Tuesday, November 7, 2017

"राष्ट्रीय शिक्षा दिवस" 11 नोव्हेंबरला
नांदेड, दि. 7 :- मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जयंती दिवस 11 नोव्हेंबर रोजी "राष्ट्रीय शिक्षा दिवस" म्हणून साजरा करण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात शनिवार 11 नोव्हेंबर रोजी "राष्ट्रीय शिक्षा दिवस" अल्पसंख्याक विभागाच्या शासन परिपत्रकानुसार साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.   

00000   
माजी सैनिकांचे पाल्य, खेळाडुसाठी सैन्य भरती
नांदेड, दि. 7 :- माजी सैनिकांचे पाल्य व पात्र खेळाडुसाठी मराठा लाईट इंन्फट्री बेळगाव येथे हेडक्वार्टर कोटा सैन्यभरती  सोमवार 13 नोव्हेंबर 2017 पासुन सोल्जर जीडी, सोल्जर ट्रेडसमॅन, सोल्जर क्लार्क पदासाठी होत आहे. शहिद जवान व विधवा यांच्या पाल्यास प्राधान्य दिले जाईल. अधिक माहितीसाठी सैनिक कल्याण कार्यालयास भेट दयावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने  यांनी केले आहे.

0000
चर्मोद्योग प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 7 :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चांभार, ढोर, मोची, होलार या वर्गातील तरुणांसाठी फरसतगंज उत्तरप्रदेश येथे येत्या डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा कार्यालयामार्फत लाभार्थ्यांचे अर्ज वाटप, दाखल करण्याची मुदत 13 ते 14 नोव्हेंबर 2017 पर्यंत आहे. या योजनाचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन येथील संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
यावेळी सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन कटींग ऑपरेटर- फुटवेअर, सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन क्लोसिंग ऑपरेटर-फुटवेअर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे राहतील. लाभार्थ्यांचे वय 18 ते 35 वर्ष असावे. लाभार्थ्यांची शैक्षणिक पात्रता आठवी पास असावी. त्यासाठी जातीचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, रेशन कार्ड, फोटो, आधार कार्ड कागदपत्रे आवश्यक आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अर्जाची छाननी 16 ते 17 नोव्हेंबर 2017 पर्यंत करण्यात येणार आहे. प्रत्यक्षपणे लाभार्थींची मुलाखत, निवड 20 ते 22 नोव्हेंबर 2017 पर्यंत होईल.

0000000
लोकन्यायालयात लेंडी प्रकल्पाचे प्रकरणे
तडजोडीने काढण्यासाठी पुर्वतयारीची बैठक संपन्न
नांदेड दि. 7 :- कंधार मुखेड न्यायालयात शनिवार 9 डिसेंबर 2017 रोजी होणाऱ्या लोकन्यायालयाच्या पुर्व तयारीबाबत बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या बैठकीत वर्ग एक जिल्हा न्यायाधिव्ही. एस. गायके, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी. वसावे, दिवाणी न्यायाधीआर. जे. तांबे, सहदिवाणी न्यायाधीश एस. व्ही. स्वामी, एस. बी. काळदाते, श्रीमती एन. एम. बिरादार, अॅड. विजय पाटील तसेच कंधार येथील बार असोसीएनचे अध्यक्ष डी. के.पांचाळ मुखेड येथील बार असोसिएनचे सदस्य श्री. येवतीकर, सदस्य उपस्थित होते.  
या बैठकीत लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवुन तडजोड रु निकाली काढण्याबाबत बैठक घेण्यात आली. तसेच लेंडी प्रकल्पाची प्रकरणे लोकन्यायालयात ठेवुन तडजोड करून निकाली काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच लेंडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी 1 कोटी रुपयाचा धनादेन्यायालयात दाखल केला तो बॅंकेत जमा करण्यात आला, असे संबंध प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
            लेंडी प्रकल्पाचे जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव,  डी. टी. वसावे यांनी मार्गदर्श केले. राष्ट्रीय लोकन्यायालयाची माहिती दयावी, असे  आवाहन श्री. वसावे यांनी केले आहे.

000000

Monday, November 6, 2017

ग्रंथालयांना सहाय्य       
                  अनिल आलुरकर
                                                                              जिल्हा माहिती अधिकारी,  
                                                                                 नांदेड

         सार्वजनिक ग्रंथालयांचे सुनियोजित व्यवस्थापन आणि विकास घडवून आणण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. वाचक चळवळ निर्माण व्हावी, यासाठी ग्रंथालय संचालनालयाने पुढाकार घेतला असून त्याचा थोडक्यात हा आढावा..

