Friday, March 16, 2018


मराठवाड्यात गारपिट आणि अवकाळी पावसाची शक्यता असल्याने
नागरिकांनी सावधगिरी बाळगावी   

नांदेड, दि. 16:- येत्या 48 तासात मराठवाड्यात गारपिट आणि अवकाळी पावसाची दाट शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा संदेश भारतीय हवामान खाते यांच्याद्वारे कळविण्यात आलेले आहे. जिल्हा उपविभाग व तालुका ठिकाणी गारपिट / अवकाळी पाऊसाचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी आपल्या कापलेल्या व इतर पिकांची काळजी घ्यावी. नागरिकांनी / विद्यार्थ्यांनी विजा चमकत असतांना झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. स्थानिय प्रशासनास सतर्क राहण्याचे तथा याबाबत वेळोवेळी कुठल्याही प्रकारची गरज पडल्यास जिल्हा प्रशासनाच्या वरीष्ठ कार्यालयांना विनाविलंब कळविण्याच्या सुचना आहेत. यासाठी दुरध्वनी क्रमांक 02462-235077 , फॅक्स क्रमांक 238500 टोल फ्री क्रमांक 1077 असा आहे.
0000000

जागतिक ग्राहक हक्क दिन

नांदेड, दि. 16:-  येथील जिल्हा पुरवठा कार्यालय व तहसील कार्यालय , नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जागति‍क ग्राहक दिन तहसील कार्यालयात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष किशोरकुमार रं. देवसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासन , प्रादेशिक परिवहन विभाग, वजने व मापे विभाग, नांदेड गॅस व पेट्रोलपंप आदी विविध विभागाचे स्टॉलचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातील स्वामी विवेकानंद व बिंदू माधव जोशी यांचे प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी केले . यावेळी ग्राहक पंचायतचे ॲङ एस.आर. कमटलवार, बा. दा. जोशी, किशोर देवसरकर , श्री. बिलोलीकर , पुरुषोत्तम अतिलकंठवार यांनी आपले मनोगत व्यक्त या प्रसंगी ग्राहक पंचायतचे अरविंद बिडवई , बालाजी लांडगे , हर्षद शहा, येजगे लक्ष्मीकांत मुळे, श्रीमती सुषमा माढेकर , श्री. पांचाळ, गोवंदे कोत्तावार , दिगंबर शिंदे, अशोक पांपटवार , माधव अटकोरे , हुंडेगकरी पंढरीनाथ , गोविंद कोलम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे,  जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी राम बोरगावकर, नायब तहसीलदार विजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार जिल्हा पुरवठा तपासणी निरीक्षण अधिकारी राम बारगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन श्रीमती एम. डी. वांगीकर व प्रेमानंद लाठकर यांनी केले. यावेळी विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहक बहुसंख्येने उपस्थित होते.
000000

पाण्याचे काटेकोर नियोजन करुन
योग्य पिकाची लागवड करणे गरजेचे
  --- पोपटराव पवार
  • जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
       
नांदेड, दि. 16:-   आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष मार्गदर्शक श्री. पोपटराव पवार यांनी विस्तृत मार्गदर्शन करताना भविष्यातील पाणी व पाण्याचे महत्व विशद केले. त्यांनी आपल्या भाषणात अनेक वैज्ञानिक व पोराणीक संदर्भ देत गावाचा कसा कायापालट केला व गांव दुष्काळ मुक्त करुन आर्थीक सुबत्ता आणली याबाबत मार्गदर्शन केले. जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत विविध कामे हाती घेऊन अनेक गावे दुष्काळमुक्त होत आहेत. परंतु सदरिल गावात पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे परत दुष्काळग्रस्त होत आहेत. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन करुन योग्य पिकाची लागवड करणे गरजेचे असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले.
           
जलयुक्त शिवार अभियान हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असुन या कार्यक्रमातन ग्रामीण भागाचा व शेतीचा कायापालट होणार असल्याचे त्यांनी सांगितले यासाठी गावांनी पुढे येऊन गुणवत्तापुर्ण कामे करुन घेतली पाहिजे. अडवलेल्या, जिरवलेल्या पाण्याचा पुरेपुर वापर होण्यासाठी पिकाची रचना गावांने ठरवली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
            या कार्यशाळेत कृषि व पशुसंवर्धन सभापती तसेच मा.माधवराव पाटील शेळगावकर यांनीही विचार मांडले.   
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कुसूमताई चव्हाण सभागृह नांदेड येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यांत आले होते. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन हिवरेबाजारचे सरपंच तथा कार्यध्यक्ष आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे श्री. पोपटराव पवार हे उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख उपस्थित अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण, माधवराव पाटील शेळगावकर उपस्थित होते.   
            अध्यक्षीय समारोप जिल्हाधिकारी श्री. अरुण डोंगरे यांनी केला व जलयुक्त शिवार अभियानाबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल व जिल्ह्यात हेअभियान चळवळीच्या स्वरुपात पुढे येऊन जिल्हा दुष्काळमुक्त होईल असेही त्यांनी सांगितले.
            किनवट येथील प्रकल्प अधिकारी श्री. कुंभारे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, लघुसिंचन जलसंधारण, पाटबंधारे, वनविभाग, सामाजिक वनिकरण, सरपंच, प्रगतशिल शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोट यांनी प्रास्तावीक केले. तर कार्यक्रमाचे सुत्र संचलन व आभार प्रदर्शन भोकर तालुका कृषि अधिकारी  रमेश देशमुख यांनी केले.
****  


