Thursday, October 11, 2018


शेवटच्या रुग्णापर्यंत वैद्यकीय सेवा
देण्याचा सहकारी संस्थेने प्रयत्न करावा
- सहकार मंत्री सुभाष देशमुख
नांदेड दि. 11 :- शेवटच्या रुग्णापर्यंत वैद्यकीय सेवा पोहचविण्यासाठी श्री गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. येथील नंदिग्राम वैद्यकीय सहकारी संस्था मर्यादित श्री गुरुजी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. देशमुख बोलत होते.
यावेळी आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, मधुकरराव जाधव, डॉ. सुधीर कोकरे, डॉ. अनिल तोष्णीवाल, डॉ. सुशील राठी, डॉ. संजय चव्हाण, लक्ष्मीकांत बजाज, सरपंच बंडू पावडे , संजय पाचपोर, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस  आदिंची प्रमुख उपस्थिती होती.  
श्री. देशमुख म्हणाले, राज्यात सहकार चळवळ समृद्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून सर्वांसाठी उत्तम आरोग्य सुविधा मिळत आहेत. त्याचप्रमाणे नांदेड येथे श्री गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना चांगली वैद्यकीय सुविधा निर्माण झाली आहे. या रुग्णालयाने दर्जेदार वैद्यकीय सेवा देवून राज्यात व देशात श्री गुरुजी रुग्णालय नावारुपास आणण्याचा प्रयत्न करावा. सहकारी चळवळीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, कर्तव्य जपण्याची आपली जबाबदारी असून रुग्ण सेवेसाठी सहकार रुग्णालयास सर्वांनी मदत करावी. असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
श्री. देशमुख यांनी श्री गुरुजी रुग्णालय जनसहभागातून उभे राहिलेले, जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी वाहणारे मराठवाड्यातील पहिले सहकारी तत्वावर चालणारे रुग्णालय आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होण्याच्यादृष्टीने संस्था देत असलेल्या योगदानास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर कोकरे तर आभार डॉ. मुकूल जोशी यांनी मानले. यावेळी रुग्णालयाचे सभासद, नागरिक आदी उपस्थित होते.
000000


बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे
विविध पिकांची क्षेत्र नोंदणी सुरु
        नांदेड, दि. 11 :-  रब्बी हंगाम सन 2018-19 मधील बीजोत्पादनाकरीता बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे विविध पिकांची क्षेत्र नोंदणी सुरु आहे. बीजोत्पादक संस्थांनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी परभणी यांनी केले आहे.
            विविध रब्बी पिकांच्या बीजोत्पादनासाठी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद कार्यालयात क्षेत्र नोंदणी सुरु आहे. बीजोत्पादक संस्थांनी बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येणाऱ्या या बीजोत्पादन कार्याक्रमाचे क्षेत्र नोंदणी प्रस्ताव बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे सादर करण्याच्या पिकनिहाय अंतिम तारखा पुढील प्रमाणे आहेत. करडई व रब्बी ज्वारी- 31 ऑक्टोंबर 2018. हरभरा- 20 नोव्हेंबर तथा गहू व इतर पिकांसाठी- 15 डिसेंबर आहे. या तारखा क्षेत्र नोंदणीच्या अंतिम तारखा असून क्षेत्र नोंदणी अंतिम तारखेपूर्वी पिकाची पेरणी झाल्यानंतर 15 दिवसात करता येईल. त्यासाठी अंतिम तारखेची वाट पाहण्याची आवश्यकता नाही.
            क्षेत्र नोंदणीकरीता बीजोत्पादक संस्थांनी प्रस्तावासोबत बीजोत्पादक संस्थेचा परवाना, बीजोत्पादक संस्था प्रतिनिधीचे अधिकारपत्र, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी यांचेसह करण्यात येणार 500 रुपयाच्या बंधपत्रावरील करारनामा, स्त्रोत बियाणे खरेदी बिल, स्त्रोत बियाण्याचे मुळ मुक्तता अहवाल, स्त्रोत बियाणे पडताळणी अहवाल, बीजोत्पादक शेतकऱ्याच्या स्वाक्षरीत व परिपूर्ण माहिती भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, बीजोत्पादकाचे महसूल दस्तावेज ( सात / बारा व आठ-अ), बीजोत्पादकांचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक, संस्था आणि बिजोत्पादकांमधील करारनामाची प्रत, स्त्रोत बियाणे वाटप अहवाल, गाव / पिक व दर्जा निहाय बीजोत्पादकांच्या विहित प्रपत्रातील याद्या 4 प्रतीत इत्यादी कागदपत्रांसह क्षेत्र नोंदणीचे प्रस्ताव सादर करावे.  
            क्षेत्र नोंदणी शुल्क 50 रुपये प्रती बीजोत्पादक असून क्षेत्र तपासणी शुल्क पायाभूत बीजोत्पादनासाठी 200 रुपये प्रती एक व प्रमाणीत बीजोत्पादनासाठी 150 रुपये प्रती एकर याप्रमाणे आहे.
            यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हास्तरीय बीज प्रमाणीकरण अधिकारी नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या कार्यालयात संपर्क साधावा, असेही आवाहन विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी परभणी यांनी केले आहे.
0000000


