Thursday, November 28, 2024

वृत्त क्र. 1148

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील

लाभार्थ्यांनी 5 डिसेंबरपर्यत आधार पडताळणी करुन घ्यावी : मुख्य कार्यकारी अधिकारी

नांदेड दि. 28 नोव्हेंबर :- राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षावरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील एकूण 1 हजार 399 लाभार्थ्यापेकी 746 लाभार्थ्यांनी आधार पडताळणी पूर्ण केली आहे. परंतु अद्यापपर्यत 651 लाभार्थ्यानी आधार पडताळणी पूर्ण करणे बाकी आहे. आधार पडताळणी बाकी असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी 5 डिसेंबर पर्यंत आधार पडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्य मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत 34 हजार 600 कलाकार व साहित्यिक यांचा समावेश आहे.  त्यांना एप्रिल 2024 पासून सरसकट 5 हजार रुपये मानधन देण्यात येते. ही प्रत्यक्ष लाभाची योजना असल्यामुळे, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे मानधन अदा करण्याबाबत शासनाचे धोरण आहे. ज्या लाभार्थ्यांनी आधार पडताळणी केलेली आहे. त्यांना माहे मे महिन्याचे मानधन डीबीटीमार्फत देण्यात आलेले आहे. ज्यांची आधार पडताळणी झालेली नाही त्या कलाकारांना विशेष बाब म्हणून मे महिण्याचे मानधन डीबीटीमार्फत देण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे मानधन दिल्यामुळे कलाकारांना मानधन मिळण्यात कालापव्यय होणार नाही. लाभार्थ्यांना मानधनाबाबतची माहिती, मानधन मिळण्याच्या अगोदर व मिळाल्यानंतर मोबाइलवर संदेशाच्या रुपाने वेळोवेळी देता येईल. मानधन रक्कम खात्यात जमा होताना कोणतीही तांत्रिक चूक होणार नाही, मानधन मिळाले नाही किंवा परत गेले अशा प्रकारच्या बाबी घडणार नाहीत.

प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण डीबीटी प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकाची पडताळणी करणे ही वैयक्तीक लाभार्थ्याचीच जबाबदारी आहे. कारण अन्य कोणतीही व्यक्ती अशा प्रकारची पडताळणी करु शकत नाही. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी मोबाईलवरुन किंवा सेतू सुविधा केंद्रातून आधार पडताळणी करणे आवश्यक आहे. आधार पडताळणी करण्याआधी लाभार्थ्यांनी मोबाईल क्रमांक आधारला जोडणे आवश्यक आहे. आधार पडताळणी करण्याआधी लाभार्थ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधारक्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. परंतु या लाभार्थ्यांना हे करण्यास अडचण व माहितीचा अभाव असल्याने त्यांना  शक्य होणार नाही. तेव्हा सर्व गट विकास अधिकारी यांना आधार पडताळणी करण्यासाठी व वारसा नोंद करण्यासाठी https://mahakalasanman.org/AadharVerification.aspx ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे यांची नोंद घ्यावी, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 1147

जिल्ह्यात पशुगणना सुरु ; नागरिकांनी गणनेत सहभागी होवून माहिती देण्याचे सहकार्य करावे

नांदेड दि. २८ नोव्हेंबर : केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक 21 वी पशुगणना 25 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होत आहे. नांदेड जिल्ह्यात या कामासाठी 308 प्रगणक व 79 पर्यवेक्षक यांची नियुक्ती पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आलेली आहे. या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन, पशुधनाची माहिती घेणार आहेत. प्रत्येक गाव व शहरातील प्रगणक नागरिकांशी संवाद साधून माहिती गोळा करणार आहेत. तरी नागरिकांनी या गणनेत सहभागी होऊन योग्य माहिती प्रगणकास देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे. 

ग्रामीण भागात प्रमुख कृषीपूरक व्यवसाय म्हणून पशुधनास संबोधले जाते. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. दूध, अंडी, लोकर आदींच्या उत्पादनामुळे पोषण सुरक्षेसोबत ग्रामीण उपजीवीकेलाही चालना मिळते. पशुपालन क्षेत्राचा शाश्वत विकास घडविण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून पशुपालकांना प्रोत्साहन देते. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाद्वारे पशुपालन वाढविण्यावर शासनाचा भर आहे. 

