Tuesday, September 20, 2016

कापूस, सोयाबीन पिकांवरील
किड नियंत्रणासाठी कृषि सल्ला
नांदेड दि. 20 :-   उपविभागीय कृषि अधिकारी देगलूर अंतर्गत देगलूर, मुखेड, नायगाव, बिलोली, धर्माबाद या पाच तालुक्यांसाठी सोयाबीन व कापूस पिकांसाठी क्रॉपसॅप योजनेअंतर्गत पिकावरील किडरोग सर्वेक्षणाचे काम चालू आहे. किडसर्वेक्षक, किडनियंत्रक यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार शेकऱ्यांनी वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी यांच्याकडून पुढील संदेश देण्यात आला आहे.
कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फ्रोफेनोफॉस 50 ईसी 3 मिली आणि रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी फलोनिक्यामिड 50 टक्के 0.2 ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. शेंदरी बोंडअळीमुळे होणाऱ्या नुकसानीकडे लक्ष दयावे.
सोयाबीन पिकावरील स्पोडोप्टेरा हेलिकोर्व्हापा आणि चक्रीभुंगा व्यवस्थापनासाठी क्लोरॅनट्रानोलिप्रोल 18.5 एससी प्रती 3 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 ईसी 2 एमएल लिटर पाण्यात मिसळून फवारावे. स्पोडोप्टेराच्या अंडीपुजा व समुहातील अळ्यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी देगलूर यांनी केले आहे.

0000000
मोटार सायकलसाठी नवीन मालिका
नांदेड दि. 20 :-  मोटार सायकल वाहनासाठी एमएच 26- एझेड ही नवीन मालिका गुरुवार 22 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे अर्ज गुरुवार 22 सप्टेंबर पासून स्विकारले जातील याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

Monday, September 19, 2016

ग्रंथालयांच्या बळकटीकरणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न
-        ग्रंथालय संचालक धांडोरे  
ग्रंथालयांसाठी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 19 :- महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ प्रभावी असून ग्रंथालयांच्या बळकटीकरणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न म्हणून राज्यात ई-ग्रंथालय उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी आज येथे सांगितले.
ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित एक दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. धांडोरे बोलत होते. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव पा. म. ताकटे होते. राजाराम मोहनरॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता व ग्रंथालय संचालनालय यांच्याअंतर्गत अर्थसहाय्याच्या विविध योजनांच्या माहिती संबंधी आयोजित या कार्यशाळेत तीन सत्रात मार्गदर्शन करण्यात आले. विजयनगर परिसरातील हनुमान मंदिर मंगल कार्यालयात कार्यशाळा संपन्न झाली.  
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी औरंगाबाद विभागाचे सहाय्यक ग्रंथसंचालक ए. मा. गाडेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गंगाधर पटने, ॲड बी. आर. भोसले, निर्मलकुमार सुर्यवंशी, प्रभाकर देशमुख, राजेंद्र हंबीरे आदींची उपस्थिती होती.
श्री. धांडोरे म्हणाले की , देशात सर्वाधिक सार्वजनिक वाचनालय महाराष्ट्रात आहेत. अशा ग्रंथालयांच्या माध्यमातून ज्ञानवर्धनाचे काम होत आहे. राज्यातील ग्रंथालयांसाठी विविध योजनाही सुरु करण्यात येत आहेत. ग्रंथालयांना अनुदान वेळेत व अनुषंगिक सुविधा देण्याबाबत नेहमीच प्रयत्न केला जातो. ग्रंथालयांचे बळकटीकरण हा महत्वपूर्ण विषय आहे. ग्रंथालयांच्या आधुनिकरणासाठी ई-ग्रंथालय ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 
जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, ग्रंथालयांनी भविष्याचा वेध घेऊन वाटचाल केल्यास त्यांना समाजाच्या सर्वच स्तरातून पाठबळ मिळेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्रंथ आणि वाचन संस्कृतीबाबत महत्व पटवून दिले आहे. त्यामुळे समाजाच्या विकासात ग्रंथालयांचे महत्व नेहमीच राहिले आहे.
यावेळी ग्रंथालय संघाचे अध्यक्ष पटने यांनीही ग्रंथालय चळवळीबाबत मांडणी केली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे क्षेत्रीय अधिकारी अनंत वाघ यांनी विविध योजनांची माहिती दिली. तिसऱ्या सत्रात सार्वजनिक ग्रंथालयाचे आधुनिकीकरण या विषयावर डॉ. गोविंद हंबर्डे, कैलास वडजे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ. जगदीश कुलकर्णी होते. या तिन्ही सत्रांचे सूत्रसंचालन देवदत्त साने यांनी केले.

