजकेच ज्येष्ठ नागरिक आज हयात आहेत. ब्रिटिशांच्या बंदुकांचा प्रतिकार आपली निधडी छाती घेऊन आनंदाने गोळ्या झेललेल्या पूर्वजाचे आपण वारस आहोत. हा अमृत महोत्सव साजरा करताना स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले, त्याग केला, शांततेच्या मार्गाने आंदोलने केली, त्यांची किती उदाहरणे आपणापुढे ठेवू हा मला प्रश्न पडला आहे. 

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आपल्या पूर्वजांनी जपलेले अहिंसेचे, विवेकाचे, धर्मनिरपेक्षतेचे, असहकार चळवळीचे, स्वदेशी बाण्याचे, समतेचे, बंधुत्वाचे मूल्य किती लाख मोलाचे होते याची प्रचिती संपूर्ण जगाने घेतली. स्वदेशी बाण्यासाठी, स्वातंत्र्यासाठी विदेशी कपड्यांच्या होळीचे आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, असहकार चळवळ, अहमदाबाद आंदोलन, चंपारण सत्याग्रह, चले जाओ आंदोलन, हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे टप्पे आहेत. यात प्रत्येक आंदोलनाने भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याबद्दल स्फुलिंग चेतविले. बैसाखी सणासाठी जालीयनवाला बागेत जमलेल्या लहान लेकराबाळांसह, माय-माऊलीसह लहान-मोठ्या लोकांना बेसावध असताना ब्रिटिशांनी गोळ्या झाडल्या. आपल्या काखेत लहान बाळांना घेऊन विहिरीत उड्या घेणाऱ्या मातांचे हुंकार आजही तिथे भेट दिल्यावर आपल्याला ऐकायला येतील. आपल्या महाराष्ट्रातील नंदुरबार येथील स्वातंत्र्यासाठी तिरंगा फडकवणाऱ्या छोट्या शिरीशकुमार या बालकावर गोळ्यांच्या तीन फेरी झाडून ब्रिटिशांनी केलेली हत्या, असे किती विरांच्या बलिदानाचे स्मरण करावे ? 

ज्या कायद्याच्या धाकाने ब्रिटिशांने भारताच्या स्वातंत्र्यावर बंदुकी रोखल्या त्याचा तेवढ्याच संयमाने, धिरानेअहिंसेच्या मार्गातून संपूर्ण भारताला जागे करणाऱ्या महात्मा गांधीची किती सारी उपोषणे, आंदोलन डोळ्यापुढे ठेवावीत ! पंडीत जवाहरलाल नेहरु पासून सरदार वल्लभभाई पटेल, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, भगिनी निवेदिता, लाला लजपतराय, सय्यद अहमद खान, बंकीमचंद्र चटर्जी, दादाभाई नौरोजी, विनोबा भावे, जमनालाल बजाज, बिरला यांच्यासारख्या असंख्य व्यक्तींनी दिलेल्या योगदानाचे मोल करता येणार नाही. एकसंघ भारतासाठी, जात-पात, धर्माच्यापलीकडे मानवतेची मूल्य जोपासून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या, मरण यातना सोसणाऱ्या पूर्वजांनी स्वातंत्र्याच्या मूल्याचा समृद्ध वारसा आपल्या हाती दिला आहे, हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.    

स्वातंत्र्यानंतरची ही 73 / 74 वर्ष आपण खूप काही शिकण्यात वेचली. स्वत:चा गाडा स्वत: उभा करण्याचे आव्हान आपण पेलले. ही मुहूर्तमेढ स्वतंत्र अर्थकारणाची, औद्योगिकीरणाची, रोजगार निर्मितीची, अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेची होती. याचबरोबर सार्वजनिक आरोग्याच्या हमीची, वाडी-वस्त्यातील, डोंगर-दऱ्यातील शिक्षणातील वंचित असलेल्या प्रत्येक घटकाला शिक्षणाचा प्रवाहात आणण्याची ही मुहूर्तमेढ होती. एका बाजुला आर्थिक व सामाजिक विकास तर दुसऱ्या बाजुला लोकशाही मूल्यांना प्राधान्य ! जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून जो लौकिक आपण प्राप्त केला त्याचा पाया भारतातल्या स्वातंत्र्य चळवळीत आहे हे विसरुन चालणार नाही. 

