राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष
जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन
नांदेड
दि. 15 :- पौष्टीक तृणधान्य पिकाचे महत्व
जनमानसांना पटण्यासाठी शुक्रवार 16 नोव्हेंबर 2018 रोजी जिल्हा फळरोपवाटीका धनेगाव
येथे पौष्टीक तृणधान्य दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सदर पिकाच्या
आहारातील महत्वाबाबत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली
आहे.
महाराष्ट्रातील
पारंपारिक पीक रचनेत ज्वारी, बाजरी, नाचणी व इतर तृणधान्ये ही महत्वाची पीके आहेत.
वातावरणाचा ताण सहन करुन कोरडवाहू व दुर्गम क्षेत्रात विपरित परिस्थितीत ही पिके शेतकऱ्यांना उत्पादन देतात.
पारंपारिक पद्धतीत दैनंदिन आहारात या तृणधान्याचे सेवन नित्याचे होते. मात्र,
बदलत्या जीवनशैलीत आहारातून या तृणधान्याचे प्रमाण लक्षणीय कमी झाले. पर्यायाने
शेतकरी सुद्धा कालपरत्वे या पिकांपासून दूर गेले आहेत.
बदलत्या जीवनशैलीतील
वाढत्या ताण-तणावामुळे व आहाराच्या बदलत्या सवयीमुळे आरोग्य विषयक समस्या जसे
मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकार, क्षय, दमा, कर्करोग आदी विकार सध्या विविध वयोगटात
निदर्शनास येत आहेत. यासाठी राष्ट्रीयस्तरावर नेमलेल्या अभ्यास गटाचे निष्कर्षाचे
आधारे केंद्र शासनाने पौष्टिक तृणधान्ये व त्याद्वारे पौष्टिक आहारावर भर देण्याचे
धोरण अवलंबिले आहे. त्यास अनुसरुन, केंद्र शासनाने या पिकांचे आहारातील महत्व
विचारात घेता ज्वारी, बाजरी, रागी व इतर लघू तृणधान्य पिके जसे वरई, राळा, बार्टी,
कोंद्रा, सावा, राजगिरा यांना 13 एप्रिल 2018 च्या अधिसुचनेद्वारे पौष्टीक
तृणधान्य पिके म्हणून घोषित केले आहे असून सन 2018-19 हे वर्ष राष्ट्रीय पौष्टीक
तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.
या तृणधान्यात
ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) चे प्रमाण कमी असल्याने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी
राखण्यास मदत होते. त्यातील पौषक गुणवत्वे विचारात घेता मधुमेह, कर्करोग, ह्दयरोग,
आतडयाचे रोग प्रतिबंधित करण्याची क्षमता असल्याचे संशोधनांती सिद्ध झले असल्याने
स्वास्थ आहारात पौष्टीक अन्नधान्याचे महत्व समजते.
पौष्टीक
तृणधान्य पिकाचे महत्वाबाबत कृषि विभागाबरोबरच शासनाचे इतर विभागही प्रयत्नशील
असून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड या कार्यालयाच्या माध्यमातून पौष्टीक
तृणधान्य दिन साजरा करण्यात येत आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000
No comments:
Post a Comment