कौशल्य विकास व उद्योजकता
मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचा दौरा
नांदेड, दि. 16 :- राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 17 मार्च 2018 रोजी मुंबई येथून टुजेटच्या विमानाने दुपारी 2.20 वा. श्री गुरु गोविंदसिंघ विमानतळ नांदेड येथे आगनम व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.
00000

Thursday, March 15, 2018


जलजागृती सप्ताहाचे आज उद्घाटन
नांदेड, दि. 15 :- नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड यांच्यावतीने जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते शुक्रवार 16 मार्च 2018 रोजी गोदावरी, पुर्णा, मानार, पैनगंगा, लेंडी, कयाधु, मांजरा या नद्याच्या पाण्याच्या कलश पुजनाने जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.
जलजागृती सप्ताहाचे आयोजन 16 ते 22 मार्च 2018 या कालावधीत साजरा करण्यात आले आहे. या दरम्यान लाभक्षेत्रात प्रत्येक गावात कार्यशाळा घेण्यात येऊन पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत जलजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रविवार 18 मार्च 2018 रोजी सकाळी 6.30 वा. महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुतळा (आयटीआय) ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अशी "जल दौड" घेण्यात येणार आहे. या जल दौडीत नागरिकांनी तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी भाग घ्यावा, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी केले आहे.
0000000


सोशल मीडियाचा उपयोग
समाज निर्मितीसाठी करावा
-        जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 15 :- आजची तरुणाई प्रामुख्याने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतांना दिसत आहे. मात्र या सोशल मीडियाचा उपयोग त्यांनी प्राधान्याने चांगल्या समाज निर्मितीसाठी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय जिल्हा माहिती कार्यालय नांदेडच्यावतीने नांदेड येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात सोशल मीडिया महामित्र उपक्रमांतर्गत संवादसत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डोंगरे बोलत होते. यावेळी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोशल मीडियाचे आजच्या काळातील महत्व विशद करतांना जिल्हाधिकारी डोंगरे पुढे म्हणाले की, या माध्यमामुळे संदेशाची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात होत असल्याने या सामाजिक माध्यमांचा प्रभावही तितकाच जास्त वाढत आहे. अनेकांशी जोडण्याच्या या नवीन माध्यमाचा वापर चांगल्या समाजोपयोगी योजना त्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केला गेला तर खऱ्या अर्थाने चांगली समाज निर्मिती होऊ शकते. महामित्र हा शासनाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे सोशल मीडियातील प्रभावी युवक-युवती शासनाशी जोडले जात आहेत. या व्यक्तींनी भविष्यात चांगले संदेश, चांगल्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचा समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवावा, अशी सुचना करुन जिल्हाधिकारी डोंगरे यांनी नांदेड जिल्ह्यातील वैशिष्ट्यपुर्ण योजनांची माहिती दिली. नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कार्य राज्यच नव्हे तर देशपातळीवर सुद्धा गौरविले गेले आहे, असे सांगून त्यांनी नांदेड जिल्ह्याची परिपूर्ण माहिती देणाऱ्या ॲप्लीकेशनची निर्मिती केल्याचे सांगून त्याचा वापर करण्याचे आवाहन केले.
जलयुक्त शिवार अभियान, तलावातील गाळ काढण्याच्या उपक्रमातून जलसंवर्धनाची चळवळ जिल्ह्यात सुरु असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डोंगरे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने राबविलेल्या महामित्र उपक्रमाचे विशेष कौतूक केले. केवळ प्राप्त झालेले संदेश कोणताही विचार न करता फारवर्ड करण्याची चुकीची पद्धत बदलून कोणताही संदेश विचार करुन फारवर्ड केल्यास आपण अधिक कार्यक्षमपणे समाजाला दिशा देवून शकतो हा विचार प्रत्येकाने बाळगावा असेही ते म्हणाले.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर आणि अनुलोम संस्थेचे जिल्हा प्रमुख विजय मोरगुलवार यांनी प्रास्ताविक करुन पाहुण्यांचे स्वागत केले. शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनीही यावेळी आपल्या भाषणात सोशल मीडियाचा वापर समर्पक समाजाच्या उद्धारासाठी करण्याचे आवाहन केले व अध्यापक महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधांचा आढावा देत या महाविद्यालयाच्या स्वत:च्या इमारत उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या प्रश्नाविषयी उहापोह केला. यावेळी महाविद्यालयाच्यावतीने त्यांनी जिल्हाधिकारी डोंगरे यांचा यथोचित सत्कारही केला.
परीक्षक मंडळीच्यावतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे अधिव्याख्याता डॉ. वैजनाथ अनमुलवार यांनी मनोगत मांडले.
नांदेड जिल्ह्यातील नऊ क्षेत्राच्या टॉप सहभागींचे नऊ संवादसत्र (गटचर्चा) सकाळी याठिकाणी घेण्यात आल्या. यामध्ये सोशल मीडिया महामित्र ॲपद्वारे टॉप ठरलेल्या व्यक्तींनी सहभाग नोंदविला या संवादसत्रासाठी डॉ. कल्पना बेलोकर, व्ही. एम. कल्याणपाड, एस.एस. दासरवार, प्रा. महेश मोरे, डॉ. भास्कर भोसले, डॉ. सुलभा मुळे, डॉ. वैजनाथ अनमुलवार, सुनिल हुसे, प्रा. सु. गं. जाधव, डॉ. एस. एस. सोळंके आणि माधव चुकेवाड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी सर्व परीक्षकांचा पुष्पगुच्छ व लोकराज्य अंक देवून सत्कार करण्यात आला. संवादसत्रात सहभागी व्यक्तींना संदर्भमूल्य असलेली महाराष्ट्र वार्षिकी पुस्तिका आणि लोकराज्य अंक देवून गौरविण्यात आले. सहभागींना वर्षेभर लोकराज्य अंक मोफत पाठविण्यात येणार असून प्रमाणपत्र थेट ॲपवरुन डाऊनलोड करुन मिळणार आहे. शेवटी विजय होकर्णे यांनी सर्वांचे आभार मानले तर अनुलोमचे बळीराम पाटील यांनी सुत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा. हारुण शेख  व त्यांचे सर्व सहकारी तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रविण बिदरकर, महमंद युसूफ, विवेक डावरे, अलका पाटील, काशिनाथ आरेवार, बालनरस्या यांनी तसेच अनुलोम संस्थेचे अशिष चौधरी, राम साळवेश्वरकर, प्रविण श्रीमनवार, पांडुरंग बुद्धेवार, विष्णु माने आदिंनी परिश्रम घेतले.
00000

