Monday, November 6, 2017

सर्व शाळा, महाविद्यालयात आज
"विद्यार्थी दिवस" साजरा करण्याचे निर्देश    
नांदेड, दि. 6 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनानिमित्त 7 नोव्हेंबर 2017 रोजी राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात "विद्यार्थी दिवस" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे 27 ऑक्टोंबर 2017 च्या परिपत्रकातील सुचनानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधीतांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.  
प्रत्येक विद्यार्थी हा या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होणे काळाची गरज आहे. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेलया कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना होण्यासाठी 7 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी "विद्यार्थी दिवस" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत विविध पैलुंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे शासन परिपत्रकात नमुद केले आहे.

0000000
कृषि प्रदर्शनाचे माळेगाव येथे आयोजन ,  
फळे, भाजीपाला नमुना आणण्याचे आवाहन
नांदेड, दि. 6 :- श्रीक्षेत्र खंडोबा यात्रा माळेगाव येथे जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शनाचे आयोजन डिसेंबर 2017 मध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, कृषि पशुसंवर्धन समितीचे सभापती दत्तात्रय रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांन या प्रदर्शनात मोठया प्रमाणात फळे भाजीपाल्याचे नमुने घेऊन यावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी यांनी केले आहे.
या प्रदर्शनामध्ये बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी, सुधारीत कृषि औजारे, विविध बँका, ट्रॅक्टर कंपन्या, महाबीज, कृषि उद्योग विकास महामंडळ, कृषि विज्ञान केंद्र, राज्य कृषि विभाग तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांचे स्टॉल उभारण्यात येणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यास मार्गदर्शन माहिती प्राप्त होणार आहे. प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत विविध कंपन्यास कृषि विभागामार्फत माहिती घेऊन संपर्क साधून कृषि प्रदर्शनाच्या आयोजनाबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
यावर्षी नव्यानेच जिल्हयातील कृषि क्षेत्रात उल्लेखन कामगीरी करणाऱ्या शेतकऱ्यास कृषिनिष्ठ शेतकरी म्हणून श्रीक्षेत्र खंडोबा यात्रा माळेगाव येथे पुरस्कार देण्यात येणार आहेत त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. तसेच भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये किटकनाशक औषधी फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत स्टॉल उभारुन किटकनाशक औषधी कंपनी मार्फत जागृती माहिती देण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शनामध्ये फळ-फळावळ भाजीपाला पिकाचे नमुन्याचे प्रदर्शन आयोजित करुन उत्कृष्ट नमुन्यास प्रथम, द्वितीय तृतिय बक्षिस जिल्हयातील प्रत्येक वाणाच्या एका फळ भाजीपाला नमुन्यास देण्यात येणार आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना फळे भाजीपाला लागवड करण्याबाबत प्रोत्साहीत करण्यात येणार आहे. कृषि समिती बैठकी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभे याबाबत जिल्हा कृषि विकास अधिकारी पंडित मोरे यांनी सविस्तर माहिती  दिली आहे. तसेच जिल्हास्तरावर सर्व बियाणे, रायायनिक खते, किटकनाशक औषधी विक्रेते तसेच सर्व संबंधीत यांची प्रदर्शनाबाबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे अशीही माहिती श्री. मोरे यांनी दिली.

000000
"राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क"
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 6 :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज https://mahadbt.gov.in करण्याचे आवाहन डॉ. शैला सारंग सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड यांनी केले आहे.  
राज्य शासनाकडून सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी https://mahadbt.gov.in हे संकेतस्थळ संचालक, माहिती व तंत्रज्ञान (DIT) यांचेमार्फत विकसीत करण्यात आले आहे. या संकेतस्थळामध्ये शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, विभागाच्यावतीने शिष्यवृत्ती योजनेचा समावेश करण्यात आला आहे. देय होणाऱ्या वित्तीय लाभाची सर्व रक्कम लाभार्थी विद्यार्थ्याच्या आधार संलग्नीत बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी स्वत:ची नोंदणी करणे, अर्ज भरणे, अर्ज भरण्यापासून ते रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्याची सर्व प्रक्रिया आता राजर्षी DBT पोर्टल मार्फत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केल्याबाबची सुचना DBT पोर्टलद्वारे प्रत्येक महाविद्यालयात दिली जाईल. त्यामुळे संबंधित विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी कोणत्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम घेवू नये. तसेच कोणत्याही आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची पीळवणूक होणार नाही याची योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थेची असेल.
उच्च शिक्षण, नांदेड विभाग, नांदेड विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती (ईबीसी), अहिंदी भाषीक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, एकलव्य आर्थिक सहाय्य योजना, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना, राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजना, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना, माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना, गणित व भौतिक विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.
ऑनलाईन नोंदणीची पुर्वतयारी करताना विद्यार्थ्याने आपला आधार क्रमांक काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने कोअर बँकींग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने आपला मागील परीक्षा उत्तीर्ण झालेला दाखला व गुणपत्रक, जन्मतारखेचा पुरावा, रहिवाशी दाखला, उत्पन्न दाखला, प्रवेशित महाविद्यालयाची माहिती आभ्यासक्रमाचा कालावधी, बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे तयार ठेवावीत.
नोंदणी कशी करावी- आपण कोणत्याही ब्राऊजरचा वार करुन (उदा. Internet Explorer (I.E.)/Google Chrome/ Mozilla firefox etc.), https://mahadbt.gov.in या वेबसाईटवर जाऊन "नविन नोंदणी" या बटणावर क्लिक करावे. प्रत्येक विद्यार्थ्याने Maha-DBT पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. "आधारकार्ड आहे" असेल तर "होय" व नसेल तर "नाही" वर क्लिक करा. त्यानंतर "OTP" हा पर्याय निवडा. वैध आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP पाठवा बटन क्लिक करा. मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP (One Time Password) टाकून "पडताळणी करा" हे बटन क्लिक करा. उपलब्ध विंडोमध्ये नांव, जन्मदिनांक, फोन नंबर, पत्ता, आधार संलग्न बँक खाते नंबद इ. आधार कार्ड वरील माहिती आपोआप दिसेल. आधार क्रमांक नसल्यास "आधार कार्ड नाही" हा पर्याय निवडा आणि आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे अपलोड करावे. नोंदणी अर्जाच्या विंडो मधील सर्व माहिती भरावी. स्वत:चा युजर नेम व पासवर्ड तयार करावा.
अर्ज कसा भरावा - महाडीबीटी पोर्टलवर लॉगइन करण्यासाठी "सिलेक्ट युजर मध्ये जावून" विद्यार्थी हा पर्याय निवडा. युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगइन व्हा. लॉगइन झाल्यानंतर विंडोज मधील "योजना तपशिल" यावर क्लिक करा. यानंतर विभागवार योजना आपण पाहून निवडू शकता. आपण ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे त्या योजनेच्या नांवासमोर "पहा" क्लिक केले असता योजनेची सर्व माहिती दिसू शकेल. त्यानंतर कोणत्या योजना (मॅट्रिक पुर्व/ मॅट्रिकोत्तर साठी आपण पात्र आहात त्याची खात्री करा व पर्याय क्लिक करा. (उदा. शालेय विद्यार्थ्यांनी "मॅट्रिकपुर्व व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी "मॅट्रिकोत्तर" हा पर्याय निवडावा.) आवश्यक ती सर्व माहिती उदा. जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवाशी, अपंगत्व, कौटुंबिक उत्पन्न इ. सॉफ्टवेअरमध्ये काळजीपुर्वक भरावी. आवश्यक ते कागदपत्रे, पालकांची माहिती, शाळा व महाविद्यालयाचा तपशिल नमुद करावा.आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी. (रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, एसएससी प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इ.) अभ्यासक्रमाचा तपशिल, मागील परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा तपशिल इ. सर्व माहिती अर्जदाराने भरावयाची आहे आणि सबमिशन पेज मधील सादर या बटनवर क्लिक करावयाचे आहे. विद्यार्थी/ पालकांना काही आडचण असल्यास त्यांनी 18001025311 या टोल फ्री क्रमांकावर किंवा helpdesk@mahadbt.gov.in या मेल आयडीवर संपर्क करावा.

