Tuesday, January 26, 2021

सुधारित वृत्त

कोरोना काळात जनतेने बाळगलेला संहिष्णूता व एकात्मता हा खऱ्या अर्थाने लोकशाही मुल्यांचा गौरव -         पालकमंत्री अशोक चव्हाण  

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

नांदेड, (जिमाका)दि. 26 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन आपण साजरा करीत असतांना मागील 71 वर्षांच्या संचितापेक्षा गत एक वर्षात जे काही अनुभवले, जे काही पाहिले, जे काही सोसले ते मागे वळून पाहिले तर प्रत्येकाच्या अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही. मात्र या कठीण कालावधीत संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतीयांनी नागरिक म्हणून जो संयम, धैर्य, संहिष्णूता आणि एकात्मता दाखविली ती खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाही मुल्यांचा गौरव करणारी आहे, या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नागरिकांचा गौरव केला. 

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. याप्रसंगी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते.  यावेळी महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, स्वातंत्र्य सैनिक, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी व वरिष्ठ अधिकारी, नागरिक उपस्थित होते.   

राज्यघटनेच्या या मूलतत्वावर लोककल्याणकारी राज्याची भूमिका आपण स्विकारुन राज्याच्या प्रत्येक भागातील जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकिय योजनांना आकार दिला आहे. शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून विकासासाठी प्रतिक्षेत असलेल्या जनतेला न्याय देण्यासाठी आपण प्रशासनाची, विविध विभागांची निर्मिती केली आहे. या सर्व यंत्रणेमार्फत आपण नांदेड जिल्ह्यात विविध विकास कामांना चालना दिल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

राज्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी नांदेडला जोडता यावे यादृष्टीने आम्ही निर्णय घेतला असून आता  नांदेड ते जालना पर्यंतचा साधारणत: 194 किमीचा स्वतंत्र समृद्धी मार्ग केला जाणार आहे. हा संपूर्ण मार्ग सिमेंट काँक्रिटचा सहा पदरी असून यास अंदाजे 6 हजार 500 कोटी रुपये खर्च येईल. मार्गामुळे धर्माबाद येथून नांदेडपर्यंत अवघ्या 1 तासात येण शक्य होणार आहे. नांदेड येथून जोडल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पांतर्गत अडीच तासात नांदेड येथून औरंगाबादला पोहचता येईल. मुंबईला जाण्याचा प्रवासही यामुळे अवघ्या सात तासात जलद आणि सुरक्षितरितीने नांदेडवासियांना करता येईल, असे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.    

 

धर्माबाद येथे रेल्वे उड्डाणपूल, भुयारी रेल्वेपूल अशा 170 कोटी रुपयांच्या कामांसह एशिएन डेव्हलमेंट बँकेअंतर्गत नांदेड ते निळा-आसनापूल-मुगट-कारेगावफाटा ते बासर येथील ट्रीपल आयटीपर्यंत जवळपास 1 हजार 325 कोटीचा रस्ता लवकरच हाती घेऊन याचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.  

 

कोरोनातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणखी काही काळ आपल्याला द्यावा लागणार आहे. कोरोनाचे प्रमाण कमी जरी झाले असले तरी त्याचा धोका अजून टळलेला नाही हे नागरिकांनी निट लक्षात घेऊन काळजी घेतली पाहिजे. कोरोनाची लस जिल्ह्यातील गरजूवंतापर्यंत पोहोचावी यादृष्टिने आरोग्य विभागातर्फे आपण नियोजन केले आहे. पहिल्या फेरीत आरोग्य विभागात व कोरोना व्यवस्थापन आणि नियंत्रण संदर्भात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस देत आहोत. कोरोनावरची लस ही सक्षम असल्याने आपण सर्वांनी मोठ्या विश्वासाने लसीकरणासाठी तयार रहावे, असेही आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

गाव तेथे स्मशानभूमी अभियानांतर्गत

पालकमंत्र्यांच्या हस्ते जमीन प्रदान आदेशाचे वाटप

नांदेड जिल्ह्यातील असंख्य गावात आजही अंत्यविधीसाठी स्वतंत्र अशा जागा नसल्यामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकवेळा वंशपरंपरागत पद्धतीने ज्या जागेवर दहन किंवा दफन विधी केला जातो. स्मशानभूमीची जागा बऱ्याच गावांमध्ये खाजगी मालकीची असल्याने वादविवाद होतात. यात तक्रारी होत असल्याने बऱ्याचवेळा हा प्रश्न जटिल होतो. नांदेड जिल्ह्यातील या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन गाव तेथे स्मशानभूमी, दफनभूमी योजना हाती घेतली असून आज नांदेड तालुक्यातील चिखली, निळा, भोकर तालुक्यातील जांबदरी, धारजनी, मौ. चिचाळा या गावांना जमीन प्रदान आदेशाचे प्रातिनिधीक वाटपही केले.

