Friday, August 10, 2018


नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणुक 2018
गुरुव्‍दारा सचखंड हजूर साहिब नांदेड येथे नांदेड तालुक्‍यातील सर्व मंडळ अधिकारी कार्यालयाच्‍या ठिकाणी मतदार नोंदणी कक्ष स्‍थापन
नांदेड दि. 10 :- गुरुव्‍दारा सचखंड हजूर साहिब नांदेड येथे व नांदेड तालुक्‍यातील सर्व मंडळ अधिकारी कार्यालयाच्‍या ठिकाणी मतदार नोंदणी कक्ष स्‍थापन करण्यात आले आहे. नांदेड तालुक्‍यातील शिख धर्मीय मतदारांना मतदार यादीत अधिकाधिक नाव नोंदविता येईल यादृष्‍टीने, नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब येथे अतिरीक्‍त मतदार नोंदणी कक्ष कार्यान्‍वीत करुन त्‍याठिकाणी मतदारांना फॉर्म नं.1 उपलब्‍ध करुन देणे, मतदार नोंदणी फॉर्म स्विकारण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. 
महसल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचे राजपत्र दि. 27 जुन 2018 नुसार नांदेड शीख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडुन देण्‍यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. सदर निवडणूकीसाठी मतदार यादी कार्यक्रम व पात्र मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्‍यासाठी  सोमवार 20 जुलै 2018 पासून मतदार नोंदणी कार्यक्रमाची प्रत्‍यक्ष अंमलबजावणी सुरु झाली आहे.   
नांदेड तालुक्‍यातील सर्व  मंडळ अधिकारी यांचे कार्यालयात अतिरीक्‍त मतदार नोंदणी कक्ष  कार्यान्‍वीत करुन त्‍याठिकाणीसुध्‍दा मतदारांना फॉर्म नं.1 उपलब्‍ध करुन देणे, मतदार नोंदणी फॉर्म स्विकारण्‍याची व्‍यवस्‍था रण्‍यात आली आहे.  सर्व शिख धर्मीय मतदारांना याद्वारे जाहिर आवाहन करण्‍यात येते की, दि. 18 ऑगस्‍ट 2018 ही मतदार नोंदणीची अंतिम तारीख असून, उपरोक्‍त ठिकाणाहून  मतदार नोंदणीचे फॉर्म प्राप्‍त करुन घेऊन, सदरचे फॉर्म अचुक भरणा करुन मतदार नोंदणी कक्षात दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000



मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक
निमित्त मतदानाच्या दिवशी आज स्थानिक सुट्टी
नांदेड, दि. 10 :- मुदखेड कृषि बाजार क्षेत्रातील शेतकरी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा व निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मुदखेड कृषि उत्पन्न बाजार क्षेत्रातील सर्व सरकारी, खाजगी शाळांना शनिवार 11 ऑगस्ट 2018 रोजी स्थानिक सुट्टी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जाहिर केली आहे.
मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान 11 ऑगस्ट रोजी दुसऱ्या शनिवारी होणार आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी शासकीय कार्यालयांना सुट्टी असली तरी खाजगी कार्यालये, संस्था व शाळा या आस्थापना त्यादिवशी चालू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे.
0000000

Thursday, August 9, 2018

लेख


करा..पालन राष्ट्रध्वजसंहितेचे , राष्ट्रभिमान प्रतीकाचे

           
भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधत्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे. हा तिरंगा गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पूर्ण तेजाने फडकत राहण्यासाठी कित्येक लोक सशस्त्र बलांच्या जवानांसह त्याचे रक्षण करण्याकरिता उदारपणाने आपले प्राण पणाला लावत आहेत. भारतीय ध्वजसंहितेची थोडक्यात माहिती येथे देण्यात येत आहे.
        जनतेतील सदस्य, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था इत्यादींनी ध्वजारोहण करणे, राष्ट्रध्वजाचा उपयोग करणे कलम एक 2.1 बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 आणि राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 आणि या विषयावर अधिनियमित केलेला इतर कोणताही कायदा यात तरतूद केलेल्या मर्यादांव्यतिरिक्त उपरोक्त अधिनियमांच्या तरतुदी विचारात घेता सर्वसाधारण जनतेतील सदस्य, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था इत्यादीनी (एक) बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, 1950 चा भंग करुन वाणिज्यिक प्रयोजनासाठी ध्वजाचा वापर करता कामा नये. (दोन) एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणू नये. याव्यतिरिक्त राष्ट्रध्वज लावण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. (तीन) ज्या प्रसंगी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यांवर उतरविण्यात येतो त्या प्रसंगाखेरीज ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार नाही. (चार) खाजगी अंत्यसंस्कारासह जे कोणतेही असेल अशा कोणत्याही स्वरुपातील आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही. (पाच) ध्वजाच्या कोणत्याही प्रकारच्या पोषाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही किंवा त्याचे उशा, हातरुमाल, हातपुसणे यावर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम करता येणार नाही किवां छपाई करता येणार नाही. (सहा) ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाहीत. (सात) ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे बांधण्याचे किंवा वाहुन नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही. परंतु विशेष प्रसंगी आणि प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय दिनी तो साजरे करण्याचा एक भाग म्हणून ध्वज फडकविण्यापूर्वी ध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळया ठेवण्यास कोणतीही हरकत असणार नाही. (आठ) एखाद्या पुतळयाचे अनावरण करण्यासारख्या प्रसंगी ध्वजाचा वापर करण्यात येईल तेव्हा तो सुस्पष्टपणे व वेगळा दिसेल अशाप्रकारे लावण्यात यावा आणि त्याचा पुतळा किंवा स्मारकाचे आवरण म्हणून वापर करता येणार नाही. (नऊ) ध्वजाचा वक्त्याचा टेबल (डेस्क) झाकण्यासाठी वापर करता येणार नाही किंवा वक्त्याच्या व्यासपीठावर आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही. (दहा) ध्वजाचा जाणीवपूर्वक भूमीशी किंवा जमिनीशी स्पर्श होऊ देऊ नये किंवा तो पाण्यावरुन फरफटत नेऊ नये. (अकरा) ध्वजाचा मोटार वाहन, रेल्वे गाडी, जहाज किंवा विमान यांच्या छतावर, बाजूंवर किंवा पाठीमागच्या बाजूस आच्छादता येणार नाही. (बारा) ध्वजाचा एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही आणि (तेरा) ध्वजाचा 'केसरी' रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशाप्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही.
        बोधचिन्ह व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 राष्ट्रध्वजाचा उपयोग करणे- कलम 2 या अधिनियमामध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर (अ) 'बोधचिन्ह' याचा अर्थ अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले असे कोणतेही बोधचिन्ह, मुद्रा, ध्वज, अधिचिन्ह, कुलचिन्ह किंवा चित्र प्रतिरुपण असा आहे. कलम 3 त्या त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र शासन विहित करील अशी प्रकरणे व अशी परिस्थिती खेरीजकरुन एरव्ही कोणत्याही व्यक्तीला अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले कोणतेही नाव किंवा बोधचिन्ह किंवा त्याची कोणतीही आभासी प्रतिकृती यांचा, केंद्र शासनाच्या किंवा शासनाने यासंबंधात प्राधिकृत केलेल्या कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही व्यापार, व्यवसाय, आजिविका किंवा पेशा यांच्या प्रयोजनार्थ अथवा कोणत्याही स्वामित्व हक्काच्या शिर्षकात अथवा कोणत्याही व्यापार चिन्हात किंवा चिन्हाकृतीत वापर करता येणार नाही किंवा वापर चालू ठेवता येणार नाही. टीप-भारताचा राष्ट्रीय ध्वज हा या अधिनियमाच्या अनुसूचीमध्ये बोधचिन्हे म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आला आहे.
        राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 कलम 2 जो कोणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी लोकांच्या देखत भारतीय राष्ट्रध्वज किंवा त्याचा कोणताही भाग जाळील, छिन्नविच्छिन्न करील, विरुप करील, त्याचे पावित्र्य विटाळील, तो विद्रूप करील, नष्ट करील, पायाखाली तुडवील किंवा अन्यथा त्याची बेअदबी करील (मग ती तोंडी किंवा लेखी शब्दाद्वारे असो वा कृतीद्वारे असो) त्याला तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. स्पष्टीकरण 1-कायदेशीर मार्गाने भारतीय राष्ट्रध्वजात बदल घडवून आणण्याच्या हेतूने, भारतीय राष्ट्रध्वजाबाबत किंवा शासनाच्या कोणत्याही उपाययोजनांबाबत नापसंती दर्शविणारे अभिप्राय व्यक्त करण्याने किंवा त्यावर टीकाटिप्पणी करण्याने या कलमान्वये कोणताही अपराध घडणार नाही. स्पष्टीकरण 2- 'भारतीय राष्ट्रध्वज' या शब्दप्रयोगात कोणत्याही पदार्थापासून तयार केलेले किंवा कोणत्याही पदार्थावर चितारलेले भारतीय राष्ट्रध्वजाचे किंवा त्याच्या कोणत्याही भागाचे अगर भागांचे चित्र, रंगीत चित्र, रेखाटन किंवा छायाचित्र अथवा अन्य दृश्य प्रतिरुपण अंतर्भूत आहे. स्पष्टीकरण 3- 'सार्वजनिक ठिकाण' या शब्दप्रयोगाचा अर्थ जनतेने वापरावी म्हणून योजलेली किंवा जेथे त्यांना प्रवेश असेल अशी कोणतीही जागा असा आहे व त्यात कोणत्याही सार्वजनिक वाहनाचा अंतर्भाव आहे.  2.2 राज्यातील सदस्य खाजगी संघटना किंवा शैक्षणिक संस्था यांना राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा व सन्मान राखून सर्व प्रसंगांच्या व समारंभाच्या दिवशी किंवा अन्यथा राष्ट्रध्वज फडकविता, लावता येईल. (एक) ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येतो अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे. (दोन) फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावण्यात येऊ नये. (तीन) ध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत किंवा ध्वजांसोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये. (चार) या संहितेच्या भाग तीनच्या कलम नऊमध्ये अंतर्भूत केलेल्या तरतूदीव्यतिरिक्त कोणत्याही वाहनांवर ध्वज लावण्यात येऊ नये. (पाच) जेव्हा एखाद्या वक्त्याच्या व्यासपीठावर ध्वज लावावयाचा असेल तेंव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्याकडे असताना त्याच्या उजव्या बाजूकडे ध्वज लावण्यात यावा किंवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या पाठीमागे वरच्या बाजूला लावावा. (सहा) जेव्हा ध्वज भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तर ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वात वर असावा. जर ध्वज उभा लावण्यात आला असेल तर ध्वजाची केशरी रंगाची बाजू त्यांच्या (ध्वजाच्या ) उजव्या बाजूस असावी (म्हणजे ध्वजाकडे तोंड करुन उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूस असावी) (सात) राष्ट्रध्वज या संहितेच्या भाग एकमध्ये विहित केलेल्या प्रमाण विनिर्देशांशी शक्य तेवढया प्रमाणात अनुरुप असावा. (आठ) राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूला किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणत्याही ध्वज किंवा पताका लावू नये तसेच ध्वज ज्या काठीवर फडकत ठेवला असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यांसह कोणतीही वस्तू ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये. (नऊ) ध्वजाचा अन्य कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा शोभेसाठी उपयोग करुन नये. (दहा) कागदापासून तयार केलेला ध्वज जनतेला महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय, सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांच्या वेळी लावता येईल तथापि असे कागदी ध्वज अशा कार्यक्रमानंतर जमिनीवर टाकू नयेत किंवा फेकू नयेत. ध्वजाची प्रतिष्ठा राखून शक्यतोवर खाजगीरीत्या त्याची विल्हेवाट लावावी. (अकरा) जेव्हा ध्वज मोकळया जागेत लावावयाचा असेल तेव्हा हवामानाची स्थिती विचारात न घेता शक्यतोवर तो सूर्यादयापासून सूर्यास्तपर्यंत लावण्यात यावा. (बारा) ध्वज फाटेल अशा कोणत्याही पध्दतीने तो लावू नये किंवा बांधू नये. (तेरा) ध्वज फाटला असेल किंवा मळाल्यामुळे खराब झाला असेल तर तो विशेषत: जाळून किंवा त्याची प्रतिष्ठा राखली जाईल अशा अन्य कोणत्याही पध्दतीने खाजगीरीत्या संबंधच्या संबंध नष्ट करावा.