महाविद्यालयासाठी सुचना :- महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन करणे व अर्ज भरण्यासाठी सहकार्य करावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्याकडून प्रवेशाच्या वेळी कोणतेही शुल्क स्वीकारु नये. विद्यार्थ्यांना आधार क्रमांक काढणे, कोअर बँकींग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते उघडण्यासाठी सुचना द्याव्यात. आपल्या महाविद्यालयाचे नांव, महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमाची नांवे, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता महाविद्यालयाच्या व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश याबाबतची माहिती पोर्टलवर मॅप करण्यासाठी संचालनालयास सादर करुन ती मॅप करुन घेण्याची कार्यवाही करावी. महाविद्यालय, त्यांचा अभ्यासक्रम, त्यांची प्रवेश क्षमता, अभ्यासक्रमाचा कलावधी, शुल्क रचना इ. माहिती पोर्टलमध्ये समावेश (मॅप) करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल त्यासाठी ज्या प्राधिकाऱ्यांनी (Authority) मान्यता दिली आहे त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन नांदेड उच्च शिक्षण विभागीचे सहसंचालक डॉ. शैला सारंग यांनी केले आहे.
000000 

Saturday, November 4, 2017

"राजे यशवंतराव होळकर महामेष" योजनेसाठी
15 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत
नांदेड, दि. 5 :- पशुसंवर्धन विभागामार्फत मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी "राजे यशवंतराव होळकर महामेष" या राज्यस्तरीय योजनेसाठी बुधवार 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत सायं. 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज http://mahamesh.in/schemeinfo.aspx या संकेतस्थळावर भरता येणार आहे. अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर त्याची पावती संबंधीत तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी वि. पंचायत समिती यांचेकडे सादर करावी, असे आवाहन नांदेड जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.  
ही योजना सन 2017-18 साठी मेंढी पालन करणाऱ्या भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव व नांदेड ही तालुके वगळून इतर तालुक्यातील पात्र शेतकरी याचा लाभ घेऊ शकतील. यासाठी कायमस्वरुपी एका ठिकाणी राहुन मेंढी पालन करणारे व स्थलांतर पद्धतीने मेंढी पालन करणारे असे दोन्ही प्रकारचे लाभार्थी पात्र राहतील. भटक्या जमाती प्रवर्गातील बचत गटांना, पशुपालक उत्पादक कंपन्यांना लाभार्थी म्हणुन प्राधान्य देण्यात येईल. मेंढीपालन करण्याबाबत स्थायी व स्थलांतरीत याबाबत कार्यक्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अपत्य दाखला, प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत, असेही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
0000000


Friday, November 3, 2017

वाचनाशी एकरुपता देते वेगळीच अनुभूती
--- नयन बाराहाते
नांदेड, दि. 3:- वाचन करतांना तल्लीन होऊन वाचना-यास आणि जे आपण वाचतो त्यात तेवढया कमालीची ताकद असल्यास त्यातील वातावरणाचा आपल्या सभोवती प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. एकदंरीत वाचनाशी एकरुपता ठेवल्यास वेगळीच अनुभूती होत असल्याचे प्रतिपादन चित्रकार नयन बाराहाते यांनी केले.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,नांदेडच्या वतीने आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते.
जेष्ठ साहित्यिक डॉ.भगवान अंजनीकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास कथाकार मधुकर धर्मापुरीकर,जेष्ठ साहित्यिक डॉ.केशव देशमुख,प्रकाशक दत्ता डांगे,संपादक राम शेवडीकर,गजलकार बापू दासरी,निवेदक देवदत्त्साने,जेष्ठ कवी महेश मोरे,साहित्यिक दिलीप पाध्ये,कवी अमृत तेलंग यांची उपस्थिती होती.
दत्ता डांगे यांनी दिवाळी अंक मराठी साहित्याचे वैभव असून प्रत्येक वाचकांनी दिवाळी अंक आवर्जून वाचावयास हवे असे सांगितले. देवदत्त साने यांनी काही ठराविक दिवाळी अंकामधील कोणत्या विषयावरील लिखाण वाचकांनी वेळात वेळ काढून वाचावे या बाबत त्यांनी सागितले.बापू दासरी व महेश मोरे यांनी मनोगता सोबत आपल्या कवितेतून उपस्थितीतांशी संवाद साधला.कथाकार मधुकर धर्मापुरीकर यांनी आपल्या मनोगतातून दिवाळी अंकांमध्ये  आपल्या जिल्हयातील साहित्यिकांचा सहभाग लक्षणीय असल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतातून डॉ.भगवान अंजनीकर यांनी दिवाळी अंकाच्या समृध्दशाली परंपरेचा उल्लेख  करुन विविध विषयाला  वाहिलेले दिवाळी अंक वाचकांसाठी दिवाळी पूरतीच नव्हे तर वर्षभर पुरणारी बौध्दीक मेजवानी असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी तर सुत्रसंचालन तांत्रिक सहाय्यक प्रताप सुर्यवंशी यांनी केले.कार्यक्रमास ग्रंथपाल आरती कोकूलवार,यशवंत राजगोरे,रामगढिया,ॲड श्रीनिवास शेजूळे,गजानन कळके, संजय पाटिल,भानूदास पवळे,मुक्तीराम शेळके,बालाजी कदम,नवनाथ कदम  .सह विदयार्थी व वाचक उपस्थित होते.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय कर्वे,अजय वटटमवार,कोडिंबा गाडेवाड यांनी सहकार्य केले.             
****  


