Tuesday, November 15, 2016

 वेतन पडताळणी पथकाचा
नोव्हेंबर 2016 महिन्याचा दौरा
नांदेड, दि. 15 :- वेतन पडताळणी  पथकाचा माहे नोव्हेंबर 2016 चा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक मंगळवार 22 नोव्हेंबर 2016 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व बुधवार 23 नोव्हेंबर ते शुक्रवार 25 नोव्हेंबर 2016 या काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी  हे  पथक या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील.
वेतन पडताळणीस सेवा पुस्तके सादर करण्यापुर्वी शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर 1299/प्र.क्र.5/99/सेवा-10 दि. 20 जानेवारी 2001 चे सोबत जोडलेले विवरणपत्र संबंधितांच्या सेवा पुस्तकात लावून त्याप्रमाणे सेवा पुस्तके पडताळणीस सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणीस सादर करताना पुढील एक वर्षात सेवा निवृत्ती होणारी प्रकरणे, मयत, न्यायालयीन, लोकायुक्त प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणी पथकाकडे सादर करताना संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोष मधील वेतनिका प्रमाणित डीडीओ लॉगीन करावे डीडीओ लॉगीन करण्यासाठी बीडीएससाठी वापरण्यात येत असलेले युजरनेम आणि पासवर्ड वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करावयाची आहे त्या कर्मचाऱ्यांचे सेवार्थ Employee ID टाकून Submit करावे. म्हणजे लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक यांच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या तपशिलासह पत्र तयार होईल. त्याच पत्रासह सेवापुस्तके पडताळणीसाठी  पथकाकडे  सादर  करावीत, असे सूचित केले आहे. 

0000000
सामाजिक न्याय विभागाकडून
शिष्यवृत्ती अर्ज पुर्ततेबाबत आवाहन
नांदेड, दि. 15 :- भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी परिक्षा फी येाजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र, इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. शैक्षणिक वर्ष 2011-12 ते 2015-16 मधील प्रकरणे निकाली काढण्यासाठी कार्यवाही प्राधान्यांने करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे महाविद्यालयाकडे सादर करावीत व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज 21 नोव्हेंबर 2016 पूर्वी समाज कल्याण कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2011-12 ते 2015-16 मधील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्याचे अर्ज अद्याप महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. शैक्षणिक वर्ष 2011-12 ते 2015-16 मधील महाविद्यालयस्तरावरील प्रलंबित अर्ज तसेच कागदपत्राअभावी प्रलंबित असलेले कार्यालयस्तरावरील अर्जाच्या त्रुटीची पुर्तता सोमवार 21 नोव्हेंबर 2016 पुर्वी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

000000
मतदारांना निर्भयपणे अधिकार बजाविण्यासाठी
यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे - डॉ. पाटील
विधान परिषद निवडणुकीसाठी प्रशिक्षण संपन्न