या पशुधनाच्या माहितीमध्ये कुटूंबामध्ये असलेल्या गाय, म्हैस, शेळी व मेंढी, वराह, घोडे व गाढव, कुक्कुट पक्षी इत्यादीच्या संख्येची नोंद मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे.  पशुसंवर्धन विभागातील योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या पशूंची नोंद होणे आवश्यक आहे. पशुगणनेमध्ये पशुधन संख्येसोबतच पशुधनाच्या प्रजाती, लिंग, वय इत्यादी बाबीची नोंद करण्यात येणार आहे. यापूर्वीची पशुगणना टॅब द्वारे करण्यात आली होती. आताची मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र ॲपची निर्मिती केलेली आहे. 

पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत असलेल्या पशुगणनेमुळे पशुपालकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे, दुधाचे अनुदान, पशुरोग प्रतिबंधक लसीकरण, वैरण बियाणे, पशुखाद्य, पशू औषधी, मुरघास, खनिज मिश्रण, पशुधन विमा इत्यादी योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे. पशुगणनेत प्रगणकांना स्वत:च्या मोबाईल ॲप वापरुन माहिती संकलित करावी लागणार आहे. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह, उंट, घोडा, गाढव, मिथून अशा 15 प्रजातींची माहिती जमा केली जाणार आहे. तसेच 219 स्वदेशी जातींची नोंद केली जाणार आहे.

00000

 वृत्त क्र. 1146

ई - पीक पाहणी प्रक्रीया पूर्ण करा

शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी आवश्यक

नांदेड दि. २८ नोव्हेंबर :  शेतकऱ्यांना कोणत्याही लाभासाठी यापुढे ई - पीक पाहणी प्रक्रीया पूर्ण करणे आवश्यक होणार आहे. त्यामुळे भवीष्यातील सर्व लाभ मिळण्यासाठी ही प्रक्रीया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम २०२४ पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅप द्वारे पीक नोंदणी करावयाची आहे. दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम २०२४ सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहायक स्तरावरुन मोबाईल अॅपद्वारे पिकांची नोंद करण्यात येणार आहे. तद् अनुषंगाने रब्बी हंगाम २०२४ करिता शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी दि.१ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.

त्‍याकरिता ई-पीक पाहणी  (DCS) V 3.0.3 डाऊनलोड करावे. तसेच डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मध्ये गटाच्या हद्दीवर आधारित Geo Fencing बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजेच जोपर्यंत संबधित खातेदार निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही तो पर्यंत पिकांचे छायाचित्र काढता येत नाही व पीक पाहणी upload करता येत नाही.

तरी जिल्‍हयातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींना आवाहन करण्यात येते कि, त्यांनी रब्‍बी हंगाम २०२४ साठी ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही.

00000

Wednesday, November 27, 2024

 वृत्त क्र. 1145 

सत्यापनकर्ता (व्हेरीफायर) लॉगिन मधून पीक पाहणी दुरुस्तीची कार्यपद्धत

 

नांदेड दि. 27 नोव्हेंबर : संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम-2024 पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCSमोबाईल अॅपद्वारे पीक नोंदणी करण्यात येणार आहे. पीक पाहणी दुरुस्तीबाबत कार्यपद्धती नमूद केल्या आहेत. गाव नमुना बारामध्ये जाहिर केलेल्या पीक पाहणी संदर्भात दुरुस्तीसाठी प्राप्त अर्जहरकत या मंडळ अधिकारी यांनी संबंधित गावाला भेट देऊन योग्य ती चौकशी करून दुरूस्त करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे य सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 नियम 30 अनुसार खंड 4 मधील गाव नमूना 12 बाबत सूचना क्र. 2 नुसार करण्यात आली आहे. डिजिटल क्रॉप सर्वे (DCSमध्ये केंद्राच्या निर्देशाप्रमाणे शंभर टक्के नोंदीचे फोटो घेणे आवश्यक आहे.

