Monday, August 22, 2022

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी दिनांक 24 ते 25 ऑगस्ट 2022 रोजी महास्वयंम या संकेतस्थळावरून ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीतजास्त ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छुक उमेदवारांना जॉब सिकर ऑप्शनमध्ये नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. जॉब सिकर ऑप्शन या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. नांदेड जिल्हा पंडित दीनदयाल ऑनलाईन जॉब Fair 1 मेळावा असे दिसेल. त्यातील Action या पर्यायाखालील दोन बटणांपैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल. तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील व क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. हा संदेश काळजीपूर्वक वाचून आय Agree बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे (पदाचे नाव,  शैक्षणिक अहर्ता, आवश्यक कौशल्य, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण) दिसेल.

 

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्य यानुसार पदाची निवड करावी व अर्जाच्या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर एक संदेश दिसेल हा संदेश काळजी पूर्वक वाचून ओके बटणावर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यामध्ये आपला ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेलकंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप, व्हॉटसॲप ईव्दारे) संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील. अधिक माहितीसाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर सपंर्क साधावा, असे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

000000

Sunday, August 21, 2022

 अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय

 - कृषि मंत्री अब्दुल सत्तार

 

· नांदेड येथे मराठवाडा विभागीय पातळीवर कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

·  पूरग्रस्त भागाची पाहणी

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतजमिनीचे, पशुधनाचे आणि विशेषत: घरांचे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ मदत कशी पोहचवता येईल याचे नियोजन आम्ही करत आहोत. याबाबत येत्या पाच दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. महसूल यंत्रणा व कृषि विभाग यांनी समन्वयातून उरलेले पंचनामे तात्काळ कसे पूर्ण होतील याचे नियोजन करण्याचे आदेश कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

 

येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात मराठवाडा विभागीय पातळीवरील कृषि आढावा बैठक त्यांनी घेतली. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा सदस्य अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार अमर राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार रत्नाकर गुट्टे, प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा कृषि विकास अधिकारी डॉ. डी. जी. चिमनशेट्टे व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमदार डॉ. राहुल पाटील,  विभागातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते.

 

जुलै पर्यंत झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे झालेले आहेत. तथापि जुलै नंतरही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील काही मंडळात पाचवेळा तर काही मंडळात तीन वेळा तर काही मंडळात दोनवेळा अतिवृष्टी झाली. एकाच हंगामात पाच-पाच वेळा जर अतिवृष्टी होत असेल तर स्वाभाविकच या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात घ्यावे लागेल. उर्वरीत पंचनामे अधिक गतीने पूर्ण करणे हे अत्यावश्यक असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी यात दक्षता घेऊन तात्काळ नियोजन करावे, असे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

 

नांदेड जिल्ह्यात 89 मंडळापैकी तब्बल 82 मंडळात अतिवृष्टी आहे. जिल्ह्यातील 8 लाख 12 हजार हेक्टर कृषि क्षेत्रापैकी 50 टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्र बाधित आहे. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबाबत अधिकाधिक मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सद्यस्थितीत विधानसभेचे अधिवेशन सुरू असून अधिवेशाबाहेर कोणत्याही घोषणा करता येत नाहीत. ज्या-ज्या भागात जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई तात्काळ मिळावी यादृष्टिने मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून वस्तुस्थिती सांगणार आहे. लवकरच याबाबत धोरानात्मक निर्णय घेतला जाईल हे त्यांनी स्पष्ट केले.

 

जिल्हा प्रशासन, कृ्षि विभाग आणि विमा कंपनी यांच्यामध्ये परस्पर समन्वय असणे खूप आवश्यक आहे. यात तिघांनी मिळून जर नुकसानीचा पंचनामा केला तर त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचला जाईल, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

 

जिल्ह्यात शेतीच्या नुकसानीसह जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.   ज्या शेतकऱ्यांच्या हाती काही पीक शिल्लक आहे त्यांना सावरण्यासाठी विजेची शाश्वत उपलब्धता असणे आवश्यक आहे. परंतू अनेक गावात ट्रान्सफार्मरचे आयुष्य संपत आले असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात दुरूस्तीही करणे आवश्यक झाले आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 5 कोटी रुपयांची तरतुद करून तात्काळ चांगले ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली.

 

यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार मेघनाताई बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार डॉ. राहूल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आग्रही मागणी केली.  

