Tuesday, August 27, 2019


वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत
४०,८९६ परतावा अर्जांचा निपटारा
- सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि.२७: वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत  शासनाने आतापर्यंत ९८८८ कोटी रुपये रकमेच्या ४० हजार ८९६ अर्जांचा निपटारा केला आहे. शासनास ४३ हजार ०८९ अर्जाद्वारे ११५०७ कोटी रुपयांचे परताव्याचे दावे प्राप्त झाले होते. त्यापैकी जवळपास ९५ टक्के अर्जांचा निपटारा झाला असल्याची माहिती वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
            सुलभ आणि वेळेवर परतावा वितरण करणारी यंत्रणा असणे हे कार्यक्षम कर प्रशासनाचे वैशिष्ट्य असते असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, यामुळे खेळते भांडवल, व्यापार विस्तार आणि विद्यमान व्यवसायाचे आधुनिकीकरण यासाठी निधी उपलब्ध होतो.
परतावा मिळणारी प्रकरणे
            वस्तू आणि सेवांची निर्यात, सेझ युनिट्स  व सेझ विकासकांना केलेला पुरवठा, डिमड् एक्सपोर्ट (deemed export) म्हणून कायद्याने मान्य केलेला पुरवठा, संयुक्त राष्ट्र किंवा दुतावासाद्वारे केलेल्या खरेदीचा परतावा, विक्रीपेक्षा खरेदीवरील मालाच्या कराचा दर अधिक असल्याने खात्यात जमा होणाऱ्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा परतावा, चुकून भरल्या गेलेल्या जास्तीच्या कराचा परतावा, रोखीच्या खात्यात अतिरिक्त शिल्लक प्रकरणांमध्ये कराचा परतावा देण्याची वस्तू आणि सेवा कर कायद्यात तरतूद आहे.
परताव्यासाठी ऑनलाईन अर्ज
परताव्यासाठी अर्ज प्रमाणित करून देण्यात आला असून तो ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.  यामुळे करदाता आणि कर अधिकारी यांच्यातील प्रत्यक्ष संबंध कमी झाला आहे. प्रत्येक परताव्या दाव्यासोबत बिलाचे स्टेटमेंट पुरेसे असते. प्रत्यक्ष बिले जोडण्याची आवश्यकता नाही अशी माहिती ही वित्तमंत्र्यांनी दिली.
जीएसटीएनसाठी मॅन्युअल व्यवस्था
जीएसटीएन पोर्टलवरील परतावा मॉड्युल कार्यान्वित होईपर्यंत परताव्याचे दावे प्रत्यक्ष (मॅन्यूअल) पद्धतीने दाखल करण्याची सुविधा ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र हे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योजक-व्यापाऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यामध्ये देशातील अग्रगण्य राज्य असून लवकरच ही पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होईल्‍ असा विश्वास ही त्यां वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
निर्यातीवरील कर परतावा
परताव्याचा अर्ज मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत परतावा मंजूर केला जातो. निर्यातीवरील कर परताव्याच्या बाबतीत यातील ९० टक्के  कर परतावा योग्य आणि पूर्ण अर्ज मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत तर उर्वरित १० टक्के परतावा ६० दिवसांच्या आत दिला जातो.
ठोस तोडगा
मंजूर परताव्यामध्ये सीजीएसटी,आयजीएसटी किंवा एसजीएसटीचा समावेश असतो. प्रत्यक्ष अंतिम वितरणासाठी लेखा कोषागारे वेगवेगळी असल्यामुळे केंद्र आणि राज्याच्या अधिकाऱ्यांकडून हे परतावे वेगवेगळे वितरित केले जातात. वस्तू आणि सेवा कर परिषद यावर ठोस तोडगा काढत आहे, यामुळे परतावा मंजूर होण्यास लागणारा विलंब कमी होण्यास मदत होईल असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.
000