        ध्वज लावण्याची योग्य पध्दत : 3.5 ज्या ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून तो स्पष्टपणे दिसेल अशारीतीने लावला पाहिजे. 3.6 जेथे कोणत्याही सरकारी इमारतींवर ध्वज लावण्याची प्रथा आहे तेथे त्या इमारतींवर रविवार व सुट्टीचे दिवस धरुन सर्व दिवशी ध्वज लावण्यात येईल आणि या संहितेमध्ये तरतूद केली असेल ती खेरीजकरुन हवामान कसेही असले तरी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज लावण्यात येईल. अशा इमारतींवर रात्रीसुध्दा ध्वज लावता येईल. मात्र काही अगदी विशेष प्रसंगीच तो रात्री लावावा. 3.7 ध्वजारोहणाचे वेळी ध्वज नेहमी झर्रकन वर चढवावा आणि उतरविताना मात्र तो सावकाशपणे व विधीपूर्वक उतरविण्यात यावा. ध्वजरोहण व ध्वजावतरण जेव्हा बिगुलाच्या प्रसंगोचित सुरांवर करावयाचे असेल अशा वेळी ध्वज चढविण्याची आणि उतरविण्याची क्रिया त्या सुरांच्या बरोबरच झाली पाहिजे. 3.8 जेव्हा खिडकीची कड, सज्जा अगर इमारतीचा पुढील भाग अशा ठिकाणी आडव्या किंवा तिरक्या बसविलेल्या काठीवरुन ध्वज फडकविण्यात येतो तेव्हा ध्वजाची केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी. 3.9 जर ध्वज इतर प्रकारे म्हणजे भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तर ध्वंजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वात वर असावा जर ध्वज उभा लावण्यात आला असेल तर ध्वजाची केशरी रंगाची बाजू (ध्वजाच्या) उजव्या बाजूस असावी म्हणजे ध्वजाकडे तोंड करुन उभ्या असलेल्या व्यक्तींच्या डाव्या बाजूस असावी. 3.10 एखाद्या व्यासपीठावर ध्वज लावावयाचा असेल तेव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असताना त्याच्या उजवीकडे काठीवर ध्वज लावण्यात यावा अथवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या वरच्या बाजूस लावावा. 3.11 पुतळयाच्या अनावरणासारख्या प्रसंगी ध्वज लावताना तो स्पष्ट दिसेल अशा वेगळया जागी लावण्यात यावा. टीप-पुतळयाचे अगर स्मारकाचे आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करु नये. 3.12 ध्वज मोटारीवर लावावयाचा असेल तर तो मोटारीच्या बॉनेटवर मध्यभागी किंवा मोटारीच्या समोरील उजव्या बाजूस मजबूतपणे बसवलेल्या सळईवर लावण्यात यावा. 3.13 मिरवणुकीत अथवा संचलनाच्या वेळी ध्वज फडकत न्यावयाचा असेल तर तो चालणाऱ्यांच्या उजव्या म्हणजेच खुद्द ध्वजाच्या उजव्या बाजूस असावा अगर अशा प्रसंगी इतर आणखी ध्वजांची रांग असेल तर तो त्या रांगेच्या मध्यभागी पुढे ठेवावा.
        ध्वजाचा चुकीचा वापर : 3.14 फाटलेल्या अथवा चुरगळलेल्या ध्वज लावता कामा नये. 3.15 एखाद्या व्यक्तीस अगर वस्तूस मानवंदना करण्यासाठी ध्वज खाली आणू नये. 3.16 दुसरा कोणताही ध्वज अगर पताका राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूस अगर राष्ट्रध्वजावर आणि पुढे नमूद केलेले काही अपवाद सोडल्यास त्याच्या बरोबरीने लावू नये. तसेच ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार घालू नयेत अथवा बोधचिन्ह लावू  नये. 3.17 ध्वजाची तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा शोभेसाठी कोणत्याही प्रकारे उपयोग करु नये. 3.18 वक्त्याचे टेबल             झाकण्यासाठी अथवा व्यासपीठावर आच्छादन वा पडदा म्हणून राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.  3.19 ध्वजाचा केशरी रंगाचा पट्टा खाली येईल अशा रीतीने ध्वज लावू नये. 3.20 ध्वजाचा जमिनीस स्पर्श होऊ नये अथवा तो पाण्यावरुन फरफटत नेण्यात येऊ नये. 3.21 ध्वज फाटेल अशा पध्दतीने लावू नये अथवा बांधू नये.
        गैरवापर : 3.22 ध्वजाचा कोणत्याही स्वरुपात आच्छादन म्हणून वापर करता कामा नये. सरकारमार्फत अथवा सेनादलांमार्फत तसेच केंद्रीय निमलष्करी दले यांच्यामार्फत काढण्यात येणाऱ्या अंत्ययात्रांचे प्रसंग यास अपवाद असतील, असे प्रसंग पुढे दिले आहेत. 3.23 ध्वजाचा वाहन अथवा रेल्वेगाडी अगर जहाज यांच्या झडपांवर, छतांवर, बाजूंवर अथवा पाठीमागच्या बाजूस आच्छादन म्हणून वापर करता कामा नये.3.24 ध्वज फाटेल किंवा तो मलिन होईल अशा प्रकारे वापरु नये किंवा ठेवू नये.  3.25 ध्वज फाटला असेल अथवा मळल्यामुळे खराब झाला असेल तर तो कोठेतरी फेकून देऊ नये अथवा त्याचा अवमान होईल अशा रीतीने त्याची विल्हेवाट लावू नये. अशा परिस्थितीत ध्वज खाजगीरित्या शक्य तर जाळून किंवा त्याचा मान राखला जाईल अशा इतर प्रकाराने सबधच्या सबध नष्ट करावा. 3.26 ध्वजाचा इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करु नये. 3.27 ध्वजाचा पोषाखाचा अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या गणवेशाचा भाग म्हणून वापर करु नये तसेच त्याचे उशा, हातरुमाल यावर भरतकाम करुन नये. अगर त्याची हात पुसण्याचे रुमाल किंवा पेटया यांवर छपाई करु नये. 3.28 ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. 3.29 ध्वजाचा जाहिरातीच्या कोणत्याही स्वरुपात वापर करु नये अथवा ध्वजस्तंभाचा जाहिरात लावण्यासाठी म्हणूनही वापर करुन नये. 3.30 ध्वजाचा काही घेण्यासाठी, देण्यासाठी बांधण्यासाठी अगर वाहून नेण्यासाठी साधन म्हणून ध्वजाचा वापर करु नये. विशेष प्रसंग आणि राष्ट्रीय दिन साजरा करण्याचा एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रवध्वज फडकविण्यापूर्वी राष्ट्रध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळया ठेवण्यात कोणतीही हरकत असणार नाही. 
-         संकलन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड
*******



राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 9 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर  समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.
00000


अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती विभागाची कार्यशाळा संपन्न
नांदेड, दि. 9 :- अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार   सन  2018-19  या शैक्षणिक वर्षामध्ये धार्मिक अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची माहिती सांगण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली.
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे  ऑनलाईन फार्म भरण्यासाठीची नांदेड तालुका अंतर्गत दक्षिण व उत्तर भागातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांची तहसील सभागृह, पंचायत समिती नांदेड येथे 8 ऑगस्ट रोजी शिक्षणाधिकारी अशोक देवकरे व शिक्षणाधिकारी (मनपा) तथा उपशिक्षणाधिकारी डी. आर. बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा संपन्न झाली.
केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे अर्ज अल्पसंख्याक 23 जुलै 2018 पासून भरण्यास सुरुवात झाली आहे. शिष्यवृत्ती फार्म भरणे संदर्भात  अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचे जिल्हा समन्वयक शेख रुस्तुम यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सविस्तर माहिती सांगितली.
या कार्यशाळेस  मनपा शिक्षणाधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी (मा.) श्री बनसोडे, शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले यांनी शैक्षणिक बाबीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरत असताना  अडचण आल्यास शेख रुस्तुम भ्रमणध्वनी ९६८९३५७२१२  वर संपर्क करण्यात यावा. या कार्यशाळेस तालुक्यातील पाचशे मुख्याध्यापक उपस्थित होते. बैठक यशस्वितेसाठी संतोषी उजळबकर, मिनल देशमुख, मारोती ढगे, संजय भालके  यांनी परिश्रम घेतले.
0000000