नांदेड , दि. 15 :- विधान परिषद निवडणुकीत मतदारांना निर्भयपणे मतदानाचा अधिकार बजाविता येईल, अशा रितीने निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी करा, असे निर्देश विधान परिषद नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाचे निवडणूक निरिक्षक डॅा. जगदीश पाटील यांनी आज येथे दिले. नांदेड विधान परिषद निवडणुकीसाठी शनिवार 19 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक यंत्रणेतील मतदान केंद्राध्यक्ष तसेच सुक्ष्म निरीक्षक अशा विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज संपन्न झाले. या प्रशिक्षणा दरम्यान डॅा. पाटील बोलत होते.
डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झालेल्या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहायक जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, अनुराधा ढालकरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॅा. पाटील मार्गदर्शनात म्हणाले की, अन्य कोणत्याही निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीसाठीही अत्यंत पारदर्शीपणे कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी. सुक्ष्म निरिक्षकांप्रमाणेच या निवडणुकीसाठी नियुक्त विविध पातळ्यांवरील अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे. मतदान केंद्रावरील व्यवस्थेबाबत काटेकोर नियोजन करण्यात यावे. मतदारांना निर्भयपणे मतदानाचा अधिकार बजाविता येईल, यासाठी विविध पातळ्यांवरील अधिकाऱ्यांनी समन्वय राखावा. अवैध बाबींवर तातडीने कारवाई करण्यासाठीही संपर्क-समनव्य राखण्यात यावा.
            जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी बैठकीत मतदान प्रक्रियेशी निगडीत विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रिया पुर्ण गोपनीय आहे. त्यामुळे या प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी प्रयत्न करावेत. मतदाराला मतदान केंद्रात ओळखपत्राशिवाय कोणतीही गोष्ट बाळगता येणार नाही. मतदारांना मतदानासाठी सर्वोतोपरी मदत करतानाच, निवडणूक प्रक्रियेतील गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठीचे प्रशिक्षणही संपन्न
जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद व दोन नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठीही अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. त्याअनुषंगानेही जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती व त्या-त्या नगरपरिषदांसाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी, सुक्ष्म-निरीक्षक यांचेही प्रशिक्षण संपन्न झाले.
त्यामध्येही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी निवडणूक कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी, आचारसंहितेचे काटेकोर पालन याबाबत निर्देश दिले. उपजिल्हाधिकारी श्री. कांबळे तसेच उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, दिपाली मोतीयेळे यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध मुद्यांवर सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.

----------

Sunday, November 13, 2016

निवडणूक निरीक्षक डॉ. पाटील यांना भेटता येणार
            नांदेड दि. 13 :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानीक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक निरीक्षक डॉ. जगदीश पाटील हे नांदेड येथे उपलब्ध राहणार आहेत. मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे त्यांना भेटता येणार आहे , असे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.
डॉ. पाटील यांच्याकडे निवडणूक कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत तसेच आचारसंहिता आणि अनुषंगीक बाबींबाबत त्यांच्याकडे सूचना , माहिती , तक्रारी दाखल करता येतील. त्यासाठी मंगळवार 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत सकाळी 10 ते 11 यावेळेत मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे उपलब्ध राहतील. त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक – 8879222001 असा आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने केले आहे.

