Monday, January 25, 2021

आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाची दारे उघडी करून देणाऱ्या

"मिशन निट -2021" या उपक्रमाचे प्रजासत्ताक दिनी

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन  

नांदेड (जिमाका) दि. 25 :- शासकीय आश्रम शाळा व  कनिष्ठ महाविद्यालयातील  विज्ञान शाखेच्या आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाची दारे उघडी करून देण्यासाठी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "मिशन निट-2021" या उपक्रमाचे मंगळवार 26 जानेवारीला पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. 

शासकीय आश्रम शाळा किनवट व बोधडी (बु ) येथे 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत "मिशन निट -2021" हा उपक्रम चालणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी या उपक्रमाची आखणी केली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या पाटोदा (खु ), बोधडी (बु) , सहस्त्रकुंड व सारखणी या शासकीय आश्रम शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयात 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेऊन 325 विद्यार्थ्यांची निवड या मिशनकरिता करण्यात आली आहे. मुख्याध्यापक नागनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय आश्रम शाळा किनवट येथे 152 मुले-मुली व मुख्याध्यापक श्याम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय आश्रम शाळा बोधडी (बु) येथे 153 मुली प्रशिक्षण घेत आहेत. 

325 विद्यार्थ्यांना दररोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत डॉ. मोटेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरसीसीचे तज्ज्ञ प्राध्यापक ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत ; तर दुपारी 3 ते 5 या वेळेत शासकीय आश्रम शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील 10 शिक्षक किनवट येथे व 12 शिक्षक बोधडी (बु) येथे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, मराठी व इंग्रजी या विषयाचं मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत स्वयंअध्ययन असणार आहे. 

सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) मनोज टिळे यांच्या नेतृत्वात गोकुंदा (पूर्व) व किनवट येथील गृहपालांनी मुलांची राहण्याची व्यवस्था आपल्या शासकीय वसतिगृहात केली आहे. तर मुलींची व्यवस्था शासकीय आश्रम शाळा किनवट व बोधडी (बु) येथे केली आहे.

00000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...