Thursday, February 9, 2023

                         आरोग्याच्या महायज्ञाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर१८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखानायोजनेच्या

 विस्ताराची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

राज्यात ५०० ठिकाणी सुरू होणार 'आपला दवाखाना'

 

            मुंबईदि. ९ : राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर१८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीजागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" या योजनेच्या विस्ताराची घोषणा देखील केली. राज्यातील सगळ्या घटकांचं आरोग्य उत्तम राहावं, यासाठी हे सारे उपक्रममोहिमा आपण हाती घेतल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज येथे सांगितले.

            आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध आरोग्य शिबिरांचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंतरोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरेआरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेआयुक्त धीरजकुमारसंचालक डॉ.विजय कंदेवाड यांच्यासह राज्यभरातील जिल्हा शल्यचिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आपल्या सरकारची वाटचाल सुरू आहे. सामान्यांच्या जीवनाशी निगडीत असे आरोग्यविषयक विविध उपक्रम आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांच्या पुढाकारातून राज्यभर हाती घेण्यात आली आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

            आजच्या दिवसाचं औचित्य साधत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" या योजनेच्या विस्ताराची घोषणा केली. मुंबईपाठोपाठ आता राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरू होणार असून सुमारे ५०० ठिकाणी आपला दवाखान्याचा शुभारंभ होणार आहे, ही आनंदाची बाब असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

            ‘राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयंउपजिल्हा रुग्णालयंग्रामीण रुग्णालयंस्त्री रुग्णालयंनागरी सामुदायिक आरोग्य केंद्रनागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत "आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आरोग्य शिबिरांत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी होईलचसोबतच त्यांना आवश्यक ते उपचार देखील मिळतील. याचाही लाभ राज्यभरातील जनतेला होईल’असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            मी स्वतः रक्तदान करीत असतोहे सांगत मुख्यमंत्री यावेळी म्हणालेरक्त ही निसर्गानं आपल्याला दिलेली मौल्यवान देणगी असूनत्यांच निरपेक्ष भावनेनं दान करण्यासारखं पुण्यकर्म नाही. हीच बाब लक्षात घेऊन आज राज्यात सुमारे ३६६ ठिकाणी "महारक्तदान शिबिरांचंही आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांत सहभागी होऊन रक्तदान कराव एखाद्या गरजूला जीवनदान द्याअसं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

            महाराष्ट्र नेहमीच रक्तसंकलनात देशात अग्रेसर असतो. तो यापुढेही राहीलअसा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करताना त्यांचे आभारही मानले. संकलित रक्त कुठेही वाया जाणार नाहीयाची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. 

            राज्यात जागरुक पालक, सुदृढ बालक मोहीमही हाती घेण्यात आली आहे. राज्यातील सुमारे १८०० शाळांमधील १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी या अंतर्गत होणार आहे.

            राज्यातील सगळ्या घटकांचं आरोग्य उत्तम राहावं, यासाठी हे सारे उपक्रममोहिमा आपण हाती घेतल्या आहेत. आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे त्यासाठी कौतुकास पात्र आहेत. यापुढेही सामान्य माणसाची आरोग्यसेवा अशाप्रकारे होत राहील आणि आपला महाराष्ट्र समृद्ध आणि निरोगी राहीलअशा सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

००००



सुधारित वृत्त क्रमांक 61

 सुधारित वृत्त क्रमांक 61

ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी

जिल्ह्यात शनिवार व रविवारी विशेष मोहिम

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

नांदेड (जिमाका) दि. 9  :- जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ॲपद्वारे पीक पेरा नोंदणी करावी. यासाठी 11 ते 12 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हाभरात ई-पीक पेरा नोंदणीसाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, शेतीमित्र, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी अशा स्वयंसेवकांच्या सहकार्याने ई-पीक पेरा नोंदवण्याची मोहिम पार पाडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपमध्ये ई-पीक पेरा अचूक नोंद करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत करण्यात आले आहे. 

क्षेत्रीय स्तरावरून पीक पाहणी Real time crop data संकलित होण्याच्यादृष्टिने तसेच सदर डाटा / माहिती संकलन करतांना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप चालू करून त्यात पीक पाहणी नोंदवण्याची नवीन पद्धत शासनाने सुरू केली आहे. पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळण्यासाठी, पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेचा आहे.  

