Tuesday, January 3, 2023

 राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2022 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

        माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2023 असा आहे.

            राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पुरस्कारांची माहिती

अ.क्र

पुरस्काराचे नाव

पारितोषिक

1

अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)

1,00,000/- लाख रूपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

2

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

3

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह वप्रशस्तीपत्र)

4

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

5

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

6

यशवंतराव चव्हाण पुरस्कार

शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)


7

पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

8

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

9

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

10

समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

11

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

12

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)


 


विभागीय पुरस्कार

13

दादासाहेब पोतनीस पुरस्कार,

नाशिक विभाग

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र,

या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

14

अनंतराव भालेराव पुरस्कार,

औरंगाबाद आणि लातूर विभाग

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

15

 

आचार्य अत्रे पुरस्कार,

मुंबई विभाग

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

16

नानासाहेब परूळेकर पुरस्कार,

पुणे विभाग

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

17

शि.म.परांजपे पुरस्कार,

कोकण विभाग

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

18

ग.गो.जाधव पुरस्कार,

कोल्हापूर विभाग

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

19

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार,

अमरावती विभाग

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

20

ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार,

नागपूर विभाग

51 हजार रुपये

(मानचिन्ह प्रशस्तीपत्र)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 











नियम व अटी

राज्य / विभागीय पुरस्कार

 

        पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षांची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिध्दीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पध्दतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी व राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. 

            उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिध्द झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल. 

            पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. 

            अर्जदाराने राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही. 

मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कार पात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनंसपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील. 

            ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल. 

            जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई(कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिध्द झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येतील. 

गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 पाठविता येतील.

 शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधीत विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील. 

            2022 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

            प्रवेशिका राज्यस्तर किंवा विभागीय स्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत, अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.

             प्रत्येक गट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. 

अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार

        महाराष्ट्र राज्याच्या बाहेर पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृतीचे काम करणाऱ्या व आपल्या लेखणीने पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या व सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी विषयांवर सातत्याने लिहिणाऱ्या व्यक्तींना, अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय) सन 2018 या वर्षापासून सुरू करण्यात येत आहे.

             राष्ट्रीय स्तरावरील संपादक/पत्रकार यांनी किमान 25 वर्ष दिल्ली वा देशातील इतर प्रांतात, नामवंत व दर्जेदार दैनिक/पाक्षिक/साप्ताहिक यामध्ये काम केलेले असावे. 

            या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवितानाअर्जदाराने वृत्तपत्र/इलेक्ट्रॉनिक्स मिडीयामध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्वाच्या बातम्या, लेख, वृत्तविशेष इत्यादींची कात्रणे/व्हिडीओ सीडी हे त्याच्या प्रसारणाच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे.

             इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार यासाठीही लागू असतील.                 

 

विकास योजना संदर्भातील

समाज माध्यम (सोशल मीडिया) पुरस्कार

 

            ही स्पर्धा वृत्तविषयक/चालू घडामोडीविषयक संकेतस्थळे व ब्लॉग या समाज माध्यमात प्रसारित मराठी भाषेतील वृत्तविषयक विशेषत: शासकीय मजकुरासाठी आहे. या दोन माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्कारासाठी सहभाग घेता येईल. समाज माध्यमातील पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. हे लेखन किमान एक वर्षापासून सुरु असावे. या माध्यमाचा वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी संकेतस्थळ व ब्लॉग या समाज माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या प्रसिद्धींची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रीत प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात.  विविध पुरस्कारासाठी असलेल्या अटी या गटासाठी लागू राहतील.

 

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार

 

 

            केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान आणि राज्य शासनाचे स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लेखनातून लोकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लेखन करणाऱ्या पत्रकारांना तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधील पत्रकारांना सहभागी होता येईल.

 

स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव योजना, घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅस तसेच वीज निर्मिती इत्यादी बाबत लेखन केलेले असावे.शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता विषयक योजनांची प्रसिध्दी, स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी लेखनाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेले जनजागृतीपर लेखन यांचा या स्पर्धेत अंतर्भाव होईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

 

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी स्पर्धा

 

        इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्र जोडलेले असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

 

            प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता, उपंसचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला,  हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तचित्रकथा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून, पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती  करण्यात येईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील. 