000000

Saturday, November 12, 2016

निवडणूक निरीक्षक डॉ. पाटील यांना आजपासून भेटता येणार
            नांदेड दि. 12 :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानीक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक निरीक्षक डॉ. जगदीश पाटील रविवार 13 नोव्हेंबर 2016 पासून नांदेड येथे उपलब्ध राहणार आहेत. मिनी शासकीय विश्रामगृह येथे त्यांना भेटता येणार आहे, असे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.
डॉ. पाटील यांच्याकडे निवडणूक कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत तसेच आचारसंहिता आणि अनुषंगीक बाबींबाबत त्यांच्याकडे सूचना, माहिती , तक्रारी दाखल करता येतील. त्यासाठी रविवार 13  नोव्हेंबर ते मंगळवार 15 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी दहा ते अकरा या वेळेत मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे येथे उपलब्ध राहतील. त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक – 8879222001 असा आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने केले आहे.
समाजमनाला दिलासा देण्याच्यादृष्टीने
लोकअदालत उपक्रम महत्त्वपुर्ण - न्या. बारणे
राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन संपन्न
नांदेड, दि. 12 :- समाजाची घडी बसविण्याच्यादृष्टीने, समाजमनाला दिलासा देण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय लोक अदालतीचा उपक्रम महत्त्वपुर्ण असल्याचे प्रतिपादन , प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता टी. बारणे यांनी आज येथे केले. जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन न्या. बारणे यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात झालेल्या उद्घाटन समारंभासाठी व्यासपीठावर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, महानगरपालिकेचे आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव ए. आर. कुरेशी, नांदेड अभियोक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. मिलिंद एकताटे, जिल्हा सरकारी वकील ॲड. अमरिकसिंघ वासरीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे यांची उपस्थिती होती.
समारंभास जिल्हा न्यायाधीश ए. एल. यावलकर, न्या. व्ही. के. मांडे, न्या. श्रीमती एस. एस. तोडकर, न्या. जी. बी. गुरव, न्या. ए. एस. सय्यद, न्या. जी. ओ. अग्रवाल, न्या. डी. टी. वसावे, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एन. सचदेव, एम. के. सोरटे,  जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक पी. एस. तुप्तेवार, जिल्हाधिकारी कार्यालयाचे विधी अधिकारी ॲड. आनंद माळाकोळीकर, ज्येष्ठ विधीज्ज्ञ आदींची उपस्थिती होती.
लोकअदालतीसाठी आठ पॅनल स्थापन करण्यात आली असून, याठिकाणी पॅनेल अध्यक्ष तसेच विधीज्ज्ञ व पक्षकारांच्या उपस्थितीत विविध प्रकरणांबाबत कार्यवाही करण्यास सुरवात झाली.
उद्घाटनपर भाषणात न्या. बारणे म्हणाल्या की, राष्ट्रीय लोक अदालत हा महत्त्वपुर्ण उपक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात येतो. या उपक्रमामुळे सलोख्याने, समेटाने प्रकरणे निकाली निघत असल्याने न्यायालयीन व्यवस्थेवरील ताण कमी होतो. नांदेड जिल्ह्यातील न्यायाधीश, विधीज्ज्ञ आणि पक्षकारांच्या सहकार्यामुळे आतापर्यंत हजारो प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे. यामुळे विविध घटकांच्यावेळेचा आणि पैश्याचा अपव्यय टाळण्यात यश येते. त्याशिवाय पक्षकारांच्या जीवनात सुख-समाधानही येते.  प्रकरणे प्रलंबित राहण्यामुळे पक्षकारातील अन्याय्य झाल्याची भावनाही कमी होते. सामंजस्यांने प्रकरणे निकाली निघण्याने, अन्य महत्त्वपुर्ण आणि ज्यांना खरोखरच चांगला वेळ द्यावा लागणार आहे, अशा प्रकरणांवर लक्ष केंद्रीत करणे शक्य होते. विविध घटकांनी एकत्र येऊन लोकअदालतीचे आयोजन करण्याने समाजमनालाही मोठा दिलासा मिळतो.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, आपल्या राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वातच सकारात्मकतेचा अंतर्भाव आहे. त्यामुळे मनुष्यबळ, उत्पन्नाचा वाटा अनावश्यक वादांमध्ये खर्च होऊ नये यासाठी राष्ट्रीय लोक अदालत महत्त्वपुर्ण आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक श्री. येनपुरे, मनपा आयुक्त श्री. उन्हाळे, अभियोक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. एकताटे, जिल्हा सरकारी वकील ॲड. वासरीकर यांचीही समयोचित भाषणे झाली.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने समारंभाचा प्रारंभ झाला. विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव न्या. कुरेशी यांनी प्रास्ताविकात या लोकअदालीतीत सुमारे 4 हजार 136 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आल्याची माहिती दिली. ॲड. विजय गोणारकर यांनी सुत्रसंचालन केले. ॲड. प्रवीण आयचित यांनी आभार मानले.

00000000

Friday, November 11, 2016

बिहारचे राज्यपाल कोविंद यांचे
शासकीय विश्रामगृह येथे स्वागत
नांदेड, दि. 11 :-  बिहारचे राज्यपाल राम नाथ कोविंद यांचे आज नांदेड दौऱ्यासाठी येथे आगमन झाले. राज्यपाल श्री. कोविंद यांचे शासकीय विश्रामगृह नांदेड येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यासोबतच राज्यपाल श्री. कोविंद यांचे महानगरपालिका आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांनीही पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार पी. के. ठाकूर, तहसिलदार महादेव किरवले, तहसिलदार किरण अंबेकर आदींची उपस्थिती होती. आगमनानंतर मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे राज्यपाल श्री. कोविंद यांनी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्याकडून जिल्हासंबंधी विविध विषयांची माहिती घेतली.
0000000

तोडकर / आरेवार 11.11.2016

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...