00000

वृत्त क्रमांक 62

 जिल्ह्यातील सर्व न्यायालयात

शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यावतीने शनिवार 11 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयात व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय नांदेड येथे ही राष्ट्रीय लोकअदालत संपन्न होईल. सर्व संबंधित पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एन. व्ही. न्हावकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्रीमती डी. एम. जज यांनी केले आहे.

 
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, धनादेश अनादरीत झाल्याबाबतची प्रकरणे तसेच कौंटुबीक न्यायालयातील तडजोड होण्यायोग्य प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे इत्यादी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय या लोकअदालतीत  दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलीफोन बिल, विविध बॅंकांचे कर्ज वसुलीचे प्रकरण, थकीत पाणी बिल, ट्राफिक चलन आदी प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढल्या जातील.

 

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये झालेल्या निवाडयाविरुद्ध अपील नाही. प्रलंबीत प्रकरणात भरलेली कोर्ट शुल्काची रक्कम शंभर टक्के परत मिळतो. नातेसंबंधात कटुता निर्माण होत नाही अशा प्रकारे लोकन्यायालयाच्या माध्यमातून सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो. पक्षकारांनी येतांना आपले अधिकृत ओळखपत्र घेवून यावे. या लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

Tuesday, February 7, 2023

वृत्त क्रमांक 60

अनुज्ञप्ती चाचणीबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 7 :- नांदेड जिल्ह्यासाठी बुधवार 8 फेब्रुवारी 2023 रोजी हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम (रहे) कंधार ऊर्स निमित्त स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे. या दिवशी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती चाचणीचे अपॉईंटमेंटची तारीख बदलून दिनांक 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी ठेवण्यात आली आहे. बुधवार 8 फेब्रुवारी 2023 रोजी शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीसाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी याची नोंद घेऊन sarathi.parivahan.gov.in या पोर्टलवर आपल्याला चाचणी करीता दिलेल्या दिनांकाची खात्री करून घ्यावी. सदर दिनांकास कार्यालयात चाचणीकरीता आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.
00000

वृत्त क्रमांक 59

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त

गुरूवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन


नांदेड (जिमाका) दि. 7 :- राज्याचे 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विभागाच्यावतीने राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातही सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय  या  शासकीय आरोग्य संस्थेच्या माध्यमातून गुरूवार 9 फेब्रुवारी 2023 रोजी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी  शिबीरजागरूक पालक तर सदृढ बालक तसेच हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

या कार्यक्रमानंतर आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे.  या आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत येणाऱ्या रुग्णांची बिपी, शुगर, नेत्र तपासणी (डायबेटीक रेटीनोपथी) सर्व प्रकारचे कर्करोगाशी संबंधित तपासणी, बाल आरोग्य इत्यादी संदर्भात आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यांतर्गत  सर्व गरजू रुग्णांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 58

