Tuesday, April 25, 2017

 वेतन पडताळणी पथकाचा
मे 2017 महिन्यातील दौरा
नांदेड, दि. 25 :- वेतन पडताळणी  पथकाचा माहे मे 2017 मधील नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक मंगळवार 23 मे 2017 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व बुधवार 24 मे ते शुक्रवार 26 मे 2017 या काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी  हे  पथक या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील.
वेतन पडताळणीस सेवा पुस्तके सादर करण्यापुर्वी शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर 1299/प्र.क्र.5/99/सेवा-10 दि. 20 जानेवारी 2001 चे सोबत जोडलेले विवरणपत्र संबंधितांच्या सेवा पुस्तकात लावून त्याप्रमाणे सेवा पुस्तके पडताळणीस सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणीस सादर करताना पुढील एक वर्षात सेवा निवृत्ती होणारी प्रकरणे, मयत, न्यायालयीन, लोकायुक्त प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणी पथकाकडे सादर करताना संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोष मधील वेतनिका प्रमाणित डीडीओ लॉगीन करावे डीडीओ लॉगीन करण्यासाठी बीडीएससाठी वापरण्यात येत असलेले युजरनेम आणि पासवर्ड वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करावयाची आहे त्या कर्मचाऱ्यांचे सेवार्थ Employee ID टाकून Submit करावे. म्हणजे लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक यांच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या तपशिलासह पत्र तयार होईल. त्याच पत्रासह सेवापुस्तके पडताळणीसाठी  पथकाकडे  सादर  करावीत, असे सूचित केले आहे. 

0000000
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 25 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा  27 एप्रिल 2017 रोजी सकाळी 6 वाजेपासून 26 मे 2017 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

00000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 25  :- जिल्ह्यात सोमवार 8 मे 2017 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील उत्सव, मिरवणुकांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात मंगळवार 25 एप्रिल 2017 ते सोमवार 8 मे 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

000000
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 25 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच  कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर  समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त  व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

00000

Monday, April 24, 2017

हिवताप आजाराची नागरिकांनी काळजी घ्यावी
आरोग्य विभागाचे आवाहन; आज जागतिक हिवताप दिन  
नांदेड दि. 24 :-  जागतीक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषीत केला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयातीन सर्व आरोग्यसंस्थेत मंगळवार 25 एप्रिल 2017 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. भविष्यात या आजाराचा उद्रेक होवू नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्यादृष्टिने नागरिकांनी जागरुक रहावे व या आजाराची लक्षणे आढळुन आल्यास वेळीच नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.  
जिल्हयात डेंग्यु, हिवताप आजार वाढणार नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. हिवताप आजारात रुग्णास थंडी वाजून ताप येतो व हुडहुडी भरते. हा ताप एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड येतो. अंग दुखणे, डोके दुखणे तसेच रुग्णास पांघरुण घ्यावे वाटते व नंतर घाम येवून ताप कमी होतो आणि रुग्णास थकवा येतो. यासाठी हिवतापाचे लवकर निदान व त्वरीत उपचार करुन घ्यावेत. उपचार न केल्यास वारंवार ताप येवून रुग्ण बेशुध्द होवू शकतो. डेंग्युच्या लक्षणात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायु दुखी होवून उलटया होणे, डोळयाच्या आतील दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातुन रक्त स्त्राव होणे, अशक्तपणा, भुख मंदावणे, तोंडाला कोरड पडणे ही लक्षणे दिसून येतात.
हिवताप आजारावर मात करण्यासाठी पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपाययोजना जनतेने राबविणे गरजेचे आहे. घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक दिवस निश्चित करुन रिकामे करावेत या साठयातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरडा करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत.             
आंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत. त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावे. पांघरुन घेवून झोपावे.  संध्याकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुन घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवू किंवा रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादीची वेळीच विल्हेवाट लावावी. संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.
या सर्व रोगाची तपासणी व उपचार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवील त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

00000
जिल्हा रुग्णालयातील बुधवारचे
रोगनिदान शिबीर रद्द
नांदेड दि. 24 :- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे बुधवार 26 एप्रिल 2017 रोजी विशेष रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाढते तापमान लक्षात घेता रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून हे शिबीर स्थगीत करण्यात आले आहे. पुढील शिबिराचा दिवस नंतर कळविण्यात येईल याची संबंधीत रुग्ण व आरोग्य संस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी केले आहे.

00000
ग्रंथामुळे जीवना समृद्धी - डॉ हंबर्डे
नांदेड दि. 24 :-  शिक्षणाने मनुष्य शिक्षित होतो परंतु सुसंस्कृत होण्यासाठी अवांतर व चौफेर वाचन गरजेचे आहे. ग्रंथ वाचनाने व्यक्तिमत्व फुलण्यास मदत होते. ग्रंथामुळे जीवन समृद्ध होते, असे प्रतिपादन महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. गोविंद हंबर्डे यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे जागतिक ग्रंथदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी डॉ. श्रीकांत लव्हेकर, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, ग्रंथ विक्रेते सुधीर देबडवार, ज्ञानविश्व साप्ताहिकाचे संपादक रमेश मस्के, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, मनपाचे ग्रंथपाल संजीव कार्ले, सेतू अभ्यासिकेचे ग्रंथपाल बाळू पावडे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी ग्रंथराजच्या प्रतिकृतीचे पूजन मान्यवरांचे हस्ते झाल्यानंतर ग्रंथभेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी प्रस्ताविकातून जागतिक ग्रंथ दिनाचे महत्व  व कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विशद केली. डॉ.लव्हेकर यांनी उपस्थितांना वाचनाची गोडी लावून घेणं आवश्यक असल्याचे सांगून ग्रंथाचे महत्व याविषयी माहिती दिली. याप्रसंगी निर्मलकुमा सूर्यवंशी व सुधीर देबडवार यांचीही समायोचीत भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय वट्टमवार यांनी केले तर आभार मुक्तीराम शेळके यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन कोंडीबा गादेवा, सोपान येनगुलवाड, रघुवीर श्रीरामवार यांनी केले.

000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...