 

पूरग्रस्त भागाची पाहणी

पूरग्रस्त भागाची पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद व प्रत्यक्ष गावातील परिस्थिती समजून घेण्यासाठी कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी विदर्भापासून दौरा सुरू केला आहे. आज नांदेड जिल्ह्यातील प्रातिनिधीक गावांना त्यानी भेट देऊन पाहणी केली. कासारखेडा, नांदुसा, विष्णुपुरी, जानापुरी, सोनखेड भागातील परिस्थितीची त्यांनी पाहणी केली.

 

अशी आहे विभागीय पाहणी

औरंगाबाद विभागात सरासरी खरीप पेरणी क्षेत्र 48.57 लाख हेक्टर असून सन 2022-23 मध्ये 47.99 लाख हेक्टर क्षेत्रावर 98.80 टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीन पिकाची 2450056.42 हेक्टर क्षेत्रावर व कापूस पिकाची 1372886.82 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

 

औरंगाबाद विभागामध्ये 1 जुन ते 19 ऑगस्ट 2022 दरम्यान 570.80 मि.मी. पाऊस पडला असून सरासरी पाऊसाच्या तुलनेत 130.11 टक्के इतका पाऊस पडलेला आहे. एकुण 52 दिवसामध्ये सदरचा पाऊस पडलेला आहे. औरंगाबाद विभागात एकुण 450 महसूल मंडळे असून त्यापैकी 207 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे.

 

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 मध्ये औरंगाबाद विभागात एकुण 66,30,913 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून 35,21,449 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे एकुण 1,80,017 पूर्व सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

 

औरंगाबाद विभागामध्ये जुन ते जुलै 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे एकुण 8,11,845 शेतकरी बाधित झालेले असून 5,87,466.41 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राच्या नुकसान भरपाईपोटी 403.58 कोटी रकमेची आवश्यकता आहे. तसेच 489.11 हेक्टर शेतजमीन खरडून / वाहून गेली  असून त्याचा नुकसान भरपाईपोटी 1.43 कोटी रकमेची आवश्यकता असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

00000











 स्वस्त धान्य वाटपाबाबत

जनतेने गैरसमज करून घेऊ नये 

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- तांत्रिक अडचणीमुळे धान्‍यसाठा दुकानात उपलब्‍ध असतांनाही स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार धान्‍य वाटप करु शकत नाहीअसे नांदेड तालुक्‍यातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार संघटनेने कळविले आहे. या तांत्रिक अडचणी लवकरात लवकर धान्‍य वाटप करण्‍यासाठी शासन स्‍तरावर कार्यवाही करण्यासाठी कळविण्‍यात आले आहे. ही कार्यवाही लवकरात लवकर होईल. धान्‍य वाटपाबाबत दुकानदार हे जाणुनबुजुन धान्‍य वाटप करीत नाहीतअसे गैरसमज जनतेने करुन घेवू नयेअसे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

00000

Saturday, August 20, 2022

 वेतन देयकासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची

ऑनलाईन आज्ञावलीत माहिती नोंदविणे आवश्यक

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- कर्मचारी सर्वंकष माहितीकोष-2022 तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातील व त्यांच्या आस्थापनेवरील नियमित, नियमितेत्तर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी व तदर्थ तत्वावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची 1 जुलै 2022 या संदर्भ दिनांकाची माहिती ऑनलाईन आज्ञावली मध्ये नोंदविणे आवश्यक आहे.

 

ही माहिती ऑनलाईन नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र-1 जोडल्याशिवाय वेतन देयके कोषागार कार्यालयाकडुन स्विकारण्यात येणार नाहीत. याची सर्व राज्य शासकीय आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या शासकीय कार्यालयांची वेतन देयके कोषागारात सादर होत नाहीत. अशा सर्व कार्यालयानी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करावी. कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2022 बाबत ऑनलाईन आज्ञावलीमध्ये माहिती नोंदवावी. अधिक माहितीसाठी उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय नांदेड व त्यांचा दुरध्वनी क्रमांक 02462-252775 तसेच कार्यालयाचा ई-मेल dso.nanded@hotmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक निखील बासटवार यांनी केले आहे.

00000

 केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा

उच्च शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- केंद्र शासन  पुरस्कृत  अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना, महाविद्यालयीन व  विद्यापिठातील विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक  शिष्यवृत्ती योजना या तीन योजनेची अंमलबजावणी उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येतात. सन 2022-23 साठी या योजनेसाठी केंद्र शासनाच्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरुन 20 जुलै 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. विद्यार्थ्याना ऑनलाईन अर्ज करण्याची अंतीम मुदत 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत तर महाविद्यालयांनी अर्जाची पडताळणी करण्याचा अंतीम दिनांक 15 नोव्हेंबर 2022 हा आहे.

