Tuesday, December 30, 2025

वृत्त क्रमांक 1334

यंदाच्या परीक्षेत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा

नांदेड, दि. 30 डिसेंबर :-मागील वर्षी 2025 झालेल्या परीक्षांतील अनुभव लक्षात घेता, फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित कोणाचीही गय केली जाणार नाही. आवश्यक असल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यताही रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी दिले.

फेब्रुवारी/मार्च 2026 च्या परीक्षांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांची संयुक्त पूर्वतयारी आढावा बैठक आज मातोश्री प्रतिष्ठाण इंजिनिअरिंग कॉलेज, खुपसरवाडी ता. जि. नांदेड येथे पार पडली. ही बैठक विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकररावजी तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

यावेळी विभागीय मंडळाच्या प्रभारी सचिव श्रीमती अनुपमा भंडारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे, संस्थेचे अध्यक्ष कामाजी पवार व सचिव श्री. चारी  उपस्थित होते.

बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी 2025 च्या परीक्षेदरम्यान काही केंद्रांवरील अव्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “परीक्षार्थ्यांना बसण्यासाठी ड्युअल डेस्क नाहीत, कंपाऊंड वॉल नाही, बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे ही दहावी-बारावीची परीक्षा आहे की जत्रा, असा भास होतो,” अशा शब्दांत त्यांनी परिस्थितीवर भाष्य केले.

2026 च्या परीक्षेपूर्वी सर्व परीक्षा केंद्रांनी भौतिक सुविधांची पूर्णता करावी. सर्व परीक्षार्थ्यांना ड्युअल डेस्कची व्यवस्था असावी. सीसीटीव्ही, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था, पंखे, लाईट, रॅम्प, कंपाऊंड वॉल आदी सुविधा अनिवार्यपणे उपलब्ध असाव्यात. या सुविधा आढळून न आल्यास संबंधित केंद्र बंद करण्याची शिफारस करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

परीक्षेदरम्यान एखाद्या केंद्रावर गैरप्रकार झाला किंवा त्यास प्रोत्साहन मिळाल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. कॉपी करून उत्तीर्ण होणे ही अत्यंत खेदजनक बाब असून, गैरप्रकारातून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी भविष्यात चांगला नागरिक होत नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

आजच्या शिक्षण पद्धतीत अंतर्गत मूल्यांकनाचे 20 गुण असून लेखी परीक्षेत 80 पैकी केवळ 15 गुण आवश्यक आहेत. वर्षभरात विद्यार्थ्यांना ही तयारी करून परीक्षा देता येत नसेल, तर त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 2026 च्या परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशाराच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला.

यावेळी विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकररावजी तेलंग यांनी मंडळाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. अपार आयडी, खाजगी विद्यार्थ्यांचे अर्ज, अतिविलंब शुल्काच्या तारखा तसेच कॉपीमुक्त अभियानाची पूर्वतयारी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. गैरप्रकाराला प्रोत्साहन दिल्यास कोणाचाही फायदा होत नाही, उलट नुकसानच होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिक्षणाधिकारी माधव सलगर व दिलीपकुमार बनसोडे यांनीही कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष कामाजी पवार यांनी प्रस्ताविकातून संस्थेच्या कामकाजाची व विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली.

या सहविचार सभेस जिल्ह्यातील 11 तालुक्यांतून सुमारे 635 मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विभागीय मंडळ, लातूर येथील सहायक अधीक्षक श्री. वैद्य यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सहायक शिक्षण उपनिरीक्षक हनुमंत पोकले यांनी परिश्रम घेतले, तर संस्थेचे प्रतिनिधी श्री. किनेकर यांनी पूर्वनियोजन केले.

यापूर्वी 27 डिसेंबर 2025 रोजी शिवनेरी पोदार लर्न स्कूल, बिजूर (ता. बिलोली) येथे पाच तालुक्यांची बैठक पार पडली होती. त्या बैठकीस 217 मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते.

०००००






वृत्त क्रमांक 1333

विना नंबर हायवांवर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक धडक कारवाई

हायवांवर आरटीओकडून ७३ हजार ७५० रुपयांचा दंड; चालक-मालकांना कडक इशारा

रेती, मुरुम, मातीची वाहतूक विना नंबर हायवांद्वारे केल्यास कठोर कारवाई

नांदेड, दि. 30 डिसेंबर :-जिल्ह्यातील बेकायदेशीर विना नंबर अवजड वाहनांवर जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज नांदेड शहरात अचानक धडक कारवाई करत ११ विना नंबर हायवा पकडल्या. लातूर रोडवरील लक्ष्मी पेट्रोल पंप, विष्णुपुरी परिसरात अवैध वाहतुकीच्या उद्देशाने उभ्या असलेल्या अकरा विना क्रमांकाच्या हायवा त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिले.

वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन, शासनाचा महसूल बुडविणे तसेच अपघातांना आमंत्रण देणाऱ्या विना नंबर वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पकडण्यात आलेल्या सर्व विना क्रमांकाच्या हायवा पुढील कार्यवाहीसाठी महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) यांच्या पथकाकडे तात्काळ सुपूर्द करण्यात आल्या.