 

                                छायाचित्रकार पुरस्कार 

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा, ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे. यात सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे, समाजातील प्रश्न मांडणारी छायाचित्रे, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी पूरक ठरतील अशी छायाचित्रे यांच्यासह प्रवेशिका सादर करता येईल.

 

            महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी. पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक कामाच्या प्रसिध्दीसाठी जाणिव जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी यांचा विचार केला जाईल. एकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास, तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही. पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिध्द झाले असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख, नियतकालिकाचे नाव प्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही. 

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. 

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार 

ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोअीफोडे यांनी त्यांच्या लेखणीद्वारे समाजातील अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा यावर सातत्याने आसूड ओढले. आपल्या अग्रलेखांद्वारे प्रभावीरीत्या सामाजिक जाणीव जागृती करणारे संपादक म्हणून सुधाकर डोअीफोडे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. विविध विकास कामांची विशेषत: शासकीय विकास कामांची त्यांनी आपल्या अग्रलेखाद्वारे सकारात्मक प्रसिद्धी केली. विविध विकास कामांची दखल, आपल्या अग्रलेखांद्वारे घेणाऱ्या पत्रकार/संपादकांना, पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार देण्यात येईल. 

या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील संपादकांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी लिहिलेले अग्रलेख हे स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावे. 

            प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे. 

            इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी या पुरस्कारासाठीही लागू असतील. 

0000 

वृत्त क्रमांक 7

 घर, अंगण, शिवारासह परसबाग फुलविण्यासाठी 

महिलांनी घ्यावा पुढाकार

- अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर

 

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- माझ घर, माझ अंगण, माझ शिवार महिलांच्या योगदानाशिवाय फुलू शकत नाही. यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याला पोषक असलेल्या बाबींसह परसबाग, फळझाडे आपल्या अंगणात लाऊन बदलाची छोटी सुरूवात करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी केले.

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात महिला आर्थिक विकास महामंडळ नांदेड व वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड व रिलायन्स  फाऊंडेशन नांदेड यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदेविभागीय संनियत्रण अधिकारी सिद्धाराम माशाळेजिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, प्रकल्प उपसंचालक एम. आर. सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, माविमचे चंदनसिंह राठोड, आहारतज्ञ उर्मिला जाधव, श्रीमती साळवे, वृक्षमित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर, रिलायन्स  फाऊंडेशनचे योगेश जोशीप्रा. चंद्रकांत गजभारे व जिल्ह्यातील विविध बचतगटांच्या महिलांची उपस्थिती होती.

 

शेती आणि महिलांचे अतूट नाते आहे. शेतीच्या व्यवसायात महिलांचा सहभाग जास्त आहे. त्यामूळे महिलांनी शेतीसोबतच शेती प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य दिले पाहिजे. बचतगटांच्या महिलांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.  घरातच परसबाग तयार करुन भाजीपाला लागवड करुन सेंद्रीय भाजीपाला पिकविण्यावर महिलांनी भर द्यावा, असे  वृक्षमित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर यांनी सांगितले. प्रा. चंद्रकांत गजभारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या.

 

दोन दशकांपूर्वी प्रत्येक अंगणात महिला या वेलवर्गीय भाज्यांचे उत्पादन घ्यायचे. अलिकडच्या काळात घराघरात वाढणारे व घरोघरी वाटल्या जाणारे हे वेलवर्गीय कार्ले, शेंगा, भोपळा, लौकी, दोडके, चमकुरा, पेरू, लिंबू, शेवगा आदी फळभाजीपाला पिके हद्दपार झाली असून पुन्हा त्याकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांच्या आरोग्यासाठी पोषणमुल्य असलेली ही परसबाग फुलविण्यासाठी महिलांनी पुढे सरसावले पाहिले, असे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सांगितले.  जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात यांनी आहाराविषयी माहिती दिली. यावेळी वृक्षमित्र फाऊंडेशनच्यावतीने बचतगटांच्या महिलांना देशी बियाणांचे किट वाटप करण्यात आले.