याचबरोबर जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनासंदर्भात जर काही अडचणी असतील तर त्या शासनस्तरावर तात्काळ पोहचाव्यात व त्यावर प्रशासनाला काम करणे सोईचे व्हावे या उद्देशाने प्रशासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ त्यांनी केला.  

ग्रामीण भागासह शहरातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी बचतगटांची भूमिका ही खूप मोलाची आहे. यादृष्टिने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय नांदेड यांच्यामार्फत वेळोवेळी नाविन्यपूर्ण योजनांसाठी बचतगटांना प्रोत्साहित केले जाते. जिल्ह्यातील बचतगटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत उद्योग करणाऱ्या नांदेड येथील रमाई महिला बचतगट, करंजी ता. हिमायतनगर येथील जिजाऊ महिला बचतगट, तेजस्वीनी मसाला युनिट नांदेड, नाळेश्वर ता. नांदेड येथील अष्टविनायक महिला बचतगट यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्याचबरोबर नेहरु युवा केंद्रामार्फत स्वच्छ भारत समर इंटरशीप अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या युवकांचे त्यांनी अभिनंदन केले. याचबरोबर जिल्ह्यात  बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत जी साक्षरता मोहिम घेतली आहे त्या मोहिमेचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कौतूक करुन पुस्तिकेचे प्रकाशन केले.   

किनवट येथील आदिवासी मुला-मुलींच्या

नीट-2021 प्रशिक्षणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

नांदेड जिल्ह्यात आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या किनवट या तालुक्यातील आदिवासी वाड्या-पाड्यात राहणाऱ्या अभ्यासू मुलांना वैद्यकीय क्षेत्रात येता यावे व त्यांना चांगल्या शिक्षणाची विशेषत: नीट परीक्षेबाबत चांगली तयारी करता यावी यादृष्टिने पूर्व तयारी करता मिशन नीट-2021 हा उपक्रम शासकीय आश्रमशाळा किनवट-बोधडी येथे आजपासून सुरु करण्यात आला. याचा शुभारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 चा

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (pmkvy 3.0) या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एम्पावर प्रगतीचे प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, यश राजु बल्लेवार, आसिफखान हिदातखान खान या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाचे साहित्य वितरित करण्यात आले. याप्रसंगी कौशल्य विकासचे सहायक आयुक्त्त रेणुका तम्मलवार, प्रशिक्षणार्थी सहाय्यक आयुक्त गौरव इंगोले, प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचे प्रमुख विजय पुरोहित उपस्थित होते.

सैनिक गोरठकर यांच्यासह पोलीसदलातील

उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदक

सीमा सुरक्षाबलाचे सेवारत सैनिक कॉ. भास्कर गंगाधर गोरठकर यांचे ऑपरेशन रक्षक जम्मु काश्मिरमध्ये अंतकवाद्याशी झालेल्या चकमकीत 50 टक्के दिव्यांगत्व प्राप्त झाले. त्यांचा आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तांब्रपट देवून गौरव करण्यात आला. पोलीस सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल मा. राष्ट्रपती यांचे पोलीस पदक पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांना देण्यात आले. याचबरोबर पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड, यांना गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावल्याबद्दल विशेष सेवापदक देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक योगेश बोधगिरे, व्यंकट गंगलवाड, शिवकुमार बाचावाड, गोपाळ इंद्राळे, दिगांबर पाटील, आनंद बिच्चेवार, पो. कॉ. अमोल जाधव यांना विशेष सेवापदक देण्यात आले. तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खामराव वानखेडे पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह, पो. कॉ. संतोष सोनसळे, साईनाथ सोनसळे यांना सायकलिंग व कोरोना योद्धा प्रशिस्तीपत्र प्रदान करण्यात आले.    

याचबरोबर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकिय आणि खाजगी रुग्णालय यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुरस्कार देऊन गौरव केला. यात कु. उषा सुर्यवंशी, प्राची गजभारे, मुक्ता नारायण पवार या विद्यार्थींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असे पुरस्कार मिळविले. याचबरोबर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीतील राज्यगुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

समाजात कोरोनाबाबत जनजागृती, आरोग्यविषयक साक्षरता प्रसार व्हावा यादृष्टिने दक्ष असलेल्या माध्यमातील कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या माध्यम प्रतिनिधी, संपादक, छायाचित्रकार यांचा गौरव करण्यात आला. 

यावेळी परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्यासमवेत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी  परेडचे निरीक्षण केले व त्यानंतर परेड संचलन झाले. त्यांच्या सोबतीला राखीव पोलीस निरीक्षक शहादेव पोकळे होते. संचलनात सहभागी प्लाटूनचे पथक पुढीप्रमाणे होते. केंद्रीय राखीव पोलीस बल मुदखेड, जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी) नांदेड, दंगानियंत्रण पथक पोलीस मुख्यालय नांदेड, पोलीस पथक पोलीस मुख्यालय नांदेड, महिला पोलीस कर्मचारी पथक, नांदेड शहर विभाग, इतवार उपविभाग पथक, शहर वाहतूक शाखा पथक नांदेड, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक  (एमएसएफ), पोलीस बँड पथक पो. मु. नांदेड, डॉग स्कॉड युनिट डॉगचे नाव सुलतान, बॉम्ब शोधक व नाशक पथक बीडीडीएस, मार्क्स मॅन क्यूआरटी, वज्र वाहन (दंगा नियंत्रण), बुलेट रायडर अग्निशमक दल, देवदूत वाहन (मिनी रेस्क्यु फायर टेंडर), अग्निशमन दलाचे रेस्क्यु वाहन, वनविभागचा चित्ररथ, 108 रुग्णवाहिका, पिकेल ते विकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान रेशीम लागवड मिशन 2000 व शेततळ्याली मत्स्यपालन अभियान चित्ररथ, बेटीबचाओ बेटी पढाओ चित्ररथाचा या संचलनात सहभाग होता.

00000












Monday, January 25, 2021

 विकेल ते पिकेल धोरणातर्गंत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 25 :- "विकेल ते पिकेल" धोरणातर्गंत संत शिरोमणी सावतमाळी रयत बाजार अभियानशेतकरी ते ग्राहक थेट विक्री मेळावा कृषि विभागाने आयोजित केला आहे. हा मेळावा 26 ते 29 जानेवारी 2021 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सकाळी  10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या या मेळाव्याचा जास्तीत जास्त  ग्राहकांनी लाभ घ्यावा असे, आवाहन   जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. 

या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे फळे व भाजीपाला, डाळी, सेंद्रीय पदार्थ, पाक, मध, मसाले, लाकडी घाण्याचे तेल, लोणची तसेच तीळ, कारळ, जवस, ज्वारी, बिबेची गोडींबी, शेतमालावर प्रक्रिया केलेले विविध पदार्थ इत्यादी उत्पादनांचे आकर्षण असणार असून हा शेतीमाल शेतकऱ्यांमार्फत ग्राहकांना थेट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी दिली.

000000

 10 कोरोना बाधितांची भर तर 25 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- सोमवार 25 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 10 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 5 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 25 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

 

आजच्या 1 हजार 573 अहवालापैकी 1 हजार 554 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 274 एवढी झाली असून यातील 21 हजार 184 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 305 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 9 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 582 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 5,  माहूर तालुक्यांतर्गत 2जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 9, मुदखेड तालुक्याअंतर्गत 4 , खाजगी रुग्णालय 3 असे एकूण 25 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.10 टक्के आहे.  

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 1, कंधार 1, हदगाव 1, अर्धापूर 1, किनवट 1, असे एकुण 5 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड हदगाव 1, मुखेड 1, मुंबई 1, किनवट 1, कंधार 1 असे एकूण 5 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 305 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 16, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 9, मुखेड कोविड रुग्णालय 7, महसूल कोविड केअर सेंटर 9, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 193नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 35, खाजगी रुग्णालय 13 आहेत.  

