Friday, July 17, 2026

वृत्त क्रमांक  

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील

शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा 

विशेष अभियानास प्रारंभ 

नांदेड, दि. 17 जुलै  :- प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शासनाच्या निर्देशानुसार १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत विशेष जनजागृती व अर्ज नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. 

अनुदानाबाबत माहिती

शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना २५ टक्के, इतर शेतकऱ्यांना ३० टक्के अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत देण्यात येईल. तसेच उर्वरित १० किंवा १५ टक्के अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना / बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अदा करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना एकूण ९० टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध होईल. 

महाडीबीटी पोर्टलवरील अर्जांची संख्या कमी असलेल्या गावांमध्ये विशेष जनजागृती करण्यात येणार असून तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त अर्ज भरून घेण्यावर भर दिला जाणार आहे. 

तालुका कृषी अधिकारी अर्धापूर यांचेमार्फत  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील सर्व पात्र शेतकऱ्यांना या विशेष अभियानाचा लाभ घेऊन महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित मंडळ कृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

0000



वृत्त क्रमांक  

शेतकरी बांधवांनी अंतिम मुदतीची वाट न बघता पिक विमा योजनेत सहभागी व्हावे

-  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

नांदेड, दि. 17 जुलै  :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२६ अंतर्गत पिक विमा भरणे चालू असून आज रोजी पर्यंत १ लाख ६५ हजार ३५१ शेतकऱ्यांनी २ लाख ८८ हजार ५०७ विमा अर्ज दाखल केले असून १ लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला आहे. पिक विमा नोंदीची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे.

 

यंदा जिल्ह्यात पाऊस कमी आहे सध्या अनेक भागात पावसाचे नितांत गरज आहे. पुढील काळातही कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे याचा परिणाम खरिपातील पिकांवर होत आहे.  उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पिक विमाची संरक्षण गरजेचे पिक विमा भरण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै २०२६ असुन यामध्ये कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही. शेवटच्या दिवसांची वाट न बघता ज्या शेतकऱ्यांना पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी लवकरात लवकर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

 

मागील काही वर्षांचा अनुभव बघता पिक विमा नोंदणीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांची गर्दी होते परिणामी पिक विमा पोर्टलवर प्रचंड ताण येऊन पोर्टल हळू होते किंवा पिक विमा भरतांना अडचणी येतात, त्यामुळे सर्व शेतकरी बाधवांनी पिक विमा नोंदणीच्या अंतिम मुदतीची वाट न बघता आपले जवळचे ग्राहक सेवा केंद्रामध्ये, बँकेमध्ये किंवा स्वतः शेतकरी यांनी पिक विमा पोर्टलवर पिक विमा उतरवून घ्यावा.

 

पिक विमा नोंदणी ग्राहक सेवा केंद्रामध्ये विनाशुल्क केल्या जाते तेसच फार्मर आयडी अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकरी बंधुनी शेतकरी विमा हप्त्याव्यतिरिक्त ज्यादा रक्कम शुल्क म्हणून ग्राहक सेवा केंद्र चालकास देऊ नये. तसेच ग्राहक संवा केंद्रामध्ये सी.एस.सी. लॉग इन मधून पिक विमा नोंदणी करतांना अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी पिक विमा पार्टलवर शेतकरी लॉग इन मधुन पिक विमा नोंदणी  करावी.

 

तसेच ज्या सर्व्हे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आलेला आहे, त्या क्षेत्राच्या ७/१२ उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नसणे, बोगस ७/१२ व पीक पेरा नोदीच्या आधारे पीक विम्याची बोगस प्रकरणे करणे, दुसऱ्या शेतकऱ्याच्या संस्थेच्या क्षेत्रावर बोगस भाडेकरारद्वारे योजनेत सहभाग घेणे, विहित भाडेकरार न करता परस्पर विमा उतरवणे अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात सबंधित दोषर्षीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच, महसूल दस्तऐवजामध्ये फेरफार करून शासनाचे फसवणूकीच्या प्रयत्नाबाबत गुन्हे दाखल करण्यात येतील.