राज्य युवा संसदेसाठी
 बिलोली, नांदेड येथील युवकांची निवड
नांदेड, दि. 27 :- युवा जागर- महाराष्ट्रावर बोलू काही " राज्यामध्ये युवा संसद सन 2019 अंतर्गत  नांदेड जिल्हास्तर युवा संसद कार्यक्रमाचे उद्घाटन 24 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 10  वा. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय बंदाघाट नांदेड येथे संपन्न झाले.
या स्पर्धेत खालील स्पर्धकांची राज्य युवा संसदेकरीता निवड करण्यात आलेली आहे. 1) कु. गावंडे सुषमा सुभाष- विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय बिलोली- प्रथम  (विषय- भारताची चांद्रयाण मोहीम). 2) कु.पठाण तहनियत लियावतखान- माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, कुंडलवाडी ता.बिलोली- द्वितीय- (विषय - स्वच्छ भारत अभियान). 3) कु.काकडे प्रविण गोविंद- यशवंत महाविद्यालय,नांदेड - तृतिय (विषय - प्रधानमंत्री पिक विमा योजना).
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सुधीर शिवनीकर, प्राचार्य, नेताजी सुभाषचंद्र बोस महा.नांदेड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन निळकंठ पाचंगे, वरिष्ठ लेखापरिक्षक, सहसंचालक कार्यालय, उच्च शिक्षण नांदेड, राजेश्वर मारावार, जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड, प्रा.डॉ.दिपक कासराळीकर, माजी मराठी विभाग प्रमुख, प्रा.डॉ.पी.डी.सुर्यवंशी राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वातंत्र्य सेनानी सुर्यभान पवार कॉलेज पुर्णा, प्रा.शंतनु कस्तुरे, ने.सु.बो.महा., माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड, क्रीडा अधिकरी किशोर पाठक, प्रवीण कोंडकर क्रीडा मार्गदर्शक, श्रीमती शिवकांता देशमुख, लेखा सहाय्यक आनंद सुरेकर, संजय चव्हाण,प्रा.सत्यकाम पाठक, उपप्राचार्य, श्रीमती चंदा रावळकर, समन्वयक, नेहरु युवा केंद्र,नांदेड, ॲड.विष्णु गोडबोले, उपाध्यक्ष, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटन तथा आयोजन समिती सदस्य, वैजनाथ स्वामी, जिल्हा युवा पुरस्कारार्थी तथा समिती सदस्य, विजय होकर्णे छायाचित्रकार आनंद जोंधळे तालुका क्रीडा संयोजक आदी उपस्थित होते.
डॉ.सुधीर शिवनीकर, प्राचार्य, नेताजी सुभाषचंद्र बोस महा.नांदेड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये उपस्थित सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिले स्पर्धकांना भारतीय संसदेच्या रचनेची कार्यपध्दती कशी असते याबाबतची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.
            याप्रसंगी मुख्य परिक्षक निळकंठ पाचंगे, डॉ.दिपक कासराळीकर, प्रा.डॉ.पी.डी.सुर्यवंशी, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार उपशिक्षणाधिकारी श्री.सलगरे समन्वयीका नेहरु युवा केंद्र श्रीमती चंदा रावळकर यांनी उपस्थित स्पर्धकांना या उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले.
प्रस्ताविकात क्रीडा अधिकारी किशोर पाठक यांनी सांगितले, इयत्ता 11 वी 12 वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय संसदेची रचना कार्यपध्दतीचे विस्तृत ज्ञान व्हावे हा मुख्य उद्देश समोर ठेवून शालेय शिक्षण क्रीडा विभागांतर्गत शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय युवा संसद करीता जिल्हयातुन 10 गट / तालुका निश्चित करण्यात आले होते. त्यामुधन प्रथम, द्वितीय तृतिय क्रमांक प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय युवासंसद मधुन प्राविण्य प्रथम, द्वितीय तृतिय क्रमांक संपादन करणाऱ्या स्पर्धकांना पुढील राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे असेही सांगीतले.
या जिल्हास्तरीय युवा संसदसाठी नांदेड जिल्हयातील 10 गटातुन 15 ते 19 वर्षे वयोगटातील कनिष्ठ महाविद्यालयातील 27 स्पर्धकांसमवेत पालक, शिक्षक महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेकरीता मुख्य परिक्षक म्हणुन निळकंठ पाचंगे यांनी काम पाहीले तर यांच्या सोबत प्रा.डॉ.दिपक कासराळीकर, माजी मराठी विभाग प्रमुख, प्रा.डॉ.पी.डी.सुर्यवंशी, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वातंत्र्य सेनानी सुर्यभान पवार कॉलेज पुर्णा, प्रा.शंतनु कसतुरे, नेताजी सुभाषचंद्र बोस महा नांदेड यांनी काम पाहीले.
विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक अनुक्रमे 10 हजार रुपये, 7 हजार रुपये 5 हजार रुपये स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. पुढील राज्यस्तरीय युवा संसद करीता विजयी स्पर्धकांना सर्वांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.श्रीमती कुरुडे यांनी केले तर आभार प्रवीण कोंडेकर, क्रीडा अधिकारी यांनी मानले.  
000000




जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 4.26 मि.मी. पाऊस
नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यात मंगळवार 27 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 4.26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 68.17 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 492.31 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 51.47 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 27 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 3.25 (505.63), मुदखेड- 3.33 (537.02), अर्धापूर- 6.67 (417.97), भोकर- 1.50 (505.20), उमरी- 2.67 (491.11), कंधार- निरंक (436.49), लोहा- 1.00 (399.60), किनवट- 8.29 (674.97), माहूर- निरंक (644.21), हदगाव- 9.00 (462.28), हिमायतनगर- 17.33 (541.02), देगलूर- निरंक (352.17), बिलोली- निरंक (523.40), धर्माबाद- 13.33 (499.65), नायगाव- 1.80 (469.00), मुखेड- निरंक (417.27). आज अखेर पावसाची सरासरी 492.31 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 7876.99) मिलीमीटर आहे.
00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...