Wednesday, August 8, 2018

भूजल नियंत्रणासाठीच्या मसुद्याबाबत
सूचना, हरकती पाठविण्याचे आवाहन
औरंगाबाद,दि.08(जिमाका) - महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 मधील प्रयोजने पार पाडण्यासाठी शासनाने दि.25 जुलै रोजी अधिसूचना काढून महाराष्ट्र भूजल नियम 2018 चे मसुदा नियम सर्वसामान्य जनतेच्या अभिप्रायांसाठी प्रसिध्द केले आहेत. या मसुदा नियमांबाबत दिनांक 31 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन जनतेला भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्यावतीने करण्यात आले आहे.
मसुदा व नियमावली जनतेच्या अभिप्रायासाठी प्रसिद्ध केली असून नियमांचा सविस्तर मसुदा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर कायदे/नियम या घटकाखाली प्रसिद्ध आहेत. या मसुदा नियमांबाबत कोणत्याही व्यक्तीस हरकती किंवा सूचना पाठवावयाच्या असतील, तर त्या अपर मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, सातवा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, इमारत संकुल, क्रॉफर्ड मार्केट जवळ, लोकमान्य टिळक मार्ग मुंबई 400 001 येथे लेखी स्वरुपात तसेच psec.wssd@maharshtra.gov.in या इमेलवर वेळेच्या मुदतीत पाठवाव्यात. या हरकती, सूचना  शासन विचारात घेणार आहे.
भूजलाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 1993 कायद्यात विहिरीतून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त शेती, उद्योगधंदे आदी कारणासाठी होत असलेल्या उपसा नियंत्रणाबाबत कुठलीच तरतूद नव्हती. विहिरींची खोली किती असावी ? पिण्याच्या पाण्याची रासायनिक प्रत, दूषित होणारे पाण्याचे उद्भव या बाबींचा या कायद्यात समावेश नव्हता. अमर्याद उपशावर नियंत्रण आणून भूजलाचे एकात्मिक पद्धतीने विकास व व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे जतन करण्यासाठी भूजल कायदा 2009 केलेला आहे. पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी व्यवस्थापन योग्य पध्दतीने व्हावे यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली निश्चित करण्यात आली आहे. या नियमावलीत अनेक अटी व शर्तीचा समावेश करण्यात आला असून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत, असेही या विभागाने कळविले आहे. प्राधिकरणाने अधिसूचित केलेल्या क्षेत्रामध्ये पीक योजना तयार करताना उपलब्ध पाण्यापैकी तीस टक्के पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. अधिसूचित क्षेत्रात जास्त पाणी लागणाऱ्या पिकाच्या लागवडीसाठी पेरणीच्या तीस दिवस आधी जलसंपत्ती समितीकडे अर्ज करावा लागणार असून त्यासाठी भूजल प्राधिकरणाकडून निश्चित केलेले शुल्क भरावे लागणार आहे. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांचे क्षेत्र वाढणार नाही, याची दक्षता प्राधिकरणाकडून घेतली जाणार आहे. जास्त पाण्याचे पीक घेण्यासाठी सूक्ष्म सिंचनाची व्यवस्था करण्याचे हमीपत्रही लिहून घेण्यात येणार आहे.
विहिरींची नोंद अन पिकांसाठी आवश्यक नव्या भूजल कायद्यानुसार राज्यात अस्तित्वात असलेल्या सर्व विहिरींची राज्य भूजल प्राधिकरणाकडे नोंद करावी लागणार आहे. नोंदणी प्रमाणापत्र घेतल्यानंतर विहिरीतील पाण्याची शेती किंवा औद्योगिक वापरासाठी अनिर्बंध उपसा करण्याचे अधिकार राहणार नाहीत. विहिरीमधून पाण्याचा उपसा करण्यासाठी शुल्क आकारण्यात येणार असून खोल विहिरीतून उपसा करण्यासाठी अधिक शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच भूजलाची पातळी खालावलेल्या भागात जास्त पाणी लागणाऱ्या पिकांच्या लागवडीस पाणलोट जलसंपत्ती समितीची परवानगी घ्यावी लागणार आहे. भूजल नियमांचे स्वरूप सर्वसामान्य नागरिकांना पटवून देण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव हे प्रत्यक्ष जिल्हानिहाय भेटी देणार आहे. मराठवाडा विभागातील औरंगाबाद येथे दि.16 ऑगस्ट 2018 तर दि.24 ऑगस्ट परभणी, दि.25 ऑगस्ट लातूर तसेच नांदेड जिल्ह्यात दि.27 ऑगस्ट 2018 रोजी  भेट देणार असून यावेळी जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, सरपंच, शेतकरी, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राधिकरणाचे संचालक शेखर गायकवाड यांनी केले आहे.

असे आहेत नवे नियम:-
विहिरीची खोली  200 फुटांपर्यंत घेता येणार आहे, मात्र त्यापेक्षा जास्त्‍ खोलीची विहीर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी खोदता येईल.
केवळ पिण्याच्या पाण्यासाठी 60 मीटरपेक्षा अधिक खोल विहीर खोदण्यास प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात येणार.
- विंधन विहिरी घेण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या विंधन यंत्रांची नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी तीन वर्षांसाठी असून, मुदत संपल्यानंतर खोदकाम करता येणार नाही.
- सांडपाणी, घनकचरा प्रक्रिया न केलेला मलप्रवाह यांना भारतीय मानक ब्युरोकडून दर्जा निश्चित करण्याचे आदेश प्राधिकरणाकडून देण्यात येणार आहेत.
प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे तसेच कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळे पाण्याचे स्त्रोत दुषित झाल्यास कारखाने, उद्योग, कृषी प्रक्रिया, पशुसंवर्धन, मत्स्यसंवर्धन, पशुधन व कुक्कुटपैदास केंद्रावर पूर्ण बंदी घालण्याचे अधिकार भूजल प्राधिकरणाला दिले आहेत.


******


मराठा क्रांती मोर्चाकडून बंदच्या आयोजनामुळे
अनुचीत घटना होऊ नये यासाठी गुरुवारी शाळा बंद ठेवण्याचे
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे निर्देश
नांदेड, दि. 8 :-  मराठा क्रांती मोर्चा नांदेड जिल्हा संघटनेकडून गुरुवार 9 ऑगस्ट 2018 रोजी बंदचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्र बंद राहणार आहे. त्याअनुषंगाने कोणतीही अनुचीत घटना होऊ नये याची दक्षता म्हणून गुरुवार 9 ऑगस्ट 2018 रोजी एक दिवसासाठी नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवावेत याबाबत नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या स्तरावर शाळा बंद ठेवण्याचे आदेश तातडीने निर्गमीत करुन अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी  अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.
000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...