Tuesday, January 3, 2023

वृत्त क्रमांक 7

 घर, अंगण, शिवारासह परसबाग फुलविण्यासाठी 

महिलांनी घ्यावा पुढाकार

- अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर

 

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- माझ घर, माझ अंगण, माझ शिवार महिलांच्या योगदानाशिवाय फुलू शकत नाही. यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याला पोषक असलेल्या बाबींसह परसबाग, फळझाडे आपल्या अंगणात लाऊन बदलाची छोटी सुरूवात करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी केले.

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात महिला आर्थिक विकास महामंडळ नांदेड व वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड व रिलायन्स  फाऊंडेशन नांदेड यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदेविभागीय संनियत्रण अधिकारी सिद्धाराम माशाळेजिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, प्रकल्प उपसंचालक एम. आर. सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, माविमचे चंदनसिंह राठोड, आहारतज्ञ उर्मिला जाधव, श्रीमती साळवे, वृक्षमित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर, रिलायन्स  फाऊंडेशनचे योगेश जोशीप्रा. चंद्रकांत गजभारे व जिल्ह्यातील विविध बचतगटांच्या महिलांची उपस्थिती होती.

 

शेती आणि महिलांचे अतूट नाते आहे. शेतीच्या व्यवसायात महिलांचा सहभाग जास्त आहे. त्यामूळे महिलांनी शेतीसोबतच शेती प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य दिले पाहिजे. बचतगटांच्या महिलांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.  घरातच परसबाग तयार करुन भाजीपाला लागवड करुन सेंद्रीय भाजीपाला पिकविण्यावर महिलांनी भर द्यावा, असे  वृक्षमित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर यांनी सांगितले. प्रा. चंद्रकांत गजभारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या.

 

दोन दशकांपूर्वी प्रत्येक अंगणात महिला या वेलवर्गीय भाज्यांचे उत्पादन घ्यायचे. अलिकडच्या काळात घराघरात वाढणारे व घरोघरी वाटल्या जाणारे हे वेलवर्गीय कार्ले, शेंगा, भोपळा, लौकी, दोडके, चमकुरा, पेरू, लिंबू, शेवगा आदी फळभाजीपाला पिके हद्दपार झाली असून पुन्हा त्याकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांच्या आरोग्यासाठी पोषणमुल्य असलेली ही परसबाग फुलविण्यासाठी महिलांनी पुढे सरसावले पाहिले, असे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सांगितले.  जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात यांनी आहाराविषयी माहिती दिली. यावेळी वृक्षमित्र फाऊंडेशनच्यावतीने बचतगटांच्या महिलांना देशी बियाणांचे किट वाटप करण्यात आले.

0000

No comments:

Post a Comment

 बेसबॉल छायाचित्र