 

सोमवार 25 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 167, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 90 एवढी आहे.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 3 हजार 590

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 77 हजार 44

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 274

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 184

एकुण मृत्यू संख्या-582

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.10 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-9

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-305

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-9.          

00000

 

नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या 2021-22 साठी

एकुण 462.91 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मान्यता 

जिल्ह्यातील विकास कामांसाठी अधिकचा

दीडशे कोटी रुपये निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील  

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड, (जिमाका) दि. 25 :- नांदेड जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेता आणि तालुक्यांची संख्या विचारात घेऊन विकास कामांची संख्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. या विकास कामांसाठी अधिकचा दिडशे कोटी रुपये निधी मिळावा यादृष्टिने येत्या 9 फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत मागणी करु, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी एकुण 462.91 कोटीच्या प्रारुप आराखड्याला सर्वांनुमते मान्यता देण्यात आली. 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, खासदार हेमंत पाटील, आमदार अमर राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार भिमराव केराम, आमदार मोहन हंबर्डे, आमदार रावसाहेब अंतापूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, आणि सदस्य उपस्थित होते. 

सन 2020-21 आर्थीक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनेसाठी एकुण 542.59 कोटी रुपये तरतुद मंजूर आहे. हा निधी शासनाकडून प्राप्त असून तरतुदीपैकी यंत्रणेच्या मागणीप्रमाणे 73.43 कोटीचे वितरण करण्यात आलेले आहे. यात 64.59 कोटी खर्च झालेला आहे. जिल्ह्यातील विविध विकास कामे सुरु असून उर्वरीत खर्च मार्च अखेरपर्यंत नियोजित आहे. या बैठकीत 2019-20 च्या जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनेच्या 479.33 कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. 

राज्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा लाभ जिल्ह्याला व्हावा यादृष्टिने नांदेड ते जालनापर्यंतच्या विशेष महामार्ग मंजूर केल्याद्दल यासभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री अशोक चव्हाण याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष अभिनंदानाचा ठराव या बैठकीत सर्वांनमुते घेण्यात आला. कोरोना काळात शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी जनतेला वैद्यकीय सेवासुविधा व इतर जीवनावश्यक वस्तुंची कमतरता पडू नये यासाठी जे नियोजन केले होते त्याबद्दलही अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला.

0000





 

आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाची दारे उघडी करून देणाऱ्या

"मिशन निट -2021" या उपक्रमाचे प्रजासत्ताक दिनी

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन  

नांदेड (जिमाका) दि. 25 :- शासकीय आश्रम शाळा व  कनिष्ठ महाविद्यालयातील  विज्ञान शाखेच्या आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाची दारे उघडी करून देण्यासाठी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "मिशन निट-2021" या उपक्रमाचे मंगळवार 26 जानेवारीला पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. 

शासकीय आश्रम शाळा किनवट व बोधडी (बु ) येथे 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत "मिशन निट -2021" हा उपक्रम चालणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी या उपक्रमाची आखणी केली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या पाटोदा (खु ), बोधडी (बु) , सहस्त्रकुंड व सारखणी या शासकीय आश्रम शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयात 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेऊन 325 विद्यार्थ्यांची निवड या मिशनकरिता करण्यात आली आहे. मुख्याध्यापक नागनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय आश्रम शाळा किनवट येथे 152 मुले-मुली व मुख्याध्यापक श्याम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय आश्रम शाळा बोधडी (बु) येथे 153 मुली प्रशिक्षण घेत आहेत. 

325 विद्यार्थ्यांना दररोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत डॉ. मोटेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरसीसीचे तज्ज्ञ प्राध्यापक ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत ; तर दुपारी 3 ते 5 या वेळेत शासकीय आश्रम शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील 10 शिक्षक किनवट येथे व 12 शिक्षक बोधडी (बु) येथे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, मराठी व इंग्रजी या विषयाचं मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत स्वयंअध्ययन असणार आहे. 

सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) मनोज टिळे यांच्या नेतृत्वात गोकुंदा (पूर्व) व किनवट येथील गृहपालांनी मुलांची राहण्याची व्यवस्था आपल्या शासकीय वसतिगृहात केली आहे. तर मुलींची व्यवस्था शासकीय आश्रम शाळा किनवट व बोधडी (बु) येथे केली आहे.

00000


 

 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास

सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे

नांदेड (जिमाका) दि. 25 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...