आरटीओ कार्यालयामार्फत या वाहनांवर नियमानुसार एकूण ७३ हजार ७५० रुपयांचा दंड आकारून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात यापुढेही रेती, मुरुम, माती आदींची वाहतूक विना नंबर, अपूर्ण कागदपत्रे किंवा नियमबाह्य पद्धतीने करणाऱ्या हायवा व इतर अवजड वाहनांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला. “वाहन चालक व मालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

पकडण्यात आलेल्या हायवा वाहनांचे क्रमांक पुढीलप्रमाणे :

एमएच 46 बीबी 9546,

एमएच 26 सीएच 2721,

एमएच 26 सीटी 7779,

एमएच 26 सीएम 7779,

एमएच 26 सीएच 4909,

एमएच 21 बीएच 0804,

एमएच 26 सीएच 7565,

एमएच 29 बीई 4869,

एमएच 26 सीएच 2909,

एमएच 14 एलएक्स 4892,

एमएच 26 सीएच 2429.

००००००





वृत्त क्रमांक 1332

नियमित लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला आढावा; जिल्ह्यात लवकरच 'एचपीव्ही' (HPV) लसीकरण सुरू

नांदेड दि. ३० डिसेंबर:- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय नियमित लसीकरण समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील लसीकरणाच्या विविध निर्देशकांचा (Indicators) सविस्तर आढावा घेण्यात आला आला.या बैठकीत uwin आणि आगामी काळात सुरू होणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेवर विशेष चर्चा करण्यात आली.

ग्रामीण व शहारी भागातील लसीकरणावर भर

बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साधारणतः २ हजार लसीकरण सत्रे व शहरी भागात 250 लसीकरण सत्रे आयोजित केली जातात. या सत्रांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक बालकापर्यंत आणि गरोदर मातांपर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी दिले. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन (Micro-planning) करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

'एचपीव्ही' लसीकरण: ३३ हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट

या बैठकीचे मुख्य आकर्षण म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीची चर्चा झाली आणि मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध होणार हा फार मोठा फायदा होणार आहे . सर्व पात्र लाभार्थ्यांनी या लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

लाभार्थी संख्या: जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येनुसार साधारणतः ३३,००० लाभार्थी या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत.

वयोगट: ही लस १४ वर्षे पूर्ण ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना देण्यात येणार आहे (अर्थात मुलीच्या १४ व्या वाढदिवसानंतर ते १५ व्या वाढदिवसापर्यंत).

विविध निर्देशकांचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण इंडिकेटरवाईज प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये प्रलंबित राहिलेली बालके (Left-outs) आणि अर्धवट लसीकरण झालेली बालके (Drop-outs) शोधून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. माता व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी नियमित लसीकरण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या महत्त्वपूर्ण बैठकीला  उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुटे, शिक्षण अधिकारी माधव सलगर, एस एम ओ लातूर डॉ. अमोल गायकवाड, बाळ रोग तज्ञ विभागप्रमुख,.किशोर राठोड, आयएपी नांदेड डॉ सुहास बेंद्रीकर,  जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका दराडे जिल्हा सहनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी अनिल कांबळे, शहरी कार्यक्रमाधिकारी सोनुले सुहास,रोहित जोशी तसेच संबंधित विभागाचे इतर अधिकारी  उपस्थित होते.

००००००



Monday, December 29, 2025

वृत्त क्रमांक 1331

निवडणूक आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द

नांदेड, दि. 29 डिसेंबर :- राज्य निवडणूक आयोगाचे पत्र 15 डिसेंबर 2025 अन्वये राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 2025-26 जाहिर झाला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात 15 डिसेंबर 2025 पासून महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यत म्हणजेच 16 जानेवारी 2026 पर्यत आचारसंहिता अंमलात राहील. त्यामुळे माहे जानेवारी 2026 या महिन्यात पाहिल्या सोमवारी म्हणजेच 5 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

वृत्त क्रमांक 1330

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

नांदेड, दि. 29 डिसेंबर :- ग्राहकांचे हक्क व ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार 2 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे दुपारी १ वाजता करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार असून, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष राहुल पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

कार्यक्रमात ग्राहक पंचायतचे संघटक ॲड. आनंद बळवंतराव कृष्णापूरकर, उपाध्यक्ष सायन्ना मठमवार व सहसचिव ॲड. दिपाली डोणगावकर हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

तरी सर्व ग्राहक व नागरिकांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 1329

निवडणूक आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द

नांदेड, दि. 29 डिसेंबर :-  राज्य  निवडणूक आयोगाचे पत्र 15 डिसेंबर 2025 अन्वये राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 2025-26 जाहिर झाला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात 15 डिसेंबर 2025 पासून महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यत म्हणजेच 16 जानेवारी 2026 पर्यत आचारसंहिता अंमलात राहील. त्यामुळे माहे जानेवारी 2026 या महिन्यात पाहिल्या सोमवारी म्हणजेच 5 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 1328

नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक

विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमित      

नांदेड, दि. 29 डिसेंबर :- राज्य निवडणूक आयोगाकडून नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यात महापालिका सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून नांदेडचे जिल्‍हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्‍वये अधिकाराचा वापर करुन विविध बाबींवर निर्बंध आदेश निर्गमीत केले आहेत.  