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 ची अंमलबजावणी करण्यासाठी या अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रंथालय संचालनालय या स्वतंत्र विभागाची स्थापना 2 मे 1968 रोजी करण्यात आली. 1967 च्या अधिनियमातील तरतुदीनुसार सार्वजनिक ग्रंथालय पद्धती प्रस्थापित करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना, परिरक्षण, संघटन, नियोजन आणि विकास यांची जबाबदारी ग्रंथालय संचालनालयाकडे सोपविण्यात आली.
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय कार्यरत आहे. राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे सुनियोजित व्यवस्थापन आणि विकास घडवून आणण्यासाठी ग्रंथालय संचालनालयांतर्गत सहा महसूली विभागामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे 6 सहाय्यक ग्रंथालय कार्यालये स्थापन करण्यात आलेली आहेत. या कार्यालयांच्या माध्यमातून संबंधित विभातील जिल्ह्यामधील ग्रंथालयावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते. राज्य आणि केंद्र शासनाच्या ग्रंथालयांच्या विकासाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी ग्रंथालय संचालनालयाकडून केली जाते. ग्रंथालय संचालनालयांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात शासकीय ग्रंथालय आहे. सार्वजनिक ग्रंथालयांना याद्वारे अनुदान दिले जाते.
रॉय प्रतिष्ठानची निर्मिती
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या स्थापनेचे 1972 हे वर्ष, भारतीय स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाचे हे वर्ष. सर्वासाठी ग्रंथ (Book for all) हे या आंतरराष्ट्रीय ग्रंथ वर्षाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या ग्रंथ सनदेचे उद्घोषाचे वाक्य होते. आधुनिक भारताचे शिल्पकार थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय याच्या द्वितीय जन्म शताब्दीचे हे वर्ष होते. या सर्व पर्वणीचे निमित्त लक्षात घेऊन राष्ट्रीय समितीच्या दि. 28 मार्च, 1972 रोजी झालेल्या बैठकीत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान स्थापन ठरले. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या (सध्याचे नाव मनुष्यबळ विकास मंत्रालय ) संस्कृती विभागांतर्गत 6 मे 1972 रोजी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.
दिनांक 20 मे 1972 रोजी प्रतिष्ठानचे औपचारिक उद्घाटन राष्ट्रीय ग्रंथालय, कोलकात्ता येथे करण्यात आले. पश्चिम बंगाल सार्वजनिक विश्वस्त नोंदणी कायद्यान्वये नोंदणी झालेले हे प्रतिष्ठान पूर्णपणे स्वायत्त आहे. यामार्फत संपूर्ण देशभर विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते.
प्रतिष्ठानच्या विविध योजना
प्रतिष्ठानच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वेगवेगळ्या अर्थसहाय्याच्या योजना तयार करण्यात आल्या आहेत. या योजना दोन प्रकारच्या साधनावर आधारित आहेत. या योजनासाठी अर्ज करणाऱ्या ग्रंथालयाने त्यापूर्वी घेतलेल्या अर्थसहाय्याचा खर्च केल्याबाबतची सर्व कागदपत्रे विहित नमुन्यातील उपयोगिता प्रमाणपत्रांसह सादर केली असतील तरच दुसरा नवीन अर्ज विचारात घेतला जातो.
समान निधी योजनेअंतर्गत राज्य आणि केंद्र शासन 50 टक्के अनुदान यासाठी देतात. समान निधी योजनेमार्फत बांधकाम आणि ग्रंथालयाचे बळकटीकरण यासाठी अनुदान उपलब्ध करुन दिले जाते. उत्कृष्ट ग्रंथालयासाठी पुरस्कार योजनाही राज्य सरकारमार्फत राबविली जात आहे. भारतातील 54 हजार सार्वजनिक ग्रंथालये राष्ट्रीय ज्ञान आयोगाशी जोडले गेले आहेत. त्यानुसार आधुनिकीकरणाचे विविध उपाय योजले जात आहेत.
एकूणच वाचक चळवळ निर्माण व्हावी, यासाठी ग्रंथालय संचालनालय अग्रेसर वाटचाल करीत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालयाशी संपर्क साधता येईल.
0000000


"निवडणूक ज्ञान स्पर्धेत"
विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा

नांदेड, दि. 6 :-  भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक ज्ञान स्पर्धा 2017-18 साठी आंतर शालेय फेरी 1 ते 10 नोव्हेंबर, जिल्हास्तर फेरी 11 ते 17 नोव्हेंबर, राज्यस्तर फेरी 20 ते 25 नोव्हेंबर, उपांत्य व अतिंम फेरी 11 ते 17 डिसेंबर 2017 या कालावधीत होणार आहेत. जिल्ह्यात ही स्पर्धा प्रत्येक तालुक्यात शालेय स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.  
अखिल भारतीयस्तरावर 14 ते 17 या वयोगटातील 9 वी ते 12 वीतील व भविष्यात नव मतदार म्हणून नोंदणी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा निवडणूक प्रक्रिया या विषयाबाबत होणार असून स्पर्धेच्या 5 फेऱ्या होणार आहेत.
प्रथम फेरी शालेयस्तरावर घेण्यात येणार असून या फेरीमध्ये भाग घेतलेल्या सर्व शाळांमधील पात्र ठरलेले प्रत्येक दोन विद्यार्थी जिल्हा स्तरावरील फेरीसाठी पात्र ठरणार आहे. शालेय स्तरावर स्पर्धेचे आयोजन करताना मुलींचा सहभाग असेल याची पुरेशी दक्षता घेण्यात येणार आहे.
दुसरी फेरी जिल्हास्तरावर होणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.
जिल्हा स्तरावरील फेरीमध्ये जिंकणाऱ्या शालेय चमूला राज्य स्तरीय तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरविण्यात येईल. चौथी व पाचवी फेरी ही राष्ट्रीय स्तरावर नवी दिल्ली येथे भारत निवडणूक आयोग आयोजित करणार आहे.
शालेय फेरीसाठी आदर्श प्रश्नपत्रिका व जिल्हा स्तरीय फेरीसाठी प्रश्नावली भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने समितीची स्थापना केली असून जिल्ह्यातील शाळांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. शालेय फेरीसाठी आदर्श प्रश्नपत्रिका तसेच जिल्हास्तरीय फेरीसाठी प्रत्येक शाळेकडून ठरवून दिलेल्या चमुची यादी स्विकृत करणे. भारत निवडणूक आयोगाकडून पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नोत्तर त्यांचे मुल्यमापन करण्यासाठी तज्ज्ञांचा एक संघ तयार करणे, जिल्हास्तरीय फेरीचे आयोजन, अध्यक्षपद स्विकारणे, मुल्यमापन करणे व त्याच दिवशी स्पर्धेतील विजेता घोषित करण्याची कार्यवाही करणे, जिल्हास्तरीय फेरीचे ऑडिओ / व्हिडीओ करुन तज्ज्ञ संस्थेला पाठविण्यात येणार आहे.  
जिल्हास्तरीय फेरीत विजेता असलेल्या चमुची नावे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला पुढील फेरीसाठी कळविण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरलेल्या व भाग घेणाऱ्यांना प्रवास व इतर सवलती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टी-शर्ट तयार करुन पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयात राष्ट्रीय मतदार दिवशी कार्यक्रमात जिल्हास्तरीय विजेता पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.  
तालुकास्तरीय समितीकडून प्राप्त होणारे विजेत्यातून जिल्हास्तरावर 11 ते 17 नोव्हेंबर, 2017 या कालावधीत स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेचे नियोजन, तसेच स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करणे व त्याच दिवशी स्पर्धेतील विजेता घोषित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

 000000  
प्रेरणादायी यशकथांचा लोकराज्य प्रकाशित
 नांदेड, दि. 6 : राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये राबविलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन सामाजिक व आर्थिक स्तर उंचावलेले नागरिक, उद्योजक , गाव यांच्या यशोगाथा सांगणारा लोकराज्यचा नोव्हेंबर 2017 चा होय, हे माझं सरकार हा विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे. हा अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.
शासनाच्या योजनांचा लाभ घेत तसेच विविध मोहिमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत नागरिकांनी  गावागावांमध्ये शौचालय उभारले, गाव स्वच्छ आणि काही गावे टँकरमुक्त झाली. बेरोजगार तरुण-तरुणींनी मुद्रा बँक योजनेतून उद्योग स्थापन केला. प्रशासनाने अनेक सेवा ऑनलाइन देऊन नागरिकांच्या वेळेची बचत केली.
जलयुक्त शिवार योजनेंर्गत अवर्षणग्रस्त भागातील अनेक गावे टँकरमुक्त व जलयुक्त झाली. या अंकात समावेश केलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील खामखेडा, खांडवा या गावांनी केलेली जलक्रांती आणि स्मार्ट, सुंदर आणि स्वच्छ गाव म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अवनखेड या गावाची यशकथा  प्रेरणादायी आहे. अशा प्रातिनिधिक यशकथांचा या अंकात समावेश करण्यात आला आहे. या अंकाची किंमत 10 रुपये आहे.

000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...