 

यानुसार पुढील सुधारीत तरतुदी तयार करण्यात आली आहे. गाव नमुना बारामध्ये पिके जाहिर केल्यानंतर जर पीकक्षेत्रजलसिंचनाचे साधनपड जमिनीबाबत किंवा शेरा स्तंभातील माहिती (गा. न. 12, स्तंभ 2 आणि 4 ते 11) चुकीची जाहिर झाल्याचे निदर्शनास आल्यास किंवा संबंधित खातेदाराने अशी चूक दुरूस्त करण्यासाठी अर्ज दिल्यास किंवा अशा चुकीबाबत कोणताही आक्षेप प्राप्त झाल्यास ग्राम महसूल अधिकारी हे अर्ज आवक-जावक नोंदवहीमध्ये नोंदवून मंडळ अधिकारी यांच्याकडे अग्रेषित करतील. मंडळ अधिकारी यांची पीक दुरुस्ती आवश्यक असल्याची खात्री पटल्यास मंडळ अधिकारी स्थळ निरीक्षण व ऑफलाईन पंचनामा करतील व मोबाईल अॅपमध्ये सत्यापनकर्ता (verifierलॉगिनने पीक दुरुस्ती करतील. सोबतच जमिनीत दुरुस्तीची मागणी केलेली बाब पीक किंवा पडक्षेत्र असल्यासडिजिटल क्रॉप सर्वे पव्दारे सत्यापनकर्ता (verifierलॉगिन मधून फोटो काढून अपलोड करतील आणि शेरा स्तंभात  ... या कारणास्तव दिनांक../../..रोजी पीक नोंदीत दुरुस्ती केली असे नमूद करतील.

 

याप्रमाणे जाहिर केलेल्या चुकीचा संबंधित खातेदाराने जर कोणत्याही शासकीय सहाय्य योजनेचा लाभ घेतला असल्याचे पुराव्यासह सिद्ध झाल्यासमंडळ अधिकारी या दुरुस्तीची नावसंबंधित राहाय्य यंत्रणेस तात्काळ कळवतीलअसे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना पत्राद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 1144 

2 डिसेंबरला लोकशाही दिन 

नांदेड दि. 27 नोव्हेंबर :  जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोमवार 2 डिसेंबरला नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी लोकशाही दिनामध्ये आपल्या तक्रारीसह उपस्थित व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

निवेदन नोंदणीची सुरूवात दुपारी 12 वा. होणार आहे. त्यानंतर लगेच प्राप्त झालेल्या अर्जावर सुनावणी घेण्यात येणार आहे. नागरिकांनी दुपारी 1 ते 3 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

000

 वृत्त क्र. 1143 

नांदेडमधील 33 केंद्रांवर 1 डिसेंबरला एमपीएससी परीक्षा 

नांदेड दि. 27 नोव्हेंबर : राज्य शासनाने नोकर भरती मोठ्याप्रमाणात सुरू केली असून याअंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 ही येत्या 1 डिसेंबरला होणार आहे. नांदेडमधील सर्व प्रमुख शाळा व महाविद्यालयांमध्ये या परीक्षेचे केंद्र असून परीक्षेसंदर्भात असणारी नाकाबंदी व शंभर मिटर पर्यंत प्रवेश बंदी केली जाणार आहे. नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या महत्त्वपूर्ण परीक्षेला लक्षात घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.    

सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते 5 याकालावधीमध्ये दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे रविवारी सेंटर असलेल्या शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात कोलाहल असणार नाही. कुठेही डिजे वाजणार नाही. किंवा शंभर मिटर पर्यंत मोबाईलपासून सर्व प्रकारच्या साहित्याला परिक्षा केंद्राच्या परिसरात वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 163 अन्वये सर्व निर्बंध लादण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

0000

 वृत्त क्र. 1142 

4 डिसेंबरपासून होणाऱ्या जंतनाशक अभियानात सहभागी व्हा 

जंतनाशक गोळी घेण्यासाठी घाबरू नका 

नांदेड दि. 27 नोव्हेंबर : राज्यात 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येत असून याअंतर्गत 1 ते 19 वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. ही गोळी चावून खाणे गरजेचे आहे किंवा पाण्यात घेता येईल. या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील अर्धापूर, धर्माबाद, लोहा, मुदखेड, नांदेड व उमरी या तालुक्यांमध्ये ही मोहिम राबविली जाणार आहे. सर्व शाळांमधून अल्बेडॅझोलची गोळी देण्यात येणार असून लहान मुलांना पाण्यातून तर 6 ते 19 वयोगटातील मुलांना चावून खाण्यासाठी सांगण्यात येणार आहे. 4 डिसेंबरला जे वंचित राहिले त्यांना 10 डिसेंबरला ही गोळी दिली जाणार आहे. चांगल्या आरोग्यासाठी ही गोळी अतिशय आवश्यक असून शिक्षक, पालक यांनी या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...