 

केंद्र शासन  पुरस्कृत  अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना राज्यातील मुस्लिमख्रिश्चनशीखबौध्दपारशी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांसाठी केंद्रशासन पुरस्कृत मॅट्रिकोत्तर (पोस्ट मॅट्रीकशिष्यवृत्ती योजना राबविली जाते. शिष्यवृत्तीसाठी वर्ग 11 ते पीएचडी व्यावसायिक डी.एड्.बी.ए., एम.एड्., आय.टी.आय., सर्व डिप्लोमा व अकरावी/बारावी स्तरांवरील एम.सी.व्ही.सी. अभ्यासक्रम (तंत्र शिक्षण विभागातील व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यादीतील अभ्यासक्रम सोडून)  इतर सर्व अभ्यासक्रमांचे विद्यार्थी पात्र आहेत. अर्जदाराच्या पालकांचे  वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाखापेक्षा अधिक नसावे.

 

महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना केंद्र शासनामार्फत नवीन शिष्यवृत्तीसाठी / नुतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज शिष्यवृत्ती पदवी व पदव्युत्तर  व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी आहे. अर्जदाराच्या पालकांचे  वार्षिक उत्पन्न रुपये 4 लाख 50 हजारापेक्षा अधिक नसावे.

 

महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना वर्ग 11 वी12वीपोस्ट मॅट्रिक डिप्लोमा / सर्टिफिकेट पदवीपदव्युत्तर डिग्री / डिप्लोमा तसेच डिप्लोमा व सर्टिफिकेट या अभ्यासक्रमासाठी देण्यात येते. अर्जदाराच्या पालकांचे  वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा अधिक नसावे.

 

सर्व महाविद्यालयांनी त्यांची केवायसी व आधार डेमो ऑथेटिंफीकेशन व स्वत:ची नोंदणी चालू  वर्षात करावी नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलवर नोंदणी करावी.  शिष्यवृत्ती योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार पात्र व इच्छुक विद्यार्थ्यानी नवीन मंजूरीसाठी व नूतनीकरणासाठीचे अर्ज www.scholarships.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. नॅशनल स्कॉलरशिप (एनएसपी)   या मोबाईल ॲपवर अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. या योजनेबाबत लाभ पात्रता व स्वरुप याबाबतची माहिती संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. एनएसपी पोर्टलवरील पात्र शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) नांदेड विभाग, नांदेड कार्यालयाने केले आहे.

00000

 गणेश मंडळांना वर्गणीसाठी

परवाना घेण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- गणेश चतुर्थीसाठी गणेश मंडळांना वर्गणी गोळा करण्याचा परवाना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्यावतीने 22 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत रविवार व शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत देण्यात येणार आहे. सर्व गणेश मंडळांनी परवानगी घेऊनच वर्गणी गोळा करावी, असे आवाहन नांदेडचे धर्मादाय उपआयुक्त किशोर मसने यांनी केले आहे. 

गणेश मंडळांना ही परवानगी ऑनलाईन / ऑफलाईन पद्धती देण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन परवाना मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे. 

परवान्यासाठी सर्व सभासदांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ई-मेल आयडी, दुरध्वनी क्रमांक, जागा मालकाची संमती, पोलीस स्टेशनचे नाहरकत प्रमाणपत्र, गणेश मंडळ स्थापनेबाबत ठराव, मागील वर्षी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून वर्गणी गोळा करण्यासाठी परवानगी घेतली असले तर गेल्या वर्षाचा अधिकृत लेखा परिक्षकामार्फत जमा खर्चाचा हिशोब या कागदपत्रांची आवश्यकता आहे, असेही आवाहन धर्मादाय उप आयुक्त, नांदेड विभाग, नांदेड यांनी केले आहे.   

00000

 सद्भावना दिवस  सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याच्या सूचना  

नांदेड (जिमाका) दि. 20 :- माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा जयंती दिवस 20 ऑगस्ट हा दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. याअनुषंगाने सामाजिक ऐक्य पंधरवडा हा 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2022 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावनासौहार्द भाव वृद्धींगत करुन हिंसाचार टाळण्यासाठी हा पंधरवडा साजरा केला जातो. 

 

सद्भावना दिवस  सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याचे जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखउपविभागीय अधिकारीतहसिलदार यांनी अल्पसंख्यांक विकास विभागाच्या 17 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमीत केलेल्या शासन परिपत्रकातील सूचनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करावे. कार्यक्रम साजरा करुन कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावाअशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

00000 

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...