निवडणूक कालावधीत विश्रामगृह वापरावरील निर्बंध

शासकीय व निवडणूकीच्‍या कामावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्‍या व्‍यतीरिक्‍त, इतर कोणत्‍याही व्‍यक्‍तीस महानगरपालिका मतदार संघ कार्यक्षेत्रासह नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहात थांबण्‍यासाठी संबंधित खात्‍याने दिलेला अधिकृत परवाना असल्‍याशिवाय किंवा सक्षम अधिकाऱ्याच्‍या पूर्व परवानगीशिवाय प्रवेश करण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे. 

ध्‍वनीक्षेपक, ध्‍वनिवर्धकाचा वापर

कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर सक्षम प्रधिकाऱ्याच्‍या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरत्‍या वाहनांवर ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिर्धकाचा वापर करता येणार नाही. महाराष्‍ट्र शासन पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्रमांक ध्‍वनीप्र 2009/प्र.क्र.12/08/ता.क.1, दिनांक 31 जुलै, 2013 नुसार ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर ध्‍वनि प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून करावी. ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर सकाळी 6 वाजेपुर्वी आणि रात्री. 10 वाजेनंतर करता येणार नाही. 

कार्यालये, विश्रामगृहे परिसरातील निर्बंध

नांदेड वाघाळा महानगरपालिका कार्यक्षेत्राचे हद्दीपावतो, सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाची कार्यालये, विश्रामगृहे इत्‍यादी परिसरात कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने, कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर निर्बंध राहतील. 

शासकीय वाहनाच्‍या गैरवापरास प्रतिबंध

निवडणूकीचे कालावधीत नांदेड वाघाळा महानगरपालिका मतदार संघ कार्यक्षेत्रासह नांदेड जिल्ह्यात नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीपावेतो निवडणूक कालावधीत कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने (Cars/Vehicles) वापरण्‍यास या आदेशाव्‍दारे प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. 

वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलके, झेंडे लावणे इत्‍यादी बाबीस काही प्रतिबंध

फिरत्‍या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्‍या डाव्‍या बाजुला विंड स्‍क्रीन ग्‍लासच्‍या पुढे राहणार नाही आणि तो त्‍या वाहनाच्‍या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्‍त राहणार नाही. प्रचाराच्‍या फिरत्‍या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्‍या आसनामागे वाहनाच्‍या डाव्‍या व उजव्‍या बाजुनेच लावण्‍यात यावा. इतर कोणत्‍याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्‍या वाहनावर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधीत पक्षाचे जिल्‍हाध्‍यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांच्‍या वाहना व्‍यति‍रीक्‍त इतर कोणत्‍याही वाहनावर लावता येणार नाही. 

सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालय स्‍थापन करण्यास निर्बंध 

नांदेड वाघाळा महानगरपालिका मतदार संघ कार्यक्षेत्र पावेतो निवडणूकीचे कालावधीत धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये किंवा शैक्षणिक संस्‍था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. 

सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे, चिन्‍हांचे कापडी फलके, भाषण देण्याबाबतचे निर्बंध

निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे, चिन्‍हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. 

शासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची विरुपता करण्‍यास निर्बंध

निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष स्‍वरुपात विरुपता करण्‍यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.

शस्‍त्र परवानाधारकाकडील शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यावर बंदी

निवडणूकीचे कालावधीत शासकीय कर्तव्‍य पार पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचारी, बँक सुरक्षा गार्ड यांचे व्‍यतिरिक्‍त इतर सर्व परवाना धारकास परवान्‍यातील शस्‍त्रास्‍त्रे बाळगण्यास व वाहून नेण्‍यास या आदेशान्‍वये बंदी घालण्‍यात आली आहे. 

वरील सर्व आदेश नांदेड जिल्ह्यातील नांदेड वाघाळा महानगरपालिका मतदारसंघ कार्यक्षेत्राच्या हद्दीपावेतो आदेश निर्गमीत झाल्‍याचा दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून 16 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री पर्यंत अंमलात राहतील. 

नामनिर्देशनपत्र दाखल करताना अवलंब करावयाची कार्यपद्धत 

नांदेड जिल्ह्यात नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या 100 मी. च्या बाहेर वाहने व मिरवणूक थांबवावी. तसेच वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या/वाहनांना तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात उमेदवारासोबत तीन पेक्षा जास्त व्‍यक्‍तीनी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्‍या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे/ वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने आणि कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक‍ प्रचार करणेस प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.

हा आदेश नांदेड जिल्‍हयाच्या नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या हद्दी पावेतो 23 डिसेंबर 2025 चे 6 वाजेपासून ते 3 जानेवारी 2026 चे मध्यरात्री पर्यंत अंमलात राहील.

00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...