संस्थेच्या विश्वस्तांना सुचना
नांदेड, दि. 3:- सर्व संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, संस्था स्थापन केल्यापासून ज्या संस्थांची हिशोब पत्रके (ऑडिट रिपोर्ट) दाखल करण्यात आलेली नाहीत. त्या संस्थांची नोंदणी रद्द करण्यासाठी कार्यालयातर्फे यादी तयार करण्यात आलेली असून सदरची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. तरी सर्व संबंधित संस्थेच्या विश्वस्तांना सुचित करण्यात येते की, त्यांनी कार्यालयातील प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीचे निरीक्षण करुन घ्यावे. तसेच आपल्या संस्थेची नोंदणी का रद्द करण्यात येवू नये. या बाबतचा खुलासा खालील नेमून दिलेल्या तालुक्याच्या दिवशी व कार्यालयातील न्याय कक्षात प्रत्यक्ष हजर राहून अथवा वकीलामार्फत सकाळी ठिक 11-00 वाजता सादर करावा.
कार्यालयात वरील ठिकाणी सुनावणीच्या वेळी आपल्या सबळ पुराव्यासह आपले म्हणने मांडण्यासठी सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे, अन्यथा आपण गैरहजर राहिल्यास आपले कांहीही म्हणने नाही, असे गृहीत धरुन आपली संस्था नोंदणी रद्द करण्यासंबंधिची नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे नांदेड विभागाचे सौ. प्रणिता श्रीनीवार यांनी कळविले आहे.

****
 कंधार येथे शैक्षणिक परिसरात तंबाखू जप्त करून केली होळी
             
        
नांदेड, दि. 3:-  तंबाखू नियंत्रण कायदा २००३ नुसार शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखू  व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे हा गुन्हा आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.पी.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालय, कंधार येथे अचानक टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये सदरील परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाच्या निदर्शनास आलेतेंव्हा सदरील विक्रेते हे प्राप्त तक्रारीनुसार कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले. करिता कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकामार्फत सदरील तंबाखू विक्रेते यांच्याकडून प्रत्येकी २०० प्रमाणे एकूण १४०० रुपये इतका दंड आकारण्यात आला तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. उपस्थित जनसमुदाय यांच्यासमक्ष जनजागृती करून सदर जप्त केलेला साठ्याची होळी करण्यात आलीसदरील पथकात जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, जिल्हा समन्वयक डॉ. प्रदीप  बोरसे, डॉ. राहुल अन्नापुरे, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक  प्रकाश आहेर व स्थानिक पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक  एस. एस. भारती व सहकारी होते. या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याअंतर्गत कोणत्याही शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू  व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास १८००११०४५६ या टोलफ्री क्रमांकावर तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखूमुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे असे आव्हान जिल्हा शल्य चकित्सक डॉ. बी.पी.कदम यांनी केले आहे.

****  

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...