 

बोगस किंवा फसवणूकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळून आल्यास, संबंधित अर्जदारास पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान योजनेसारख्या DBT द्वारे लाभ देण्यात येणाऱ्या कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यापासून पाच वर्ष बंदी घालण्यात येईल. तसेच विमा कंपनीचा सुधारीत टोल फ्री क्रमांक १४४४७ हा आहे कृपया याची सर्व विमाधारक शेतकरी बंधुनी नोंद घ्यावी

00000

 

वृत्त क्रमांक  

सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन  

नांदेड, दि. 17 जुलै  :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 20 जुलै 2026 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी महिला लोकशाही दिनाच्या दिवशी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 20 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधिनी (प्रशिक्षण केंद्र), एसबीआय एटीएमच्या मागे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

वृत्त क्रमांक   

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

विकासकामे गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करावेत - पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, दि. 17 जुलै : जिल्ह्यात शेती, आरोग्य, शिक्षण, वीज, पाणीपुरवठा, रस्ते व अन्य पायाभूत सुविधांची विकासकामे गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजना 2026-27 च्या 867.59 कोटींच्या नियोजनास बैठकीत मान्यता देण्यात आली. शाळांमधील शौचालये, अतिरिक्त वर्गखोल्या, स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे आणि मूलभूत सुविधांवर प्राधान्याने खर्च करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना) सन 2025-26 च्या 790.57 कोटीच्या खर्चास मान्यता आणि 867.59 कोटीच्या खर्चाचे नियोजनास मान्यता दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रविंद्र चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार अमर राजूरकर, आमदार विक्रम काळे, आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव तिडके बोंढारकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार बाबुराव कोहळीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री अतुल सावे म्हणाले, जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर सर्व विभागांनी विशेष भर द्यावा. शाळेच्या जागेची नोंदणी शासनाच्या नावे करण्याची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी, जेणे करुन त्यांना विकासनिधी व सीएसआर निधी मिळण्यात अडचण येणार नाही. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने अल निनोच्या पार्श्वभूमीवर भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन आतापासूनच करावे, असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.

जिल्ह्यातील स्मशानभूमींची प्रलंबित कामे शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत. पीक विम्याच्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. यामध्ये कोणाचीही गय करू नये, असे निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले.

पोचमपाड धरणाच्या बॅकवॉटर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोल्हापूरच्या धर्तीवर उपाययोजना करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. नांदेड शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी 150 इलेक्ट्रिक बसांच्या मागणीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिल्या.

जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्पांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रभावीपणे पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपजिल्हाधिकारी प्रियंका कर्डिले व प्रवीण मेगशेट्टी यांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले.

बैठकीत खासदार अशोक चव्हाण यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना तसेच वीजबिल सवलतीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.

सीसीटीएनएस प्रणालीत राज्यात नांदेड प्रथम

पोलीस विभागाच्या सीसीटीएनएस (Crime and Criminal Tracking Network & Systems) प्रणालीमध्ये महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पालकमंत्री अतुल सावे यांनी पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले.

लोकप्रतिनिधींनी मांडले विविध प्रश्न

बैठकीत खासदार व आमदारांनी वीजपुरवठा, पाणीपुरवठा, पीक विमा, रस्ते विकास, आरोग्य सुविधा, दुबार पेरणीचे संकट, शाळा बांधकाम, बससेवा, दळणवळण सुविधा, स्मशानभूमी, कायदा व सुव्यवस्था, शहरातील सीसीटीव्ही व्यवस्था, वृक्षारोपण, दिव्यांगांसाठीच्या सुविधा, अतिक्रमण, शिक्षक समायोजन, जलसंधारण कामांसाठी निधी, ईव्ही चार्जिंग स्टेशन, शहरातील होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल ऑडिटसह वाहतूक कोंडी आदी विषयांवरील समस्या मांडल्या.

या सर्व प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी लोकप्रतिनिधींना लेखी उत्तर सादर करावे, असेही निर्देश पालकमंत्री श्री. सावे यांनी दिले.

या बैठकीत कंधार तालुक्यातील भगवानराव पेठकर यांच्या कुटुंबाचा विशेष सत्कार करण्यात आला. मुलाच्या विवाह सोहळ्यात 3 हजार 365 नागरिकांचा विमा उतरविण्याचा समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ‘महाभूसंपादन’ ऑनलाइन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे यांनी केले.

या बैठकीनंतर पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विजेच्या समस्यांबाबत करावयाच्या उपयायोजनांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी विजेच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सूचित केले. 