अल्‍पसंख्‍याक बहुल शासनमान्‍य शाळेतील
पायाभुत सोयी सुविधेसाठी अनुदान योजना
अर्ज करण्याची 30 ऑक्टोंबर मुदत  
नांदेड दि. 11 :- जिल्‍ह्यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळा  यांच्याकडून पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत कमाल 2 लाख रुपये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छूक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी संपूर्ण भरलेला अर्ज जिल्‍हा नियोजन समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मंगळवार 30 ऑक्टोंबर 2018 पर्यंत सादर  करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा उच्‍चस्‍तरीय निवड समितीचे अध्‍यक्ष अरुण डोंगरे यांनी केले आहे. 
शासन निर्णय 7 ऑक्टोंबर 2015 व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.
योजनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे राहतील. शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थामध्ये अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लिम, बौध्‍द, ख्रिश्चन, जैन, शिख व पारसी मिळून) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. शासन मान्‍यताप्राप्‍त अपंगाच्‍या शाळांमध्‍ये किमान 50 टक्के अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे.
या योजनेंतर्गत पुढील पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय आहे. शाळेच्‍या इमारतीचे नुतनीकरण व डागडूजी. शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणे. ग्रंथालय अद्ययावत करणे. प्रयोगशाळा उभारणे / अद्यावत करणे. संगणक कक्ष उभारणे / अद्यावत करणे. प्रसानधगृह / स्वच्छतागृह उभारणे / डागडुजी करणे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक फर्निचर. इन्‍व्‍हर्टर / जनरेटरची सुविधा निर्माण करणे. झेरॉक्श मशीन. अध्‍ययनाची साधने (Learning Material) / एल.सी.डी.प्रोजेक्‍टर अध्‍ययनासाठी लागणारे विविध  सॉफटवेअर इत्‍यादी. इंग्रजी लॅग्‍वेज लॅब. संगणक हार्डवेअर / सॉफटवेअर.
या योजनेंतर्गत यापूर्वी 5 वेळा अनुदान घेतलेल्‍या शाळा / संस्‍था यावर्षी अनुदानासाठी पात्र  असणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राह धरले जाणार नाहीत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
0000000


मतदार नोंदणीसाठी
गृह निर्माण संस्थेने प्रयत्न करावेत 
- जिल्हाधिकारी डोंगरे
  नांदेड, दि. 11 :- मतदार नोंदणीसाठी गृह निर्माण संस्थेने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
मतदार नोंदणी जनजागृतीसाठी नांदेड शहरातील विविध सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष / सचिव यांची बैठक जिल्हा निवडणूक अधिकारी तथा‍ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली बुधवार (10 ऑक्टोंबर) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे घेण्यात आली. त्यावेळी श्री. डोंगरे बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी मतदानाच्या अमूल्य हक्काची जाणीव करुन देत निवडणूक आयोगामार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. महिला, दिव्यांग आणि नवमतदार या तीन मतदार वर्गाकडे या मोहिमेमध्ये विशेष भर दिला गेला आहे. यासाठी अध्यक्ष / सचिव यांनी गृह निर्माण संस्थेत बुथ लेवल स्वयंसेवक म्हणून भूमिका पार पाडावी, असेही त्यांनी आवाहन केले.   
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती दिपाली मोतीयेळे यांनी मतदार नोंदणी प्रक्रिया, त्यासाठी भरावयाचे अर्ज, Nvsp Portal वर नावाची आणि मतदान केंद्राची चाचणी आदी बाबीवर मार्गदर्शन केले. बैठकीस अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक सह. संस्था प्रविण फडणीस, सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते.  
00000

Wednesday, October 10, 2018

अपघातात बळी पडलेल्या 13 प्रकरणात
नुकसान भरपाईचे 18 लाख रुपये मंजूर
नांदेड, दि. 10 :- अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींना नुकसान भरपाई म्हण यात एकुण 13 प्रकरणांमध्ये 18 लाख रुपये आर्थिक मदत मंज केली आहे. या निधीमुळे पिडिताच्या कुटूंबाला आधार मिळाला असुन त्यांना भविष्यात या रक्कमेची योग्य ती मदत होईल असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश डी. टी. वसावे यांनी व्यक्त केला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जिल्हा न्यायाधीश-1 एस. एस. खरात यांचे अध्यक्षतेखाली मोटार अपघात, अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 357 मधील तरतुदींनुसार पुनर्वसन आवश्यक असलेल्या व्यक्तींना न्यायालयाच्या निर्णयानुसार नुकसान भरपाई देण्याच्या प्रयोजनार्थ जिल्हा न्यायाधीश-1 नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांची समिती गठीत केली होती.
0000

दिव्यांग मतदार नोंदणीसाठी सहकार्य करावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
        नांदेड, दि. 10 :- दिव्यांग मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी जास्तीतजास्त दिव्यांगांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दिव्यांग मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी जिल्हा‍ निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
            भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदार नोंदणीवर विशेष भर दिला आहे. नवीन नाव नोंदणी बरोबरच यापुर्वीच ज्याची नावे मतदार यादीत आहेत ती नावे ध्वजांकित केली जात आहेत. जेणे करुन मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना आवश्यक सुविधा पुरविणे शक्य होईल, असेही श्री. डोंगरे यांनी सांगितले.   
            उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिपाली मोतीयेळे यांनी विविध शासकीय कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांची नाव नोंदणी तपासणीसाठी संबंधित आस्थापनाकडून याद्या मागविल्या आहेत. शासकीय कार्यालयाच्या एकत्रीत प्रयत्नांतून जास्तीतजास्त दिव्यांगांकडे पोहचणे शक्य असल्याने जिल्हा परिषद, महानगरपालिका, महसूल, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य विभाग, भारत स्काऊड गाइड आदी विभागाचे सहकार्य निवडणूक विभागाने घेतले आहे, असे त्यांनी सांगितले.
जास्तीतजास्त दिव्यांगांची नोंद व्हावी यासाठी संभाव्य उपाय योजनांची तसेच दिव्यांग स्वयंसेवी संस्थांची या कामात कशी मदत घेत येईल याबाबत बैठकीत चर्चा झाली. बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर, संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.  
00000


आणिबाणीच्या कालावधीत तुरुंगवास भोगाव्या
लागलेल्या व्यक्तींनी माहिती सादर करण्याचे आवाहन
        नांदेड, दि. 10 :-  सन 1975 मे 1977 मधील आणिबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदीवास / तुरुंगवास सोसावा लागला त्यांनी यापुर्वी अर्ज सादर केलेल्या सर्व संबंधितांनी अर्जाचा नमुना परिशिष्ट अ व शपथपत्राचा मसुदा परिशिष्ट ब मध्ये माहिती आवश्यक पुरावा कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतीसह 20 ऑक्टोंबर 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
            सन 1975 व 1977 मधील आणिबाणीच्या कालावधीत लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या ज्या व्यक्तींना बंदीवास / तुरुंगवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्यासंबंधी धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने अर्जदारांकडून प्राप्त करुन घ्यावयाच्या अर्जाचा नमुना परिशिष्ट अ मध्ये असून शपथपत्राच्या मसुद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित शपथपत्राचा मसुदा परिशिष्ट ब मध्ये सादर करण्याबाबत शासनाने सुचना दिल्या आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...