00000
अठरा ते वीस वर्षाखालील मुलांना
वाहन चालविण्यावर निर्बंध 
नांदेड दि. 19 :- मोटार वाहन कायद्यानुसार 18 वर्षाखालील व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवण्याबाबत तसेच 20 वर्षाखालील व्यक्तीस विहित क्षमतेहून अधिक ताकदीचे वाहन चालवण्यास परवानगी नाही. याबाबत संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
 मोटार वाहन कायदा 1988 व केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 मध्ये नमूद केल्याप्रमाणे 18 वर्षाखालील वाहन चालविणाऱ्या मुलासंदर्भात वाहन मालकास शिक्षा करण्याचे तरतूद आहे.
मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम चार पोटकलम (1) अन्वये सार्वजनिक ठिकाणी 50 सीसीपेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविणाऱ्या व्यक्तीस व कलम अठरामध्ये सार्वजनिक ठिकाणी 20 वर्षाखालील व्यक्तीस व्यावसायीक वाहन चालविण्यास मान्यता नाही. मोटार वाहन कायद्याच्या कलम 180 मध्ये 18 वर्षाखालील व्यक्तीने वाहन चालविल्यास वाहन चालकास तुरुंगवास किंवा एक हजार रुपयापर्यंत दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.


00000

लेख -

राहूल कस्तूरे यांना मिळाला
बीज भांडवल योजनेचा आधार
            बालपण नांदेड शहरातच गेलं. माझ्या घरची परिस्थिती तशी बेताची. मला एक भाऊ व तीन बहीणी असा परिवार त्यात आई गृहीणी व वडील महाराष्ट्र परिवहन महामंडळात कामाला... तुटपुंज्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह. एक वर्षाचा असताना अंगात खूप ताप आला... औषधोपचारासाठी डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी ताप असतानाच इंजक्शन दिले. त्यात माझे दोन्ही पाय निकामी झाले. या आजारानंतर घरच्यांनी माझ्यासाठी खूप ठिकाणी उपचार केला. परंतू त्यांना यश आले नाही. त्यामुळे मला कायमचे अपंगत्व... मला चालता येत नसल्याने शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षण पुर्ण झाले. शिक्षण पुर्ण करत असतानाच स्व:ताचा व्यवसाय चालु केला. या व्यवसायासाठी मला देना बँक व जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने मदत केली. बीज भांडवल योजनेचा लाभ मिळाला. पानटपरीचा व्यवसाय सुरु केला. आजही अपंगत्वावर मात करुन खंबीरपणे हा व्यवसाय चालवित आहे.हे बोल आहेत राहूल माधवराव कस्तूरे यांचे.
नांदेड शहरातील तरोडा नाका परिसरातील राजेशनगर येथे राहणाऱ्या राहूलने 12 वी पर्यंतचे शिक्षण वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय वसरणी सिडको येथे पुर्ण केले. शिक्षणाबरोबर व्यवसाय चालु ठेवला. व्यवसाय करतानाच यशवंतराव चव्हाण मु्क्त विद्यापीठाच्या यशवंत महाविद्यालयातील अभ्यास केंद्रातून बी.ए. ची पदवी पुर्ण केली. त्यानंतर मराठी/इंग्रजी टंकलेखनाचा कोर्स पुर्ण केला. ही शैक्षणिक वाटचाल करताना त्याला खुप अडचणी आल्या त्यावर मात करत त्याने शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण पुर्ण झाल्यावर जवळपास 20 पेक्षा अधिक स्पर्धा परिक्षा दिल्या परंतू त्यात राहूलला यश आले नाही. घरची परिस्थिती बिकट असल्याने शिक्षण करावयाचे म्हणल्यावर थोडा विचार केला. 12वीत शिकत असताना त्याने सायकल टॅक्सीचा व्यवसाय सुरु केला. परंतू त्या व्यवसायात पाहिजे तेवढा नफा मिळत नव्हता. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या समाज कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तीच्या विविध योजनांची माहिती घेतली. त्यातील बीज भांडवल योजनेचा लाभ घेतला. यासाठी देना बँक, आनंदनगर, नांदेड यांचे सहकार्य त्याला लाभले.50 हजार रुपये कर्ज आणि 10 हजार रुपये सबसिडी मिळाली. त्यानंतर सायकल टॅक्सीचा व्यवसाय बंद करुन पानठेल्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. कारण हा व्यवसाय त्याच्यासाठी सोपा होता, यात फिरण्याची आवश्यकता नव्हती.
समाज कल्याणची बीज भांडवल योजना त्याच्यासाठी जिवनदायी ठरली. या योजनेतून व्यवसाय करण्याची संधी मिळाली. या व्यवसायावरच त्याला लग्नासाठी स्थळ आलं. आणि 2013 मध्ये लग्न झाले. सध्या एक मुलगी आहे. या व्यवयसायावर त्याचे घर चालते.त्यामुळे त्याच्यासाठी ही योजना जिवनदायी ठरली. याबाबत शासनाच्या बीज भांडवल योजनेचा ऋणी असल्याचे तो आवर्जुन सांगतो.
राहूलला वाचनाची खूप आवड आहे. त्याचा तो छंदही आहे. त्याला सामाजिक उपक्रम करायला आवडतं. स्व:ताच्या पैशातून दररोज 5 दैनिक वाचकांसाठी मोफत त्याच्या पानटपरीवर उपलब्ध करुन देतो. दिव्यांग व्यक्तीला सर्वात मोठा आधार कुटुंबाचा असतो. आई,वडील,भाऊ,बहीणी आणि पत्नी यांचा त्याला मोठा आधार आहे. हे सर्वच त्याचा आत्मविश्वास वाढवतात. मेहनत घेण्याच्या जिद्दीला साथ मिळाली बीज भांडवल योजनेची आणि यातून तो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