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी स्वयंपूर्ण भारतासाठी जी दूरदृष्टी त्यांनी त्यावेळेस दिली त्या दूरदृष्टीमुळे आपण स्वातंत्र्याच्या अवघ्या 74 वर्षात गरिबी निर्मुलनापासून, अन्न सुरक्षिततेच्या संवैधानिक अधिकारापर्यंत, औद्योगिक विकासापासून आंतराळाच्या प्रगतीपर्यंत, अणुऊर्जेच्या स्वयंसिद्धतेपर्यंत, वैज्ञानिक संशोधनात आघाडीपर्यंत, दूरसंचार क्षेत्रापासून आजच्या 5 जी (फाइव्ह जी) पर्यंतच्या युगाचा पाया हा पंडित जवाहरलाल नेहरु, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिलेल्या दूरदृष्टीत होता, हे विसरुन चालणार नाही.   

या 74 वर्षात भारताने अनेक आव्हानांचा सामना केला. मोठमोठे दुष्काळ पचवले. निसर्गाच्या लहरीपणामुळे पाण्याचे आव्हान पचविले. अन्न-धान्याच्या बाबतीत स्वंयपूर्णता सिद्ध करुन कृषिक्रांतीची बीजे रोवली. मानवी आरोग्यावर अपरीचित असलेल्या विविध आजाराबाबत संशोधन करुन औषधोपचाराच्या निर्मितीपर्यंतचा आपला प्रवास थक्क करणारा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची जी लोकसंख्या होती त्याच्या तिप्पटीने भर पडून आज ज्या काही सोई-सुविधा मुलभूत प्रमाणात आवश्यक आहेत त्या उभे करण्यात एवढा काळ लागणे यात गैर नाही. स्वत:ची अर्थव्यवस्था निर्माण करणे, औद्योगिकरणाला चालना देणे, हे सारे पंचवार्षिकचे टप्पे निश्चित करत अन्न-धान्यापासून शिक्षणापर्यंत, आरोग्यापासून तंत्रज्ञानापर्यंत भारताला स्वयंपूर्ण होता आले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात प्रवेश करताना आजवरच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासमवेत 2019 नंतरचा कोविड-19 चा काळ मात्र आपल्याला वेगळा काढून तपासून बघावा लागेल. मागच्या दीड वर्षात कोरोनामुळे जागतिक महासत्ता असणारे देश लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी प्रयत्नांची शर्थ करतांना दिसले. त्या तुलनेत भारतासारख्या विविध नटलेल्या देशात या दीड वर्षाच्या आव्हानाच्या काळात जी एकसंघता दाखविली तो खरा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा गौरव म्हणून आपल्याला पहावे लागेल. या दीड वर्षात लोककल्याणकारी राज्याची संकल्पना, प्रत्येकाच्या आरोग्याची हमी घेण्यासह निर्बंध घालुनही जनजीवन सुरळीत ठेवण्यामध्ये शासन म्हणून जे यशस्वी नियोजन करता आले त्याकडे पाहिल्यावर आता स्वताचा स्वत:ला विश्वास बसत नाही. 

गतवर्षी मेच्या अखेरीस मलाही कोरोनाच्या दिव्यातून जावे लागले. संपूर्ण जगभर ही लाट वाढली. नांदेडची मर्यादीत खाटांची क्षमता असलेल्या आरोग्य सुविधेवर  90 हजार लोकांपर्यंत उपचार व विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी पडली. पालकमंत्री म्हणून प्रशासनाच्या पाठीमागे भक्कम उभे राहणे, दुसऱ्या बाजुला ज्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत त्यासाठी नवीन यंत्रणा तात्काळ उभी करणे, दीडशे खाटावरुन जिल्ह्यातील मंगल कार्यालय असोत, सभागृह असोत जिथे जागा मिळेल तिथे लोकांना आरोग्याच्या सुविधा कमी कालावधीत आपण उभ्या करु शकलो. 

कोविडच्या व्यवस्थापनासाठी गतवर्षात आर्थिक आव्हाने असतांनाही आपणजिल्ह्यात सुमारे 52 कोटी रुपयांचा निधी केवळ आरोग्य विभागासाठी उपलब्ध करुन दिला. यातून सर्व व्यवस्था आपल्याला करता आली. तर यावर्षी आजवर सुमारे 6 कोटी 21 लाख रुपयापर्यंतचा निधी आपण आरोग्यासाठी उपयोगात आणला. यानिधीतून जिल्हा रुग्णालयात अतिरीक्त दोनशे खाटांचा बाह्य रुग्ण विभाग आपण सुरु केला. नव्याने उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात कोरोनावर उपचाराची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध केली. जिल्हा रुग्णालयातील शंभर खाटाच्या डीसीएचसी स्तराचे कोविड-19 हॉस्पिटलमध्ये रुपांतर करुन त्याठिकाणी केंद्रीत ऑक्सिजन प्रणाली निर्माण केली. 

देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनासाठी स्वतंत्र कक्ष उभारुन त्याठिकाणी विद्युत व इतर अत्यावश्यक कामे पूर्ण केली. हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातही स्वतंत्र कोविड वार्डची निर्मिती, मालेगाव येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये कोविडचा कक्ष व त्याठिकाणी अत्यावश्यक असलेली विद्युतीकरणाची कामे, देगलूर येथील ट्रामा केअर इमारतीत कोरोना उपचाराचा कक्ष, उपजिल्हा रुग्णालय हदगाव, लोहा, मुखेड, किनवट व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी कोरोनावर उपचार करण्यासाठी आपण स्वतंत्र वार्ड निर्माण करुन आरोग्य सुविधा भक्कम केल्यात. अनेक ठिकाणी जुन्या इमारती असल्यामुळे वेळेच्या आतात्याठिकाणी विद्युतीकरणापासून ते नळ जोडणीपर्यंतची सर्व कामे पूर्ण करावी लागली. 

कोरोनावर उपचारासाठी अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर या सुविधा उपलब्ध करणे ही तारेवरची कसरत होती. या यंत्र सामुग्रीसाठी जागोजागी विद्युतीकरणाची सुविधा आवश्यक होती. प्रत्येक तालुकापातळीवर, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ग्रामीण आरोग्य केंद्र व उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत आणि आपल्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयापर्यंतच्या सर्व सोई-सुविधांचा एकत्रित आढावा घेऊन त्याचे यशस्वी नियोजन करुन आपण आरोग्य सेवेच्या व्यवस्थापनात एक अनुकरणीय मापदंड निर्माण केला. 

जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या लक्षात घेता 100 खाटांच्या स्वतंत्र वार्डाची आपण निर्मिती केली. एकीकडे कोरोना बाधितांवर उपचाराची सुविधा तर दुसऱ्या बाजुला जिल्ह्यातील नागरिकांच्या कोविड चाचणीसाठी भक्कम यंत्रणा उभी करणे मुळीच सोपे काम नव्हते. आजही हे काम अव्याहतपणे सुरू आहे. सुरुवातीच्या काळात साऱ्याच गोष्टी अनभिज्ञ होत्या. जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक संस्थांची मतमतांतरे लक्षात घेऊन नांदेड सारख्या ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची सुविधा उपलब्ध करतांना प्रशासनाने कोणतीही कसर सोडली नाही. 

एका बाजुला कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविणे, दुसऱ्या बाजुला बाधितांवर उपचार करणे तर तिसऱ्या बाजुला जे अतिगंभीर आहेत त्यांच्यासाठी व्हेंटिलेटरच्या सुविधा उपलब्ध करणे, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांशी समन्वय साधून अतिरिक्त उपचार सुविधेची व्यवस्था करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. 

याच्या जोडिला जिल्ह्यातील किनवट सारख्या आदिवासी बहुल भागापासून थेट मुखेड, देगलूर, लोहा, कंधारपर्यंत लसीकरणाच्या मोहिमेत जनतेचा भक्कम सहभाग घेत त्याचे नियोजन करणे आपल्याला आवश्यक होते. आपण सुरुवातीला प्राधान्याने वयस्कर लोकांच्या लसीकरणावर भर दिला. त्यानंतर वयोमानाप्रमाणे व कोऑरबीट नागरिकांच्या लसीकरणावर आपण भर दिला. त्या खालोखाल आता युवकांच्या लसीकरणावर आपण भर देत असून लवकरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या महालसीकरण मोहिमेचा आपण शुभारंभ करत आहोत. जिल्ह्याला ज्या प्रमाणात लस प्राप्त होत आहे त्यातील 30 टक्के लसीचा साठा महाविद्यालयीन युवकांसाठी प्राधान्याने आपण वापरणार आहोत. 

जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागावा यासाठी आपण उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटेकोर वापरासह प्रलंबित प्रकल्प मार्गी लागण्यासाठी नियोजन केले आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहेच मागील महिन्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण नांदेड जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पाचा आढावा घेऊन त्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. लेंडी प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या हरितक्रांतीचे स्वप्न आपण लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहोत. केवळ नांदेड जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण मराठवाड्याच्या कृषि क्षेत्रासाठी जायकवाडी, अप्पर पेनगंगा आणि इतर धरणे खूप महत्वाची आहेत. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा येवा कमी झाल्याचे चित्र काळजी करायला लावणारे आहे. यातूनही मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. राज्याच्या कृषि विभागातर्फे "विकेल ते पिकेल" या संकल्पनेपासून ते बीज अर्थात बियाणांचा स्वावलंबनापर्यंतचा जो प्रयास सुरु आहे तो कौतुकास्पद आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि इतर पिकांचे चांगले बियाणे जपून ठेवत मोठ्या प्रमाणात एक दुसऱ्यांची मदत करुन त्यात स्वयंपूर्णता आणली याचे मला विशेष कौतूक आहे. कृषिक्षेत्राचे तंत्रज्ञ दिवसेंदिवस बदलत आहे. 

निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी ई-पिक पाहणी सारखा महत्वपूर्ण प्रकल्प आपण राज्यात सुरु केला आहे. यात पिक पेरणीची माहिती, प्रत्येक गावनिहाय, सात-बारा निहाय आपल्याला आता सहज एकत्रीत स्वरुपात उपलब्ध होईल. यामुळे कृषि क्षेत्राचे पेरणीनुसार त्याचे व्यापक नियोजन करता येईल. शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण असून पेरणीनुसार येणारे उत्पादन व या उत्पादनासाठी योग्य भाव मिळेल याचे नियोजन करता येणे शक्य होईल. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न कसे होऊ शकेल याची काळजी आपण घेत आहोत. 

शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनेत काही अडचणी असल्याचे आमच्या निदर्शनास आले. पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांची होणारी दिशाभूल आणि लूट थांबविण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. ही योजना केंद्र सरकारची योजना आहे. राज्य सरकारकडे केवळ अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली कंपन्यांचे हित जर साधले जात असेल तर पिक विमा योजनेत बदल करण्याची राज्य सरकारची मागणी आहे. संपूर्ण राज्यात बीड जिल्हा पॅटर्न लागू करण्यात यावा अशी अधिकृत मागणी पंतप्रधानांकडे आपण केली आहे. कर्जमुक्ती योजना असेल, कापसाची खरेदी असेल, यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र शोध मोहिम घेऊन शेतकऱ्यांच्या सात-बारा निहाय, कापसाची उचल आपण करुन घेतली आहे. शेतकऱ्यांचे दु:, अडचणी दूर व्हाव्यात हा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. 

शेतीला पूरक उद्योग म्हणून पशूधनाकडे आपण पाहतो. इतर जिल्ह्याच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यात उपलब्ध असलेले पाण्याचे प्रमाण व हिरवा चारा लक्षात घेता पशुपालन व्यवसायाची संधी आपल्या येथे मोठी आहे. प्रत्येक गावातील पशूधनाला आरोग्याच्या सुविधेसाठी आवश्यक असलेले खोडे असंख्य गावात खराब झाले होते. काही गावे / खेडे यांना खोड्यांची उपलब्धता नव्हती. मानव विकास कार्यक्रमांतर्गत आपण 9 तालुक्यातील 546 गावांमध्ये "गाव तेथे खोडा" योजनेंतर्गत खोडा उपलब्ध करुन दिला आहे. आपल्या जिल्हा परिषदेचा हा अभिनव उपक्रम असून याचा शुभारंभ आपण केला आहे. याचबरोबर ज्या-ज्या गावांमध्ये मोडकळीस आलेले पशु दवाखाने आहेत त्याच्या इमारतीची पाहणी केली जात आहे. जनावरांच्या लसीकरणासाठी अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅबला आपण मंजुरी दिली आहे. जिल्ह्यासाठी तीन फिरत्या पशुवैद्यकिय रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या आहेत. 

