Wednesday, July 8, 2020


वृत्त क्र. 624   
परराज्यातील कामगारांना स्वत:च्या राज्यात
जाण्याची इच्छा असल्यास त्यांनी नोंदणी करावी
नांदेड (जिमाका), दि. 8 :- परराज्यातील कामगारांना आपापल्या राज्यात परत जाण्याची इच्छा असेल त्यांनी http://migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर नोंदणी करावी. देशाच्या विविध राज्यातून महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेल्या परराज्यातील कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने हे संकेतस्थळ निर्माण केले आहे.
याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी महाराष्ट्राचे कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दि. 16 जून 2020 रोजी आदेश निर्गमीत केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कामगार अधिकाऱ्यांची या कामासाठी नियुक्ती केली आहे. नांदेड जिल्ह्यातील परराज्यातील कामगारानी त्यांच्या अडचणी संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, शिवाजी नगर, औद्योगिक वसाहत उद्योग भवन, नांदेड दूरध्वनी क्र. 02462-254764 (Emailid-aclnanded@gmail.com) यावर संपर्क साधावा, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन. अ. सय्यद यांनी केले आहे.
00000

वृत्त क्र. 623


शालेय शिक्षण मंत्री
प्रा. वर्षा गायकवाड यांचा दौरा
नांदेड (जिमाका), दि. 8 :- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 9 जुलै 2020 रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 2.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व सोयीनुसार नांदेड येथून हिंगोलीकडे मोटारीने प्रयाण करतील.
00000

Tuesday, July 7, 2020


वृत्त क्र. 619   
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते
लेंडी प्रधान प्रकल्प संपादित घरमालकांना मावेजाचे वाटप
नांदेड (जिमाका) दि. 7 :-  भुसंपादन प्रस्‍ताव लेंडी प्रधान प्रकल्‍प ( जुने गावठाण) वार्ड क्र. 1 ते 8 बुडीत क्षेत्रासाठी मुखेड तालुक्यातील मौजे मुक्रमाबाद येथील संपादित घराचा मावेजा 6 जुलै  2020 रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील  नियोजन भवन येथे वाटप करण्यात आला.  भुसंपादन प्रकरणात एकुण (1659) खातेदार असुन  11  घरमालकांना मावेजाचे वाटप करण्‍यात आले आहे. रमेश हुलाजी कांबळे,   केरबा मष्‍णाजी कांबळे, बंडु मष्‍णाजी कांबळे,  देविदास मष्‍णाजी कांबळे, आनंदा मष्‍णाजी कांबळे,  खंडु कडेप्‍पा काबंळे,  सुभाष कोंडीबा कांबळे, माधव नामदेव इंदुरे, नामदेव माधव  इंदुरे, अशोक भुमन्‍ना भुरुळे, सुमनबाई काशीनाथ खलुरे यांना मावेजाचे धनादेश वाटप करण्यात आले.                                                          
यावेळी आमदार तुषार राठोड, जिल्‍हाधिकारी विपीन इटनकर, जिल्‍हाधिकारी किनवट अभिनय गोयल,  निवासी उपजिल्‍हाधिकारी सचिन खल्‍लाळ, उपजिल्‍हा निवडणुक अधिकारी, प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी  शक्‍ती कदम, उपजिल्‍हाधिकारी भुसंपादन लसिका संतोषी देवकुळे, कार्यकारी अभियंता देगलुर लेंडी प्रकल्‍प विभाग रा.मा. देशमुख, तहसीलदार मुखेड काशीनाथ पाटील, तहसीलदार वैशाली पाटील, अव्‍वल कारकुन लक्ष्‍मण व्हि. टेकाळे , मंडळ अधिकारी एस.एस. साले, डी. डी. धांडे, आठवले व्हि. एस. तसेच मुक्रमाबाद येथील माजी सरपंच शिवराज आवडके, सुरेश पंदिलवार,  सुभाष अप्‍पा बोधने, गंगाधर वटटमवार, तलाठी ज्ञानेश्‍वर रातोळीकर, ग्रामसेवक पांडुरंग नागेश्‍वर व प्रतिष्‍ठीत नागरीक आदी उपस्थित होते.
                                                              00000


वृत्त क्र. 618   
 पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी
निकषांमध्ये योग्य तो बदल करणे आवश्यक
     -                  पालकमंत्री अशोक चव्हाण  

