Monday, November 6, 2017

"राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क"
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 6 :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज https://mahadbt.gov.in करण्याचे आवाहन डॉ. शैला सारंग सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड यांनी केले आहे.  
राज्य शासनाकडून सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी https://mahadbt.gov.in हे संकेतस्थळ संचालक, माहिती व तंत्रज्ञान (DIT) यांचेमार्फत विकसीत करण्यात आले आहे. या संकेतस्थळामध्ये शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, विभागाच्यावतीने शिष्यवृत्ती योजनेचा समावेश करण्यात आला आहे. देय होणाऱ्या वित्तीय लाभाची सर्व रक्कम लाभार्थी विद्यार्थ्याच्या आधार संलग्नीत बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी स्वत:ची नोंदणी करणे, अर्ज भरणे, अर्ज भरण्यापासून ते रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्याची सर्व प्रक्रिया आता राजर्षी DBT पोर्टल मार्फत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केल्याबाबची सुचना DBT पोर्टलद्वारे प्रत्येक महाविद्यालयात दिली जाईल. त्यामुळे संबंधित विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी कोणत्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम घेवू नये. तसेच कोणत्याही आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची पीळवणूक होणार नाही याची योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थेची असेल.
उच्च शिक्षण, नांदेड विभाग, नांदेड विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती (ईबीसी), अहिंदी भाषीक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, एकलव्य आर्थिक सहाय्य योजना, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना, राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती योजना, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना, माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना, गणित व भौतिक विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.
ऑनलाईन नोंदणीची पुर्वतयारी करताना विद्यार्थ्याने आपला आधार क्रमांक काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने कोअर बँकींग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने आपला मागील परीक्षा उत्तीर्ण झालेला दाखला व गुणपत्रक, जन्मतारखेचा पुरावा, रहिवाशी दाखला, उत्पन्न दाखला, प्रवेशित महाविद्यालयाची माहिती आभ्यासक्रमाचा कालावधी, बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे तयार ठेवावीत.
नोंदणी कशी करावी- आपण कोणत्याही ब्राऊजरचा वार करुन (उदा. Internet Explorer (I.E.)/Google Chrome/ Mozilla firefox etc.), https://mahadbt.gov.in या वेबसाईटवर जाऊन "नविन नोंदणी" या बटणावर क्लिक करावे. प्रत्येक विद्यार्थ्याने Maha-DBT पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. "आधारकार्ड आहे" असेल तर "होय" व नसेल तर "नाही" वर क्लिक करा. त्यानंतर "OTP" हा पर्याय निवडा. वैध आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP पाठवा बटन क्लिक करा. मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP (One Time Password) टाकून "पडताळणी करा" हे बटन क्लिक करा. उपलब्ध विंडोमध्ये नांव, जन्मदिनांक, फोन नंबर, पत्ता, आधार संलग्न बँक खाते नंबद इ. आधार कार्ड वरील माहिती आपोआप दिसेल. आधार क्रमांक नसल्यास "आधार कार्ड नाही" हा पर्याय निवडा आणि आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे अपलोड करावे. नोंदणी अर्जाच्या विंडो मधील सर्व माहिती भरावी. स्वत:चा युजर नेम व पासवर्ड तयार करावा.
अर्ज कसा भरावा - महाडीबीटी पोर्टलवर लॉगइन करण्यासाठी "सिलेक्ट युजर मध्ये जावून" विद्यार्थी हा पर्याय निवडा. युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगइन व्हा. लॉगइन झाल्यानंतर विंडोज मधील "योजना तपशिल" यावर क्लिक करा. यानंतर विभागवार योजना आपण पाहून निवडू शकता. आपण ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे त्या योजनेच्या नांवासमोर "पहा" क्लिक केले असता योजनेची सर्व माहिती दिसू शकेल. त्यानंतर कोणत्या योजना (मॅट्रिक पुर्व/ मॅट्रिकोत्तर साठी आपण पात्र आहात त्याची खात्री करा व पर्याय क्लिक करा. (उदा. शालेय विद्यार्थ्यांनी "मॅट्रिकपुर्व व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी "मॅट्रिकोत्तर" हा पर्याय निवडावा.) आवश्यक ती सर्व माहिती उदा. जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवाशी, अपंगत्व, कौटुंबिक उत्पन्न इ. सॉफ्टवेअरमध्ये काळजीपुर्वक भरावी. आवश्यक ते कागदपत्रे, पालकांची माहिती, शाळा व महाविद्यालयाचा तपशिल नमुद करावा.आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी. (रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, एसएससी प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इ.) अभ्यासक्रमाचा तपशिल, मागील परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा तपशिल इ. सर्व माहिती अर्जदाराने भरावयाची आहे आणि सबमिशन पेज मधील सादर या बटनवर क्लिक करावयाचे आहे. विद्यार्थी/ पालकांना काही आडचण असल्यास त्यांनी 18001025311 या टोल फ्री क्रमांकावर किंवा helpdesk@mahadbt.gov.in या मेल आयडीवर संपर्क करावा.

महाविद्यालयासाठी सुचना :- महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन करणे व अर्ज भरण्यासाठी सहकार्य करावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्याकडून प्रवेशाच्या वेळी कोणतेही शुल्क स्वीकारु नये. विद्यार्थ्यांना आधार क्रमांक काढणे, कोअर बँकींग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते उघडण्यासाठी सुचना द्याव्यात. आपल्या महाविद्यालयाचे नांव, महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमाची नांवे, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता महाविद्यालयाच्या व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश याबाबतची माहिती पोर्टलवर मॅप करण्यासाठी संचालनालयास सादर करुन ती मॅप करुन घेण्याची कार्यवाही करावी. महाविद्यालय, त्यांचा अभ्यासक्रम, त्यांची प्रवेश क्षमता, अभ्यासक्रमाचा कलावधी, शुल्क रचना इ. माहिती पोर्टलमध्ये समावेश (मॅप) करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल त्यासाठी ज्या प्राधिकाऱ्यांनी (Authority) मान्यता दिली आहे त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन नांदेड उच्च शिक्षण विभागीचे सहसंचालक डॉ. शैला सारंग यांनी केले आहे.
000000 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...