ग्रामविकासाच्या वाटचालीत असलेली अनेक आव्हाने याची मला कल्पना आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, त्यांचे सदस्य, सरपंच हे आहे त्या उपलब्ध स्थितीत त्यांच्यापरीने चांगले काम करीत आहेत. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक गावांचे गणित आणि विकासाचे नियोजन हे काळजीचे झाले आहे. या नियोजनातील विविध प्रश्नांपैकी अत्यंत अशा भावनिक प्रश्न म्हणजे स्मशानभूमी / दफनभूमी. या जिल्ह्यात असंख्य गावांना स्वत:ची दफनभूमी / स्मशानभूमी नसल्याने मोठा भावनिक प्रश्न निर्माण झाला होता. यातील अडचण लक्षात घेऊन "गाव तेथे स्मशानभूमी" हा अभिनव उपक्रम आपण सुरु केला असून आजच्या घडीला जवळपास 105 गावांना आपण गायरान जमीन स्मशानभूमीसाठी उपलब्ध करुन दिली आहे. इतर ज्या गावात गायरान जमीन नाही त्या गावासाठी लोकांना अपील करुन कोणी जर जमीन देत असेल तर ती जमीन शासकीय दराने विकत घेण्याची तयारी आपण दर्शविली आहे. 

ग्रामीण भागासह मागील काही वर्षात मराठवाड्यातील रस्ते विकास योजनांचा अनुशेष मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हा अनुशेष अल्पकालावधीत भरुन निघेल असे शक्य नाही. परंतू जे अत्यावश्यक रस्ते विकासाची कामे आहेत ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी सुरु केला आहे. नांदेड जिल्ह्यातील विविध पायाभूत व इतर विकास कामांसाठी सुमारे 4 हजार कोटींच्या कामांना आपण मंजुरी दिली आहे. नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जे महत्वाचे वास्तुस्थापत्य, विद्युत व इतर कार्यालय आवश्यक होती त्याची उपलब्धता आपण केली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर पूर्ण वळण रस्ता मार्गावरील आसना नदीच्या जोडीला आणखी नवा पुल, आपण युद्धपातळीवर काम करुन पुर्ण करीत आलो आहोत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला नांदेड जिल्ह्यातील जनतेला जोडण्यासाठी आपण नांदेड-जालना हा जोड दृतगतीमार्ग प्रस्तावित केला असून हा मार्ग आपण लवकरात लवकर पूर्ण करू. याचा लाभ इथल्या उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे. 

नांदेड शहराच्या सांस्कृतिक वैभवासाठी "उर्दू घर" आपण जनसेवेसाठी खुले केले आहे. मानवी संवेदनेचा एक मोठा कप्पा उर्दू भाषेत, उर्दू साहित्यात दडलेला आहे. उर्दू भाषेचा परिचय बहुभाषिकांना व्हावा, उर्दू भाषेचे संवर्धन व्हावे, उर्दू शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या भाषेचे परिपूर्ण ज्ञान मिळावे आणि महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्व भाषेतील साहित्यिक कवी यांना एका व्यासपिठावर एकत्र येता यावे. यादृष्टिने राज्यातले पहिले "उर्दू घर" आपण नुकतेच जनतेसाठी खुले केले आहे. 

मानवी समाजाच्या विकासासाठी, जडण-घडणीसाठी केवळ भौतिक सुविधा देऊन चालणार नाही तर भौतिक सुविधेच्या आकाराबरोबर विवेकाचे भान आणि मानवतेच्या विचारांचा जागरही आवश्यक असतो. नांदेड हे विचाराच्या जागरासाठी ओळखले जाते. इथल्या नागरिकांना विवेकाच्या जागराच्यादृष्टिने स्वस्थ बसता यावे, चिंतन करता यावे असेही पार्क आपण विकसित केले आहे. यात गोदावरीच्या काठावर घाटांची निर्मिती असेल किंवा राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक असेल अथवा अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी यांची नांदेड शहरातविकसित केलेले स्मारके विचारांची केंद्र झालेली आहेत. आपल्या विसावा उद्यानात मानवतेच्या संदेशासाठी भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार पद्मश्री आर. के. लक्ष्मण यांच्या नजरेतून साकारलेल्या कॉमनमॅनचा पुतळा हा आपण नांदेडकर जनतेला अर्पण केला आहे. लोकशाहीच्या विकासासाठी जनतेच्या विवेकाला भान देण्याचे कामही शासनाचे आहे. सजग आणि विवेकाचे भान असलेल्या लोकसहभागातून उद्याचा भारत समृद्ध होणार आहे. या समृद्ध भारतासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊ !

 

-         अशोक चव्हाण, पालकमंत्री नांदेड जिल्हा

 

शब्दांकन- विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   94 ​ राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक नांदेड दि २४ :- गेल्या तीन...