नांदेड (जिमाका) दि. 7 :- इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमासाठी पात्र होण्याचे प्रमाण हे अत्यल्प प्रमाणात आहे. नांदेड जिल्हा हा हमखास पडणाऱ्या पावसाच्या क्षेत्रात मोडत जरी असला तरी अलिकडच्या काळात पर्यावरणातील बदलामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतमाल नुकसानीचे प्रमाण हे पिक विमा कंपन्याच्या निकषापलिकडचे आहेत. या सर्व गोष्टीचा सारासार विचार करुन जिल्ह्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना अधिकाधिक पिक विमा योजनेचा लाभ कसा मिळेल याचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
कृषि विभाग व सहकार विभागाच्या जिल्ह्यातील विविध योजनांची व सद्यस्थितीची आढावा बैठक पालकमंत्री अशोक  चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, गणपतराव तिडके आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात यावर्षी सोयाबिन व कापूस पिकाची शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात पेरणी केली.  यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबिन बियाणांची उगवण कमी झाल्याने संबंधित बियाणे कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल करुन तेवढ्यावर थांबता येणार नाही. या बियाणे कंपन्यांनी स्वत:हून पुढे येत शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देणे अपेक्षित आहे. यासाठी शासनस्तरावरुन जर काही हस्तक्षेप करावा लागला तर जिल्हा प्रशासनाने तो वेळेवर करुन शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
कृषि विभागाच्या विविध विषयाचा त्यांनी तपशीलवार आढावा घेतला. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांची कमतरता होऊ नये, यासाठी कृषि विभागाने दक्षता घ्यावी. बँकांकडून शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्जाचे वाटप होणे गरजेचे असून त्यात शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. 
बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, पेरणी क्षेत्र, बियाणे व खत उपलब्धता, पिक कर्ज वाटप, शेतमालाची हमी भावाने खरेदी आदीं विषयाचा आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी घेतला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी जिल्ह्यात सोयाबिन पिकाची 3 लाख 8 हजार 4 हेक्टर व कापूस पिकाची 1 लाख 93 हजार 441 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीन पिकामध्ये उगवन कमी झाल्याने 11 हजार 53 एवढ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात 15 ते 16 हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागणार आहे. यातील बहुतांश क्षेत्रावर पेरणी सुरु झाली असून कापूस, तूर, मुग व इतर पिकांची बियाणे बाजारात उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
000000

वृत्त क्र. 617


दोनशे खाटांचे नवीन हॉस्पिटल व सी.टी.स्कॅन विभागाचे
ना. अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण
नांदेड जिल्हावासियांसाठी अद्ययावत वैद्यकिय संकुल निर्माण करण्याचा मानस
-         पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक अद्यावत असे जिल्हा रुग्णालय संकुल निर्माण करण्याचा माझा मानस आहे. याचाच एक भाग असलेल्या 200 खाटांच्या नविन हॉस्पिटलचे लोकार्पण करतांना मला मनस्वी आत्मिक समाधान असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकिय रुग्णालय येथील 200 खाटांच्या अद्ययावत बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीचे व सी. टी. स्कॅन विभागाचे लोकार्पण आज त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
शासकिय निमयामांच्या अंतर्गत निवडक उपस्थितीत छोटेखानी झालेल्या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर,  महापौर सौ. दिक्षा धबाले, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदि मान्यवर उपस्थित होते.
नांदेड येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या इतर इमारती या अत्यंत जीर्ण झाल्या असून याचा कायापालट करणे आवश्यक झाले आहे. जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेत सहाय्यभुत ठरणारे येथील नर्सींग कॉलेज व इतर विभागांना चांगल्या इमारतीची गरज आहे. हे लक्षात घेता आजच्या घडिला जिल्हा रुग्णालय परिसरात उपलब्ध असलेल्या जागेवर लवकरच अद्ययावत वैद्यकिय सुविधांचे एकत्रित संकुल लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. याठिकाणी सी. टी. स्कॅन विभागाचीही अत्यंत गरज होती. ती गरज लक्षात घेऊन या 200 खाटाच्या ओपीडीसह हा सी. टी. स्कॅन विभागही जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या आरोग्य विषयक गरजा पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवीन उभारण्यात आलेल्या या इमारतीची स्वच्छता व येथील उपकरणांची निगा ही तितक्याच गुणवत्तापूर्ण पद्धतीने घेतली पाहिजे. शासन जनतेच्या सुविधेसाठी चांगल्या वास्तू निर्माण करते मात्र कालांतराने त्याठिकाणी स्वच्छता व निगा याबाबत फारशी काळजी घेतल्या जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त करुन या नवीन वास्तुच्या स्वच्छतेबद्दल योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले.       
कोरोना आपत्तीमुळे जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करुन त्यांना जनतेच्या सेवेत तत्पर ठेवणे हे अतिशय महत्वाचे झाले आहे. यासाठी येत्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकटीकरण, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी 41.54 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 5 कोटी 28 लक्ष 66 हजार रुपये एवढा निधी किनवट आणि माहूर तालुक्यातील आदिवासी भागात आरोग्य सेवा बळकटी करणासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
या नवीन 200 खाटांच्या रुग्णालयात प्राथमिक तपासणी, पॅथॉलॉजी विभाग, क्ष किरण विभाग, ओपीडी, इंजेक्शन आणि ड्रेसिंग, डायलेसीस, औषध भांडार, महानगर ब्लड बँक, फिजिओ थेरपी, प्रतिक्षागृह आदि अद्ययावत वैद्यकिय सुविधा अंतर्भूत केल्या आहेत.
सद्यस्थितीत कोरोनाचे आव्हान लक्षात घेता ही नवीन 200 खाटांचे इस्पितळ कोविडसाठी उपयोगात आणले जाणार आहे.    
00000

Monday, July 6, 2020


वृत्त क्र. 616   
फळबाग लागवड करुन उत्पन्न वाढवा
-         खासदार प्रताप पाटील चिखलीकर 
नांदेड (जिमाका) दि. 6 :- कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत जिल्ह्यात 1 ते 7 जुलै यादरम्यान कृषी संजीवनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील गावात कृषी योजनांचा जागर सुरू आहे. यामध्ये उत्पादन  तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती  मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जाते आहे.

रविवार 5 जुलै रोजी कंधार तालुक्यात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या उपस्थितीत चिखली येथे फळबाग लागवडीचा शुभारंभ व जलपुजन करण्यात आले. यावेळी चिखलीचे सरपंच श्रीमती ललीताबाई चिखलीकर, संतोष क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, बारूळ मंडळ कृषी अधिकारी आर. एम. भुरेकृषी पर्यवेक्षक बालाजी डफडेकृषी सहाय्यक सौ. उज्वला देशमुखपरमेश्वर मोरेगोविंद तोटावाड, एम. एम. राठोड, गोगदरेशेतकरी प्रकाश तोटावाड, सतीश पवळेमाजी सरपंच पांचाळयांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

कंधार तालुक्यात आज अखेर कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत तालुक्यातील 85 गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कंधार तालुक्यातील पानभोसी, बहादरपुरा, शिरढोण, आलेगाव, हाळदा, चिंचोली प क येलूर, अंबुलगा, उस्माननगर, लाठ खू,  फुलवळ,  पानशेवडी, बारुळ या गावासह एकूण 85 गावात हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात गावातील सरपंच, प्रगतशील शेतकरी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शेतकरी बैठका  घेऊन विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. विविध गावांना भेटी देत शेतकऱ्यांना पीक  उत्पन्नावाढीच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे.
तालुक्यातील विविध गावात मंडळ कृषी अधिकारी पवनसिंह बैनाडे, विकास नारळीकरआर. एम. भुरे,  कृषी पर्यवेक्षक रोहीणी पवारआत्माराम धुळगुंडेअहेमद खॉ पठाण, बालाजी डफडेसंभाजी डावळेदत्ता रामरूपे यांच्यासह कृषी सहाय्यक सोपान उबाळेपरमेश्वर मोरेशिवाजी सूर्यवंशीसुनील देशमुख,  गोविंद तोटावाडमाधव गुट्टे, कल्पना जाधवभूषण पेटकर, एन. बी.  कुंभारे, गजानन सूर्यवंशीसंतोष वाघमारेजी. एम. कळणे यांच्यासह तालुक्यातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गाव बैठका घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहितीशेतकऱ्यांना मार्गदर्शनरुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड एकात्मिक किड रोग व्यवस्थापन एकात्मिक खत व्यवस्थापन, लिंबोळी अर्क तयार करणेसोयाबीन उगवण यासह पिक विमा राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना, ठिबक सिंचनकृषी यांत्रिकीकरण फळबाग लागवडशेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजना याबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात येत आहे. गावा-गावात माहितीपत्रके शेतकरी मासिके देऊन नवीन वर्गणीदार करून घेण्यासाठी माहिती दिली. कंधार अंतर्गत प्रचार वाहन व त्यावर  ध्वनिक्षेपक लावून  गावोगावी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्यातील संपूर्ण गावात जनजागृती करून कार्यक्रम घेण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, पोखर्णी तसेच  कापूस संशोधन केंद्र नांदेड येथील शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
00000







वृत्त क्र. 615   

कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
नांदेड (जिमाका) दि. 6 :- कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत जिल्ह्यात 1 ते 7 जुलै यादरम्यान कृषी संजीवनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील गावात कृषी योजनांचा जागर सुरू आहे. यामध्ये तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मार्गदर्शन फळबाग लागवड कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. याअंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी रविवार 5 जुलै रोजी कंधार तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधला.  

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत उस्माननगर येथील बालाजी मारोती गाडे  यांच्या शेतातील आंबा फळबाग लागवडीची पाहणी केली. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या 5 शेडनेटचे उद्घाटन करण्यात आले. या शेडनेटमध्ये यावर्षीपासून भाजीपाला बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. यावेळी संतोष गव्हारे, विष्णु इंगोले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सोबत तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, कृषी पर्यवेक्षक बालाजी डफडे, कृषी सहाय्यक सोपान उबाळे यांची उपस्थिती होती.
हळदा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत लागवड केलेल्या यशवंतराव शिंदे, राजू पटलेवाड यांच्या मोसंबी या फळपिकाची पाहणी करण्यात आली. मौजे भूकमारी येथे सामूहिक शेततळ्यातील पाण्याचे जलपूजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चलवदे यांच्या हस्ते करण्यात आले. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत राहुल कोळंबीकरमिलींद कोळंबीकर यांनी लागवड केलेल्या पेरू आंबा डाळिंब सीताफळ या फळपिकांची पाहणी व लागवड करण्यात आली. ठिबक सिंचन, कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत औजारे यांची पाहणी त्यांनी केली.
00000











  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...