0000

 वृत्त क्रमांक 6

ग्रामीण डाक जीवन विमाधारकाच्या वारसाला

5 लाख 24 हजार रुपयाचा धनादेश वितरीत


नांदेड (जिमाका) दि. 3 :- कंधार तालुक्यातील भीमगड कंधार येथील ग्रामीण डाक जीवन विमाधारक राहुल आत्माराम झगडे (वय 35 वर्षे) यांचे हृदय विकाराच्या आजाराने दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी निधन झाले. त्यांनी 2 हजार रुपये प्रती महिना याप्रमाणे 5 लाख रुपयाचा ग्रामीण डाक जीवन विमा दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी घेतला होता. हा विमा घेऊन त्यांना केवळ 7 महिने झाले होते. त्यांच्या या निधनानंतर डाक विभागामार्फत त्यांच्या वारस पत्नी श्रीमती शिल्पा राहुल झगडे यांना 5 लाख 24 हजार रुपयाचा धनादेश डाकघर अधीक्षक राजीव पालेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

 

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ग्रामीण डाक जीवन विमा वरदान ठरत असून प्रत्येकांनी आपली बचत व संरक्षण म्हणून ग्रामीण डाक जीवन विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडचे डाकघर अधिक्षक राजीव पालेकर यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक  5 

रस्ते अपघातातील अधिकांश प्रमाण

हे आपल्या बेजबाबदार वर्तणाचेच प्रतीक

-  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर  

·  वाहतुक नियमांच्या साक्षरतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने रस्त्यावर उतरून केले आवाहन   

नांदेड (जिमाका) दि. 3 :- इतरांप्रती आदराची भावना ही सदैव चांगल्या वर्तणाची दिशादर्शक असते. इतरांना दुखवू न देता नम्रतेच्या भावनेत जर आपण स्वत:ला ठेवले तर कोणत्याही कायद्याची पायमल्ली होण्याचा प्रश्न उरत नाही. तथापि न कळत सातत्याने होणारे कायद्याचे उल्लंघन हा जर आपल्या वर्तणाचा भाग बनला तर त्याची किंमत ही जीवघेणी ठरू शकते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. विशेषत: रस्ते अपघात हे आपल्या गैर व बेपर्वा वर्तवणुकीचे द्योतक असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर  यांनी केले. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित साक्षरता उपक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा येथे वाहतुकीच्या नियमाबाबत पत्रके वाटून वाहतुक साक्षरता अभियानाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर-जज, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे, वाहतुक शाखा पोलीस निरीक्षक श्री. ननवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविणाऱ्या व्यक्तींना प्रातिनिधीक स्वरूपात पत्रक देऊन हेल्मेट वापरण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांनी केले. याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून यातील पहिला टप्पा 6 जानेवारी रोजी भव्य रॅलीने पूर्ण केला जाणार आहे. रस्त्यावरील अपघातात पादचारीही बळी पडतात. हे निष्पाप बळी रोखण्यासाठी रस्त्याच्या उजव्या बाजुने चला हे अभियान जाणिवपूर्वक हाती घेतल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी दिली.

0000




Monday, January 2, 2023

वृत्त क्रमांक 4

ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचा बहाद्दरपुरा येथे  

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 

·    शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी

पुष्पचक्र अर्पण करून दिली श्रद्धांजली 

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- मराठवाड्यातील कंधार, लोहा, मुखेड या तीन तालुक्यांच्या सिमेवर असलेल्या डोंगराळ भागातील शेतकरी कष्टकऱ्यांचा लोकनेता म्हणून गणल्या गेलेल्या स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे यांच्यावर आज बहाद्दरपुरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शासनाच्यावतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.      

स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे यांना जिल्हा पोलीस दलाच्यावतीने बंदुकीच्या हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. केशवराव धोंडगे यांच्या अर्धांगिनी चंद्रप्रभावतीबाई धोंडगे यांच्याकडे पार्थिवावरील तिरंगा यथोचित सन्मानाने सुर्पूद करण्यात आला. ॲड मुक्तेश्वर धोंडगे, प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे या दोन सुपुत्रांसह त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना यावेळी शोक अनावर झाला.  यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या शोकसंदेशाचे वाचन करण्यात आले.

यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी आमदार गुरुनाथराव कुरूडे, ईश्वराव भोसीकर, पाशा पटेल, ओमप्रकाश पोकर्णा, रोहिदास चव्हाण, शंकरअण्णा धोंडगे, ज्ञानोबा गायकवाड, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धवराव भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000




वृत्त क्रमांक 3

 औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक

कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण संपन्न   

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- निवडणूक आचारसंहितेबाबत भारतीय निवडणूक आयोगाने स्वयंस्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्देशाप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घेतली पाहिजे. यासंदर्भात दिरंगाई, इतर कारणे लक्षात घेतली जाणार नाहीत, असे निर्देश, जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. 

05-औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यपद्धतीबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे प्रशिक्षण आज आयोजित केले होते.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपरजिल्‍हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संतोषी देवकूळे, तहसिलदार ज्योती चव्हाण व निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व तालुक्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या अडचणी व प्रश्नांचे निराकरण जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी योग्यरितीने झाली पाहिजे यासाठी आपण शासन, प्रशासन म्हणून काम केले पाहिजे असे अपरजिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सांगितले.   

औरंगाबाद शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीत तीन पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकामध्ये फ्लाईग स्कॉड टीम (FST), व्हिडीओ सरव्हायलन्स टीम (VST), व्हीडीओ व्हिवींग टीम (VVT)  याचा समावेश आहे. ही पथके भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आली आहेत. या पथकात नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आचारसंहितेचे उल्लंघन व आचारसंहितेबाबत तक्रार प्रकरणांची चौकशी, मतदारास लाच देणे, धमकी देणे, गैरवाजवी दडपण टाकणे, समाजकंटकाच्या हालचालीवर लक्ष ठेवणे, शस्त्र बाळगणे, मतदारांना लाच देण्यासाठी मद्य व पैशाचा वापर करणे यासंदर्भात प्राप्त तक्रारीची चौकशी करणे, निवडणूक संदर्भात होणाऱ्या खर्चाबाबत प्राप्त तक्रारींची चौकशी करणे आदी जबाबदारी आहे.  प्रत्येक महत्वाच्या घटनांचा तपशिल पाहून निरीक्षणे नोंदविणे तसेच सीडीत आढळलेल्या बाबींचा अहवाल त्यादिवशी सादर करण्याबाबतचे प्रशिक्षण व सादरीकरण निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोषी देवकूळे यांनी केले.

00000

वृत्त क्रमांक 2

 प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे  

तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबीर

 

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी जानेवारी ते मार्च 2023 मध्ये तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या अधीन राहून ऑनलाईन अपॉटमेंट प्रत्येक महिन्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. अपॉटमेंट घेतलेल्या सर्व अर्जदारांनी याबाबतची नोंद घ्यावी व शिबिर कार्यालयास उपस्थित राहावेअसे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

 

तालुकानिहाय शिबिराचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. कंधार येथे 4 जानेवारी, 3 फेब्रुवारी, 3 मार्च 2023 तर किनवट येथे 6 जानेवारी, 6 फेब्रुवारी, 6 मार्च 2023 आहे. मुदखेड येथे 9 जानेवारी, 8 फेब्रुवारी, 8 मार्च 2023 रोजी आहे. हदगाव येथे 11 व 20 जानेवारी, 10 व 20 फेब्रुवारी, 10 व 20 मार्च 2023 रोजी आहे. धर्माबाद येथे  13 जानेवारी, 13 फेब्रुवारी, 13 मार्च 2023 रोजी आहे. तर हिमायतनगर येथे 27 जानेवारी, 24 फेब्रुवारी , 29 मार्च 2023 रोजी आहे. माहूर येथे 16 व 30 जानेवारी, 16 व 28 फेब्रुवारी, 16 व 30 मार्च 2023  रोजी आहे. यानुसार शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

0000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...