-         लोणेकर प्रितम तुकाराम
मो. 9860720646
  (लेखक जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आंतरवासिता करीत आहेत)


Saturday, September 17, 2016

शंकरराव चव्हाण स्मृतीसंग्रहालयास
राज्यमंत्री खोतकर यांची भेट
नांदेड, दि. 17 :- माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री दिवंगत डॅा. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती संग्रहालयास वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे भेट देऊन, दिवंगत डॅा. चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी उपस्थित जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी यांचाही यथोचित सत्कारही केला.
मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली डॅा. शंकरराव चव्हाण यांनीही सक्रीय सहभाग घेतला होता. यानिमित्ताने शारदा भवन एज्युकेशन सोसायाटीच्यावतीने या कार्यक्रमाये औचित्य साधण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगलाताई गुंडले, महापौर शैलजा स्वामी, आमदार अमर राजुरकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे,  मनपा आयुक्त समीर उन्हाळे, तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, जिल्हा परिषदेचे तसेच मनपाचे पदाधिकारी, अधिकारी आदींची उपस्थिती होती.   
स्मृतीसंग्रहालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते तसेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संग्रहालयातील प्रेक्षागृहात छायाचित्रकार होकर्णे प्रस्तुत कर्मयोगी या लघुपट प्रदर्शित करण्यात आला. उपस्थित स्वातंत्र्यसेनानी यांचा राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. राज्यमंत्री खोतकर यांनी स्मृतीसंग्रहालयाचीही मान्यवरांसोबत पाहणी केली.