 ज्येष्ठांप्रती आदराच्या भावनेसाठी प्रत्येक शालेय कार्यक्रमात ज्येष्ठांचा सन्मान

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका) दि. 7 :- ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक सुरक्षिततेच्यादृष्टिने अनेक भावनिक कंगोरे पुढे येतांना आपण पाहतो. यात नवीन पिढी व त्या-त्या घरातील आजी-आजोबा यांचे नाते ही एक समृद्ध नात्याची ठेव आहे. कुटुंबातील आजी-आजोबांचे योगदान लक्षात घेता अंगणवाडी पासून शाळेपर्यंत आजी-आजोबांनाही विविध कार्यक्रमांना निमंत्रीत करून त्यांचा गौरव करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शिक्षण विभागाला दिले. अशा उपक्रमातून पाल्यांच्या मनातही ज्येष्ठांप्रती आदरयुक्त भावना वृद्धीस लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश डी. एम. जज, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष अशोक तेरकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर, ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. कलटवाड, जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
आपल्या कुटुंबातील पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती या अग्रही असतात. यादृष्टिने आपले कुठे योगदान जर आवश्यक असेल तशी संधीही ते तपासून पाहत असतात. घरातील लहान मुलांना शाळेसंदर्भात मदत करणे हा त्यांच्यासाठी आनंदाचा भाग असतो, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात दर बुधवारी दुपारी 12 ते 2 कालावधी ज्येष्ठांसाठी राखीव
ज्येष्ठांच्या वैद्यकिय सेवा-सुविधांबाबत तात्काळ उपचार व्हावेत यादृष्टिने सर्व शासकीय रुग्णालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि आठवड्यातील प्रत्येक बुधवारी दुपारी 12 ते 2 या कालावधी ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या कालावधीत ज्येष्ठांच्या उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधांनुसार सर्व तपासण्या केल्या जातील. विशेषत: ज्येष्ठांमध्ये फ्रोजन सोल्डर व इतर आजाराच्या तक्रारी असतात त्यासाठी उपलब्ध सुविधेनुसार परिपूर्ण सेवा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले. अत्त्यावश्यकता भासेल यानुसार जिल्ह्यातील एमपीजीवाय अंतर्गत जेवढी रुग्णालय आहेत त्या सर्व रुग्णालयांना विशेष बाब म्हणून ज्येष्ठांना सवलत देण्याबाबत अशा रुग्णालयांना विनंती केली जाणार आहे.
ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी लवकरच नाना-नानी पार्क येथील केंद्र होईल पूर्ववत
ज्येष्ठांच्या मनोरंजनासाठी, करमणुकीसाठी मनपा व त्या-त्या नगरपरिषदांनी एक करमणुकीचे केंद्र विकसीत करावे अशी मागणी आहे. त्यादृष्टिने नाना-नानी पार्क येथे पूर्वीचे केंद्र पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी दिली. याचबरोबर चौफाळा, सिडको याठिकाणी शासनाच्यावतीने वेगळा निधी उपलब्ध करून घेण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष सेल
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता व कौटुंबिक अथवा इतर वादाच्या समुपदेशनासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यानुसार 112 या दूरध्वनी क्रमांकावर कोणत्याही गरजू नागरिक, महिला अथवा बालकांना केंव्हाही संपर्क साधून मदतीची मागणी करता येते. याच्या नियोजनासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याचबरोबर कोणत्याही पोलीस स्टेशनला मदतीसाठी केंव्हाही नागरिकांना जाता येईल. जिल्ह्यात या सेल मार्फत आज पर्यंत एकुण 39 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 13 प्रकरणांत आपसी तडजोड करण्यात आली. पोलीस स्टेशनला 4 अर्ज वर्ग करण्यात आले. सहा प्रकरणात मा. न्यायालयात दाद मागवून समज पत्र देण्यात आले. वरील सर्व अर्ज सद्यस्थितीत निकाली काढण्यात आले आहे. पोलीस विभाग यासाठी दक्ष आहे.
00000



Monday, February 6, 2023

 वृत्त क्रमांक 57 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन    

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू पात्र विद्यार्थ्यांनी आपला अर्ज 10 फेब्रुवारी ते 4 मार्च 2023 पर्यंत  ऑनलाईन भरुन कार्यालयीन वेळेत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, नांदेड येथे समक्ष सादर करावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना http://www.syn.mahasamajkalyan.in या संकेतस्थळवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. गरजू विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून सदर अर्जाची एक प्रत सहाय्यक आयुक्त कार्यालयातील स्वाधार शाखेकडे जमा करावी. संकेतस्थळावर योजनेच्या अटी व शर्ती तसेच अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रांची यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी दि. 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी खर्चाची बाबीत भोजन भत्ता 28 हजार, निवास भत्ता 15 हजार, निर्वाह भत्ता 8 हजार प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम  51 हजार रूपये एवढी आहे.  नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अनुज्ञेय रक्कम  आहे. या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येतो.  

सदर योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. विद्यार्थी कोणत्याही शासकीय वस्तीगृहात प्रवेशित नसावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यास इयत्ता दहावी/ अकरावी, बारावी, पदवी, पदविकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.  विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागु राहणार नाही. 

विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंव्हा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यावसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील.​​ तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले / आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे.

00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...