Monday, March 12, 2018


चाणक्य पुरस्काराने देवेंद्र भुजबळ सन्मानित 


पुणे दि. 12 : देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या पब्लीक रिलेशन्स कॉन्सिल ऑफ इंडीयाच्यावतीने जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) देवेंद्र भुजबळ यांना प्रतिष्ठेच्या ‘चाणक्य’ पुरस्काराने  मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
येथे नुकतेच पब्लीक रिलेशन्स कॉन्सिल ऑफ इंडीयाची दोन दिवसीय 12 वी ग्लोबल कम्युनिकेशन परिषद झाली. यामध्ये प्रतिष्ठेच्या चाणक्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पब्लीक रिलेशनमधील तज्ज्ञ मॅथ्यू, पीआरसीआचे पदाधिकारी एम. बी. जयराम, विजयलक्ष्मी, आर. डी. कुमार, बी. एन. कुमार, आर. टी. कुमार, वेणूगोपाल यांच्यासह  देशभरातून पब्लीक रिलेशनमध्ये काम करणाऱ्या मान्यवर संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
या परिषदेत जनसंपर्क क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे तज्ज्ञ सहभागी होतात. यावर्षीची 12 वी परिषद ‘ट्रान्सफॉर्म’ या संकल्पनेवर आधारीत होती.  या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर व्यक्ती व संस्थांना या परिषदेत सन्मानित करण्यात आले.
या वर्षी शासनाच्या जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कम्युनिकेटर ऑफ द इयर ‘चाणक्य’ पुरस्काराने देवेंद्र भुजबळ यांना सन्मानित करण्यात आले. देवेंद्र भुजबळ हे 1991 पासून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात कार्यरत आहेत. सध्या ते संचालक (माहिती) या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी केसरी या मराठी वृत्तपत्रापासून आपल्या कामाला सूरूवात केली, नंतर त्यांनी मुंबई दूरदर्शन येथे प्रोग्रॅम प्रोड्यूसर म्हणून सहा वर्षे काम केले आहे. माहिती व जनसंपर्क विभागात त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. 
या परिषदेला देशभरातून जनसंपर्क क्षेत्रातील विविध मान्यवर संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.     
*****

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...