Monday, August 3, 2026

 वृत्त क्रमांक 

SIR अंतर्गत नांदेड दक्षिण मतदारसंघाचे 99 टक्के काम पूर्ण ; प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी अंतिम टप्प्यात

नांदेड, दि. 3 ऑगस्ट : 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ‘विशेष सखोल पुनर्निरक्षण’ (Special Intensive Revision-SIR) मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून आजअखेर 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित केवळ 1,847 मतदारांचे काम शिल्लक असून येत्या तीन दिवसांत 100 टक्के काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर आज (3 ऑगस्ट) उपविभागीय अधिकारी कार्यालय, नांदेड येथे विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व बीएलए-1 यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत गणना पत्रांचे वाटप, बीएलओंकडे प्राप्त झालेले व डिजिटायझेशन झालेले फॉर्म, ‘अनकलेक्टेबल’ (मयत, स्थलांतरित, गैरहजर, दुबार इ.) म्हणून नोंद झालेल्या मतदारांची माहिती तसेच प्रस्तावित नवीन मतदान केंद्रांची मतदान केंद्रनिहाय यादी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली.

087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व 312 मतदान भागांमध्ये गणना पत्रांचे 100 टक्के वाटप पूर्ण झाले असून डिजिटायझेशनचे 78 टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण प्रक्रियेत 99 टक्के प्रगती झाली असून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

डॉ. खल्लाळ यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आवाहन केले की, ‘अनकलेक्टेबल’ म्हणून नोंद झालेल्या मतदारांचे गणना पत्र संबंधित बीएलओंकडे जमा करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. ज्या मतदारांनी विहित मुदतीत गणना पत्र सादर केले नाही किंवा ज्यांचे फॉर्म ‘अनकलेक्टेबल’ म्हणून नोंदविण्यात आले आहेत, अशा मतदारांची नावे 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाहीत. अशा मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक पुरावे सादर करावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विशेष सखोल पुनर्निरक्षण (SIR) मोहिमेतील अवघड वाटणारे काम बीएलओ, पर्यवेक्षक, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तसेच राजकीय पक्षांचे बीएलए आणि प्रतिनिधी यांच्या समन्वयातून यशस्वीरीत्या पूर्णत्वाकडे जात असल्याचे सांगून डॉ. खल्लाळ यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.

0000







वृत्त क्रमांक 

माय भारततर्फे 'नशामुक्त युवा -विकसित भारत' संकल्प अभियान उत्साहात संपन्न

नांदेड, दि. 3 ऑगस्ट : भारत सरकारच्या मेरा युवा भारत नांदेड यांच्या वतीने 'नशामुक्त युवा – विकसित भारत' संकल्प अभियानाचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील समाजशास्त्र विभागाच्या सहकार्याने 2 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) आयोजित करण्यात आले. कार्यक्रमास २०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून   राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारोती गायकवाड तसेच जिल्हा युवा अधिकारी अशनी अनिल कनकटे उपस्थित होत्या.

थेट प्रक्षेपणाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील युवकांना व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी पुढील १०० रविवार विविध जनजागृती उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. त्यांनी युवकांना व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान देण्याचा संदेश दिला. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी 'नशामुक्त युवा-विकसित भारत' संकल्पाची शपथ घेतली.

यावेळी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी युवकांची सामाजिक जबाबदारी, व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व आणि राष्ट्रनिर्मितीत युवकांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता अधोरेखित केली. डॉ. मारोती गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

जिल्हा युवा अधिकारी, MY Bharat अशनी अनिल कनकटे यांनी मार्गदर्शन करताना व्यसनमुक्ती ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक चळवळ असून प्रत्येक युवकाने समाजात जनजागृती करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे बंडू कांबळे, सिस्टीम एक्सपर्ट विभागाचे विजय हनवते, सह्याद्री पगडे, नरसिंग कागडा तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, स्वयंसेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

माय भारतच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण करत 'विकसित भारत' घडविण्याच्या राष्ट्रीय संकल्पाला बळकटी दिली.

00000





 


 प्रवीण टाके छत्रपती संभाजीनगरच्या माहिती उपसंचालक पदावर रूजू 

छत्रपती संभाजीनगर दि.03 : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर विभागाचे माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला. 

प्रवीण टाके यापूर्वी कोल्हापूर येथे उपसंचालक म्हणून कार्यरत होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात २००८ ला रुजू झाल्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर मुंबई  मंत्रालयात वरिष्ठ सहायक संचालक असताना ‘लोकराज्य’चे ते कार्यकारी संपादक होते. चंद्रपूर, नागपूर व नांदेड याठिकाणी त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी पदावर कार्य केले आहे. शासन सेवेत केलेल्या उल्लेखनीय कामासाठी त्यांना सन २०१९ - २० वर्षाचा यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. 

पत्रकारितेतील स्नातकोत्तर पदवी प्राप्त असलेले प्रवीण टाके यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा स्व.वसंतराव ओगले पुरस्कार प्राप्त आहे. शासनात येण्यापूर्वी त्यांनी जवळपास १४ वर्ष नागपूर पत्रिका, तरुण भारत, सामना आणि लोकमत वृत्तपत्रात विविध पदावर कार्य केले आहे. त्यांची फकीर ही चरित्र कादंबरी प्रकाशित झाली आहे. वऱ्हाडी भाषेतील स्तंभकार, कवी, लेखक म्हणून त्यांची ओळख असून विविध सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. 

आज विभागीय माहिती कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर, जालना,  बीड, परभणी येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अधिकारी,कर्मचा-यांनी  त्यांचे स्वागत केले. 

*****







Sunday, August 2, 2026

Saturday, August 1, 2026

वृत्त क्रमांक 

"अंगदान जीवन संजीवनी अभियान–२०२६" अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विविध स्पर्धांचे आयोजन 

नांदेड, दि. १ ऑगस्ट : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथील बधिरीकरणशास्त्र विभागाच्या वतीने माननीय अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली "अंगदान जीवन संजीवनी अभियान २०२६" अंतर्गत अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. समाजात अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि "अंगदान करा, जीवन वाचवा" हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धा व जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. 

या अभियानांतर्गत या वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय,नांदेड येथील विद्यार्थी, निवासी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व पथनाट्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत अत्यंत कल्पकतेने या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अवयवदानाचे महत्त्व, त्याविषयीचे गैरसमज दूर करण्याची गरज आणि "एक अवयवदान -अनेक जीवनदान" हा संदेश प्रभावीपणे मांडला. रांगोळी व पोस्टर स्पर्धेत आकर्षक कलाकृतींमधून अवयवदानाचा संदेश साकारण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, हा हृदयस्पर्शी संदेश प्रभावीपणे समाजासमोर मांडण्यात आला. 

यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी अवयवदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असून एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, असे सांगितले. समाजातील प्रत्येक नागरिकाने अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजामध्ये अवयवदानाविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन व जनजागृती निर्माण करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी, असेही त्यांनी नमूद केले. 

याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांसमवेत अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली तसेच अवयवदानाची चळवळ समाजात अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.

00000







 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

बळीराजाला कर्जमुक्तीचा आधार, आपले महाराष्ट्र सरकार !

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...