00000










वृत्त क्रमांक   

सरसेनापती नेताजी पालकर स्मारकासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा

तामसा येथील स्मारक उभारणीसंदर्भात पालकमंत्री अतुल सावे यांची सकारात्मक भूमिका

नांदेड, दि. 17 जुलै :- छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरसेनापती नेताजी पालकर यांच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथील ऐतिहासिक समाधी स्थळाचा विकास करून भव्य स्मारक उभारण्यात येणार असून, त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केली.

तामसा येथील समाधी स्थळाच्या विकासासाठी छावा मराठा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अतुल सावे यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात चर्चा केली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी तामसा परिसराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत स्मारक उभारणीसाठी शासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

यावेळी शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक सल्लागार समिती, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन व आढावा समिती स्थापन करणे, स्मारकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे तसेच प्रकल्प व्यवस्थापन समिती (पीएमसी) गठीत करण्याबाबत मागणी केली. 

शिष्टमंडळाच्या निवेदनाची दखल घेत पालकमंत्री श्री. सावे यांनी स्मारक उभारणीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून स्मारकाच्या उभारणीस गती देण्यात येईल. तसेच यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीस किशोर चव्हाण, डॉ. राजेंद्र दाते पाटील, इंजि. तानाजी हुस्सेकर, कामाजी पवार, सुनंदा जोगदंड, डॉ. प्रभाकर जाधव, दीपक पावडे, दीपक राजुरकर, कैलास शिंदे, बबन पाटील, संजय हंबर्डे, सुनील कदम, दशरथ कपाटे, शिवानंद पाटील, विश्वजीत जाधव यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.

00000






वृत्त क्रमांक      

महाराष्ट्रातील पहिल्या “ईव्ही फास्ट चार्जिंग” स्टेशनचे 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात उद्घाटन

नांदेड, दि. 17 जुलै : पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाले.

यावेळी राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण, राज्यसभा खासदार अजित गोपछडे, किनवटचे आमदार भीमराव केराम, नायगावचे आमदार राजेश पवार, भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण, महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री अतुल सावे यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा नियोजन समितीमार्फत हा नाविन्यपूर्ण उपक्रम साकारण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांतील तहसील कार्यालयांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात येत आहेत.

या केंद्रांवर 60 किलोवॅट क्षमतेचे फास्ट चार्जर बसविण्यात आले असून त्याद्वारे एकाच वेळी दोन इलेक्ट्रिक वाहने चार्ज करता येणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात ही सेवा उपलब्ध होणार असून इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरणार आहे.

महाराष्ट्रात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अशा प्रकारे सर्व तालुक्यांमध्ये ईव्ही चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन मिळणार आहे.

हा उपक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आला असून नांदेड जिल्हा हरित व शाश्वत विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

00000






वृत्त क्रमांक      

पालकमंत्री अतुल सावे यांनी विष्णुपुरी उड्डाणपुलाच्या घटनेची केली पाहणी ;

दोषींवर होणार कठोर कारवाई  

नांदेड, दि. 17 जुलै : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथे श्री गुरुगोबिंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या बाजूचा खालचा भाग अचानक कोसळल्याच्या घटनेची राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, केंद्रीय उच्चस्तरीय तज्ज्ञ पथकाने दोन दिवसांपूर्वी घटनास्थळी भेट देऊन उड्डाणपुलाच्या संरचनेची सखोल तांत्रिक तपासणी केली आहे. चौकशीत बांधकामातील त्रुटी, निकृष्ट दर्जाचे साहित्य, कामातील निष्काळजीपणा अथवा संबंधित यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची हयगय झाल्याचे आढळल्यास दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. सावे यांनी स्पष्ट केले. 

पालकमंत्री श्री. सावे यांनी उड्डाणपुलाच्या कोसळलेल्या भागाची पाहणी करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), संबंधित बांधकाम संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. उड्डाणपुलाच्या उर्वरित संरचनेची सुरक्षितता, स्थिरता आणि गुणवत्तेची तपासणी करून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

उड्डाणपुलाच्या बांधकामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा, संरचनात्मक मजबुती तसेच तांत्रिक बाबींची सखोल तपासणी करण्यासाठी आयटीची टीम बोलावणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आवश्यक ती दुरुस्ती, सुधारणा आणि पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. 

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात पर्यायी मार्गाने वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दक्षता घ्यावी. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मोठी दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी संपूर्ण उड्डाणपुलाची तांत्रिक तपासणी करण्यात येत असून चौकशी अहवालाच्या आधारे जबाबदारी निश्चित करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. 

यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित तांत्रिक अधिकारी, जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000








  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी