Thursday, November 15, 2018


नदीपात्र परिसरातील
प्रतिबंध आदेश तुर्तास स्थगित
नांदेड, दि. 15 :- विटभट्टीधारक अथवा त्यांचे नोकर, वीटभट्टी चालक यांना नांदेड जिल्हा हद्दीतील वाहणाऱ्या सर्व नदीपात्रापासून 500 मीटरच्या आत दोन्ही बाजूनी नदी काठालगत असणाऱ्या खाजगी / शासकीय मालकीच्या शेतामध्ये माती उत्खनन करण्यास प्रतिबंधाचे आदेश जिल्हादंडाधिकारी लहुराज माळी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 पोटकलम 5 नुसार तुर्तास स्थगित केला आहे.  
0000000


जागतिक मधुमेह दिन व सप्ताहनिमित्त
मधुमेह तपासणी शिबीर संपन्न
नांदेड, दि. 15 :- जागतिक मधुमेह दिन व सप्ताहनिमित्त श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम व अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह तपासणी व उपचार शिबीर नुकतेच घेण्यात आले. या शिबिरात 30 वर्षे व त्यावरील वयोगटातील स्त्री-पुरुष व ज्येष्ठ नागरिकांची मधुमेह तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ. निळकंठ भोसीकर, डॉ. दीपक हजारी व डॉ. रहेमान यांनी रुग्ण व नातेवाईकांना आहार, दिनचर्या व मधुमेह वरील उपचाराबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, डॉ. रहेमान, डॉ. कुलदीपक, डॉ. दीपक गोरे, डॉ. बालाजी माने, डॉ. अर्चना तिवारी, डॉ. साईप्रसाद शिंदे, डॉ. अनुप्रिया गहिरवार आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी जिल्हा समन्वयक डॉ. प्रदीप बोरसे, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड व संतोष बेटकर यांनी परिश्रम घेतले. या सप्ताहानिमित्त प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा शासकीय रुग्णालयात मोफत मधुमेह तपासणी शिबीर घेण्यात येणार असून याचा लाभ वय वर्ष 30 व त्यावरील वयोगटातील सर्व स्त्री-पुरुष व जेष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.पी. कदम यांनी केले आहे.  
000000


जंगमवाडी, तरोडा नाका परिसरातील
11 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही
15 हजार 100 रुपयाचा दंड आकारला  
नांदेड दि. 15 :- जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने शहरातील जंगमवाडी व तरोडा नाका परिसरात आज अचानक धाडी टाकून कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार या पथकामार्फत 11 तंबाखू विक्रेत्यांकडून 15 हजार 100 रुपये दंड आकारण्यात आला आहे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम व नोडल अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तथा संतोष बेटकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक नेहरकर तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे आदी होते.
जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.
00000


राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष
जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन
नांदेड दि. 15 :- पौष्टीक तृणधान्य पिकाचे महत्व जनमानसांना पटण्यासाठी शुक्रवार 16 नोव्हेंबर 2018 रोजी जिल्हा फळरोपवाटीका धनेगाव येथे पौष्टीक तृणधान्य दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सदर पिकाच्या आहारातील महत्वाबाबत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्रातील पारंपारिक पीक रचनेत ज्वारी, बाजरी, नाचणी व इतर तृणधान्ये ही महत्वाची पीके आहेत. वातावरणाचा ताण सहन करुन कोरडवाहू व दुर्गम क्षेत्रात विपरित परिस्थितीत ही पिके शेतकऱ्यांना उत्पादन देतात. पारंपारिक पद्धतीत दैनंदिन आहारात या तृणधान्याचे सेवन नित्याचे होते. मात्र, बदलत्या जीवनशैलीत आहारातून या तृणधान्याचे प्रमाण लक्षणीय कमी झाले. पर्यायाने शेतकरी सुद्धा कालपरत्वे या पिकांपासून दूर गेले आहेत.
बदलत्या जीवनशैलीतील वाढत्या ताण-तणावामुळे व आहाराच्या बदलत्या सवयीमुळे आरोग्य विषयक समस्या जसे मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकार, क्षय, दमा, कर्करोग आदी विकार सध्या विविध वयोगटात निदर्शनास येत आहेत. यासाठी राष्ट्रीयस्तरावर नेमलेल्या अभ्यास गटाचे निष्कर्षाचे आधारे केंद्र शासनाने पौष्टिक तृणधान्ये व त्याद्वारे पौष्टिक आहारावर भर देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यास अनुसरुन, केंद्र शासनाने या पिकांचे आहारातील महत्व विचारात घेता ज्वारी, बाजरी, रागी व इतर लघू तृणधान्य पिके जसे वरई, राळा, बार्टी, कोंद्रा, सावा, राजगिरा यांना 13 एप्रिल 2018 च्या अधिसुचनेद्वारे पौष्टीक तृणधान्य पिके म्हणून घोषित केले आहे असून सन 2018-19 हे वर्ष राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.
या तृणधान्यात ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) चे प्रमाण कमी असल्याने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी राखण्यास मदत होते. त्यातील पौषक गुणवत्वे विचारात घेता मधुमेह, कर्करोग, ह्दयरोग, आतडयाचे रोग प्रतिबंधित करण्याची क्षमता असल्याचे संशोधनांती सिद्ध झले असल्याने स्वास्थ आहारात पौष्टीक अन्नधान्याचे महत्व समजते.
पौष्टीक तृणधान्य पिकाचे महत्वाबाबत कृषि विभागाबरोबरच शासनाचे इतर विभागही प्रयत्नशील असून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड या कार्यालयाच्या माध्यमातून पौष्टीक तृणधान्य दिन साजरा करण्यात येत आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000


"राष्ट्रीय पत्रकार दिन" कार्यक्रमाचे
एमजीएम महाविद्यालयात आयोजन
नांदेड, दि. 15 :- राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त शुक्रवार 16 नोव्हेंबर 2018 रोजी नांदेड येथील एमजीएम महाविद्यालयात "राष्ट्रीय पत्रकार दिन" सकाळी 10.30 वा. साजरा करण्यात येणार आहे.  
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड आणि महात्मा गांधी मिशन संचलित वृत्तपत्र विद्या व माध्यमशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फसके यांचे डिजीटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हान या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय प्रेस परिषदेने डिजीटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हानहा विषय यावर्षी दिला आहे. सर्व संपादक, माध्यम प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर व माध्यमशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांनी केले आहे.
000000

Wednesday, November 14, 2018


शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 14 :  महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पुरस्कारांसाठी 5 ते 25 नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचे आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह क्रीडा मार्गदर्शक यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 5 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2018 अशी ठेवण्यात आली आहे.
अर्जदारांनी विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करून त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहस उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी जिजामाता क्रीडा पुरस्कार तसेच ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
सन 2017-18 या वर्षासाठी मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या ठरावासह दि. 25 नोव्हेंबर 2018 पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशील देऊन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 27 नोव्हेंबर पूर्वी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह सादर करावी. तर उर्वरित पुरस्काराच्या अर्जदारांनी 5 डिसेंबर 2018 पूर्वी सादर करावी.
अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी यांना संपर्क साधावा.
00000



अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे
सुधारीत वेळापत्रक जाहीर
नांदेड दि. 14 :- (शिकाउ उमेदवारी योजना) 108 वी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक प्राप्त झाले असून परिक्षा सोमवार 17 डिसेंबर 2018 पासून सुरु होणार आहे, असे आवाहन केंद्राचे अंशकालीन प्राचार्य जी. जी. पाटनूरकर यांनी केले आहे.
ही परीक्षा 17 ते 29 डिसेंबर या कालावधीत होणार असून प्रात्यक्षीक परीक्षा 17 ते 19 डिसेंबर व अभियांत्रिकी चित्रकला 20 डिसेंबर रोजी होणार आहे. लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 27 ते 29 डिसेंबर दरम्यान होणार आहे. परीक्षेचे हॉल तिकीट संबंधीत परीक्षार्थ्यांनी 7 डिसेंबर 2018 रोजी संबंधीत आस्थापनेच्या लॉगीन आयडीवरुन प्राप्त करुन घ्यावेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बी.टी.आर.आय. केंद्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे संपर्क साधावा,  अशी माहिती नांदेड औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे अंशकालीन प्राचार्य यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...