0000000
शेतीपूरक व्यवसाय , प्रक्रिया उद्योगांद्वारे
जिल्ह्याच्या विकासाला दिशा देऊ या - राज्यमंत्री खोतकर
मुक्तीसंग्राम दिनी राष्ट्रध्वज वंदन; हुतात्म्यांना पुष्पचक्र, मानवंदनेने आदरांजली

नांदेड, दि. 17 :- आगामी काळात शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग तसेच वनउपजाद्वारेही रोजगार निर्मिती यांसह पशुसंगोपन व्यवसायासाठी नियोजनपुर्वक प्रयत्नातून जिल्ह्याच्या विकासासाठी दिशा देण्याचा प्रयत्न केले जातील , असा विश्र्वास वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी आज येथे व्यक्त केला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ मोठया दिमाखात संपन्न झाला. या समारंभात शुभेच्छापर संदेश देताना श्री. खोतकर बोलत होते. यावेळी उद्यानातील हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली तसेच मानवंदना देण्यात आली.  
ध्वजवंदनापुर्वी राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते हुतात्मा स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा परिषदच्या अध्यक्ष मंगलाताई गुंडले, महापौर शैलजा स्वामी, स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीच्यावतीने स्वातंत्र्य सेनानी नारायणराव भोगावकर, आमदार अमर राजुरकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे,  मनपा आयुक्त समीर उन्हाळे, गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक संदिप डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे आदींनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, पदाधिकारी, अधिकारी व जेष्ठ नागरिकांनीही पुष्पअर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.   
शुभेच्छापर संदेशात राज्यमंत्री श्री. खोतकर यांनी नांदेड जिल्ह्याने मराठवाडा मुक्तीसंग्रामात धडाडीने सहभाग नोंदविला असून, मुक्तीसंग्रामातून ध्येयाप्रती सर्वस्वाचा त्याग करण्याची प्रेरणा घ्यावी लागेल असे नमूद केले. श्री. खोतकर पुढे म्हणाले की, गेली तीन वर्षे निसर्गाने अवकृपा केली होती, पण यंदा चित्र वेगळे आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे, तर वेळेवर पेरण्या झाल्यामुळे पीक परिस्थिती चांगली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात उत्कृष्ट कामे झाली आहेत. त्यांचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. लोकसहभाग, जिल्हा प्रशासनाचे सुनियोजन आणि विविध घटकांचा सकारात्मक प्रतिसाद यांना अभियान यशस्वी करण्याचे श्रेय द्यावे लागेल. आगामी काळात जलसंवर्धनाची ही लोकचळवळ अशीच संवर्धित करुया, असे आवाहनही त्यांनी केले.
यापुढे कृषी क्षेत्राशी निगडीत विविध उपक्रमांवर भर द्यावा लागणार असल्याचे सांगून श्री. खोतकर म्हणाले की, शेतीमालाची साठवणूक, कृषि प्रक्रिया उद्योग तसेच शेतकऱ्याला बाजारपेठेशी संलग्न करणे, शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी शेतीपूरक उद्योग तसेच वनउपजाद्वारेही रोजगार निर्मिती यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पशूधन आणि त्यातील वैविध्य हे शेतीसाठी पूरक अशा उद्योगासाठी मोठी संधी असणारे क्षेत्र आहे. त्यामुळे पशुसंगोपन हा जोडधंदा न राहता तो मुख्य व्यवसायही होऊ शकतो. त्यासाठी पशुपालकांना प्रयोगशीलतेसाठी नेहमीच प्रोत्साहन देण्याचे धोरण राहील असेही त्यांनी सांगितले.
हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभासमोर पोलीस दलाच्या पथकाने सावधान सलामी, शोकशस्त्र, सलामी शस्त्र आणि मान्यवरांनी आदरांजली वाहिल्यानंतर हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. पोलीस वाद्यवृंद पथकानेही बिगूल धून वाजवून सलामी दिली. यावेळी सर्व उपस्थितांनीही हुतात्म्यांना मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रध्वजाचे वंदन आणि राष्ट्रीय सलामी झाली. याप्रसंगी जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिकेचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.  राज्यमंत्री श्री. खोतकर यांनी स्वातंत्र्य सेनानी व जेष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांना मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देतानाच त्यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. पोलीस निरीक्षक शामराव राठोड यांनी परेड कमांडर म्हणून संचलन केले. व्यंकटेश चौधरी, सुधीर रावळकर, स्नेहलता स्वामी यांनी समारंभाचे सुत्रसंचालन केले. या समारंभास नागरिक, विविध शाळेतील विद्यार्थी आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

0000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...